जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक :146/2012 दाखल तारीख :12/10/2012
निकाल तारीख :12/05/2015
कालावधी :02वर्षे 07 म.
रविंद्र बोयतराम अग्रवाल,
वय 44 वर्षे, धंदा व्यापार,
रा. निलंगा, ता. निलंगा जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) दि ब्रँच मॅनेजर,
नॅशनल इंशुरन्स कंपनी लि.
मालु बिल्डींग हनुमान चौक, लातूर.
2) दि ब्रँच मॅनेजर,
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद,
शाखा निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. ..... सामनेवाला
कोरम :1) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
2) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.डी.आर.डाड.
गै.अ.क्र.1 तर्फे :अॅड.के.एच.मुगळीकर.
गै.अ.क्र.2 तर्फे : अॅड.व्ही.पी.कुलकर्णी.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा:श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत सामनेवालार( विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून, त्याचे सामनवेाला क्र. 2 यांच्याकडून तवेरा कार नं. एम.एच.24/एल 0565 कर्जाने 2008 साली घेतली. त्यावेळेस पासुन तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून गाडीचा विमा संरक्षण खरेदी केले आहे. तक्रारदाराची सदर गाडीचे विमा संरक्षण हे दि. 19.10.2011 रोजी पुर्ण होत असल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांच्यानावे चेक क्र. 018156 चा रु. 11604/- दि. 13.10.2011 रोजीचा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा निलंगा बँके वरील दिला. त्यानुसार सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या नावे वाहन क्र. एम.एच.24/एल 0565 चा विमा संरक्षण रक्कम रु. 4,73,022/- IDV ने दि. 19.10.2011 ते 18.10.2012 या कालावधीसाठी स्विकारले. त्याची पॉलिसी क्र. 271401/31/11/6100002308 असा दिला.
तक्रारदाराच्या वाहनाचा दि. 11.11.2011 रोजी पहाटे 4.00 वाजण्याच्या सुमारास वाहनाचे समोरील टायर फुटुन अपघात झाला. सदर घटनेची माहिती तक्रारदाराने सामनेवाला व पोलिस स्टेशन यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला, व सामनेवाला यांचा सर्व्हेअर श्री अभिजित नलावडे यांनी सविस्तर सर्व्हे केला, सर्व्हेअरने सर्व्हे रिपोर्ट सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे सादर केला, असे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे विमा प्रस्ताव रक्कम रु. 1,27,058/- चा दाखल केला. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांना विमा क्लेम दाखल केल्यानंतर सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास दि. 17.11.2011 रोजी दि. 21.10.2011 रोजी बँक ऑफ अमेरिका शाखा चेन्नई येथे चेक सादर केला, तक्रारदारास परत दिला व तक्रारदाराची पॉलिसी रद्द केली असल्याचे सांगीतले. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांना विचारणा केली असता, सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेल्या माहिती व सल्ल्यानुसार जास्तीची रक्कम (ओव्हरडयु) व व्याज आकारुन तक्रारदाराच्या विमा पॉलिसीचे नुतनीकरण करुन दिली. त्यापोटी तक्रारदाराने रक्कम रु. 15,877/- रोख सामनेवाला क्र.1 यांच्याकडे जमा केले.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना दि. 02;06.2012 व दि. 23.06.2012 रोजी पत्र देवुन काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदाराने दि. 07.07.2012 रोजी वकीला मार्फत कायदेशिर नोटीस दिली. त्यास ही उत्तर न दिल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने विमा क्लेम दाखल केलेली रक्कम रु. 1,27,058/- , रक्कम रु. 2 लाख गाडी कमी किंमतीत विकुण झालेली नुकसानीची किंमत व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 1,00,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 14 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणने दि. 03.12.2012 रोजी दाखल झाले असून, तक्रारदाराने सदर अपघातग्रस्त वाहन हे आमच्याकडून कर्जावर खरेदी केले आहे, परंतु तक्रारदाराच्या तक्रारी नुसार तक्रारदार व आमच्यात कोणताही वाद नसुन, तक्रारदाराचा व सामनेवाला क्र. 1 यांच्यातील वाद असल्यामुळे आमच्या विरोधातील तक्रारदाराची तक्रार रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे मुदतीत दाखल न केल्यामुळे त्यांचे विरोधात दि. 04.03.2013 रोजी लेखी म्हणणे दाखल केले नाही असा आदेश न्यायमंचाने पारित केला. सामनेवाला क्र. 1 यांनी सदर आदेश रद्द करुन, लेखी म्हणणे दाखल करण्या संदर्भात दि. 13.11.2013 रोजी लेखी म्हणणे व वकालतनामा दाखल केला. त्यावर न्यायमंचाने रु. 200/- कॉस्ट आकारुन सामनेवाला क्र. 1 यांचे लेखी म्हणणे दाखल करुन घेतले.
सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 13.10.2011 रोजी चेक क्र. 018156 चा रु. 11604/- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा निलंगा वरील चेक एजंट श्री ओमप्रकाश स्वामी यांनी आणुन जमा केला. त्यानुसार दि. 19.10.2011 ते दि. 18.10.2012 या कालावधीसाठी पॉलिसी क्र. 27/404/31/6100002308 नुसार तक्रारदारास पॉलिसी देण्यात आली असे म्हटले आहे. तक्रारदाराचा अपघात दि. 11.11.2011 रोजी झाला, परंतु तक्रारदाराने दिलेला चेक दि. 13.10.2011 रोजीचा न वटल्यामुळे सदर चेक तक्रारदारास वापस दिल्या कारणाने तक्रारदाराची पॉलिसी रद्द केली.
सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 19.10.2011 रोजी तक्रारदाराचा चेक बँक ऑफ अमेरिका शाखा चैन्नई येथे सादर केला. परंतु तो न वटल्यामुळे दि. 21.10.2011 रोजी तक्रारदारास परत पाठवल्याचे सांगीतले. तक्रारदाराची पॉलिसी रद्द असल्याकारणाने आम्ही तक्रारदारास सदर क्लेम ची रक्कम न देवुन कोणतीही सेवेत त्रूटी केली नाही. तसेच तक्रारदाराने दि. 02.06.2012, दि. 23.06.2012 चे पत्र व 07.07.2012 रोजी पाठवलेचा कायदेशीर नोटीसे बाबत आम्हास मिळाल्याचे सिध्द करावे असे म्हटले आहे. तसेच पॉलिसी नुतनीकरण करतांना जास्तीची रक्कम व व्याजासह भरुन पॉलिसी नुतनीकरण केले असल्याबाबतचे तक्रारदाराने सिध्द करावे, असे ही म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्या सोबत शपथपत्राशिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले आपले लेखी म्हणणे यांचे बारकाईने वाचन केले असता, तक्रारदाराने विमा पॉलिसीची मुदत संपण्यापुर्वीच पॉलिसी नुतनीकरण केली होती हे दोघांनाही मान्य आहे. तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा निलंगा वरील चेक सामनेवाला क्र. 1 यांचा एजंट श्री स्वामी यांच्याकडे रक्कम रु. 11604/- चा दि. 13.10.2011 रोजी दिला. सामनेवाला यांनी सदर केच लातूर शाखेत जमा न करता, तो चेक चेन्न्ई येथील शाखेत बँक ऑफ अमेरिका मध्ये दि. 19.10.2011 रोजी सादर केला. सामनेवाला यांनी सदर चेक तक्रारदारास वटला नसल्यास त्वरीत कळवणे आवश्यक होते, तसे कृत्य सामनेवाला यांनी न करता, तक्रारदाराचा अपघात ता. 11.11.2011 चा क्लेम फॉर्म् दिल्यानंतर तक्रारदारास सदर बाब कळवण्यात आली.
तक्रारदाराने ज्या स्टेट बँक हैद्राबाद च्या कर्ज खात्याचा चेक दिला होता, त्याचा खाते उतारा दाखल केला आहे. त्यानुसार तक्रारदाराने चेक दिलेल्या तारखे पासुन ते तक्रारदारास चेक परत मिळे पर्यंतच्या तारखे पर्यंत तक्रारदाराच्या खात्यावर सदर चेक सामनेवाला यांच्याकडून लावण्यात आलेला असल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या खात्यावर चेक वटण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम खात्यात असल्याचे खाते उता-यावरुन दिसून येत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि. 08.12.2011 रोजी पॉलिसी नुतनीकरण केल्या संदर्भात सिध्द करावे असे म्हटले आहे. त्यानुसार तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्राच्या यादीतील क्र. 9 वर दि. 08.12.2011 रोजीची मुळ पावती दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 यांचा एजंट श्री. ओमप्रकाश वैजनाथ स्वामी यांचे शपथपत्र न्यायमंचात दि. 26.03.2014 रोजी दाखल केले आहे. त्यात त्यांनी सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे, असे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडून अतिरिक्त रक्कम व व्याज भरणा करुन पॉलिसी नुतनीकरण करुन घेतली असल्याचे दिसून येत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या बँक खाते उता-यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा चेक बँकेत वटण्यासाठी न लावता तक्रारदारास परत केला आहे, हे तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. आणि सदर चेक अपघाताच्या नंतर परत केला आहे, हीच बाब तक्रारदाराच्या सेवेतील त्रूटीसाठी सगळयात महत्वाची आहे. म्हणजेच समानेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास गाडीच्या अपघात संरक्षण विम्याचा क्लेम न देवुन सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदाराचा दाखल केलेला सामनेवाला क्र.1 यांच्याकडीहल विमा कलेम रक्कम रु. 1,27,058/- मंजुर करणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र. 1 यांनी ग्राहक साहाय्यता निधीमध्ये दंड म्हणुन रक्कम रु. 1000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत या न्यायमंचात जमा करावे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराच्या अपघातग्रस्त
वाहनाचा विमा संरक्षण नुकसान भरपाई रक्कम रु. 1,27,058/- ( रुपये एक लाख सत्ताविस हजार आठ्ठावन फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावे.
- समानेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, ग्राहक साहाय्यता निधीमध्ये दंड म्हणुन रक्कम रु. 1000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत या न्यायमंचात जमा करावे.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**