:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा. सदस्या श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर)
(पारीत दिनांक – 24 डिसेंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासंबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून मृतक श्री श्यामचंद कवळू नागपुरे हा तक्रारकर्तीचा पती होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता. मृतक श्री श्यामचंद कवळू नागपुरे यांच्या मालकीची मौजा आष्टी, तालुका- तुमसर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं- 1527 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने ती मृतक श्री श्यामचंद कवळू नागपुरे ची पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्या पतीचा दिनांक-05/04/2016 रोजी मित्राच्या गाडीवरुन जात असता दुस-या मोटरसायकल स्वाराने धडक दिल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान दिनांक 17/04/2016 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर तिने दिनांक-07/07/2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधी रितसर प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह सादर केला. पुढे विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीला विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्ष 2 यांनी काहीही न कळविल्याने तक्रारकर्तीच्या वकीलांनी दिनांक 07/10/2017 रोजी माहिती अधिकार कायद्दाखाली कृषी आयुक्त, महाराष्ट्र, पुणे यांना माहिती मागितली असता त्यांनी ज्यांचे विमा दावे नाकारण्यात आलेत त्यांचे नावाची यादी पाठविली ज्यामध्ये तक्रारकर्तीचा विमा दावा हा “rejected due to other reason” हे कारण नोंदविलेले आहे. सदरचे यादी वरुन तिला कळले. सदर दावा फेटाळल्या बाबत विरुध्दपक्षांनी आज पर्यंत तिला कळविलेले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळल्याबाबत तिला पत्र पाठविले नसल्याने सेवेत त्रृटी ठेवली. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत. तक्रारकर्तीने पुढे असेही नमूद केले आहे की, शासकीय परिपत्रकानुसार कुठेही विजेचा धक्का लागल्यावर वायरमनचा परवाना आवश्यक असल्याचे नमूद नाही, त्यामुळे आवश्यक नसलेले कागदपत्र मागून व दावा फेटाळून विरुध्द पक्ष हे अनुचित व्यापार पध्दत अवलंबत आहे. म्हणून तिने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-07/07/2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचासमक्ष पृष्ठ क्रमांक 68 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या तक्रारीला सक्त विरोध केला असून, तक्रारकर्तीचा मृतक पती श्री श्यामचंद कवळू नागपुरे घटनेच्या दिवशी शेतकरी नव्हता आणि 7/12 मध्ये तसा फेरफार देखील झालेला नव्हता त्यामुळे सदरहू क्लेम “Rejected Due to Other Reason” असा शेरा मारुन रद्द करण्यात आला असे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 2 विमा कंपनी पुढे असे कथन करते की, तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीत नमूद केलेले ‘परिपत्रकानुसार कुठेही विजेचा धक्का लागल्यावर वायरमनचा परवाना आवश्यक असल्याचे नमूद नाही’ हे म्हणणे तक्रारीतील घटनेशी विसंगत आहे. वास्तविक क्लेम फॉर्म मृतकाचा मृत्यु हा मोटार वाहन उपघात होऊन झाल्याचे पोलीसाचे कागदपत्रांवरुन लक्षात येते. तक्रारकर्तीचा पती हा घटनेच्या दिवशी शेतकरी म्हणून महसूल खात्याचे रेकार्डवर नाही, म्हणून विमा कंपनीने घेतलेला निर्णय बरोबर आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-1) व 3) यांना मंचाद्वारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-10 नुसार एकूण-08 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, माहिती अधिकारात मागविलेली माहिती, तिने दाखल केलेल्या विमा दाव्याची प्रत, तिचे पतीचे शेताच्या 7/12 उता-याची प्रत व इतर दस्तऐवज, पतीचे अपघाता बाबत एफ.आय.आर. व इतर पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र, न्युरॉन हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, मृतकाचा वयाचा पुरावा अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं-71 ते 72 वर तिचे शपथपत्र दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे सिनीअर डिव्हीजनल मॅनेजर यांनी पुराव्या दाखल पृष्ठ क्रं-73 वर शपथपत्र दाखल केले. विरुध्द पक्ष क्रमांक 2 ने पृष्ठ 79 वर दिनांक 29/03/2017 चे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याबाबतचे पत्र दाखल केले आहे. तसेच पृष्ठ क्रं 76 वर त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्तीने त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केला नाही.
06. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, शपथपत्र, व लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे वकील श्री. व्ही. एम. दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. विरुध्द पक्ष क्रमांक 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीचा पती मृतक श्री श्यामचंद कवळू नागपुरे हा शेतकरी नव्हता व त्याचे 7/12 वर त्याचे नावही चढले नव्हते, म्हणून विमा दावा नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्तीने पृष्ठ क्रमांक 26 नुसार भुमापन क्रमांक 1078 च्या 7/12 ची छायाकिंत प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. सदर 7/12 सन 2015-16 चा असून त्यात मृतक श्री श्यामचंद कवळू च्या नावाची भुमीस्वामी म्हणून नोंद असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 27 वर भुमापन क्रमांक 1527 च्या 7/12 छायाकिंत प्रत दाखल केली असून, त्यामध्ये देखील श्यामचंद कवळू अ.पा.क. कवळू याप्रमाणे नोंद आहे. तसेच पृष्ठ क्रमांक 30 वर फेरफार पत्रकाची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. सदर फेरफार पत्रकात अनु. क्रं. 105 वर रामचंद कवळू नागपूरे व श्यामचंद कवळू नागपुरे यांच्या नावाने ते अज्ञान असल्याने त्यांच्या नावाने त्यांचे वडील कवळू यांनी मोडकू शिवा बकटू शिवा यांचेकडून खरेदी केल्यामुळे खाते क्रमांक 288 त्यांच्या नावाने दिनांक 13/08/1981 रोजी फेरफार केल्याचे नमूद आहे. सदर फेरफारची नोंद ही 1981 सालची आहे, त्यामुळे फेरफार नोंदीमध्ये खाते क्रमांक वेळोवेळी निश्चितपणे बदल झालेला असावा त्यानुसार सदर नोंद ही भुमापन क्रमांक 1527 बाबत असल्याचे तलाठयाचे प्रमाणपत्र तक्रारकर्तीने घ्यावयास हवे होते. अभिलेखावर दाखल भुमापन क्रमांक 1527 हा सन 1983-84 चा असल्याचे दिसून येते. अभिलेखावर दाखल मृतकाचे जन्म दाखल्यानुसार विचार केला असता भुमापन क्रमांक 1527 वर मृतकाचे नाव त्याच्या वयाच्या 9 व्या वर्षीच दाखल असल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पृष्ठ क्रमांक 28 वरील भुमापन क्रमांक 1078 च्या 7/12 मध्ये तक्रारकर्तीचे नाव पृष्ठ क्रमांक 31 वर दाखल फेरफार पत्रकानुसार नोंदविण्यात आल्याचे दिसून येते. सदर फेरफार पत्रकाचे अवलोकन केले असता तलाठयाने सदरची नोंद ही श्यामचंद कवळू नागपुरे याचा दिनांक 17/04/2016 रोजी मृत्यु झाल्यामुळे मृतकाचे वारसान म्हणून केल्याचे दिसून येते, यावरुन हे स्पष्ट होते की, मृतक श्यामचंद कवळू नागपुरे याच्या नावे भुमापन क्रमांक 1078 ही शेतजमीन होती व तो शेतकरी होता. अभिलेखावरील दाखल एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल तसेच न्युरॉन हॉस्पीटलचे प्रमाणपत्र यावरुन हे सिध्द होते की, मृतक श्यामचंद नागपुरे याचा दिनांक 05/04/2016 रोजी अपघात झाला व उपचारादरम्यान दिनांक 17/04/2016 रोजी त्याचा अपघातामुळे डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले सर्व दस्ताऐवज विमा दावा प्रस्ताव अर्जासोबत विरुध्द पक्षाकडे दाखल केले होते तसेच वेळोवेळी मागणीप्रमाणे कागदपत्र दाखल केले होते. सदर दस्ताऐवजावरुन तक्रारकर्तीचा पती हा मृत्युच्या वेळी शेतकरी होता व त्याचा मृत्यु अपघाती होता हे सिध्द होते. अश्यापरिस्थितीत विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर करणे आवश्यक होते, परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा “Rejected Due to Other Reason” असे नमूद करुन नाकारला आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीने अपघाताचे घटनेच्या विसंगत कथन तक्रार अर्जात नमूद केल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी असे प्रतिपादन केले आहे. परंतु सदरचे कथन हे तांत्रिक चुकीमुळे करण्यात आल्याचे अभिलेखावरुन दिसून येते तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु मोटार अपघातामुळे झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्तीचा पती मृत्युसमयी शेतकरी होता हे देखील सिध्द होते. त्यामुळे विरुध्द पक्ष विमा कंपनीने विसंगत कथनाबाबत घेतलेल्या आक्षेपात तथ्य दिसून येत नाही व केवळ सदरच्या तांत्रिक चुकीमुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करता येणार नाही. त्यामुळे विमा दावा नामंजूर करतांना दाव्यासोबत दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे योग्य प्रकारे परिक्षण न करता अपघाताच्या वेळी मृतक श्यामचंद नागपुरे हा शेतकरी नव्हता असा चूकीचा निष्कर्ष विरुध्द पक्ष विमा कंपनीने काढला आहे व अयोग्य पध्दतीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केला आहे.
08. विरुध्द पक्ष 2 विमा कंपनीने युक्तिवादाचे दरम्यान त्यांचे दिनांक 29/03/2017 रोजीचे विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र दाखल करीत विरुध्द पक्ष क्रमांक 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा मृतकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे नामंजूर करण्यात आला असा युक्तिवाद केला आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही उल्लेख त्यांनी त्यांचे लेखी उत्तरात व शपथपत्रात केलेला नाही. विरुध्द पक्ष 2 यांनी स्वतःच त्यांचे लेखी उत्तरात व मौखिक युक्तिवादात नविन कारण दाखवित विमा दावा नाकारण्याचे दोन विसंगत कारणे उपस्थित केलेली आहेत. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिला विरुध्द पक्ष 2 कडून तिच्या विमा दाव्याबाबत काहीही कळविण्यात न आल्यामुळे तक्रारकर्तीच्या वकीलांनी माहिती अधिकाराचे कायद्याअंतर्गत माहिती मागीतली असता त्यात तिचा विमा दावा “Rejected Due to Other Reason” या कारणास्तव नामंजूर केल्याचे नमूद आहे. विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवादातही हेच कारण नमूद आहे. तसेच दिनांक 29/03/2017 चे पत्र विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्तीला व कृषी आयुक्त, महाराष्ट्र, पुणे यांना पाठविले व ते त्यांना मिळाले याबाबत कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही व त्याबाबत स्वतः विरुध्द पक्ष 2 हेच अनभिज्ञ असल्याचे व शेतक-यांचे विमा दाव्याबाबत अत्यंत निष्काळजीपणे निर्णय देत असल्याचे मंचाचे निदर्शनास येते. युक्तिवादादरम्यान दाखल दिनांक 29/03/2017 चे विमा दावा नामंजूरीचे पत्र आता ग्राह्य धरणे उचित होणार नाही असे मंचाचे मत आहे. कारण त्यात नमूद करण विरुध्द पक्षाने कधीही तक्रारकर्तीला कळविलेले नाही, तसेच वाहन परवान्याची प्रत तक्रारकर्तीकडून मागविली होती याबाबतही विरुध्द पक्षाने लेखी पुरावा दाखल केला नाही. त्याचप्रमाणे मंचासमक्ष अभिलेखावर दाखल कागदपत्रामध्ये तक्रारकर्तीचा मयत पती अपघाताचे वेळी वाहन चालवित होता व सदर अपघात हा त्याचे निष्काळजीपणामुळे झाला असा कुठेही उल्लेख नाही. याउलट समोरुन येणा-या वाहनाने तक्रारकर्तीच्या पतीचे वाहनास धडक दिल्यामुळे सदरचा अपघात झाला असे अभिलेखावर दाखल पोलीस दस्तऐवजात नमूद आहे. न्युरॉन हॉस्पीटलने दिलेल्या प्रमाणपत्रात त्यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार तक्रारकर्तीचा पती हा अपघाताचे वेळी मोटार सायकलच्या मागील सिटवर बसल्याचे नमूद आहे. त्यामुळे सदर पत्रातील कारणानुसारही विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारणे ही योग्य पुराव्याअभावी चुकीचे व विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
09. उपरोक्त नमुद विवेचना वरुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, म्हणून तक्रारकर्ती ही विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तक्रार दाखल दिनांक-28/12/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
10. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये -2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-28/12/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.