(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 31 जानेवारी 2014)
तक्रारकर्ती हिने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ती ही मृतक रविंद्र रायमल्लु कंकनालवार याची विधवा असून तिच्या पतीचा दि.17.12.2010 रोजी मोटार सायकल क्र.एम.एच.-33-जे-0069 हिरोहोंडा पॅशनवर मागे बसलेले असतांना कसनसूर-एटापल्ली रोडला वानेसर फाट्याजवळ अपघातात मृत्यु झाला, त्यावेळी बैसू मासा गोटा हे मोटार सायकल चालवीत होते व त्यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. मोटार सायकल मृतक रविंद्र याचे मालकीची होती व मृतक रविंद्र यांनी व गैरअर्जदार यांचेकडून काढलेली पॉलिसीचा क्र.35100731106201669747 असून त्याची वैधता दि.30.11.2010 ते 29.11.2011 नुसार इन्शुअर्ड होती. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार दस्त क्र.6 पॉलिसी प्रत, तसेच घटनास्थळ पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्ट अनुक्रमे दस्त 3 व 4 वर दाखल केले. अर्जदाराचे पती गैरअर्जदाराचे ग्राहक असल्याने व अर्जदार मय्यताचे वारस असल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने तक्रार दाखल केली. त्यामुळे, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून पॉलिसीची रक्कम रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई 12 टक्के व्याजासह द्यावी, तसेच शारिरीक व मानसीक ञासापोटी रुपये 25,000/- देण्यात यावे, अशी मागणी केली.
2. तक्रारकर्तीने तक्रारीचे कथनाचे पृष्ठ्यर्थ नि.5 नुसार 6 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. तक्रारकर्तीची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार हजर होऊन गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 नुसार लेखी बयान, गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.25 नुसार वारसान मामला क्र.12/2011 ची प्रत दाखल केली.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखीबयाणातील विशेष कथनात नमूद केले की, मृतक रविंद्र त्याच्या साथीदारासह मोटार सायकलने प्रवास करताना मोटार वाहन नियम 129 प्रमाणे हेल्मेटचा वापर अनिवार्य असतांना सुध्दा दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे, विमा पॉलिसी व मोटार वाहन कायदा तरतुदीचे उल्लंघन केल्याने दावा नामंजूर होणे आवश्यक आहे. पोस्टमार्टमचे रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण डोक्याला जबरदस्त मार (हेडइंज्युरी) असे नमूद आहे. मृतक हा गाडीचा मालक असल्यामुळे तो तिराहीत या संज्ञेत मोडत नाही म्हणून मृतकाच्या मृत्युबद्दल तो स्वतः इन्शुअर्ड असल्यामुळे नुकसान भरपाईस पाञ नाही. (Under third Party Claim ) अर्जदाराने फॉर्म कॉम ए-ए व मोटार सायकल चालकाचा वाहन परवाना सादर केलेला नाही. गैरअर्जदाराने सेवेत कोणत्याही प्रकारे ञुटी व न्युनता ठेवलेली नसल्याने सदर दावा खारीज करावा, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.18 नुसार सदर प्रकरणात पक्ष म्हणून जोडण्याकरीता अर्ज दाखल केला. गैरअर्जदार क्र.2 चा अर्ज मंजूर करुन त्याला प्रकरणात पक्ष म्हणून जोडण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयाण दाखल केले नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.2 ने युक्तीवादात काहीही म्हणणे नाही असे सांगीतले.
5. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार दाखल केलेले लेखी उत्तर व दस्ताऐवज हाच शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. अर्जदाराने नि.क्र.16 नुसार एक झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराने नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद व नि.क्र.22 नुसार 1 झेरॉक्स दस्त दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.23 नुसार पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : नाही.
केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : नाही.
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
तक्रार खारीज.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदार ही मृतक रविंद्र रायमल्लु कंकनालवार यांची विधवा असून दि.17.12.2010 ला 6.30 वाजता मोटार सायकल अपघातात ते मृत्यु पावले. तसेच मोटार सायकल क्र.एम.एच.-33-जे-0079 हिरोहोंडा पॅशन ही रविंद्र रायमल्लु कंकनालवार यांचे मालकीची होती. मृतक रविंद्र रायमल्लु कंकनालवार यांनी सदर मोटार सायकलबाबत गैरअर्जदार क्र.1 कडे पॉलिसी क्र. 35100731106201669747 काढली होती. सदर पॉलिसी वैधता दि.30.11.2010 ते 29.11.2011 पर्यंत होती. गैरअर्जदार क्र.1 सदर बाबत मान्य असल्याने याबाबत कोणताही वाद नाही. अर्जदार ही मृतक रविंद्र रायमल्लु कंकनालवार यांची पत्नी असल्याने वारस या नात्याने गैरअर्जदार क्र.1 यांचा ग्राहक आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आंम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराच्या तक्रार अर्जा प्रमाणे अर्ज दाखल करण्या अगोदर अर्जदाराने विमा रक्कम मागणीसाठी कोणताही अर्ज वा नोटीस गैरअर्जदार क्र.1 कडे दिलेला नाही. सदर बाब अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 या दोघांनाही मान्य असल्याने याबाबत वाद नाही. मंचाच्या मताप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे कोणतीही विमा रकमेच्या मागणी बद्दल अर्ज वा नोटीस दिला नाही, त्यामुळे अर्जदाराप्रती गैरअर्जदार क्र.1 ने कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. यास्तव मुद्दा क्र.2 चा निष्कर्ष आंम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. अर्जदाराने नि.क्र.5 चे नुसार एफ.आय.आर.ची प्रत, इनक्वेस्ट पंचनामाची प्रत, घटनास्थळचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, गाडीचे रजीस्ट्रेशनची प्रत व गैरअर्जदार क्र.1 चे पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. नि.क्र.13 नुसार गैरअर्जदाराने लेखीउत्तरातील विशेष कथनामध्ये नमूद केले की, ‘‘मृतक रविंद्र यांनी मोटार वाहन नियम क्र. 129 प्रमाणे हेल्मेटचा वापर अनिवार्य होता आणि त्याने त्याचे उल्लंघन केले होते. तसेच, मृतकाच्या मालकीचे मोटार सायकल क्र.एम.एच.33-जे-0079 ती गैरअर्जदाराकडे विमाकृत होती, परंतु मृतक हा गाडीचा मालक असल्यामुळे तो तिराहीत या संज्ञेत मोडत नाही. म्हणून मृतकाच्या मृत्युबद्दल तो स्वतः इंशुअर्ड असल्यामुळे नुकसान भरपाईस मिळण्यास पाञ नाही. (Under third Party Claim) या कारणास्तव मोटार अपघात दावा क्र.43/12 नाईलाजाने अर्जदारास काढून घ्यावा लागला होता.’’ अर्जदाराचे वकील श्री पी.सी.समद्दार यांनी तोंडी युक्तीवादात मंचाचे निर्देशनास आणून दिले की, नि.क्र.5 चे दस्त क्र.6 मोटार सायकलची विमा पॉलिसी ही वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी आहे. तसेच पुढे सांगितले की, मृतक रविंद्र हा सदर वाहनाचे मागे बसलेला होता (Pillion Rider) होता तरी विमा पॉलिसी ही वैयक्तीक विमा पॉलिसी असल्याने आणि गैरअर्जदार क्र.1 ने रुपये 50/- प्रिमीयम घेतल्यामुळे अर्जदार हा सदर विमा रक्कम मिळण्यास पाञ आहे. मंचाने विमा दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, वाहनाच्या मागे बसलेल्या व्यक्तीला (Pillion Rider) सदर पॉलिसीचा लाभ मिळणार नाही. सदर पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाने व्यक्तीगत अपघात (Pillion Rider) च्या संदर्भात कोणताही प्रिमीयम भरलेली नव्हती, म्हणून मंच या निष्कर्षाप्रत आलेला आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही Pillion Rider ला कोणत्याही पॉलिसीचा लाभ देऊ शकत नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज, लेखी उत्तर, दाखल दस्ताऐवज, तसेच लेखी व तोंडी युक्तीवादावरुन मंचाच्या मताप्रमाणे, मृतक रविंद्र रायमल्लु कंकनालवार हा अपघाताचे वेळी मोटार सायकलचे मागे बसलेला होता (Pillion Rider) हे सिध्द झालेले आहे, म्हणून अर्जदार हे विमा कंपनीकडून विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पाञ नाही. सबब, मुद्दा क्र.3 हा नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
9. गैरअर्जदार क्र.2 ही मृतकाची आई असून त्याचे या तक्रार अर्जात काहीही मागणी नव्हती. म्हणून गैरअर्जदार क्र.2 चे बाबत कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
10. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-31/01/2014