जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/57 प्रकरण दाखल तारीख - 17/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 14/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मल्हारी पि.उमाजी थाडके, वय वर्षे , धंदा शेती, अर्जदार. रा.तळणी ता.हदगांव जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. ना.जि.म.सह.बँक लि, शाखा तळणी, सध्या – निवघा, ता.हदगांव जि.नांदेड. 2. मुख्य व्यवस्थापक, ना.जि.म.सह.बँक लि, शिवाजी पुतळयाजवळ, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.ए.नेवरकर. गैरअर्जदारां तर्फे वकील. - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्य) अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, गैरअर्जदार यांच्या बँकेमध्ये त्यांचे बचत खाते होते. त्यामधील शिल्लक असलेली रक्कम गैरअर्जदारांनी अर्जदारास न देता उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे देण्याचे टाळाटाळ केली व त्रुटीयुक्त सेवा दिली म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द मंचात तक्रार दाखल केली. अर्जदाराची थोडक्यात हकीकत अशी की, अर्जदाराचे बचत खाते क्र.189 गैरअर्जदार बँकेत आहे. अर्जदाराने सदरील खात्यामध्ये वेळोवेळी जमा व उचलबाबतचे व्यवहार केलेले आहे. अर्जदाराचा खाते पुस्तीकेतील शेवटची नोंद म्हणुन दि. 07/10/2006 रोजी रु.23,722/- पैकी रु.5,000/- उचल केल्याचे दिसुन येते. बाकी रु.18,722/- सदरील खात्यामध्ये शिल्लक होते. त्यानंतर दि.07/11/2006 रोजी अर्जदार सदरील खात्यामधील शिल्लक रक्कम रु.18,722/- उचलणे करीता गैरअर्जदार क्र. 1 कडे गेला असता, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यात एवढी रक्कम शिल्लक नाही त्यामुळे तुम्हाला सदरील रक्कम मिळणार नाही असे सांगीतले. त्यानंतर अर्जदाराने त्यांच्या खात्या बाबत माहीती विचारली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व माहीती देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार यांच्या शाखेत ग्राहकांच्या खात्यामध्ये परस्पर खोटया नोंदी करुन गैरव्यवहार झाल्याबद्यलची तक्रार बॅकेच्या लेखापालानी पोलिस स्टेशन हदगाव येथे केली आहे व त्या बॅकेचे तात्कालीन शाखाधिकारी व कॅशीअर यांना आरोपी केलेले आहे. सदरील माहीती कळाल्यानंतर अर्जदारास त्याच्याही खात्यामध्ये असाच गैर व्यवहार झाल्याचे शंका आली. सदरील पैसे मिळण्या करीता अर्जदाराने दि.16/12/2009 रोजी वकीला मार्फत नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठवीली. अर्जदारास पैशाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु हक्काचे पैसे जमा असून देखील गैरअर्जदाराने अर्जदारास त्याची रक्कम परत केली नाही. त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला. म्हणुन अर्जदारास त्यांचे जमा असलेली रक्कम रु.18722/- ही 18 टक्के व्याजासह देण्याचे गैरअर्जदार यांना आदेश करण्यात यावे व मानसिक त्रासाबद्यल रु.15,000/- तक्रारीचा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रार ही योग्य बरोबर नसल्यामुळे ती खर्चासह नामंजुर करावी. अर्जदाराच्या म्हणणेप्रमाणे ज्या व्यक्तिनी अपहार केला आहे त्या व्यक्तिला प्रकरणांत हजर करण्याचे आदेश करावेत व तसे नाही केल्यास त्या कारणास्तव प्रस्तुतची तक्रार खर्चासहीत नामंजुर करावी. अर्जदाराचे खाते पुस्तीके प्रमाणे नोंदी बरोबर नसुन बँकेचे लेजर बुक च्या नोंदी प्रमाणे बरोबर आहेत. दि.27/06/2005 रोजी तक्रारदाराने सदरील खात्यातील जमा रक्कमेची मागणी केली व त्या प्रमाणे अर्जदाराने रु.20,000/- ची पेस्लीपवर सही करुन सदरील रक्कम उचलून घेतली, त्यावर अर्जदाराचा अंगठा आहे. त्यामुळे दि.07/11/2006 रोजी शिल्लक रक्कम रु.18,722/- उचलण्याचा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदाराने उडवा उडवीची उत्तरे देणे हे म्हणने खोटे आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यानी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांना दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे काय व ते अर्जदाराने सिध्द केले काय? 3. अर्जदाराने मागणी केलेली रक्कम देण्यास गैरअर्जदार होय. बांधील आहेत काय? 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार हे तळणी ता.हदगांव जि.नांदेड येथील राहणार असून त्यांनी गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तळणी येथे बचत खाते उघडलेले आहे ते गैरअर्जदारास मान्य आहे. म्हणुन अर्जदार हे गैअर्जदाराचे ग्राहक आहेत म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 – अर्जदार हे तळणी येथील राहणार आहेत ते सामान्य शेतकरी आहेत. शेतीमधुन नीघणा-या नफयापासुन काही रक्कम त्यांनी गैरअर्जदार यांचेकडील बचत खात्यामध्ये जमा केलेले होते. अर्जदाराचे बचत खाते क्र.189 असुन अर्जदाराने सदरील पासबुकची छायाप्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. त्यांनी मागणी केलेल्या व्यवहाराची नोंद त्या पासबुकात आहे. सदरील खाते पुस्तकात दि.07/10/2006 रोजी रु.23,722/- पैकी रु.5,000/- उचल केल्याचे स्पष्ट निदर्शनास येते व रु.18,722/- रक्कम खात्यामध्ये शिल्लक होती. दि.07/11/2006 रोजी अर्जदार आपल्या खात्यामधील रक्कम रु.18,722/- उचल करण्या करीता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पासबुक व स्लिप दाखल केले असता गैरअर्जदारांचे कर्मचारी यांनी एवढी रक्कम तुमच्या खात्यात शिल्लक नसत्यामुळे ती तुम्हाला मिळणार नाही असे सांगितले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना त्यांच्या खात्याबद्यलची माहीती देण्या करीता विनंती केली त्यावेळी गैरअर्जदारांनी अर्जदारास खाते संदर्भात माहीती देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर अनेक वेळा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे खाते संदर्भात माहीती दाखविली नाही व गैरअर्जदार यांनी सदरील माहीती आजपर्यंत दिलेली नाही. अर्जदारास यापुर्वी सदर बँकेत लेखापाल व बॅकेचे तात्कालीन शाखाधिकारी व कॅशीअर यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन हदगांव येथे तक्रार दाखल केलेली होती, या गोष्टीची माहीती होती त्यामुळे अर्जदारास शंका आली की, त्यांचे खात्यातही अशाच पध्दतीचा गैरव्यवहार झाला असण्याची शंका आहे. दि.16/12/2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पोष्टाद्वारे नोटीस पाठविली व रु.18,722/- व्याजासह अर्जदारास 15 दिवसात परत करावे असे कळविले. सदरील नोटीसची पोच पावती अर्जदाराने मंचा समोर दाखल केलेली आहे तरीही देखील आजपर्यंत गैरअर्जदाराने अर्जदाराचे पैसे परतफेड केलेली नाही. रिझर्व बँकचे निर्बंध लावल्यामुळे बॅकेचा व्यवहार बंद होते. सध्याच्या परिस्थितीत रिझर्व बॅकेने लावलेले निर्बंध शिथील केलेले आहे , ग्राहकांना त्यांची ठेवी परत मिळत आहे. त्यांचे स्वतःचे अधिकाराचे पैसे गैरअर्जदाराने परत केले नसल्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला त्याबद्यल अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन रु.5,000/- नुकसान भरपाई मागीतली आहे व रक्कम रु.18,722/- 18 टक्के व्याजाने वापस करावे अशी विनंती केली आहे. अर्जदाराचे पासबुक पाहीले असता, दि.27/06/2006 रोजी अर्जदाराने रु.5,000/- उचल केलेले आहे त्या वेळेस अर्जदाराच्या खात्यावर रु.28,522/- रक्कम शिल्लक होते. त्यानंतर दि.07/10/2005 रोजी अर्जदाराने रु.5,000/- उचलून उर्वरित रक्कम खात्यावर रु.18722/- होते याबद्यल छायाप्रत दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी लेखी म्हणणे सादर केले आहे व त्यामध्ये दि.27/06/2005 रोजी अर्जदाराला रु.20,000/- ची स्लिप सही करुन सदरील रक्कम उचलून घेतली आहे. त्यामुळे दि.18722/- उचलण्याचा प्रश्नच येत नाही असे वक्तव्य केलेले आहे व रिझर्व बॅकेने आर्थीक निर्बंध शिथील केले असले तरी अटी व नियम पालन करणे आवश्यक आहे. सदरील अर्जदाराचे हे अटी व नियमाचे बाहेरचे असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराची रक्कम देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. गैरअर्जदार यांनी व्हिड्रॉल स्लीप दाखल केलेली आहे, बॅकेचे लेजर पेज दाखल केलेले आहे. त्यामध्ये दि.27/06/2005 रोजी रु.20,000/- ची स्लिप अर्जदाराने भरुन दिली व त्यावरील अक्षरी रक्कम लिहिलेले स्पष्ट दिसत नाही. दि.27/06/2005 रोजी अर्जदाराचे खाते पुस्तकात रु.5,000/- उचल केलेले आहे यावरुन अर्जदाराने त्या दिवशी फक्त रु.5,000/- च उचलेले होते हे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांच्या लेखापाल व तात्कालीन शाखाधिकारी व कॅशीअर यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन हदगांव येथे तक्रार दाखल आहे. सदरील प्रकार हा जरी बॅकेचे कर्मचारीची चुक असले तरी देखील तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असुन अर्जदार याचे बचत खातेमध्ये असलेले रु.18,722/- एवढी उचलण्याचा त्यांचा हक्क आहे तरी कुठलीही गोष्टी खातर त्यांच्या खात्यात असलेली रक्कम बँक अडवून ठेवू शकत नाही. सदरील खात्यातील रक्कमेची उचल किंवा अफरातफर कोणाकडुन झाले हे सिध्द झाल्यानंतर बँकेने व्यक्तशः त्या व्यक्तिकडुन ती रक्कम वसुल करावी व अर्जदारास एक महिन्याच्या आंत रु.18,722/- रक्कम दि.07/10/2006 पासुन 9 टक्के व्याज दराने द्यावे. सदरील रक्कम एक महिन्यात न दिल्यास संपुर्ण रक्कमेवर दि.07/10/2006 पासुन 12 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत अर्जदारास द्यावे. तसेच मानसिक त्रास व दावा खर्चाबद्यल अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु.3,000/- द्यावेत या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रक्कम रु.18,722/- एक महिन्याच्या आंत द्यावे. सदरील रक्कमेवर दि.07/10/2006 पासुन 9 टक्के व्याज दराने व्याजासह द्यावे. असे न केल्यास संपुर्ण रक्कमेवर दि.07/10/2006 पासुन 12 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत अर्जदारास द्यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल, दावा खर्च म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु.5,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |