(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 15 फेब्रुवारी, 2011) तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदारांची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांचे गैरअर्जदार बँकेकडे सयुंक्त खाते आहे व ते खाते मुख्याद्यापक व सचिव यांनी संयुक्तपणे हाताळावयाचे असा ठराव आहे, मात्र गैरअर्जदार यांनी संबंधित खात्यात व्यवहार करण्यास सन 2009 मध्ये प्रतिबंध केला, कारण आष्टणकर यांनी यासंबंधी आक्षेप घेतला की, ते संस्थेचे सचिव आहेत आणि त्यामुळे तक्रारदाराची गैरसोय झाली. यास्तव तक्रारदारानी ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे चेकची रक्कम रुपये 15,669/- 18% व्याजासह परत मिळावी, तसेच त्यांना झालेल्या मनस्तापापोटी रुपये 75,000/- नुकसानी मिळावी आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 5,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. यात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार यांचे थोडक्यात निवेदन असे आहे की, पूर्वी तक्रारदार नं.1 व 2 हे खाते हाताळीत होते, मात्र यासंबंधी श्री आष्टणकर यांनी नवीन चेंज रिपोर्ट आणून धर्मादाय आयुक्त यांचा आदेश दाखल केला आणि ते सध्या संस्थेचे सचिव आहेत अन्य कुणाचेही सहीने खाते हाताळण्यात येऊ नये असा आक्षेप घेतला. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असा उजर घेतला. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत पासबुक, मुख्याद्यापकाचे पत्र, सचिवाचे पत्र, पोचपावती, नोटीस, नोटीसचे उत्तर, वरीष्ठ आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख व लेखी युक्तीवाद इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने तक्रारदारांशी केलेला पत्रव्यवहार, धार्मादाय आयुक्तांचा आदेश, इतर पत्रव्यवहार, अपिलीय अधिका-याचा आदेश, ठराव असे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. सदर प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांचे वकीलांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणात गैरअर्जदारानी योग्य त्या दस्तऐवजांचे आधारे व योग्य अशा प्राधिका-याचे आदेशाचे आधारे केलेली कृती चूकीची आहे, असे जे तक्रारदाराचे म्हणणे आहे ते विचारात घेण्याजोगे नाही. धर्मादाय आयुक्त यांनी पारीत केलेल्या आदेशास व संस्थेच्या पदाधिका-यांचे झालेल्या बदलास स्थगनादेश आहे, असे दाखविण्यास तक्रारदार असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी ठेवली नाही व तक्रारदाराची तक्रार चूकीची असून ती खारीज होण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -// अं ती म आ दे श //- 1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2) तक्रारदार यांनी गैरअर्जदारास खर्चादाखल रुपये 1,000/- द्यावेत. 3) तक्रारदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनाकांपासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |