::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये मा. सदस्या सौ. कल्पना जांगडे (कुटे))
(पारीत दिनांक :-06/08/2019 )
अर्जदाराने सदर चौकशी अर्ज ग्रा. सं.कायदा 1986 चे कलम 27अंतर्गत दाखल केला आहे.
1. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द ग्राहक तक्रार क्रं.69 /2010 दाखल केले होते त्यामध्ये वि. मंचाने गैरअर्जदाराविरुध्द दि.16/9/2010 रोजी पारित केलेल्या अंतिम आदेशाची पूर्तता न केल्याने कलम 27 अंतर्गत सदर चौकशी अर्ज दाखल केला आहे.अर्जदार यांनी दाखल केलेल्या ग्रा.त. क्र.69/2010 चा थोडक्यात आशय असा कि गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्त केल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानापोटी व शारिरीक ,मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार खर्चाची मागणी अर्जदाराने केली होती. सदर प्रकरणामध्ये जि.ग्रा.त. नि. मंच ,चंद्रपूर यांनी दि. 16/9/2010 रोजी खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत केलेला आहे.
अंतीम आदेश
1. गैरअर्जदाराने, अर्जदाराचा ट्रक क्र. एच.जि.व्ही.2515 एम.एच. 34 एम.8648 चा ताबा आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
2. गैरअर्जदाराने,वाहनाचा ताबा घेतल्याचे तारखेपासून वाहन परत करण्याच्या दिनांकापर्यंत कोणतेही व्याज,दंड, रिपझेशन चार्जेस वसूल करू नये.
3. गैरअर्जदाराने,अर्जदारास आर्थिक नुकसानापोटी,तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रार खर्चा पोटी रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावे.
4. अर्जदाराने,मार्च 2010 पर्यंतच्या मासिक किस्तीची रक्कम
गैरअर्जदाराकडे वाहनाचा ताबा मिळाल्यानंतर 15 दिवसाचे आंत
जमा करावे .अन्यथा, अर्जदाराने यात कसुर केल्यास गैरअर्जदार
व्याज,दंडासह रक्कम वसूल करून वाहनाचा ताबा घेण्याचा
अधिकार राहील.
5. अर्जदार यांनी मार्च नंतरच्या किस्तीची रक्कम नियमित
किस्तीच्या रकमेपेक्षा जास्त भरणा करावे .
6. उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गैरर्जदार यांनी उपरोक्त अंतिम आदेशाची पूर्तता न करून वि.मंचाचे आदेशाचा अवमान केला आहे. अर्जदाराने अधिवक्त्यामार्फत पाठवलेली नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरर्जदार यांनी सदर आदेशाची पूर्तता केली नाही. गैरर्जदार सदर आदेशाची जाणून बुझून पूर्तता करण्यास टाळाटाळ करीत आहे. सबब अर्जदाराने , गैरर्जदार यांचेविरुद्ध सदर चौकशी अर्ज दाखल करून ग्रा. सं. कायदा1986, कलम 27अंतर्गत आरोपी/गैरर्जदार यांस जास्तीत जास्त शिक्षा व दंड ठोठावून कारवाई करण्याची विनंती केली आहे .
2. फिर्यादीची तक्रार पडताळणी करुन आरोपी विरुध्द कलम 27 (1)ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे चौकशी अर्ज दाखल करण्यात आले व आरोपीला समन्स काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. आरोपीला समन्स बजावणी झाल्यावर आरोपी यांनी मंचासमक्ष हजर होऊन जामिन कदबा भरून दिला. गुन्ह्याचे स्वरुप आरोपीला विशद केल्यानंतर सदर जबाबामध्ये आरोपी यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27(1)अंतर्गत गुन्हा मान्य नाही असे सांगितले.
3. फिर्यादीने नि. क्रं.43 व 90 वर साक्षीपुरावा म्हणून शपथपञ दाखल करून त्यामध्ये आरोपी/ गैरर्जदार यांनी ग्राहक तक्रार क्रं.69 /2010 मध्ये दि. 16 सप्टेंबर 2010 मध्ये पारित केलेल्या अंतिम आदेशानुसार ट्रक क्रमांक एच.जि.व्ही.2515, एम.एच. 34/ एम/8648 चा ताबा तसेच नुकसान भरपार्इ व तक्रार खर्चाची रक्कम आजपर्यंत दिलेली नाही अर्जदार यांनी गैरर्जदार यांना दि. 20/10/2010 रोजी अधिवकता श्री आर.आर. वर्मा यांचेमार्फत नोटीस पाठवून उपरोक्त अंतिम आदेशाची पूर्तता करण्याची विनंती केली सदर नोटीस गैरर्जदार यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी सदर आदेशाची पूर्तता न करून अवमान केल्याने गैरर्जदार /आरोपी हा शिक्षेस व दंडास पात्र आहे.
4. आरोपीतर्फै अधिवक्ता श्री लिंगे यांनी फिर्यादीची दि.13/11/2014 रोजी उलटतपासणी घेतली. सदर उलट तपासामध्ये अर्जदार यांनी गैरर्जदार कंपनीचे दोन महिन्याचे हप्ते भरू न शकल्याने गैरर्जदार यांनी उपरोक्त ट्रक जप्त केला.मुळ त.क्र. 69 /2010 दाखल करण्यापूर्वी कंपनीने सदर ट्रक विकून टाकला होता व ज्यावेळी सदर तक्रार दाखल केली तेव्हा सदर ट्रक गैरर्जदार यांचे ताब्यात नव्हता सदर तक्रार मी उपरोक्त ट्रक परत मिळण्याबाबत दाखल केली आहे, गैरर्जदार कंपनीने मला सांगितले होते कि सदर ट्रक त्यांच्या ताब्यात नाही म्हणून दुसरा ट्रक दाखविण्यात आला ,आजही मला कंपनीची सदर ट्रक बाबतची थकीत रक्कम आहे.सदर ट्रकचा मॉडेल 2008चा होता. जर मला 2008 च्या मॉडेलचा दुसरा ट्रक दाखवला तर मि तो घेण्यास तयार नाही ह्या बाबी मान्य केल्या आहेत .
5. अर्जदार यांचे अधिवक्ता श्री.शेख यांनी युक्तीवादामध्ये सांगितले कि विदयमान जि. ग्रा. मंच,चंद्रपूर यांनी अंतिम आदेश पारित केल्यानंतर गैरर्जदार कंपनी यांनी सदर आदेशाची पूर्तता न केल्याने अर्जदार यांनी गैरर्जदार यांना दि. 20/10/2010 रोजी अधिवक्ता श्री आर.आर. वर्मा यांचेमार्फत नोटीस पाठवून उपरोक्त अंतिम आदेशाची पूर्तता करण्याची विनंती केली सदर नोटीस गैरर्जदार यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी सदर आदेशाची पूर्तता केली नाही सदर नोटीस ,पोस्टाची पावती इ. नि.क्र.5 वर दस्त क्र.अ-2 ते अ 6वर दाखल आहेत व आजपर्यंतहि गैरअर्जदार यांनी पूर्तता केली नाही यावरून गैरर्जदार /आरोपी हे जाणून बुझून हेतुपुरस्सर कोणतेही कारण नसतांना सदर अंतिम आदेशाची पूर्तता करण्यास टाळाटाळ करत असून सदर आदेशाचा अवमान करत असल्याने आरोपी हा शिक्षेस पात्र आहे .
6. आरोपीतर्फै अधिवक्ता श्री लिंगे यांनी युक्तिवादामध्ये सदर ट्रक हा मुळ तक्रार दाखल होण्यापूर्वीच गैरर्जदार यांनी लिलावाद्वारे विकला आहे व सदर बाब अर्जदार यांनी मान्य केली आहे. सदर ट्रक विकला असल्याने सदर ट्रकचा ताबा देणे अशक्य आहे गैरर्जदार यांनी अर्जदार यांना वाह्नाचा ताबा देण्याचा आदेश हा Infructious आहे त्यामुळे गैरर्जदार यांनी दुसरे वाहन देण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु अर्जदार यांनी सदर ट्रक 2008 चे मॉडेल असल्याने घेण्यास नकार दिला. गैरर्जदार यांनी शारिरीक व मानसिक तसेच तक्रार खर्चाची रक्कम अर्जदारास देऊन पूर्तता केली आहे .गैरर्जदार यांनी हेतुपुरस्सर सदर आदेशाचा अवमान केला नाही .सबब सदर चौकशी अर्ज खारीज होण्यास पात्र आहे .
7. फिर्यादीची तक्रार, ग्राहक तक्रार क्र.69/2010 चे निकाल पञ, फिर्यादीने दाखल केलेले दस्तावेज, फिर्यादीचा साक्षीपुरावा, उलट तपास व उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करतांना मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम (27)1नुसार : नाही
आरोपी दंड व शिक्षेस पाञ आहे काय ?
2. आदेश काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा –
मुद्दा क्रं. ०1 बाबत ः-
8. अर्जदार यांनी उलटतपासणी मध्ये ट्रक क्र.एच.जि.व्ही.2515 एम.एच. 34 एम.8648 हा मुळ त.क्र 69 /2010 दाखल करण्यापूर्वीच कंपनीने सदर ट्रक विकून टाकला होता व ज्यावेळी सदर तक्रार दाखल केली तेव्हा सदर ट्रक गैरर्जदार यांचे ताब्यात नव्हता.गैरर्जदार कंपनीने अर्जदार यांना सांगितले होते कि सदर ट्रक त्यांच्या ताब्यात नाही म्हणून दुसरा ट्रक दाखविण्यात आला आहे जर मला 2008 च्या मॉडेलचा दुसरा ट्रक दाखवला तर मि तो घेण्यास तयार नाही ह्या बाबी मान्य केल्या आहेत. तसेच गैरर्जदार यांनी सदर ट्रकचा ताबा घेऊन निविदानुसार विकला असे निकालपत्रामध्ये सुध्दा नमूद आहे. गैरर्जदार यांनी सदर ट्रकचा ताबा देणे शक्य नसल्याने त्याला पर्याय म्हणून दुसरा ट्रक अर्जदारास देऊ करून उपरोक्त अंतिम आदेश क्र.1ची पूर्तता करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. सदर ट्रकचा ताबा देऊन अंतिम आदेश क्र1ची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याने गैरर्जदार यांनी सदर ट्रक अर्जदारास दिला नाही.परंतु गैरर्जदार यांनी ग्राहक तक्रार क्रं.69/2010 मध्ये दि.16/09/2010 रोजी पारित केलेल्या अंतिम आदेश क्र.3 नुसार शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु. 25,000/- व तक्रार खर्च रु.1,000/- ची रक्कम अर्जदार यांना देऊन उर्वरित अंतिम आदेश क्र.3 चे पालन केले आहे.
वरील वस्तुस्थितीचा विचार करता आज रोजी सदर ट्रक चा ताबा देऊन गैरर्जदार यांना जि.ग्रा.त. नि. मंच ,चंद्रपूर यांनी ग्रा.त.क्र. 69/2010 मध्ये दि. 16/09/2010 रोजी पारित केलेल्या अंतिम आदेश क्र.1 ची अंमलबजावणी करणे शक्य नाही. सबब गैरर्जदार यांनी हेतुपुरस्सर कोणतेही आदेशाचा अवमान केला नाही हे सिद्ध होत असल्याने आरोपी हा ग्रा. सं.कायदा 1986 चे कलम 27(1)अंतर्गत शिक्षेस पात्र नाही.असे मंचाचे मत आहे.त्यामुळे सदर चौकशी अर्ज खारीज होण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 01 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ०2 बाबत ः-
9. मुद्दा क्र. 1 चे विवेचनावरून खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1. चौकशी अर्ज क्र.47/2010 खारीज करण्यात येते.
2. गैरर्जदार/आरोपी मॅग्मा सांची फायनान्स कं. लि. मार्फत ब्रॅंच
मॅनेजर, सचिन माडेवार ए.के. गांधीच्या ऑफीस जवळ,चंद्रपूर,
तह. व जिल्हा – चंद्रपूर.यांना ग्रा. सं.कायदा 1986 कलम 27
अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात येते .
3. आरोपी यांचा जमानत पत्र, जातमुचलका(बेलबॉंड) रद्द करण्यात
येते.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर,
दिनांक : 06/08/2019
(सौ. किर्ती गाडगिळ (वैद्य)) (सौ.कल्पना जांगडे(कुटे) (श्री. अतुल डी.आळशी)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा.अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर