::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 21/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून जिवन साथी नावाची पॉलिसी त्याचा क्रं. 971973542 हा होता. ती पॉलिसी 2012 मध्ये पूर्णत्वाला आली म्हणून गैरअर्जदाराकडून दि. 28/3/12 रोजी रु. 2,22,240/- चा चेक अर्जदाराला मिळाला दि. 26/12/12 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास पञाव्दारे कळविले कि, वरील दिलेल्या रक्कमे मध्ये अर्जदाराला जास्तीची रक्कम रु. 1,11,090/- देण्यात आले होते सदर रक्कम अर्जदाराने गैरअर्जदाराला परत करावी. अर्जदाराने ती रक्कम खर्च केली असून ती रक्कम भरण्यास असमर्थ आहे असे गैरअर्जदाराला कळविले. अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर रक्कम पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर भरण्याचे सांगितले. परंतु दि. 16/1/13 रोजी गैरअर्जदाराने वरील नमुद असलेली रक्कम जमा करण्याबाबत अर्जदाराला स्मरण पञ पाठविले तसेच दि. 27/5/13 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराचे नावे असलेली पॉलिसी मधून कर्ज दिले आहे असे कळविले व उर्वरित रक्कम रु. 160/- चा चेक अर्जदारास पाठविला आहे. सदर पॉलिसी दि. 20/7/14, 28/7/18 व 22/10/16 ला पूर्णत्वाला येणार होती. गैरअर्जदाराने अर्जदाराची कोणतीही परवानगी न घेता ईतर पॉलिसीवर अर्जदाराचे लोन दाखवून अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे म्हणून अर्जदाराने दि. 10/7/13 रोजी गैरअर्जदाराला नोटीस पाठविला त्याची कोणतीही गैरअर्जदाराने दखल घेतली नाही म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचे तीनही पॉलिसी पूर्ववत करुन दयावे असे निर्देश दयावे तसे शक्य नसल्यास तिनही पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर बोनस सहीत जी रक्कम मिळणार होती ती रक्कम अर्जदाराचे हातात व्याजासह मिळण्याचा आदेश व्हावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 11 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप हे खोटे असून नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराने विमा पॉलिसी क्रं. 171973542 ची अवधी पूर्ण झाल्यानंतर गैरअर्जदाराकडून 1,11,090/- अतिरिक्त रक्कम घेतली होती. सदर रक्कम परत करण्याबाबत गैरअर्जदाराने अर्जदाराला अनेक पञ लिहीण्यात आले परंतु अर्जदाराने ती रक्कम देण्यास कोणतीही दखल घेतली नाही तसेच अर्जदाराने सदर रक्कम स्वतःच्या उपयोग करीता खर्च केले होते. याउलट अर्जदाराला तीन पॉलिसींची पूर्ण रक्कम अगोदरच प्राप्त झाली आहे. सदर तक्रार खोटी व बनावटी असून ती खारीज करावी अशी मागणी केली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही.
(3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून जिवन साथी नावाची पॉलिसी त्याचा क्रं. 971973542 हा होता. ती पॉलिसी 2012 मध्ये पूर्णतः आली म्हणून गैरअर्जदाराकडून दि. 28/3/12 रोजी रु. 2,22,240/- चा चेक अर्जदाराला मिळाला तसेच अर्जदाराचे नाव गैरअर्जदाराकडून इतर तिन पॉलिसी काढण्यात आली होती ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 5 व दस्त क्रं. अ- 1 व अ- 2 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, गैरअर्जदाराने अर्जदारापासून वारंवार अतिरिक्त दिलेली रक्कम परत करण्याबाबत पञाव्दारे संपर्क करुन अतिरिक्त रक्कम परत करण्याची विनंती केली. अर्जदाराने तक्रारीत असे मान्य केले आहे कि, सदर रक्कम अर्जदाराने स्वतःच्या वापराकरीता उपयोग केली. मंचाच्या असे निर्देशनास आले कि, तक्रार दाखल करे पर्यंत किंवा त्याच्यानंतरही अर्जदाराने अतिरिक्त रक्कम गैरअर्जदार विमा कंपनीला परत केलेली नाही. अर्जदार हा स्वच्छ हाताने आलेला नाही. गैरअर्जदाराची विमा कंपनी ही महामंडळ असल्याने जनतेच्या पैशांची अधिरक्षक असल्याने, अर्जदाराला दिलेली अतिरिक्त रक्कम वसूल करण्याची जबाबदारी गैरअर्जदार विमा कंपनीची आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या इतर पॉलिसीवर लोन दर्शवून आणि रु. 160/- चा चेक अर्जदाराला देवून कोणतीही अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही असे मंचाचे मत ठरले आहे.सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015