-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. तक्रारीचे स्वरुप खालीलप्रमाणे- 1. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून सामनेवाले हे हॉलिडेज- सुटटया देणारी व्यावसायिक संस्था आहे. तक्रारदार हे सामनेवाले कंपनीकडून हॉलिडेजसाठी मेंबरशिप घेतली. त्यापोटी त्यानी रु.25,426/-भरले. या सर्व बाबीसाठी कंपनीने त्यांचा प्रतिनिधी कौस्तुभ राणे याला त्यांचेकडे पाठवले होते. कंपनीच्या तीन मेंबरशिप होत्या. त्यामध्ये मुख्य सुटीतील काळ, मधला काळ व लोकसीझन काळ अशा स्कीम्स होत्या. तक्रारदारांच्या शंकेचे निरसन त्यावेळी त्यांचे प्रतिनिधीने केले. त्याने असे आश्वासन दिले की, आजच मेंबरशिप घेतली तर स्पेशल केस म्हणून विचार करु व 10 टक्के भरले तरी स्कीम लागू होईल. तक्रारदार संभ्रमात पडले व योजनेचा फायदा जावू नये म्हणून त्यांनी फॉर्मवर सही केली. त्यांचे कथनानुसार प्रतिनिधीने सर्व फॉर्म भरला व त्यावर त्यांच्या सहया घेतल्या त्यामुळे त्यांना अटी वाचण्यास मिळाल्या नाहीत. 2. नंतर कंपनीकडून 5-9-09 रोजी एक पत्र आले व असे सांगितले की, तुम्हाला वरच्या सीझनमध्ये सुविधा हवी असल्यास हॉटेलचे बुकींग 15 दिवस अगोदर जागा असल्यासच मिळेल, तसेच जादा कॉट देणार आहेत का नाही याचा खुलासा त्यांनी केला नाही. त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलणी केली त्यावेळी त्याने असे सांगितले की, तुम्ही काळजी करु नका, मी बुकींग करुन देईन. तक्रारदारांचे असे म्हणणे होते की, कंपनीने आम्हाला तसे लिहून दयावे. पण राणे याने तसे करता येणार नसल्याचे सांगितले. तक्रारदारांच्या मते रेड सीझन म्हणजे मोठया सुटीतील काळात खात्रीचे बुकींग मिळत नसल्याने व रेड सीझनचे म्हणजे मोठया काळातील सुटीची किंमत परवडत नसल्याने त्यांनी कंपनीला आमचे पैसे परत करा अशी विनंती ईमेल ने केली. त्याचे काही उत्तर न आल्याने पुन्हा दुसरा ईमेल 2-10-09 ला पाठवला. दोन्ही ईमेलचे उत्तर न आल्याने त्यांनी कंपनीचे कॉलसेंटरवर विचारणा केली असता त्यांनी त्यांचे वाशी ऑफिसशी संपर्क साधला. तेव्हा तेथील श्री.जयसिंग यांचेशी चर्चा करुन त्यांनी पत्र त्यांना दिले. तसेच पत्र पुन्हा 30-12-09 रोजी दिले. 3. तरी त्यांची अशी विनंती की, त्यांनी कंपनीकडून कोणतीही सेवा घेतली नाही, अशा परिस्थितीत त्यांना पैसे परत मिळणे आवश्यक आहे, तसेच ग्राहकांना चुकीची माहिती देणे, अपुरी माहिती देणे, मेंबरशीपच्या अटी न सांगणे, फॉर्म न वाचून घेता सही घेणे, सुरुवातीला रक्कम घेणे व नंतर ग्राहकाना वेठीला धरणे अशी त्यांची तक्रार आहे. 4. तरी त्यांची अशी विनंती की, त्यांनी भरलेली रक्कम रु.25,426/- वार्षिक 24 टक्के व्याजाने परत मिळावी. त्यानी केलेले फोन कॉल व भेटीसाठी खर्च म्हणून रु.2,000/- मिळावे, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत. 5. तक्रारदारानी नि.2 अन्वये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.3 सोबत कागद यादी दाखल केली असून त्यात मेंबरशिपचा भरलेला फॉर्म, पैसे भरल्याची पावती, केलेले ईमेल, वाशी कार्यालयात समक्ष दिलेली पत्रे यांचा समावेश आहे. 6. याकामी सामनेवालेना नोटीस काढणेत आली. सामनेंवाले या कामी हजर झाले. त्यांच्या कंपनीतर्फे अधिकृत व्यक्तीने लेखी म्हणणे दाखल केले. तसेच म्हणण्याच्या पृष्टयर्थ नोटराईज्उ प्रतिज्ञापत्र दिले जे म्हणण्यावरच आहे. त्यांचे म्हणणे संपूर्ण नोटराईज्ड स्वरुपात आहे. सोबत त्यांनी तक्रारदाराचा मेंबरशिपचा फॉर्म दिला आहे. 7. सामनेवालेनी प्रामुख्याने तक्रारदाराची तक्रार खोटी व द्वेषमूलक पध्दतीने व त्रास देणेसाठी केली असल्याचे कथन केले आहे. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदारानी अकारण कायदयाचा गैरवापर केला आहे, त्यांचा मूळ हेतू पैसे मिळवण्याचा आहे. या तक्रारीत वस्तुस्थिती व कायदयाचा प्रश्न येत असेल तर मंचाला ही तक्रार चालवण्याचा अधिकार नाही. त्यांनी वस्तुस्थिती दडवून वेगळया प्रकारे तक्रार मांडली आहे जी रदद होणेस पात्र आहे. तक्रारदार हे स्वतः व्यावसायिक डॉक्टर असून त्यानी कोणत्याही प्रकारे कागद न वाचता सहया केल्या हे त्यांचे म्हणणे अशक्य आहे. तक्रारदाराची ही कथने पूर्णतः खोटी आहेत. तक्रारदार म्हणतात तशी कोणतीही पौलिसी नाही. उलट तक्रारदारानेच सूचना व अटी वाचून व माहितीपत्रक पाहून मेंबरशिप घेणे आवश्यक होते व ते त्याने केलें नसल्याने तो अशा प्रकारे तक्रार करु शकत नाही. स्वतःच्या चुकीचा फायदा त्याला घेता येणार नाही. त्यांचे नियम व अटीप्रमाणे 10 दिवसातच कॅन्सलेशन रदद केले तर काही पैसे परत देण्याची तरतूद आहे अन्यथा नाही. सामनेवालेकडून कोणतीही दोषपूर्ण सेवा मिळालेली नाही. तक्रारदारानी खोटी तक्रार दाखल केली असल्याने त्यांचेवर ग्रा.सं.का.कलम 26 अन्वये कारवाई करुन त्यांना रु.10,000/- खर्चापोटी दयावेत असे त्यांचे म्हणणे आहे. 8. तक्रारदारांतर्फे युक्तीवाद ऐकणेत आला. सामनेवाले गैरहजर होते. तक्रारदारानी अर्जाप्रमाणे युक्तीवाद केला व आम्ही सेवा घेतलेली नाही त्यामुळे रिफंड मिळावा अशी त्यानी मागणी केली. याबाबत सामनेवालेनी त्यांना दोषपूर्ण सेवा दिली आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच तक्रारदारानी ज्या पध्दतीने तक्रार मांडली आहे, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. याठिकाणी तक्रारदार हे व्यावसायिक डॉक्टर आहेत, ते अडाणी नाहीत, त्यामुळे प्रतिनिधीच्या सांगण्यावरुन घाईघाईने सहया केल्या व नियम वाचणेस मिळाले नाहीत ही त्यांची कृती न पटणारी आहे. एखादया अडाणी व्यक्तीने अशी कथने केली असती तर ती मान्य करता येतील पण येथे तसे नाही. पुढील बाब अशी की, सामनेवालेनी बुकिंग कॅन्सल करायचे असेल तर किती दिवसात करावे याचाही खुलासा नियमावलीत दिला आहे. त्यानुसार त्यांनी नियम वाचल्यावर वेळेत पत्रव्यवहार करणे आवश्यक होते तसा तो केल्याचे दिसत नाही. त्याला या सर्व बाबी विलंबाने कळाल्याचे दिसत आहे. वास्तविकतः ग्राहकाने स्वतःहून आपण कोणत्याही व्यवहारात फसलो जात नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण स्वतःहून चूक करणे व योग्य ती काळजी न घेणे व रिफंड मागणे या बाबी कायदयाला अनुसरुन होणार नाहीत. त्याने वेळेत कारवाई केली असती तर त्याला रिफंड मिळाला असता व त्यानंतरही त्याला तो मिळाला नसता तर तो कारवाई करु शकला असता पण त्याने विलंबाने ही कारवाई केली आहे. आता स्वतःच्या चुकीचा फायदा त्याला घेता येणार नाही. नियम व अटी वाचणे ही त्याची जबाबदारी आहे. यासाठी तो सामनेवालेना दोषी धरु शकणार नाही. दाखल असलेल्या अटी व नियमांचे मंचाने अवलोकन केले असता त्या वाचता येण्यासारख्या असल्याचे दिसते. त्यामुळे तक्रारदाराचे कथन योग्य असल्याचे मंचास वाटत नाही, त्याने केवळ सेवा घेतली नाही म्हणून पैसे मिळावेत हे कथन योग्य नाही. कोणत्याही कंपन्या वा व्यक्ती नियमाला बांधील असतात व नियमाप्रमाणे काम चालते व तसे ते चालणे आवश्यक आहे. सामनेवालेनी त्यांच्या म्हणण्यात आपल्या अटी स्पष्ट नमूद केल्या आहेत. अशा परिस्थितीत तक्रारदाराचा अर्ज मंजूर करता येईल असे मंचास वाटत नाही. सबब त्याचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे. -ः आदेश ः- 1. तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात येत आहे. 2. सामनेवालेनी स्वतःचा खर्च स्वतः सोसण्याचा आहे. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.4-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |