(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणेः-
तक्रारदार हे शेतकरी असून मौजे पिंपळस ता.राहाता जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे वापरासाठी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्याकरीता सामनेवाला यांचेकडून कर्ज घेतले होते. सदरहू ट्रॅक्टर श्रीरामूपर येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करुन त्या वाहनाला रजि.नं.एम.एच.17 अेई-5236 असा देण्यात आला होता. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडून जे कर्ज घेतले होते, त्या कर्जाची कट ऑफ डेट 25.05.2015 अशी होती. त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाला यांना स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा राहाता या बँकेचे धनादेश क्र.470342 ते 470351 दिले होते. सदरील कर्ज हप्त्याची सहामाही रक्कम रु.66,700/- ही ठरलेली होती. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे एकूण 7 सहामाही हप्ते सामनेवाला यांचेकडे जमा केले आहेत. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे 8 वा हप्ता तक्रारदार हे मुदतीत जमा करुन शकले नाहीत, त्याबाबतची कल्पना तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेली होती. असे असताना देखील दि.29.04.2015 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कोणतीही पुर्व सूचना न देता त्यांचे वाहन ताब्यात घेतले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहन बेकायदेशिररित्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी पत्राने विनंती केली. परंतू सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना शेतीची कामे करता आले नाही. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदाराने दि.07.04.2016 रोजी वकीलामार्फत सामनेवाला यांना कायदेशिर नोटीस पाठवून विनंती केली. परंतू सामनेवाला यांनी त्याबाबात सुध्दा कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर तक्रारदाराने श्रीरामपूर येथील उप-प्रादेशिक कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, सदरचे वाहन ति-हाईत व्यक्तीला विकल्याचे समजले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदाराला कोणतीही पूर्व सुचना न देता त्यांचे वाहनाचा लिलाव केला आहे. सदरहू सामनेवालाचे कृत्य हे बेकायदेशिर असून त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल केली व परीच्छेद क्र.10 प्रमाणे मागणी केली आहे.
3. सामनेवाला यांना या प्रकरणाची नोटीस प्राप्त झाली. परंतू सामनेवाला हे या प्रकरणात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.1 वर दि.13.11.2017 रोजी प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय.? | ... होय |
2. | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय. ? | ... होय |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 व 2 – तक्रारदार यांनी त्यांचे शेतीचे वापरासाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता. सदरहू ट्रॅक्टरला रजिष्टर नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. सदरहू वाहनासाठी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडून कर्ज प्रकरण केले होते. व त्या कर्ज प्रकरणापोटी सहामाही हप्ता रक्कम रु.66,700/- देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने 7 सहामाही हप्ते सामनेवाला यांचेकडे जमा केले होते ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेले नि.10 वरील खाते उता-यावरुन स्पष्ट होते. मंचाने सदरहू खाते उता-याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने 7 हप्ते भरल्याची बाब निदर्शणास येते. तक्रारदाराने स्वतः तक्रारीमध्ये कथन केले आहे की, 8 वा हप्ता आर्थिक परिस्थितीमुळे मुदतीत भरला नाही. व त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना पुर्व सुचना दिलेली आहे. तरीसुध्दा दि.29.04.2015 रोजी तक्रारदारास सामनेवालाने कोणतीही पुर्व सूचना न देता त्यांचे वाहन ताब्यात घेतले ही बाब सामनेवालाने तक्रारदार यांना दिलेले पत्र दि.25.11.2016 चे पत्रामधील कॉलम 1 मध्ये नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे वाहन सामनेवाला यांनी दि.29.04.2015 रोजी ताब्यात घेतले आहे. ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदाराचे वाहन सामनेवाला यांनी कोणतीही पुर्व सूचना न देता ताब्यात घेतले आहे. कारण प्रकरणात पुर्व सूचना दिल्याचे कोणतेही दस्त दाखल नाहीत. सदरहू बाब ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी ठरते. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहन ताब्यात घेण्यापुर्वी तक्रारदार यांना पुर्व सूचना देणे गरजेचे होते. परंतू तसे सामनेवाला यांनी केले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत निश्चीतच त्रुटी केलेली आहे.
6. सामनेवाला यांना या प्रकरणाची नोटीस प्राप्त होऊनही ते या प्रकरणात हजर झाले नाहीत. व त्यांनी तक्रारदाराचे अर्जास म्हणणे खोडून काढण्याची संधी गमावली आहे. त्यांचे विरुध्द नि.1 वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
7. तक्रारदार यांचे वाहन सामनेवालाने कोणतीही पुर्व सुचना तक्रारदार यांना न देता ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रारदाराने अनेकदा सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यहवार केला व वकीलामार्फत नोटीसही पाठवली. परंतू सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. अशा प्रकारे तक्रारदाराना निश्चीतच मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांना सदरहु नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.75,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार यांनी त्यांची तक्रार कागदपत्रासह सिध्द केलेली आहे. सबब तक्रार अंशतः मंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे व मुद्दा. क्र.3 चे उत्तरार्थ खालील आदेश पारीत करण्यात येत आहेत.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्या आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.75,000/- (रु.पंच्याहत्तर हजार फक्त) या निकालाची प्रत प्राप्त झाल्याचे दिवसांपासून 30 दिवसाचे आंत तक्रारदार यांना द्यावी. सदरील रक्कम मुदतीत न दिल्यास द.सा.द.शे.9 टक्के दराने तक्रार दाखल तारखेपासून रक्कम वसूल होईपावेतो होणारे व्याजासह तक्रारदार यांना अदा करावेत.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना या तक्रारीचे खर्चापोटी रु.10,000/- (रु.दहा हजार फक्त) अदा करावेत.
4) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
5) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदार यांना द्यावी.