जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 338/2015.
तक्रार दाखल दिनांक : 01/09/2015.
तक्रार आदेश दिनांक : 02/09/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 00 महिने 01 दिवस
मोहन विठ्ठल शेंडगे, वय 25 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. पेठ भूम, ता. भूम, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स सर्व्हीस लि.,
डी.आय.सी. रोड, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : यू.बी. टाळके
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी दि.4/10/2011 रोजी महिंद्रा कंपनीचे स्कॉर्पिओ व्ही.एल.एक्स.7 एसटीआर रजि. नं. एम.एच.25/वाय.1001 हे चारचाकी वाहन खरेदी केलेले होते. त्याकरिता त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून कर्ज घेतलेले आहे आणि कर्जाची नोंद वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट बुकवर करण्यात आली. तसेच मुळ रजि. सर्टिफिकेट बूक व वाहनाची चावी विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात असून कर्ज रकमेचा पूर्ण भरणा झाल्यानंतर ते परत करण्याची हमी विरुध्द पक्ष यांनी दिलेली होती. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी वाहन कर्जाचे हप्ते वेळोवेळी मुदतीमध्ये भरणा केलेले आहेत आणि त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे संपूर्ण कर्ज परतफेड झाल्याबाबत बेबाकी प्रमाणपत्र सादर करुन रजि. सर्टिफिकेट बूक व दुस-या चावीची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत आहे. तक्रारकर्ता यांच्या वाहनाची चावी हरवल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दुसरी चावी न दिल्यामुळे त्यांना खाजगी वाहन भाडे तत्वावर घेऊन वैयक्तिक कामे करणे भाग पडले आहे. तसेच त्यांना वाहनाचे लॉक बदलणे भाग पडले आहे. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीचा वादविषय उपस्थित करुन तक्रारकर्ता यांनी त्यांच्या स्कार्पिओ व्ही.एल.एक्स.7 एसटीआर रजि. नं. एम.एच.25/वाय.1001 या वाहनाची चावी न दिल्यामुळे रु.50,000/- नुकसान भरपाई व रु.2,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर उचित संधी देऊनही ते जिल्हा मंचापुढे उपस्थित झाले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जीपच्या खरेदीकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून कर्ज घेतले व ते कर्ज पूर्णपणे फेडलेले आहे. आर.सी. बुकावर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स सर्व्हीस लि., नाशिक यांच्याकडे हायपोथिकेशन केल्याबद्दल नोंद झालेली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्याने आता संपूर्ण कर्ज फेडले आहे. हे खरे आहे की, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस, नाशिक यांना याकामी पक्षकार केलेले नसून शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद यांना याकामी विरुध्द पक्षकार करण्यात आलेले आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्याने विरुध्द पक्षाकडूनच कर्ज घेतले आहे. नाशिकला मुख्य ऑफीस असून विरुध्द पक्ष ही त्यांची शाखा असल्याचे दिसून येत आहे. विरुध्द पक्ष यांनी आपले कोणतेही म्हणणे मांडलेले नाही व तक्रारकर्त्याच्या कथनाचे खंडन केलेले नाही. त्यामुळेच असा निष्कर्ष निघतो की, विरुध्द पक्षामार्फत तक्रारकर्त्याने फायनान्स घेतले व त्याची संपूर्ण परतफेड केली. तक्रारकर्त्याच्या अशा शपथपत्रावर गैरविश्वास दाखविण्याचे काहीच कारण दिसून येत नाही.
5. तक्रारकर्त्याचे पुढे म्हणणे आहे की, मुळ आर.सी. बुक व गाडीची दुसरी चावी त्याने विरुध्द पक्षाकडे ठेवली. तक्रारकर्त्याने आर.सी. बुकाची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. विरुध्द पक्षाकडे आर.सी. बुक देण्यापूर्वी अशी झेरॉक्स प्रत काढून घेणे शक्य आहे. तसेच फायनान्स कंपनी गाडीची दुसरी चावी पण सर्वसाधारणपणे स्वत:कडे ठेवून घेते. तक्रारकत्याने विरुध्द पक्षाला दि.27/3/2015 रोजी नोटीस दिल्याचे दिसते. विरुध्द पक्षाने नोटीसला उत्तरही दिलेले नाही व प्रस्तुतकामी सुध्दा उत्तर दिलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची सर्व कथने विरुध्द पक्षाला मान्य आहेत, असा निष्कर्ष निघतो.
6. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, त्याच्याकडे असलेली चावी दि.16/3/2015 रोजी गहाळ झाली. विरुध्द पक्षाने दुसरी चावी व आर.सी. बुक परत केले नाही, जरी तक्रारकर्त्याने बेबाकी प्रमाणपत्र हजर केले तरी त्यामुळे तक्रारकर्त्याला दि.16/3/2015 ते 26/3//015 पर्यंत भाडे तत्वावर खाजगी वाहन घ्यावे लागले व त्यासाठी रु.20,000/- खर्च आला. तसेच गाडीचे लॉक बदलण्यासाठी रु.25,000/- खर्च आला. म्हणून ती रक्कम रु.45,000/- व शरीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- तक्रारकर्त्याने मागितलेले आहेत. अजय नारायण शेंडगे यांच्या 2 पावत्या तक्रारकर्त्याने हजर केल्या असून त्या प्रत्येकी रु.10,000/- च्या आहेत. दररोज रु.2,000/- भाडे दिले, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र तक्रारकर्त्याला कोठे जावे लागले, याचा कोणताही तपशील दिलेला नाही. त्यामुळे त्याबद्दल तक्रारकर्त्याला रु.5,000/- खर्च आला, असे मानता येईल. त्याच प्रमाणे लॉक बदलण्याकरिता तक्रारकर्त्याने रु.25,000/- खर्च केला, असे दाखवण्याकरिता तक्रारकर्त्याने काहीही पुरावा दिलेला नाही. मात्र एक ते दोन हजारामध्ये डयुप्लीकेट चावी बनवून मिळणे शक्य आहे, असे आमचे मत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे आमचे मत आहे. तसेच आर.सी. बुक व मूळ चावी तक्रारकर्त्यास अद्याप हवी असल्यास तो ते मिळण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील आदेश करतो.
आदेश
(1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वाहन भाड्याकरिता नुकसान भरपाई रु.5,000/- व चावीचा खर्च म्हणून रु.2,000/- व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई रु.3,000/- द्यावी.
(2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- द्यावेत.
(3) तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाकडे वाहनाचे आर.सी. बुक व दुसरी चावी हवी असल्यास त्याने विरुध्द पक्षाकडे मागणी करावी आणि त्यानंतर तीस दिवसाचे आत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे पूर्तता करावी.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-