निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार श्रीमती भारतबाई बिरादार रा. दैठणा ता. शिरुर अनंतपाळ येथील रहिवाशी असून ती मयत शंकरराव भुजंगराव बिरादार यांची पत्नी आहे. शंकरराव बिरादार याचा मुलगा राजीव बिरादार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे जनता वैयक्तिक अपघात विमा प्रिमीयम दि.12/11/2008 रोजी भरलेली असून विम्याचा कालावधी दि. 12/11/2008 ते 11/11/2012 पर्यंतचा आहे. सदर पॉलीसी नुसार राजूचे वडील शंकरराव बिरादार यांचा रु. 50,000/- च्या रक्कमेची हमी गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने स्विकारलेली आहे. सदर पॉलीसीचा क्र. 67929/115, 67929/116, 67929/117 असा आहे. सदर विम्याच्या कालावधीमध्ये अपघाती मृतयू झाल्यास त्याच्या वारसास वरिल विम्याची नमुद रक्कम देण्याची हमी गैरअर्जदाराने स्विकारलेली आहे. दि. 11/09/11 रोजी शंकरराव बिरादार रात्री अंदाजे 9.00 वाजण्याच्या सुमारास लातुरहुन दैठणा या गावी निघाले होते. त्यांची मोटारसायकल मौजे आरी या शिवारात पुलाजवळ रात्री 11 वाजता आली असता एक सफारी जीपच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणाने चालवून शंकरराव बिरादार यांच्या मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यास मार लागून जखमी अवस्थेत रोडवर पडले होते. त्यानंतर थोडया वेळाने शंकरराव बिरादार यांची पत्नी भारतबाई, मेव्हणी कमलबाई व इतर दवाखना करुन मारोती कारने येत होती. तेव्हा त्यांनी टाटा सफारी गाडी मोटार सायकलला धडक देवून निघुन गेलेली पाहीली होती. त्यांनी शंकरराव बिरादार यांन विवेकानंद येथे दाखल केले. लातुर येथे दि. 13/09/11 पर्यंत ठेवले होते. त्यानंतर सोलापुर येथील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या दवाखान्यात दाखल केले तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू दि; 23/09/11 रोजी झाला. सदर घटने बाबतची फिर्याद संजय बिरादार यांनी पोलीस स्टेशन शिरुर अनंतपाळ येथे दिल्या वरुन गु क्र. 107/11 कलम 279, 304 (अ) भा.दं.वि व 184 मोटार वाहन कायदानुसार टाटा सफारी ड्रायव्हर विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. म्हणून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा गैरअर्जदाराने काढलेल्या विमा पॉलीसीचा कालावधी दि. 12/11/2008 ते 11/11/2012 यात झालेला आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मुदतीत विमा पॉलीसीची रक्कम मिळावी म्हणून पोलीस पेपर्स पाठविली आहेत. व इतर कागदपत्रे अर्जदारास गैरअर्जदाराने काही कागदपत्रे मागितली. त्यानुसार कागदपत्रे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पाठविलेली आहेत. परंतु गैरअर्जदार हा पैसे लवकरच मिळतील असे एप्रिल 2012 पासून सांगत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत रु. 50,000/- न देवून त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदारास रु. 50,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याजाने दयावेत, अर्जदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/-, दाव्याचा खर्च रु.7,000/- दयावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत मयताचे मतदान ओळखपत्र, लाईफ लाईन लाईफ केअर यांनी दिलेली मेंबर कॉफी/पावती व त्यासोबतचे कार्ड, दि ओरिएण्टल इ. कं.लि पॉलीसी कव्हर नोट, मेडिकोलिगल केसचे पोलीस स्टेशन सोलापुरला सुचना पत्र, मरणोत्तर तपासणीसाठी प्रेताबरोबर सिव्हील सर्जनकडे पाठविलेला पोलीसचा रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, रहिवाशी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस स्टेशन शिरुर अनंतपाळ येथे दिलेली फिर्याद, एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, नोटीस, पोस्टाची पावती, परत पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रथम क्लेम दि. 24/12/11 रोजी मिळालेला आहे. परंतु त्यात प्रथम दर्शनी त्रुटी आढळल्याने त्यांनी पुर्तता करण्यासाठी दि. 24/12/2011 रोजी अर्जदारास परत पाठविला. त्यानंतर त्यांचा तो क्लेम दि. 28/01/2012 रोजी आम्हास मिळाला मिळालेल्या स्थितीत तो क्लेम आमच्या ऑफीसने दि. 28/1/2012 रोजी वरिल विमा कंपनीस सादर केला. नियमाप्रमाणे क्लेम लवकरात लवकर सेटल करणे ही दि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि., अहमदनगर ऑफीसची कायदेशीर जबाबदारी आहे.
गैरअर्जदार क्र. 4 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा मुलगा श्री राजु बिरादार यांनी जनता वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत विमा काढला होता. व त्यात मयत शंकरराव बिरादार याच्या विमा पॉलीसीची हमी गैरअर्जदाराने त्या कालावधीत मयत झाल्यास रु. 50,000/- देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. परंतु काही कागदपत्र न मिळाल्यामुळे सदरचा क्लेम प्रथम अवस्थेतच ठेवलेला आहे. सदरचा क्लेम फेटाळलेला नाही, तो विचाराधीन आहे.
मुद्दे उत्तरे
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
3) अर्जदार हा अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचा ग्राहक आहे. त्याच्या पॉलीसीचा क्र. 67929/115, 67929/116, 67929/117 असा आहे व त्यात मयत शंकरराव बिरादार यांचा मुलगा यांने सदरची जेपीए पॉलीसी गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे काढलेली आहे. त्याचा कालावधी दि. 12/11/2008 दि. 11/11/2012 असा आहे. यांचा मृत्यू अपघाती स्वरुपाचा झालेला आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराचे पती दि. 11/09/11 रोजी रात्री 10.30 वाजता लातुरहुन दैठणा गावाकडे येत असताना मोटार सायकल स्लीप होवून पडल्याने मयताच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाला होता. उपचारार्थ प्रथम लातुर व तेथून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या दवाखान्यात बेशुध्द अवस्थेतच दाखल केले होते, उपचारा दरम्यान दि. 23/09/11 रोजी मयत झाला. शंकरराव बिरादार यांच्या पि.एम रिपोर्टवरुन असे दिसते की, त्याच्या डौक्यास मार लागल्यामुळे मृत झाला आहे. अर्जदाराच्या अपघाताच्या वेळी बेशुध्द अवस्थेत होता असे त्याचे दवाखान्याचे कागदपत्रावरुन दिसुन येते. सदर अपघातानंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडे पाठविला. सदरचा तक्रार अर्ज रितसर गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांच्याकडे दि. 28/01/2012 रोजीच प्राप्त झालेला आहे. परंतु आज पर्यंत सेटल झाला नाही. गैरअर्जदार क्र. 4 चे म्हणणे, गैरअर्जदाराच्या आलेल्या लेखी कथनातुन दिसुन येते. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरचा तक्रार अर्ज हा अजुनही प्रथम अवस्थेतच आहे. म्हणुन गैरअर्जदारने अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूबाबत कोणताही आक्षेप नोंदविला नाही. तसेच त्याची जेपीए पॉलीसी काढलेली आहे, हे सुध्दा त्यांना मान्य आहे. तसेच सदर पॉलीसीनुसार मयत शंकरराव बिरादार यांचा मृत्यू दि; 12/11/2008 ते 11/11/2012 या कालावधीत अपघाती झाल्यास त्यास सदरची रु. 50,000/- देण्याची हमी विमा पॉलीसी गैरअर्जदार क्र; 3 व 4 यांनी घेतलेली आहे. म्हणून गैरअर्जदाराला सर्व बाबी मंजुर असताना देखील त्यांनी अर्जदाराचा क्लेम सेटल केला नाही अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी दिसुन येते. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. व त्यास रु. 50,000/- शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 50,000/-(अक्षरी पन्नास
हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.