न्या य नि र्ण य
(दि.20-06-204)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवाला विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केलेने दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे तक्रार अर्जातील नमुद पत्त्यावर कायमस्वरुपी राहात आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सामनेवाला यांचेकडे जीवन आरोग्य (तालिका क्रमांक 903) हेल्थ इन्शुरनस विमा पॉलीसी क्र.949013475 दि.26/08/2013 ही पॉलीसी घेतली होती. सदर पॉलिसीची अंतिम मुदत दि.26/08/2050 पर्यंत आहे. सदर पॉलिसीचा वार्षिक हप्ता रु.2,653/- असून तो तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे नियमितपणे व वेळेवर भरलेला आहे. सामनेवाला यांनी सदर विमा पॉलिसी उतरविताना विमाधारकाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागल्यास त्यासाठी होणारा वैदयकीय तपासण्या व पॅथॉलॉजिकल तपासण्यासहित सर्व वैदयकीय खर्च सदर विमा पॉलिसीच्या अंतर्गत येतो अशी माहिती तक्रारदारास दिलेली होती. त्यानंतर तक्रारदार हया दि.25/09/2017 रोजी आकस्मिक आजारी पडल्याने देवरुख ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथील डॉ. भोळे यांचे हॉस्पिटलमध्ये तातडीच्या उपचाराकरिता दाखल केले. त्यांचा ओपीडी नंबर 1004/17 होता. सदर हॉस्पिटलमध्ये तक्रारदार यांचेवर दि.25/09/2017 ते 29/09/2017 या कालावधीमध्ये उपचार करुन तक्रारदार यांना दि.29/09/2017 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदार यांना हॉस्पिटल व विविध वैदयकीय तपासण्याकरिता व औषधोपचाराकरिता एकूण रक्क्म रु.50,000/- इतका खर्च आला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचे मदतीने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे मेडिक्लेम मिळणेसाठी क्लेम फॉर्मसह सर्व योग्य ते कागदपत्र दाखल केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास सदरचा क्लेम नाकारलेचे जवळजवळ 3 वर्षांनी म्हणजे सन-2020 मध्ये कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.11/03/2021 रोजी सामनेवाला यांचे कोल्हापुर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पुर्नविचार करणेबाबतचा अर्ज पाठविला होता. सदर अर्जावर सामनेवाला यांचे कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाने दि.17/03/2021रोजी खोटे व बिनबुडाचे खोडसाळपणाचे व असंयुक्तीक कारण देऊन तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला असलेचे कळविले.
विमाधारक व्यक्तीची पॉलीसी खंडीत झाल्यास अगर नियमित प्रिमियम न भरल्यास खंडीत झालेली विमा पॉलिसी ईर्डा च्या मार्गदर्शक तत्वानुसार सामनेवाला विमाधारकास नोटीस पाठवून पर्याय देऊन खंडीत कालावधीतील पॉलिसीचे विमा हप्ते घेऊन मागील मिळणा-या लाभासह पुर्नजीवीत करुन सुरु ठेवता येते. तक्रारदार यांच्या विमा पॉलीसीचा प्रिमियम भरण्यासाठी 26 ऑगस्ट अशी होती. तक्रारदारांच्या काही कौटूंबिक आर्थिक अडचणीमुळे दि.26/08/2017 रोजी चा प्रिमियम भरणे राहून गेले होते. सदर पॉलिसी खंडीत झालेल्या ताखेपासून 90 दिवसात म्हणजे दि.26/11/2017 पर्यंत तसेच दि.26/11/2017 ते 26/11/2019 या दोन वर्षापर्यंतच्या नियमात निर्धारित केलेल्या प्रतिक्षा कालावधीत तक्रारदार त्याची विमा पॉलिसी नियमित करु शकत होता. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून त्यांचे हेल्थ इन्शुरन्सचे थकीत विमा हप्ते दंड व्याजासह दि.03/07/2019 रोजी भरुन घेतलेले आहेत व तक्रारदाराची विमा पॉलीसी नियमित केलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारता येणार नाही. तसेच तक्रारदार यांनी दि.08/10/2020रोजी सामनेवाला यांचे कोल्हापूर येथील कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली तक्रारदाराने क्लेमसोबत दाखल केलेल्या पावत्यांच्या सर्टीफाईड कॉपी मिळणेसाठी अर्ज दिला होता. त्यास सामनेवाला यांनी दि.18/02/2021 रोजी उत्तर देऊन रक्कम रु.35,189/- च्या मेडिकल बीलाच्या झेरॉक्स प्रती दिल्या. परंतु रक्कम रु.14,811/- च्या मेडिकल बीलाच्या प्रती दिल्या नाहीत. अशाप्रकारे सामनेवाला यांनी जाणूनबुजून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे व तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज् मंजूर करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारास हॉस्पिटलायझेशनच्या सर्व बीलांचा एकूण खर्च रु.50,000/- व त्यावर रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 %दराने होणाने व्याज देणेबाबत आदेश व्हावा. क्लेम फॉर्मसोबत दाखल केलेली वैदयकीय बीले सामनेवाला यांनी याकामी दाखल करणेबाबत आदेश व्हावा तसेच मानसिक, आर्थिक व शारिरीक नुकसानीपोटी रक्कम रु.1,00,000/- व तक्रारदाराच्या नुकसान भरपाईकरिता रक्कम रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.15,000/- अशी रक्कम तक्रारदारास सामनेवाला क्र.1 यांचेकडून देणेबाबतचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जात केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे 18 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये पॉलीसीची प्रत, तक्रारदाराने सन-2016 ते 2020 अखेर विमा हप्ता भरलेची पावती, सामनेवाला यांचे विमा क्लेम नाकारलेचे दि.24/02/2020 रोजीचे पत्र, माहितीचा अधिकार बाबतचा अर्ज व त्याची पोष्टाची पावती,त्यास सामनेवाला यांनी दिलेले उत्तर, महिती अधिकाराखाली सामनेवाला यांनी दिलेले बीलाच्या प्रती, मेडिकल बीले व डॉ. भोळे यांचे बील व सर्टीफिकेट, डिस्चार्ज समरी, तक्रारदाराचा पुर्ननिरीक्षण अर्ज, सदर अर्जाची पोहोच पावती, पुर्ननिरिक्षण अर्जबाबत सामनेवाला यांचे उत्तर, सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस व त्याची पोष्टाची पावती व पोष्टाचा ट्रॅकिंग रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.15 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.16 व 21 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.23 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला क्र.1 यांनी सदर कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.12 कडे त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. सामनेवाला त्यांच्या म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील सर्व मजकूर धादांत खोटा व खोडसाळ आहे. तक्रारदाराची पॉलिसी ही मेडीक्लेम नसून आरोग्यविमा पॉलिसी आहे व ती Fixed Cash Benefit पॉलिसी आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी Daily Benefit Rs.1000/- असा घेतला आहे. त्या अंतर्गत तक्रारदारास वैदयकीय तपासण्या, पॅथॉलॉजिक तपासण्या, औषधांचे बील मिळत नाही. तक्रारदारांनी दि.26/08/2016 रोजीचा हप्ता दि.10/03/2017 रोजी तसेच दि.26/08/2017 व 26/08/2018 चे दोन वार्षिक हप्ते दि.30/07/2019 रोजी व दि.26/08/2019 रोजीचा हप्ता दि.05/02/2021 रोजी भरलेला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या कलम (6) IV च्या नियमानुसार नमुद केलेल्या आजारपणासाठी दोन वर्षाचा “ विशेष प्रतिक्षा अवधी” (Specific Waiting Period) लागू झाला. सदर नियमानुसार तक्रारदाराचा दि.25/09/2017 ते 29/09/2017 या कालावधीमधील हॉस्पिटलायझेशनचा क्लेम दि.24/02/2020 रोजीच्या पत्राने नाकारण्यात आला. सदर पत्रामध्ये दावा नाकारण्याचे कारण “Revival after 90 days from date of Lapse. Specific waiting period of 2 years applicable from date of Revival” असे स्पष्टपणे नमुद केले आहे. तसेच तक्रारदाराचा दि.11/03/2021 रोजी पुर्नविचार करणेबाबतच्या अर्जास सामनेवाला यांनी दि.17/03/2021 रोजी उत्तर दिलेले आहे. पॉलिसीच्या कलम (13) मध्ये पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाबाबत नमुद केले आहे की, प्रमुख विमेदाराने न भरलेल्या विम्याच्या हप्त्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पॉलिसी पुनरुज्जीवित करु शकतात. सदर दोन वर्षाच्या कालावधीस “Period of Revival” अथवा “Revival Period” असे म्हटले जाते. ज्या कालावधीमध्ये पॉलिसी बंद अवस्थेमध्ये असेल त्या कालावधीमध्ये घडलेल्या घटनेसाठी कोणतेही लाभ देय होत नाहीत. तक्रारदाराने सदर पॉलिसीचा दि.26/08/2016 ला देय असणारा वार्षिक हप्ता त्यापुढील 30 दिवसाच्या सवलतीच्या (Grace Period) कालावधीमध्ये न भरल्यामुळे तक्रारदाराची पॉलिसी बंद पडली. सदर हप्ता दि.10/03/2017 रोजी भरुन पॉलिसी पुनरुज्जीवित केली आणि पॉलिसी 90 दिवसानंतर पुनरुज्जीवीत केल्यामुळे विशेष प्रतिक्षा अवधी (Specific waiting period) प्रत्येक विमेदारासाठी पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून पुढे दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू झाला. तक्रारदार यांनी घेतलेला औषधोपचार, हॉस्पिटलायझेशन व शल्यचिकित्सा यासाठीचा दावा पॉलिसीच्या कलम 6 (IV) अंतर्गत नमुद केलेल्या विशेष प्रतिक्षा अवधी (Specific waiting period) अंतर्गत देय होत नाही. थकीत हप्त्यासाठी विशेष प्रतिक्षा कालावधी लागू नाही तर दाव्यासाठी लागू आहे. तक्रारदाराने क्लेम फॉर्मसोबत रक्कम रु.50,000/- ची बीले दाखल केली नसून रक्कम रु.35,189/- ची बीले दाव्यासोबत जोडली होती व सदर बीलाच्या प्रती दि.18/02/2021 रोजी तक्रारदारास दिलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यत यावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र.1 यांनी नि.17 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.18 सोबत तक्रारदाराची प्रिमियम हिस्ट्री शिट दाखल केली आहे. नि.19 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.24 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5. सामनेवाला क्र.2 यांनी याकामी हजर होऊन नि.13 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार मान्य केली आहे. सामनेवाला क्र.2 त्यांचे म्हणणेमध्ये कथन करतात, सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीचे विमा प्रतिनिधी असून एजंट कोड नं.एलआयसी 02631948 असा आहे. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीची पॉलिसी सामनेवाला क्र.2 यांचेकडून घेतली होती व सदर पॉलिसी दि.26/08/2050 पर्यंत वैध आहे. सदर पॉलिसीचा हप्ता वेळेवर भरला जात होता. दि.25/09/2017 ते 29/09/2017 या कालावधीतील तक्रारदाराच्या आजारपणासाठी झालेला रक्कम रु.50,000/- चा खर्चाचा परतावा सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून मिळण्याची तरतुद आहे. तक्रारदाराने पॉलिसीचे राहिलेले सर्व हप्ते दंड व्याजासह भरुन तक्रारदार यांनी दि.30/07/2019 रोजी खंडीत पॉलिसी पुर्नजिवित करुन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदाराची खंडीत पॉलिसी नियमित झालेली होती. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम फॉर्म मंजूरीसाठी पात्र आहे. तक्रारदार यांनी दि.11/03/2021रोजी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीच्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाकडे पुनर्विचार करणेबाबतचा अर्ज दिला होता. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी सदर कामी काही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून सामनेवाला क्र.2 यांना पक्षकार केलेले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना दोषी ठरवण्यात येऊ नये अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी केली आहे.
6. सामनेवाला क्र.2 यांनी नि.14 कडे दोन कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये सामनेवाला क्र.2 अधिकृत विमा प्रतिनिधी असलेबाबत लेटर ऑफ अपॉईंटमेंटची प्रत व विमा प्रतिनिधीच्या Functions संबंधीत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एजंटस) रेग्युलेशन्स 2017 च्या संबंधीत पान क्र.45 व 49 च्या प्रती दाखल केल्या आहेत.
7. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे आणि उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | नाही. |
3 | सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा प्रदिर्घ विलंबाने नाकारलेचे कळवून तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. सामनेवाला क्र.1 |
4 | तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून नुकसान भरपाईपोटीची रक्कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
8. मुद्दा क्रमांकः 1 – तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे जीवन आरोग्य (तालिका क्रमांक 903) हेल्थ इन्शुरनस विमा पॉलीसी क्र.949013475 दि.26/08/2013 ही पॉलीसी घेतली होती. सदर पॉलिसीची अंतिम मुदत दि.26/08/2050 पर्यंत आहे. सदर पॉलिसीचा वार्षिक हप्ता रु.2,653/- होता. सदर पॉलिसी तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केली असून सदरची पॉलिसीवर तक्रारदाराचे नांव दिसून येते तसेच सदर पॉलिसी सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली आहे. तसेच तक्रारदार हे सामनेवाला यांचे विमाधारक असलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला विमा कंपनी ही सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. मुद्दा क्रमांकः 2 – तक्रारदार हया दि.25/09/2017 रोजी अचानक आजारी पडल्याने त्यांनी डॉ.भोळे देवरुख ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे या हॉस्पिटलमध्ये दि.25/09/2017 ते 29/09/2017 या कालावधीमध्ये सर्जरी करुन उपचार करुन दि.29/09/2017 रोजी डिस्चार्ज घेतला. त्याबाबत डॉ.भोळे यांचे डिस्चार्ज कार्ड तक्रारदाराने याकामी नि.6/12 कडे दाखल केले आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे मेडिक्लेम मिळणेसाठी क्लेम फॉर्मसह सर्व योग्य ते कागदपत्र दाखल केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास “Revival after 90 days from date of Lapse. Specific waiting period of 2 years applicable from date of Revival” असे कारण देऊन सदरचा क्लेम नाकारलेचे दि.24/02/2020 रोजी म्हणजे जवळजवळ 3 वर्षांनी कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.11/03/2021 रोजी सामनेवाला यांचे कोल्हापुर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पुर्नविचार करणेबाबतचा अर्ज पाठविला होता. सदर अर्जावर सामनेवाला यांचे कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाने दि.17/03/2021 रोजी उत्तर देऊन तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला.
10. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदाराने सदर पॉलिसीचा दि.26/08/2016 ला देय असणारा वार्षिक हप्ता त्यापुढील 30 दिवसाच्या सवलतीच्या (Grace Period) कालावधीमध्ये न भरल्यामुळे तक्रारदाराची पॉलिसी बंद पडली. सदर हप्ता दि.10/03/2017 रोजी भरुन पॉलिसी पुनरुज्जीवित केली आणि पॉलिसी 90 दिवसानंतर पुनरुज्जीवीत केल्यामुळे विशेष प्रतिक्षा अवधी (Specific waiting period) प्रत्येक विमेदारासाठी पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून पुढे दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू झाला. तक्रारदार यांनी घेतलेला औषधोपचार, हॉस्पिटलायझेशन व शल्यचिकित्सा यासाठीचा दावा पॉलिसीच्या कलम 6 (IV) अंतर्गत नमुद केलेल्या विशेष प्रतिक्षा अवधी (Specific waiting period) अंतर्गत देय होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे दिसून येत नाही. सबब मुद्दा क्र.2चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.
11. मुद्दा क्रमांकः 3 – तक्रारदाराने त्यांचा विमा क्लेम सामनेवालाकडे सन-2017 मध्येच दाखल केला होता. सदर विमा क्लेमबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास तीन/सहा महिन्यामध्ये विमा क्लेम मंजूर अथवा नामंजूर कळविणे आवश्यक होते. परंतु सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये कबूल केले आहे की सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.24/02/2020 रोजी त्यांचा क्लेम नामंजूर केलेचे पत्र दिलेले आहे. सदरचे पत्र तक्रारदाराने नि.6/6 कडे दाखल केले आहे. यावरुनच सामनेवाला यांनी तक्रारदारास जवळजवळ तीन वर्षाच्या विलंबाने क्लेमबाबत कळविलेचे दिसून येते. तसेच सदर क्लेम नाकारलेचे पत्र देणेसाठी सामनेवाला यांना तीन वर्षे इतका विलंब का झाला याबाबतचा कोणताही खुलासा सामनेवाला यांनी केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी विमा क्लेमबाबत लवकर निर्णय न घेऊन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
12. मुद्दा क्रमांकः 4 – वरील सर्व विवेचनांचा विचार करता, सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रदिर्घ विलंबाने नाकारलेने तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाला क्र.1 च्या हया कृतीमुळे तक्रारदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निर्णयाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. तसेच सामनेवाला क्र.2हे सामनेवाला क्र.1 चे एजंट असून त्यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना सेवात्रुटीसाठी जबाबदार धरता येणार नाही.
13. मुद्दा क्रमांकः 5 –सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा क्लेम प्रदिर्घ विलंबाने नाकारलेने नुकसान भरपाईपोटी रक्क्म रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) अदा करावे.
3) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1 यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.