जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 7/2016 तक्रार नोंदणी दि. :-6/2/2016
तक्रार निकाली दि. :- 30/7/2016
निकाल कालावधी :- 5 म.24 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- कु.अपुर्वा रोमदेव अरसोडे,
वय 12 वर्षे, धंदा-शिक्षण,
मार्फत–अपाक आई श्रीमती प्रतिभा रोमदेव अरसोडे,
वय 36 वर्षे, धंदा-नोकरी,
रा.पो.ता.जि.गडचिरोली (बालाजी नगर,चामोर्शी रोड)
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- शाखा प्रबंधक,
भारतीय जीवन विमा प्राधिकरण गडचिरोली.
ता.जि.गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.ए.बी.रणदिवे
गैरअर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री प्रमोद बोरावार व अन्य
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 30 जूलै 2016)
अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराचे मृतक वडीलांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलीसी क्रमांक 973298214 दिनांक 28.3.2004 ला काढली होती. अर्जदाराचे मृतक वडील हे भगवंतराव हिंदी हायस्कुल, गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते, त्यांचा दिनांक 9.11.2013 ला आजारी पडून मृत्यु झाला. अर्जदाराचे वडीलाचे पगारातून पॉलीसी किस्त रुपये 641/- कपात होत होती. पॉलीसी किस्त नियमित भरणा केलेली आहे. अर्जदाराचे वडीलांचे निधन झाल्याने, अर्जदार ही पॉलीसीचे हितलाभ मिळण्यास पात्र आहे. अर्जदाराचे वडीलांचे निधनानंतर अर्जदाराची आईने दिनांक 24.6.2014 ला मृत्युदावा मिळण्याबाबत गैरअर्जदाराकडे प्रस्ताव सादर केलेला होता. त्याअनुषंगाने, गैरअर्जदार यांनी दिनांक 7.5.2014 च्या पत्रान्वये, सदर पॉलीसीची रक्कम देता येऊ शकत नाही, किस्त नियमित भरण्यात यावी, असे कळवून अर्जदाराचा दावा फेटाळला. सदर पॉलीसीवर अर्जदाराचे वडीलांनी रुपये 45,000/- कर्ज घेतलेले होते. सदरचे कर्ज अर्जदाराचे आईने गैरअर्जदाराकडे दिनांक 22.9.2014 ला गैरअर्जदाराकडे एकमुस्त भरणा केले व व्याजाची तसेच कर्जाची थकीत रक्कम रुपये 5371/- दिनांक 28.1.2016 ला भरणा केले. अर्जदाराचे वडीलांचा मृत्यु झाल्याने पॉलीसीची किस्त भरणे शक्य नाही. अर्जदाराची पॉलीसी ही मृत्युपश्चात हितलाभ मिळण्यास पात्र झाली. सदर पॉलीसीमध्ये असे कथित केले आहे की, “यदि किसी भी समय इस पॉलीसी के जोखीम प्रारंभ तिथी के पश्चात और इस पॉलीसी के अंतर्गत कम से कम 3 पुरे वर्षो के प्रिमीयमोंका भुगतान किये जाने के उपरान्त किसी अनुवर्ती प्रिमीयम का भुगतान नियमानुसार नही किया जाता है तो प्रथम अदत्त प्रिमीयम कि देय तिथी के छः माह के भितर बिमीत व्यक्ती की मृत्यु होणे की दशा मे (क) अदत्त प्रिमीयम या प्रिमीयमोंको उन शर्तोपर जैसे की, इस अवधी मे पॉलीसी के पुनःप्रवर्तन के लिये हो, मृत्यु की तिथी तक व्याज सहित और (ख) पॉलीसी की अगली वर्षगाठ के पुर्व देय प्रिमीयमोको काटकर पॉलीसी धन राशीया उसी प्रकार भुगतान की जायेगी जैसे की, पॉलीसी पुर्ण रुप से चालू रही हो ”. या नियमानुसार अर्जदार सदर पॉलीसी मृत्यु पश्चात हितलाभ मिळण्यास पात्र आहे. परंतु, गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा फेटाळल्यामुळे, अर्जदाराने विद्यमान मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराकडून नुकसानभरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावरील व्याज प्रति महिना 18 टक्के दराने मिळण्यात यावी तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/- मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 12 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचे वडील श्री.रामदेव यादवराव अरसोडे यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलीसी क्र.973298214 दिनांक 28.3.2014 ला काढली होती व ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते आणि त्यांचा मृत्यु दिनांक 9.11.2013 ला झाला हे मान्य आहे. पॉलीसी किस्त रुपये 641/- त्यांचे कपात होत होत होती. मात्र, पॉलसीची किस्त नियमित भरणा करण्यात येत होती, हे अमान्य आहे. उपारोक्त पॉलीसीमध्ये 5/2013, 6/2013 तसेच 8/2013 ते 20/2013 असे गॅप पडलेले होते. पॉलीसीमधील नमुद अटी व शर्तीनुसार गॅप पडल्यामुळे पॉलीसी Inforce नव्हती आणि त्यामुळे, Premium Waiver Benefit चा लाभ मिळू शकत नाही. Premium Waiver Benefit चा लाभ मिळण्यासाठी Proposer च्या मृत्युच्या दिवशी पॉलीसी ही Inforce असावी लागते. भगवंतराव हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली यांनी दि.5.1.2015 च्या पत्रानुसार कळविले की, एल.आय.सी. चे प्रिमियम माहे 5/2013 ते 6/2013 कपात करण्यात आलेले नाही, सदर पत्र अर्जदाराने तक्रारीसोबत जोडलेले आहे. सदर पत्रावरुन माहे 5/2013 ते 6/2013 चे प्रिमियम कपात झाले नाही, हे सिध्द होते, त्यामुळे पॉलीसीमध्ये गॅप पडली व Inforce नव्हती त्यामुळे, Premium Waiver Benefit नाकारण्यात आला. गैरअर्जदारांनी योग्य ते कारण व अटी आणि शर्तीनुसारच Premium Waiver Benefit नाकारला असल्यामुळे, गैरअर्जदार यांनी कुठल्याही प्रकारची त्रृटीपुर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे, अर्जदाराचा दावा खारीज करण्यात यावा, अशी विनंती केली.
4. अर्जदाराने तक्रारी कथना पृष्ठयर्थ नि.क्र.13 नुसार पुरावा शपथपञ व नि.क्र.14 नुसार प्रतिउत्तर, व नि.क्र.23 नुसार 5 दस्तऐवज दाखल केले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.18 नुसार 9 दस्तऐवज दाखल केले. अर्जदार यांनी नि.क्र.19 नुसार अर्जदाराची तक्रार हाच लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांनी नि.क्र.20 नुसार गैरअर्जदाराचे लेखी उत्तर हेच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, अशी पुरसिस दाखल केली. तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : होय
केला आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराचे मृतक वडील, यांनी अर्जदाराचे नावाने अर्जदार लाभार्थी असलेली भारतीय जीवन विमा निगम, शाखा गडचिरोली यांचेकडून पॉलीसी क्र. 973298214 ही दिनांक 28.3.2004 ला काढलेली होती, ही बाब गैरअर्जदारास सुध्दा मान्य असल्यामुळे, अर्जदार सदर पॉलीसीचा लाभार्थी असल्यामुळे, अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे, हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. गैरअर्जदाराने आपले लेखी उत्तरातील विशेष कथनात असे म्हटले आहे की, अर्जदाराने काढलेली वादातीत पॉलीसी ची प्रिमियम रक्कम रुपये 641/- जी त्याच्या पगारातून कपात होत होती, परंतु, सदर पॉलीसीमध्ये दिनांक 5/2013, 6/2013 ची कपात झालेली नाही, त्यामुळे, पॉलीसीमध्ये गॅप पडली व Inforce नव्हती त्यामुळे, Premium Waiver Benefit नाकारण्यात आला. परंतु, गैरअर्जदाराने याबाबत कोणताही पुरावा, दस्तऐवज दाखल केलेला नाही, उलट, अर्जदाराने नि.क्र. 23 व 25 नुसार दाखल दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, अर्जदाराच्या पगारातून रक्कम कपात होत होती. म्हणून, अर्जदार हा मृत्युपश्चात हितलाभ (PWB) या लाभासाठी पात्र आहे. म्हणून, वरील विवेचनावरुन हे मंच अर्जदाराची मृत्युपश्चात हितलाभ (PWB) बद्दल तक्रारीत केलेली मागणी मान्य करीत आहे.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या तोंडी युक्तीवादावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराचे वडीलाने, अर्जदाराचे नावे काढलेली वादातीत पॉलीसी अर्जदाराचे वडीलाचे मृत्युपश्चात हितलाभ (PWB) साठी पात्र आहे. तसेच, अर्जदाराचे आईने वादातीत पॉलीसीवर घेतलेल्या कर्जाची रक्कम रुपये 45,000/- सुध्दा व्याजासह भरलेली आहे. तसेच, गैरअर्जदाराने सदर कर्जाची रक्कम जमा करतांनासुध्दा अर्जदारास कळविले नाही व अर्जदारासोबत कोणतेही पत्रव्यवहार करुन पॉलीसी प्रिमियम भरण्यास सांगितले नाही. वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश –
अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
गैरअर्जदाराचे अभिलेखानुसार जर अर्जदाराची पॉलीसी बंद झालेली असल्यास, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आंत पुर्ववत सुरु करुन दयावी.
अर्जदाराचे वडीलांनी काढलेली पॉलीसीमधील मृत्युपश्चात हितलाभ (PWB) आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आंत गैरअर्जदाराने अर्जदारास दयावे.
गैरअर्जदाराने, अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व रुपये 2000/- तक्रारीचा खर्च म्हणून आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आंत दयावी.
आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य द्यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/7/2016.
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.