(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 31 ऑगष्ट 2013)
अर्जदार नामदेव फत्तूजी पिलेवान यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. अर्जदाराची संक्षिप्त तक्रार अशी की,
अर्जदार नामदेव फत्तुजी पिलेवान यांनी डिसेंबर 2002 मध्ये गैरअर्जदाराकडे रुपये 2,00,000/- देवून पेन्शन पॉलिसी क्र.974519260 काढली होती. सदर पॉलिसी प्रमाणे गैरअर्जदार अर्जदारास मासिक रुपये 1500/- पेन्शन देत होते. अर्जदाराच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने आर्थिक अडचणीमुळे सदर पॉलिसी बंद करुन समर्पित मुल्य देण्याची अर्जदाराने दि.15.8.2011 रोजी व त्यानंतर दि.29.9.2012 रोजी आवश्यक कागदपञ सादर करुन विनंती केली. गैरअर्जदाराने एप्रिल 2012 पासून अर्जदारास मासिक पेन्शन देणे बंद केले असून अर्जदाराने भरलेली रक्कम रुपये 2,00,000/- त्यास परत करण्यास टाळाटाळी करत असून त्यासंबंधाने कोणताही पञव्यवहार केला नाही. गैरअर्जदाराचे कृती सेवेतील न्युनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केली असून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेली मुळ रक्कम रुपये 2,00,000/- सदर रकमेवर डिसेंबर 2011 ते ऑक्टोंबर 2012 पर्यंतचे व्याज रुपये 25,000/-, शारिरीक व मानसिक ञासाबाबत रुपये 10,000/- आणि तक्रार खर्च रुपये 500/- असे एकुण रुपये 2,40,000/- देण्याचा गैरअर्जदाराविरुध्द आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
2. गैरअर्जदार शाखा प्रबंधक, भारतीय जिवन विमा निगम, शाखा गडचिरोली यांनी त्यांचे लेखी बयान नि.क्र.11 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे कि, अर्जदाराने त्यांच्याकडे रुपये 2 लाख देवून 2004 च्या फेब्रुवारीमध्ये पेन्शन पॉलिसी क्र.974519260 काढली होती. आर्थिक अडचणीमुळे सदर पॉलिसी बंद करुन रक्कम परत करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यामुळे गैरअर्जदाराने एप्रिल 2012 पासून अर्जदारास पेन्शन देणे बंद केले आहे. गैरअर्जदाराने यासंबंधात पञव्यवहार केला नाही व रक्कम परत देण्यास टाळाटाळी करीत असल्याचे नाकबूल केले आहे.
3. आपल्या विशेष कथनात गैरअर्जदाराने असे म्हटले आहे कि, पेन्शन पॉलिसीची मुळ रक्कम परत करण्यासाठी गैरअर्जदारास प्राप्त अर्ज Individual Pension Policy Cell या गैरअर्जदाराच्या मुंबई येथील विभागात मंडल कार्यालयाच्या शिफारशीसह पाठवावा लागतो व त्यानंतर सदर विभागाच्या सक्षम अधिका-याच्या निर्णयाप्रमाणे पॉलिसीधारकास मिळणा-या रकमेकरीता संमतीपञ मागविण्यात येते. या प्रकरणात वरील कार्यालयीन प्रक्रियेप्रमाणे गैरअर्जदारास समर्पित मुल्य स्विकारण्यासाठी संमती असल्याबाबत संमतीपञ सही करुन देण्यासाठी पाठविले होते. परंतु अर्जदाराने ते पञ स्विकारले नाही व संमतीपञ सही करुन दिले नाही म्हणून पॉलिसी समर्पणाची पुढील प्रक्रिया थांबलेली आहे. यांत गैरअर्जदाराचा कोणताही दोष नाही आणि त्यांचेकडून सेवेत कोणताही ञृटीपूर्ण व्यवहार अगर अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्या गेला नाही. वेळेवर समर्पण मुल्य न मिळण्यासाठी अर्जदार स्वतःच जबाबदार असल्याने त्याला गैरअर्जदाराविरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही आणि म्हणून समर्पण मुल्यावर व्याज तसेच शारीरीक व मानसिक ञासाबद्दल नुकसान भरपाई किंवा तक्रार खर्च मिळण्यास अर्जदार पाञ नाही.
4. त्यांनी असेही नमुद केले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेल्या संमतीपञावर (consent letter) अर्जदाराने सही करुन दिल्यास पॉलिसीच्या शर्ती व अटी प्रमाणे आणि गैरअर्जदाराच्या नियमाप्रमाणे अर्जदारास पॉलिसीचे समर्पण मुल्य (Surrender Value) रुपये 1,96,000/- आणि एप्रिल 2012 पासून न दिलेली अॅन्युइरी समर्पणाच्या तारखेपर्यंत देण्यास गैरअर्जदार तयार आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदाराचे परस्पर कथनावरुन खालील मुद्दे मंचापुढे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, मंचाने निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणे मिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) गैरअर्जदाराने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा : नाही
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ?
2) अर्जदार गैरअर्जदारांकडून पेन्शन विमा : समर्पित मुल्य रुपये
पॉलिसीसाठी ठेवलेली रक्कम मिळण्यास पाञ 1,96000/- मिळण्यास आहे काय ? पाञ आहे.
3) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
अर्ज अंशतः मंजूर.
- कारण मिमांसा -
6. अर्जदार नामदेव फतुजी पिलेवान यांनी त्यांची साक्ष शपथपञ नि.क्र.18 प्रमाणे दिली आहे. तसेच यादी नि.क्र.4 सोबत 2 दस्ताऐवज दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने पुराव्याचे वेगळे शपथपञ दिले नसल्याने शपथपञावर दाखल केलेले लेखी बयाण हाच त्यांचा पुरावा समजण्यांत आला. तसेच त्यांनी दस्तऐवजाची यादी नि.क्र.16 आणि अर्ज नि.क्र.22 सोबत दाखल यादीप्रमाणे दाखल दस्तऐवज सदर प्रकरणाच्या निर्णितीसाठी विचारात घेण्यात आले. गैरअर्जदाराने लेखी युक्तिवाद नि.क्र. 19 प्रमाणे व अर्जदाराने लेखी युक्तिवाद नि.क्र.21 प्रमाणे दाखल केला आहे.
7. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत :- सदर प्रकरणांत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रुपये 2,00,000/- देवून पेन्शन पॉलिसी क्र.974519260 काढली व सदर पॉलिसीपोटी गैरअर्जदाराकडून अर्जदारास मार्च 2012 पर्यंत दरमहा रुपये 1500/- पेन्शन मिळाली आहे याबद्दल उभयपक्षात वाद नाही. तसेच अर्जदाराने यादी नि.क्र.4 सोबत दाखल दस्त क्र.अ-1 व अ-2 प्रमाणे अनुक्रमे 5.8.2011 आणि 21.9.2012 रोजी गैरअर्जदारास पञ देवून वरील पॉलिसी बंद करुन समर्पित मुल्य परत करण्यास विनंती केली हे देखील उभयपक्षांना मान्य आहे. गैरअर्जदाराच्या कार्यपध्दतीप्रमाणे अर्जदाराचा अर्ज वैयक्तिक पॉलिसी सेल, मुंबई या कार्यालयाकडे विभागीय कार्यालयाचे शिफारशीसह पाठविण्यांत आला. त्यावर सरेंडर व्हॅल्यु मान्य असल्याबाबत अर्जदाराच्या संमतीपञाची आवश्यकता असल्याने 21.11.2012 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास रजिस्टर पोष्टाने पञ पाठवून संमतीपञ पाठविण्याची किंवा त्याबाबत शाखा कार्यालयात येवून पुर्तता करण्यास कळविले. सदरचे पञाची प्रत दस्तऐवजाची यादी नि.क्र.16 सोबत दस्त क्र.ब-2 वर आहे. सदर पञ पाठविल्याबाबतचा रजिष्टर पोष्ट ए.डी. लिफाफा दस्त क्र. ब-3 वर आहे. त्यावर अर्जदार नामदेव फतूजी पिलेवान (Addressee) यांनी सदर लिफाफा स्विकारण्यास नकार दिल्याबाबत “Refused, Return to sender” असा 6.12.12 चा पोष्टाचा शेरा आहे. यावरुन गैरअर्जदाराने समर्पित मुल्य रुपये 1,96,000/- देण्यासाठी अर्जदाराकडे नियमानुसार संमतीपञ मागणारे पञ पाठविले, परंतु अर्जदाराने सदरचे पञ स्विकारण्यास नकार दिला व संमतीपञ पाठविले नाही म्हणून गैरअर्जदार अर्जदारास समर्पित मुल्य देवू शकले नाही हे स्पष्ट होते. अर्जदाराच्या अर्जावर कार्यालयीन प्रक्रियेप्रमाणे आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता झाल्याशिवाय गैरअर्जदाराने पॉलिसीचे समर्पित मुल्य अर्जदारास देणे अपेक्षित नाही. अर्जदाराने स्वतः गैरअर्जदाराने पाठविलेले 21.11.12 चे पञ नाकारुन संमतीपञ सादर केले नाही म्हणून सदर संमतीपञा अभावी गैरअर्जदाराने अर्जदारास समर्पित मुल्याचे भूगतान केले नाही याचा दोष गैरअर्जदारास देता येणार नाही व गैरअर्जदाराची सदरची कृती सेवेतील ञृटी किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
8. असे असले तरी गैरअर्जदाराने अर्जदाराच्या पेन्शन पॉलिसीचे समर्पित मुल्य रुपये 1,96,000/- आणि एप्रिल 2012 पासून देण्यात न आलेली पेन्शन (अॅन्यूईटी) दरमहा रुपये 1500/- प्रमाणे समर्पित मुल्य अर्जदाराचे हातात पडेपर्यंतच्या तारखेपर्यंत देण्याचे लेखी बयाण व युक्तिवादात मान्य केले आहे. तसेच सदर प्रकरण चालू असतांना अर्जदाराने रुपये 1,96,000/- समर्पित मुल्य स्विकारण्यास तयार असल्याबाबत संमतीपञ दि.8.8.2013 रोजी गैरअर्जदाराकडे दिले असून ते गैरअर्जदाराने पुढील कारवाईसाठी पाठविले असल्याने अर्जदारास सदर रक्कम देण्यास कोणताही कायदेशिर अडथळा राहिलेला नाही. सदर संमतीपञाची प्रत गैरअर्जदाराने दि.26.8.2013 रोजी नि.क्र.22 सोबतच्या यादीप्रमाणे दाखल केले आहे. तसेच अर्जदारास मार्च 2012 पर्यंत दरमहा रुपये 1500/- प्रमाणे मासिक पेन्शनचे चेक देण्यांत आले व ते अर्जदाराने वटवून त्याची उचल केल्याचे सटेटमेंट गैरअर्जदाराने पुरसीस नि.क्र.23 सोबत दाखल केले आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदाराने अर्जदारास पॉलिसीचे समर्पण मुल्य रुपये 1,96,000/- तसेच सदर रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत एप्रिल 2012 पासून दरमहा रुपये 1500/- प्रमाणे अॅन्युईटीची रक्कम द्यावी असा आदेश होणे न्यायोचित होईल.
9. माञ, अर्जदाराने पॉलिसी बंद करण्यासाठी अर्ज दिल्यामुळे एप्रिल 2012 नंतरची मासिक पेन्शन देण्याचे गैरअर्जदाराने बंद केले व नोव्हेंबर 2012 मध्ये गैरअर्जदाराने रजिस्टर पोष्टाने पञ पाठवून समर्पण मुल्य स्विकारण्याबाबत संमतीपञ मागूनही अर्जदाराने ते न दिल्यामुळे समर्पित मुल्य व बाकी राहीलेली पेन्शनची रक्कम देण्यास विलंब झाला आहे ही बाब लक्षात घेता अर्जदार शारीरीक व मानसिक ञासाबाबत नुकसान भरपाई तसेच समर्पित मुल्यावर मागणी प्रमाणे व्याज आणि या कारवाईचा खर्च मिळण्यास पाञ नाही.
म्हणून मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
(1) गैरअर्जदाराने अर्जदारास पेन्शन पॉलिसी क्र. 974519260 च्या समर्पित मुल्याची राशी रुपये 1,96,000/- द्यावी.
(2) समर्पित मुल्य राशी रुपये 1,96,000/- अर्जदाराच्या हातात पडेपर्यंतच्या काळासाठी एप्रिल 2012 पासून दरमहा 1,500/- प्रमाणे पेन्शन (अॅन्युईटी) ची रक्कम एकमुस्त द्यावी.
(3) वरील आदेशाची पुर्तता आदेशाच्या तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी. मुदतीच्या आंत पैसे न दिल्यास 1 महिन्यानंतरच्या काळासाठी वरील संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे.12 % प्रमाणे व्याज देण्यास गैरअर्जदार पाञ राहील.
(4) सदर प्रकरणाचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
(5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 31/8/2013