(घोषित दि. 04.12.2014 व्दारा श्री सुहास एम आळशी, सदस्य)
अर्जदार या भादली ता.घनसावंगी जि.जालना येथील रहिवासी आहेत. अर्जदार यांच्या पतीचा मृत्यू दिनांक 29.11.2011 रोजी विजेचा शॉक लागून झालेला आहे. सदर घटनेची नोंद अर्जदार यांनी पोलीस स्टेशन घनसावंगी जि.जालना येथे आकस्मीत नोंद क्रमांक 44/11 अन्वये केलेली आहे. मयताचे पोस्ट मार्टम सामान्य रुग्णालय, कुंभार पिंपळगाव येथे करण्यात आलेले आहे.
अर्जदार यांचे पती मदन अश्रूबा तौर हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील दारिद्यरेषे खालील व अल्पभुधारक शेतक-यांसाठी आम आदमी विमा योजना सुरु केलेली आहे. सदरील योजने अंतर्गत संबंधित कुटू्ंबाच्या प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 75,000/- व नैसर्गिक मृत्यू आल्यास रुपये 30,000/- मयताच्या वारसास देय आहेत. अर्जदाराचे पती यांचा एल.आय.सी आय.डी 5016682 असून सदर विमा योजने अंतर्गत तहसील कार्यालय घनसावंगी यांचे मार्फत दिनांक 05.03.2012 रोजी व जिल्हाधिकारी जालना यांचेकडे तसेच दिनांक 14.10.2013 रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे विमा दावा सादर केलेला आहे. परंतू अद्याप पर्यंत विमा कंपनीकडे विमा दावा प्रलंबित आहे.
अर्जदार यांनी तक्रारी सोबत पॉलीसी अटीशर्ती याची प्रत, जिल्हाधिकारी यांना दिलेले पत्र, जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या दाव्याची छायांकीत प्रत, दावा अर्ज, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, कार्यकारी दंडाधिकारी यांचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
अर्जदार यांनी विमा रक्कम रुपये 75,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- अशी मागणी केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 हजर झाले असून त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून त्यांना अर्जदार यांनी दाखल केलेला विमा दावा प्राप्त झालेला नाही. याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 04.03.2014 रोजीचे खुलासा करणारे औरंगाबाद येथील शाखा कार्यालयाने नांदेड येथील विभागीय कार्यालयास पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. त्याच प्रमाणे अर्जदार यांचा अर्ज अथवा कागदपत्र हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांना प्राप्त न झाल्यामुळे ते त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ होते व आहेत असे देखील म्हटले आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार हा ग्राम पंचायतचा शिपाई असल्याबाबत उल्लेख केलेला आहे. परंतू त्याबाबत कोणताही योग्य तो दस्तऐवजाचा पुरावा दाखल केलेला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचा समोर हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी अर्जदाराचा विमा दाव्याबाबतचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठविला अथवा नाही याबाबतही काही कळविलेले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
मुद्दा निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सेवेत कोणतीही
त्रुटी केलेली आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
गैरअर्जदार व अर्जदार यांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, अर्जदाराचे पती मदन आश्रुबा तौर यांचा मृत्यू दिनांक 29.11.2011 रोजी झाला. त्याबाबतचे आवश्यक ते दस्तऐवज जसे साक्षीदाराचे जवाब नि.4/11, घटनास्थळ पंचनामा नि.4/12, पोस्ट मार्टम रिपोर्ट नि.4/14 हे व इतर कागदपत्र त्यांनी प्रकरणात दाखल केले आहेत. दोनही पक्षाचे कागदपत्रांचे अवलोकन केले असता मा.जिल्हाधिकारी यांना तहसीलदार घनसावंगी यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव पत्र क्रमांक जाक्र 2012/संगायो/आ.आ.वि.यो/कावी दिनांक 05.03.2012 रोजी पाठविला होता. परंतु जिल्हाधिकारी जालना यांचे कार्यालया मार्फत सदर विमा प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्याच प्रमाणे नि.17/1 वरुन असे दिसुन येते की, श्रीमती आशा मदन तौर या सदर योजनेच्या लाभधारक म्हणून अधिकारप्राप्त व्यक्ती आहेत. तसेच त्यांचा विमा पॉलीसी क्रमांक एल.आय.सी आय.डी 5016682 असा असल्याबाबतचे पत्र प्रकरणात दाखल आहे. वरील परिस्थिती वरुन अर्जदार हिने मयत मदन आश्रुबा तौर यांच्या मृत्यूच्या विमा दाव्याचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दाखल करणे ऊचित ठरेल असे या मंचाचे मत आहे. यावरुन हे मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रार अर्जदार यांनी मयत मदन आश्रुबा तौर यांच्या मृत्यूच्या विमा दाव्याची रक्कम मिळणे करिता गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे विमा प्रस्ताव सदर आदेश झाल्या पासुन 30 दिवसात दाखल करावा. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदर प्रस्ताव विलंबाचे कोणतेही कारण न दाखवता तो स्वीकार करावा व अर्जदाराने दावा दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 45 दिवसांच्या आत त्यावर आवश्यक ती कार्यवाही करावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.