(पारीत व्दारा श्री. भास्कर बी. योगी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक – 20 एप्रिल, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष लॉईफ इन्शुरन्स कॉपोरेशन ऑफ इंडिया विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात दुय्यम अपघाती लाभाची रक्कम मिळण्याकरीता विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदार उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तक्रारदार क्रं. 1 चा मृतक पती श्री. महेंद्रनाथ राहांगडाले हे हरीकृष्णा कनिष्ठ विद्यालय, कोडे लोहारा येथे शिक्षक पदावर कार्यरत होते. तक्रारदार क्रं. 2 व 3 हे तक्रारदार क्रं.1 व महेंद्रनाथ यांची मुले आहेत व तक्रारदार क्रं. 1 ची सासु फुलभाषण ही दिनांक 13/04/2016 रोजी मरण पावली आहे. तक्रारदार क्रं. 1 च्या पतीने विरुध्द पक्ष विमा कंपनीकडून एकूण 13 विमा पॉलीसीस्या काढल्या होत्या त्यांचे विवरण पुढील प्रमाणे-
अ.क्रं. | पॉलीसी क्रमांक | दिनांक | रुपये | परिपक्व दिनांक |
1. | 972832673 | 02/02/2000 | 25,000 | 02/01/2020 |
2. | 972736703 | 28/03/2000 | 50,000 | 28/03/2020 |
3. | 972833130 | 28/03/2000 | 1,00,000 | 28/03/2025 |
4. | 972834397 | 14/09/2000 | 50,000 | 14/09/2023 |
5. | 972996144 | 15/12/2001 | 50,000 | 15/12/2023 |
6. | 972998767 | 28/11/2002 | 50,000 | 28/11/2027 |
7. | 973217732 | 05/03/2004 | 30,000 | 05/03/2024 |
8. | 973278994 | 28/03/2005 | 50,000 | 28/03/2025 |
9. | 972989178 | 23/12/2002 | 1,00,000 | 23/12/2022 |
10. | 973222620 | 04/08/2005 | 1,00,000 | 04/08/2026 |
11. | 973282991 | 19/01/2006 | 1,00,000 | 19/12/2027 |
12. | 973283630 | 03/03/2006 | 1,05,000 | 03/03/2031 |
13. | 973721179 | 14/09/2009 | 75,000 | 14/09/2025 |
तक्रारकर्ती क्रं. 1 ने पुढे असे नमुद केले की, तक्रारदार क्रं. 1 चा मृतक पती श्री. महेंद्रनाथ राहांगडाले हे दिनांक 10/11/2015 रोजी स्वतःच्या घरी टेरेसवर सकाळी 11.15 वाजताच्या दरम्यान दिवाळी सणानिमित्त तिस-या मजल्यावर साफ सफाई करीत असतांना अचानक त्याचा तोल जावून घराच्या टेरेसवरुन खाली पडल्यामुळे फसलिला मार लागला. तक्रारकर्ती क्रं. 1 च्या पतीला ताबडतोब औषधोपचाराकरीता ‘आधार’ रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले, तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन त्यांना ‘आयुष हास्पीटल’ गोंदिया येथे हलविण्यात आले. आयुष हास्पीटल येथील डॉक्टरांनी तक्रारकर्ती क्रं. च्या पतीला मृत घोषित केले. डॉ. विशाल बन्सोड तर्फे पोलीस निरिक्षक सानका के.टी.एस. दवाखाना गोंदिया यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन, गोंदिया येथे मर्ग क्रं. 00/15 कलम 174 जा.फौ.चा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटनास्थळ हे पोलीस स्टेशन, तिरोडाच्या हद्दीतील असल्याने सदर मर्गचे कागदपत्र पोलीस स्टेशन, तिरोडा येथे पाठविण्यात आले व पोलीस स्टेशन, तिरोडा येथे मर्ग क्रं. 34/2015 कलम 174 जा.फौ. चा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस स्टेशन अधिकारी, गोंदिया यांनी दिनांक 10/11/2015 रोजी मर्ग क्रं. 00/2015 कलम 274 जा.फौ. अंतर्गत गुन्हा दाखल केला. व त्याच दिवशी मृतक महेंद्रनाथ राहांगडाले यांचा इनक्वेस्ट पंचनामा तयार करुन के.टी.एस. हॉस्पीटल गोंदिया येथे शव विच्छेदन करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस सटेशन तिरोडा येथे मर्ग क्रं. 34/2015 कलम 174 जा.फौ. अंतर्गत दिनांक 14/11/2015 रोजी गुन्हा दर्ज करुन दिनांक 15/11/2015 रोजी घटनास्थळ पंचनामा तयार करण्यांत आला व सदर प्रकरणाची सखोल चौकशी अंती उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा यांनी अकस्मात मृत्यु समरी बुकमध्ये सदर घटनेची नोंद करुन मृतक महेंद्रनाथ हे स्लॅबवरुन तोल जावून खाली जमीनीवर पडून छातीच्या फसलीला गंभीर जख्मी होऊन मरणाचे कारण नमुद केले.
तक्रारकर्ती क्रं. 1 चा मृतक पती महेंद्रनाथ यांचा अपघाती मृत्यु म्हणून मर्ग समरीद्वारे मंजूर करण्यांत आली, त्यामुळे महेंद्रनाथ यांचा मृत्यु आत्महत्या किंवा घात पात नसुन अपघाती मृत्यु आहे असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तक्रारकर्ती कं. 1 च्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे त्यांनी काढलेल्या विमा पॉलीसीबाबत दुय्यम अपघाती लाभाची रक्कम मिळण्याकरीता रितसर दस्ताऐवजासह विरुध्द पक्षाकडे विमा दावा सादर केला. परंतु विरुध्द पक्ष विमा कंपनीने दिनांक 02/08/2016 रोजी तक्रारकर्ती क्रं. 1 ला पत्र पाठवून विमा दावा नामंजूर केला व त्यात मृत्युचे कारण तिस-या माळयावरुन साफ सफाई करीत असतांना खाली पडले ही बाब अपघात या सदरखाली येत नाही या कारणास्तव नामंजूर केला. म्हणून तक्रारदार यांनी सदर प्रकरण या मंचात दाखल करुन या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-17,70,000/- दिनांक-10/11/2015 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे मंचासमक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीच्या तक्रारीतील सर्व बाबी मान्य केल्या असुन, पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीच्या पतीने 13 विमा पॉलीसी विरुध्द पक्षाकडून काढल्या होत्या ही मान्य केली आहे. परंतु अनुक्रमांक 1 वरील पॉलीसी क्रं. 972832673 चा परिपक्वता दिनांक 02/01/2020 नसुन तो 02/02/2020 आहे तसेच अनुक्रमांक 4 वरील पॉलीसी क्रं. 972834397 चा परिपक्वता दिनांक 14/09/2023 नसुन तो दिनांक 14/09/2025 आहे व अनुक्रमांक 11 वरील पॉलीसी क्रमांक 973282991 चा परिपक्वता दिनांक 1912/2027 नसुन तो 19/12/2028 आहे.
विरुध्द पक्षाने पुढे असे नमुद केले आहे की, मृतकाच्या सर्व 13 पॉलीसीसतील मुळ विमा रक्कम बोनसच्या लाभासह एकूण रक्कम रुपये 11,83,229/- पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ती क्रं. 1 ला देण्यात आली आहे ती विमा करारानुसारच आहे. परंतु अपघाती विमा लाभ असलेल्या पॉलीसीतील अपघाती लाभ नामंजूर केला तो पॉलीसीतील अटी व शर्तीनुसारच व अपघाती विम्याच्या पॉलीसीतील व्याख्येनुसार देय नसल्याने तो नामंजूर करण्यात आला आहे यात त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीने दिलेल्या सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसुन किंवा त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. तक्रारकर्ती क्रं. 1 ने मागणी केलेली रक्कम रुपये 17,70,000/- चुकीची असुन दिनांक 10/11/2015 पासून किंवा इतर कोणत्याही दिनांकापासून ती देय नाही.
विरुध्द पक्ष विमा कंपनीने आपले विशेष कथनात पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ती क्रं. 1 हिला सर्व. 13 पॉलीसीची मुळ रक्कम बोनससह एकूण रक्कम रुपये 11,83,229/- दिलेली आहे. तक्रारकर्ती क्रं.1 च्या पतीचा अपघाती विमा लाभाच्या व्याख्येनुसार ‘अपघात’ बाह्य कारणामुळे म्हणजे मोटार अपघात रेल्वे अपघात इत्यादी या सारख्या कारणामुळेच झालेला असावा असे गृहीत मानले आहे, परंतु सदर प्रकरणांत अश्या प्रकारचा अपघात झालेला नाही, त्यामुळे अपघाती विमा लाभ देय नसल्याचे विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती क्रं. 1 ला कळविले असल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं- 10 नुसार एकूण-22 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये विमा पॉलीसी, मर्ग खबरी, इन्क्वेस्ट पंचनामा, अकस्मात मृत्यु समरी, उपविभागीय अधिकारी यांचे आदेश, घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, विरुध्द पक्ष विमा कंपनीने नामंजूर केलेले पत्र अश्या दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्तीने शपथपत्र दाखल केलेले नाही., पृष्ठ क्रं- 61 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने शपथपत्र दाखल केलेले नाही. पृष्ठ क्रं- 64 वर लेखी उत्तरालाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
07. तक्रारकर्तीची तक्रार, लेखी युक्तिवाद, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीतर्फे वकील श्री. पी. एम. रामटेके आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती सुषमा सिंग यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्ती क्रं.1 च्या पतीने विरुध्द पक्ष विमा कंपनी यांचेकडून 13 विमा पॉलीसी विकत घेतल्या होत्या व तक्रारकर्ती क्रं.1 च्या पतीचा दिनांक 10/11/2015 मृत्यु झाला होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. तसेच तक्रारकर्ती क्रं. 1 हिला सर्व 13 पॉलीसीची मुळ रक्कम बोनससह एकूण रक्कम रुपये 11,83,229/- दिलेली आहे याबाबत सुध्दा उभय पक्षात वाद नाही.
09. तक्रारकर्ती कं. 1 च्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे त्यांनी काढलेल्या 13 विमा पॉलीसीबाबत ‘दुय्यम अपघाती’ लाभाची रक्कम विरुध्द पक्ष यांनी दिनांक 02/08/2016 रोजीचे पत्रात मृत्युचे कारण तिस-या माळयावरुन साफ सफाई करीत असतांना खाली पडले ही बाब अपघात या सदरखाली येत नाही या कारणास्तव नामंजूर केला असल्यामुळे वाद उपस्थित झालेला आहे. तक्रारकर्ती कं. 1 ने प्रकरणांत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, दिनांक 15/11/2015 रोजी घटनास्थळ पंचनामा तयार करण्यांत आला व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा यांनी अकस्मात मृत्यु, समरी बुकमध्ये सदरहु घटनेची नोंद करुन मृतक महेंद्रनाथ हे स्लॅबवरुन तोल जावून खाली जमीनीवर पडून छातीच्या फसलीला गंभीर जख्मी होऊन मृत्युचे कारण नमुद केले असुन तक्रारकर्ती क्रं. 1 चा पती मृतक महेंद्रनाथ यांचा अपघाती मृत्यु म्हणून मर्ग समरीद्वारे मंजूर करण्यांत आली, त्यामुळे महेंद्रनाथ यांचा मृत्यु आत्महत्या किंवा घात पात नसुन अपघाती मृत्यु आहे असे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची बाब दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत असल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाच्या वकीलांनी मौखिक युक्तिवादाच्या वेळी मान्य केले की, तक्रारकर्ती क्रं. 1 च्या पतीचा मृत्यु अपघातामुळे झालेला असल्यामुळे विरुध्द पक्ष हे 6 टक्के द.सा.द.शे. व्याज लावण्याची प्रार्थना केली, परंतु सन 2015 ते 2019 पर्यंत तक्रारकर्तीला आर्थिक त्रास सहन करावा लागला आणि आर्थिक नुकसान झालेले आहे ही बाब लक्ष्यात घेता तक्रारकर्ती द.सा.द.शे 7.5% व्याजासह देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
10. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रं. 1 ला सर्व 13 पॉलीसीची मुळ रक्कम बोनससह एकूण रक्कम रुपये 11,83,229/- कधी दिली याबाबत उभय पक्षाने कोणतेही दस्ताऐवज दाखल केलेले नाहीत, परंतु रक्कम मिळाल्याची बाब तक्रारकर्तीने मान्य केलेली आहे. पोलीस दस्ताऐवजावरुन अपघाताचे कारण स्पष्ट नमुद असतांना सुध्दा विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती क्रं. 1 ला ‘दुय्यम अपघाती’ लाभाची रक्कम बोनससह न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते.
11. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात ‘दुय्यम अपघाती’ लाभाची उर्वरीत रक्कम बोनससह देय रकमेच्या तारखेपासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7.5% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ती क्रं. 1 ला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तक्रारकर्ती क्रं.1 विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ती क्रं. 1 ला अपघाती मृत्यू संबंधात ‘दुय्यम अपघाती’ लाभाची रक्कम ज्या पॉलीसीमध्ये नमुद आहे त्या पॉलीसीतील रक्कम बोनससह देय रकमेच्या तारखेपासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7.5% दराने व्याजासह तक्रारकर्तीला अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ती क्रं. 1 ला मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला अदा करावे.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत अदा करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.