आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. तक्रार – विमा पॉलीसी अंतर्गत अपघात विम्याचा दुहेरी लाभ मिळण्याबद्दल दाखल आहे. तक्रार श्रीमती गोदावरी शंकर भुरे यांनी दाखल केली आहे. तक्रारीचा तपशील थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्तीच्या पतीच्या नावे विमा पॉलीसी (एल.आय.सी.) होती. पॉलीसीचा कालावधी 22/02/2003 ते 28/02/2022 पर्यंत 20 वर्षाचा होता. ही पॉलीसी रू. 50,000/- ची होती. मृतक विमाधारक तक्रारकर्तीचा पती वार्षिक हप्ता नियमितपणे भरत होता. 3. दिनांक 30/09/2008 रोजी तक्रारकर्तीचा पती पाण्याची मोटर कां चालू होत नाही म्हणून पोलवर चढला आणि कार्बन साफ करीत असतांना त्याला विजेचा शॉक बसला व तो पोलवरून खाली पडला. त्याला दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तक्रारकर्तीने ती नॉमिनी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यासाठी विरूध्द पक्ष यांच्याकडे दावा दाखल केला. तिला पॉलीसीअन्वये रू. 62,950/- चा धनादेश विरूध्द पक्ष यांनी दिला. परंतु तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, तिच्या पतीचा मृत्यु अपघाती झाला. विमा पॉलीसी ही अपघात झाल्यास दुहेरी लाभ पॉलीसी होती, त्यामुळे तिला दुहेरी अपघात लाभ म्हणून रू. 50,000/- अधिक मिळावयास पाहिजे. ही मागणी विरूध्द पक्ष यांच्याकडे केली असता त्यांनी काही दस्तावेजांची मागणी केली. त्याप्रमाणे संपूर्ण दस्तावेज दिनांक 17/07/2010 रोजी तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्या कार्यालयात जाऊन दिले. त्यात उपविभागीय दंडाधिकारी, भंडारा यांचा आदेश, अपघाती मृत्यु समरी, अकस्मात मृत्यु सूचना, इन्क्वेस्ट रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल इत्यादींचा संपूर्ण कागदपत्रांचा समावेश होता. 4. दिनांक 05/08/2010 रोजी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा दुहेरी अपघात लाभाबद्दलचा दावा नामंजूर केला. याबद्दल कारण देतांना मृत्यु अपघाती नव्हता असे नमूद केले. 5. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, तिच्या पतीचा मृत्यु अपघाती होता. तसे पोलीस रेकॉर्ड व वैद्यकीय कागदपत्रांवरून सिध्द होते म्हणून ती दुहेरी लाभ मिळण्यास पात्र आहे. विमा दावा मिळावा म्हणून तिने मंचात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचे कारण दिनांक 05/08/2010 रोजी जेव्हा विरूध्द पक्ष यांनी विमा दावा नाकारला तेव्हा घडले असे तक्रारकर्ती म्हणते. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत एकूण 10 दस्तावेज दाखल केले आहेत. त्यात पोलीसांकडील कागदपत्रे व वैद्यकीय कागदपत्रांचा तसेच विरूध्द पक्ष यांचे विमा दावा नाकारणारे पत्र इत्यादींचा समावेश आहे. 6. विरूध्द पक्ष यांचे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यांनी पॉलीसी मान्य केली आहे. मृतक विमाधारक वार्षिक रू. 3,670/- प्रमाणे नियमित हप्ते भरत होता ही बाब मान्य केली आहे. विरूध्द पक्ष आपल्या उत्तरात पुढे म्हणतात की, तक्रारकर्तीला पॉलीसी अंतर्गत Vested Bonus + Interim Bonus मिळून एकूण रू. 62,950/- इतकी रक्कम अदा केलेली आहे. तक्रारकर्ती दुहेरी लाभ मिळण्यास पात्र नाही, कारण विमाधारकाचा मृत्यु अपघाती झाला असे सिध्द होत नाही व तसे तक्रारकर्तीला कळविण्यात आलेले आहे. मृतक विमाधारकाचा मृत्यु फुफ्फुसात रक्त गोठल्यामुळे झाला एवढीच बाब रेकॉर्डमध्ये आहे. विरूध्द पक्ष यांनी उत्तरासोबत पॉलीसी दस्त व दंडाधिकारी यांचे आदेश जोडलेले आहेत. 7. मंचाने दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली. मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणेः- निरीक्षणे व निष्कर्ष 8. विरूध्द पक्ष यांनी विमा दाव्याची मूळ रक्कम रू. 50,000/- अधिक बोनस मिळून येणारा एकूण रू. 62,950/- इतक्या रकमेचा दावा तक्रारकर्तीला दिलेला आहे. परंतु दुहेरी अपघात लाभ नाकारलेला आहे. मृतक विमाधारकाचा मृत्यु अपघाती झाला होता हे दाखविण्यासाठी तक्रारकर्तीने पोलीसांकडील तसेच वैद्यकीय दस्तावेजांचा हवाला दिला आहे. अकस्मात मृत्यु समरीप्रमाणे, ‘’मृतकाची पत्नी गोदावरी शेतात गेती तेव्हा तिला मृतक शेतातील बांध्याचे धु-यावर उपडा बसला दिसला. पत्नीने काय झाले असे विचारले असता काहीच सांगितले नाही. पाणी पाज, दवाखान्यात घेऊन चल असे सांगितले म्हणून तिने शेजारी शेतकरी रमेश व मुरलीधर भुरे यांना आवाज देऊन त्यांच्या मोटारसायकलवर मांडून मृतकाला भंडारा येथे सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ....................................cause of death is Blunt trauma chest right …………haemothorax …………………” मृतकाचे फुफ्फुसात रक्त गोठल्याने त्याल मृत्यु आला असे सांगितले. याच दस्तामध्ये पुढे मृतक नेहमीच पोलवर चढत असे, घटनेच्या वेळी तो पोलच्या खाली पडलेला आढळला त्यामुळे त्याच्या कमरेला मार लागला, नाकातोंडातून रक्त निघाले व दवाखान्यात आणले असता मृत घोषित केले. मृत्यु संबंधीचे अशाप्रकारचे वर्णन अकस्मात मृत्यू सूचना, घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय दस्तावेज इत्यादीमध्ये आढळले. मंचाचा निष्कर्ष आहे की, मृतक विमा धारकाचा मृत्यु विजेचा शॉक बसल्यामुळे त्याच्या छातीत रक्त गोठले त्यामुळे आला. वैद्यकीय दस्तावेजामध्ये ट्रॉमा हा शब्द आढळतो. विजेचा धक्का बसून नाकातोंडातून रक्त येणे व फुफ्फुसात रक्त गोठणे या क्रिया घडतात. यावरून मृतक विमाधारकाचा मृत्यु नैसर्गिक नसून अपघाती आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे. मृतक विमा धारकाचा मृत्यु नैसर्गिक आहे असे प्रतिपादन विरूध्द पक्ष यांनी कुठेही केले नाही किंवा तसे सिध्दही केले नाही. मृतकाला कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नव्हती. एकाएकी मरण येण्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती. त्याला अपघातानेच मृत्यु आला असा निष्कर्ष मंच नोंदविते. 9. तक्रार क्रमांक 28/2010 ही मृतक विमा धारकाच्या पत्नीने या मंचात शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावा मिळण्यासाठी दाखल केली होती. त्याचा आदेश दिनांक 08/09/2010 रोजी पारित करण्यात आला. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीला विरूध्द पक्ष विमा कंपनीने अपघाती मृत्यु झाल्यामुळे रक्कम अदा केलेली आहे. यावरूनही मयत विमाधारकाचा मृत्यु अपघातीच होता हे सिध्द होते. सबब आदेश. आदेश तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याच्या दुहेरी अपघात लाभाची उर्वरित रक्कम रू. 50,000/- द्यावी. या रकमेवर दिनांक 05/08/2010 पासून (दुहेरी अपघात लाभ नाकारला ती तारीख) 9 टक्के दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज द्यावे. 2. तक्रारकर्तीला तिच्या कायदेशीर लाभापासून विनाकारण वंचित ठेवल्याने तिला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दलची नुकसानभरपाई म्हणून विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीला रू. 3,000/- द्यावे. 3. सदर तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला रु. 2,000/- द्यावेत. 4. विरुद्ध पक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |