ग्राहक तक्रार क्र. : 20/2015
दाखल तारीख : 05/01/2015
अर्ज निकाल तारीख : 06/11/2015
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सोमनाथ मोतीराम लांडगे,
वय - सज्ञान, धंदा – शेती,
रा.एकंबी ता.औसा जि. लातुर,
ह.मु. सातपुते मेडिकल दुकानामागे,
बार्शी नाका, उस्मानाबाद.
2. उषाताई भ्र. सोमनाथ लांडगे,
वय-सज्ञान, धंदा- घरकाम,
रा.वरीलप्रमाणे ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
कोळपे पाटील मल्टीस्टेट को. ओपरेटिव्ह,
क्रेडिट सोसायटी लि., पुणे शाखा, उस्मानाबाद,
सेंटर बिल्डींग, समर्थ अर्बन को-ऑप. बँकेसमोर,
काळा मारुती चौक, उस्मानाबाद.
2. सर व्यवस्थापक/ कार्यकारी संचालक,
कोळपे पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,
नोंदणीकृत कार्यालय, 317,
महालक्ष्मी मार्केट, 3 रा मजला,
मार्केट यार्ड , पुणे-37, ...विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.देविदास वडगावकर.
विरुध्द पक्षकारा विरुध्द नो से आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य सौ.विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार (तक) मौजे एकंबी, ता. औसा जि.लातूर येथील रहिवाशी असून सध्या उस्मानाबाद येथे राहतात. तक यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडे ठेवी ठेवल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. | बचत खाते क्र. | रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 221019000071 | रु.1,00,000/- | 28/10/2014 | 18/12/2014 | 1,01,747/- |
वरील रक्कम मुदतपुर्ती नंतर विप यांनी परस्परच बचत खातेवर ठेव पावती क्र.221019000071 जमा केली. बचत खात्यावरील तक क्र. 1 यांची जमा रक्कम रु.95,485/- अशी रक्कम विप यांचेकडे जमा आहे. अर्जदाराने आपल्या खाजगी कामासाठी वरील रक्कम काढण्यास अनेकदा विप यांना विनंती केली असता विप ने रक्कम देण्यास टोलवाटोलवी केली. म्हणून सदरची रक्कम रु.1,02,747/- व रु.95,485/- व्याजासह, मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- सह मिळावी अशी विनंती केली आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत वर नमूद केलेल्या रक्कमेच्या ठेवीची पावत्या क्र.FDR 2,221019000071 व पासबूक खाते क्र.221017000014 चा खाते उतारा दाखल केला आहे.
सदर तक्रारीबाबत विप क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविली असता त्यांनी वकील पत्र दाखल केले मात्र आपले म्हणणे दाखल न केल्याने अखेर दि.10/04/2015 रोजी त्यांच्या विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 ते 3 :
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज ठेव गरज असल्याने मागणी करुनही मुदत संपुनही मिळालेली नाही म्हणून दाखल केली आहे. सदर तक्रारीबाबत तक्रारदार यांनी दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे नाव असलेले खालील पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे आढळून येतो.
अ.क्र. | क्र. | रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 221019000071 | रु.1,00,000/- | 28/10/2014 | 18/12/2014 | 1,01,747/- |
सदर ठेवींना व्याजदर 12.50 टक्के दर्शविलेला आहे. तक क्र.2 यांनी गुंतवलेली एकूण रक्कम रु.1,00,000/- असून देय रक्कम रु.1,01,747/- आहे. सदर पावतीवर विप पतसंस्थेचे नाव व शिक्का, तसेच पासिंग ऑफिसर व मॅनेजर यांच्या सहया आहेत. तसेच तक क्र.1 यांनी दाखल केलेल्या पासबुकावर तक यांचा फोटो असून विप बँकेचा शिक्का आहे तसेच अधिका-याची सही आहे. तक यांनी पासबुकचे विवरण पत्र दाखल केले असून त्यावर वरील नोंदी विप याचे बचत खात्यावर तक क्र.1 यांचे नावे रु.95,485/- जमा आहे. या सर्व कागदपत्रांवरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊन त्यांनी आपले म्हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्हणून विप क्र.1 व 2 विरुध्द दि.10/04/2015 रोजी नो से आदेश झाला. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित राहूनही व आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच विप कडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम व बचत खात्यावरील रक्कम मिळण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची एकूण मुदत ठेव पावती नुसार 12.50 टक्के व्याजासह मुदतपुर्ती नंतर होणारी तक क्र.2 यांची रु.1,01,747/- (रुपये एक लक्ष एक हजार सातशे सत्तेचाळीस फक्त) दि.18/12/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावी व तक क्र. 1 यांची बचत खात्यावरील रक्कम रु.95,485/- तक्रार दाखल दिनांका पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेच्या 30 दिवसात द्यावेत.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
(तक्रारीच्या) खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..