::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदाराला गाडी विकत घ्यायची आहे असे केतन हुंडई, पडोली यांना कळाले असता गैरअर्जदारचे मॅनेजर अर्जदाराकडे हुंडई वर्ना १.४ डिझेल गाडी Test Drive करण्याकरीता घेवुन आले व अर्जदाराने नकारात्मक इच्छा दाखवल्यावर अर्जदारास दुबई सहलीचे आमिष दाखवून गाडी घेण्यास भाग पाडले व या योजनेची वैधता दिनांक ३१.०४.२०१४ पर्यंत आहे. सदर योजना रक्कम रु. ६२,०००/- ची आहे, असे सांगितले. त्याप्रमाणे अर्जदाराने दिनांक ३०.०८.२०१४ रोजी एच २०१४००२९५ हे बिल देवुन दिनांक ०३.०९.२०१४ रोजी गाडी आरटीओ करून क्रमांक एम एच ३४ ए एम ३७९७ चे पेपर आणून दिले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारकडे Buy & Fiy Dubai Trip Offer बद्दल विचारणा केली असता त्यांनी अर्जदाराला दुबई ट्रीपचे छापील अर्ज ग्राहकाला हुंडई कंपनीकडून डायरेक्ट मिळतो व त्याची वैधता देयक दिनांकापासून ६ महिने असते. सदर अर्ज अर्जदाराला दिनांक ०२.११.२०१४ रोजी पोस्टाने भेटला व त्यात लिहिले होते की वैधता देयक दिनांकापासून ६ महिने राहील व तिचा आस्वाद दोन व्यक्तींना २८.०२.२०१५ पर्यंत घेता येईल. त्याप्रमाणे अर्जदाराने सदर अर्ज दस्ताऐवजात सोबत हुंडई मोटर, पडोली येथे सादर केला. त्यानंतर गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या पत्राची शिफारस करणारा ई-मेल श्री बनी बजाज हुंडई मोटर्स एरिया इन्चार्ज यांना पाठवला. त्यावर लगेचच श्री बनी बजाज हुंडई मोटर्स एरिया इन्चार्ज यांचा ई-मेल दिनांक १९.११.२०१५ रोजी आला. त्यात नमूद होते की, ग्राहकाचे सविस्तर वर्णन पाठवा म्हणजे त्यांचे दुबई प्रकरण मार्गी लावता येईल. त्याप्रमाणे अर्जदाराने त्यावेळचे उत्तर दिले व सविस्तर वर्णन पाठविले. त्यानंतरही अर्जदाराला गैर अर्जदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक ०५.१२.२०१४ रोजी शाखा व्यवस्थापक श्री मिलिंद कावडे यांना कळविले कि, तुमचे बन्नी बजाज साहेब भ्रमणध्वनी उचलत नाही व ई-मेल चे उत्तर देत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार आणि बजाज यांची केतन हुंडई, पडोली ऑफिसमध्ये भेट देऊन करुन दिली व अर्जदाराला सांगितले की मुंबईला जाऊन त्यांच्या रकमेची अथवा दुबई ट्रीपची पूर्तता करतो. दोन-तीन महिने निघून गेल्यानंतर गैरअर्जदाराकडून काहीही फोन किंवा ई-मेल व्दारे अर्जदाराला उत्तर न मिळाल्याने अर्जदाराला शंका आल्यामुळे पुणे हुंडई मोटर्स इंडीया यांना ऑनलाइन तक्रार केली. त्यावर लगेचच केतन हुंढई, नागपुर वरून पुजा यादव यांचा भुमणध्वनी आला व तक्रारीची सविस्तर मागील माहिती मागवली. त्यानंतर दिनांक १८.०५.२०१५ रोजी पुजा यादव मुख्य वाणिज्य व्यवस्थापक केतन हुंडई, नागपुर यांच्या ई-मेल अर्जदाराला आला त्यात असे नमूद केले होते की अर्जदाराचा दुबई सहलीचा अर्ज उशिरा सादर केल्यामुळे तो नामंजूर झालेला आहे. अर्जदाराच्या असे लक्षात आले की केतन हुंडई, चंद्रपूर यांनी दस्तावेज वेळेवर पाठविले नाहीत, जेव्हा की अर्जदाराने हे पेमेंट पूर्ण वेळेवर दिले वयोजनेचो दस्ताऐवज पूर्ण दिले. दुबई सहल न देता गैर अर्जदाराने पैशाचा मोबदला देणार हे सुद्धा सांगितल्यावर अर्जदाराने ते मान्य केले. सबब गैरअर्जदार क्रमांक १ ते ३ यांनी अर्जदार प्रती सेवेत न्यूनता दिली आहे व अनुचित व्यवहार पद्धतीची अवलंबना केली असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मुदतीत दाखल केलेली आहे अर्जदाराची अशी मागणी आहे की, गैरअर्जदाराने सदर स्कीमचा मोबदला म्हणून रुपये ६२,०००/- व्याजासह परत करावे तसेच मानसिक, शारीरिक व नैतिक छळापोटी रक्कम रु. १,००,०००/- देण्याचे आदेश व्हावेत.
३. अर्जदाराची तक्रार स्वीकृत होऊन गैरअर्जदार क्रमांक १ ते ३ यांना मंचा मार्फत नोटीस पाठविले असता गैरअर्जदार कमांक १ व २ यांनी उत्तर दाखल करून तक्रारीत केलेले कथन खोडून काढून पुढे नमूद केले की अर्जदाराने स्वतः विरुद्ध पक्ष १ व २ कडे सदर गाडीबाबत चौकशी केली होती. गाडी चालवण्याची चाचणी सुद्धा घेतली व सदर गाडी विकत घेण्याची तयारी दर्शवली. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही योजनेचे आमिष दाखवून सदर गाडी घेण्यास भाग पाडले नाही. सदर गाडी बाबतची माहिती विरुध्द पक्ष क्र. १ यांनी अर्जदारास देते वळेस वि.प क्र. ३ यांच्या ग्राहकाकरीता मे.टिम प्रमोशन यांचे या कंपनीद्वारे मोफत दुबई योजना दिली होती. परंतु ही योजना मे.टिम प्रमोशन कंपनीद्वारे पुरवण्यात येणार होती, त्यामुळे गरअर्जदार क्र. १ व २ यांचा त्याच्या योजनेशी काहीही संबंध नव्हता. गैरअर्जदार क्रमांक १ व २ हे विरुद्ध पक्ष क्रमांक ३ चे वितरक आहेत आणि यासारख्या योजनशी त्यांचा काहीही संबंध नसतो. सदर योजना पुरणाची संपूर्ण जबाबदारी ही फक्त मे.टिम प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची असते तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांच्या ग्राहकांनी त्यांची नावे तसेच सर्व कागदपत्रे हे मे.टिम प्रमोशन प्राइवेट लिमिटेड या कंपनीला पुरवायचे असतात त्याप्रमाणे त्या वेळेस विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांच्या द्वारे निर्मीत वाहनाच्या खरेदी करता मे.टिम प्रमोशन प्राइवेट लिमिटेड या कंपनीद्वारे देण्यात येणार होती. त्यामुळे सदर योजनेशी विरुध्द पक्ष १ व २ यांचा काहीही संबंध नाही. याबाबत तक्रारकर्त्याला स्पष्टपणे कळविले होते कि, तक्रार करता हा विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ यांचा एक मौल्यवान ग्राहक आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला मदत करण्याच्या हेतूने विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारर्त्यास सदर योजनेबाबत मे.टिम प्रमोशन प्रायवेट लिमिटेड या कंपनी कडे पाठपुरावा करण्यात विरुद्ध पक्ष १ यांनी फक्त मदत केली. या मदतीच्या बदल्यात अर्जदाराने विरुध्द पक्ष १ व २ यांच्यावर पूर्णत खोटे व काल्पनिक आरोप केले तसेच विरुद्ध पक्ष १ यांनी पूजा यादव,मुख वाणिज्य व्यवस्थापक, केतन हुंडई, नागपुर यांनी सुद्धा तक्रारकर्त्याला मदत करीत होते. परंतु मे.टिम प्रमोशन प्राइवेट लिमिटेड या कंपनीला या योजनेशी निगडीत अर्ज तक्रारकर्त्याचा फार उशिरा मिळाल्याने त्यांनी सदर प्रकरण नामंजुर केले. सदर माहिती गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांना मिळताच त्याबाबतचा ई-मेल अर्जदाराला पाठवलेला होता. सबब या वादात विरुद्ध पक्ष १ व २ यांची काहीही चूक नसताना अर्जदाराने विनाकारण सदर प्रकरणात ओढले आहे. अर्जदारांनी त्यांच्या विरुध्द केलेले सर्व आरोप खोटे असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक १ व २ विरुद्ध तक्रार खारीज करण्यात यावी, गैरअर्जदार क्रमांक ३ यांनी त्यांचे लेखी उत्तर तक्रारीत दाखल करून त्यांच्याविरुद्ध केलेले कथन खोडून काढून पुढे नमूद केले की, अर्जदाराने सदर वाहन विकत घेते वेळी मुदतीत Buy & Fiy Dubai Trip Offer च्या अटी व शर्ती चे पालन केले नाही. तसेच अर्जदार क्र. १ व २ यांना किंवा मे.टिम प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड ला अर्जदाराचा अर्ज किंवा दस्तावेज मिळाले नाही. तसेच योजनेच्या अर्जावरील अटी व शर्ती प्रमाणे हे स्पष्ट लिहिलेले होते कि, सदर योजनेशी निगडीत अर्ज आणि दस्ताऐवज मे.टिम प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड ला दिनांक ३१.१०.२०१४ रोजी किंवा त्याआधी नमूद पत्त्यावर अर्ज व दस्तावेज कंपनीला पाठवले याबाबत कुठेही पुरावा दाखल केलेला नाही. योजनेच्या विनंती नोंदणीच्या अर्जाच्या मागे नमुद केलेले पारपत्र, आयकर ओळखपत्र, २ वर्षाचे आयकर विवरण पत्र, संपत्तीबाबत पुरावा, डिमांड ड्राफ्ट रक्कम रु. १९,९९८/- TPPL यांचे नांवे विमानतळ शुल्कासाठी हे सर्व दस्ताऐवज दिनांक ३१.१०.२०१४ पुर्वी किंवा त्याआधी अर्जदाराला पाठवायचे होते. परंतु सदर दस्तावेज अटी व शर्तीनुसार अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. ३ कडे पाठविलेले नाहीत. अट क्रमांक 25 च्या अटी व शर्तीनुसार सदर योजनेचा पर्याय अस्विकार केल्यास रोख रक्कम देता येणार नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. त्यामुळे अर्जदारांनी केलेली रक्कम रु. ६२,०००/- ची मागणी देण्यासारखी नाही. सदर तक्रार गैरअर्जदार क्र. ३ विरुध्द कोणतीही तक्रार केलेली नसून अर्जदारांनी सदर तक्रार योजनेबाबत बाबत केलेली आहे. परंतु सदर योजनेबाबत शर्तींचे पालन अर्जदाराने केलेले नाही. सबब सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारास Buy & Fiy
Dubai Trip योजनेच्या कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध
करतात काय ? होय
२. गैरअर्जदार क्र. १ ते ३ तक्रारदारास नुकसानभरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रमांक १ व २ बाबत :-
५. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ कडुन नमूद गाडी दिनांक ३०.०८.२०१४ रोजी खरेदी केली त्याबद्दल अर्जदाराने प्रकरणात Invoice दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. १ ला सदर गाडीसोबत सदर योजनेबाबत विचारणा केली असता गैरअर्जदार कं. १ यांनी योजनेचा अर्ज हुंडई कंपनीकडून पोस्टने येईल असे अर्जदाराला सांगितले. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या मे.टिम प्रमोशन प्रायवेट लिमिटेड यांच्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता अट क्र. १ नुसार सदर योजनेचे लाभ दिनांक ०१.०८.२०१४ ते ३१.०८.२०१४ कालावधीत गाडी खरेदीकरतील त्यांच्यासाठीच आहे. असे नमुद आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ यांचेकडुन दिनांक ३०.०८.२०१४ रोजी गाडी खरेदी केलेली आहे. तसेच अट क्र. ११ मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, योजनेचे सदर अर्ज भरून दिनांक ३०.१०.२०१४ किंवा त्याच्या आधी दाखल करायचा होता समोर असे नमूद आहे की योजनेतील पूर्ण यात्रा ही गाडी खरेदी केलेल्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत किंवा दिनांक २८.०२.२०१५ पर्यंत पूर्ण करायची आहे. अटी व शर्ती यांचा विचार करता सदर प्रकरणात ३०.०८.२०१४ रोजी लगेच योजनेच्या मुदतीत अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. १ कडून गाडी खरेदी केली परंतु योजनेचा लाभ घेण्याबद्दल गैरअर्जदार क्र.१ ला विचारणा केल्यास योजनेचा नोंदणी अर्ज अर्जदाराला पोस्टने येईल असे सांगितल्यावर सदर अर्ज २ महिने पर्यंत अर्जदाराला प्राप्त झाला नाही. गैरअर्जदाराशी सतत संपर्क साधाल्या नंतर दिनांक ०२.११.२०१४ रोजी योजनेतील अर्ज पोस्टातर्फे अर्जदाराला प्राप्त झाला आणि दिनांक ११.११.२०१४ रोजी गैरअर्जदार क्र. ३ यांचेकडे त्यांनी तो अर्ज भरून दाखल केला. अर्जदाराने सदर अर्ज दाखल केल्यावर सुद्धा गैरअर्जदारने अर्जदाराला TPPL च्या अटी व शर्तीनुसार अर्जदाराने दिनांक ३१.१०.२०१४ पर्यंत दाखल करायचा होता. याबद्दल कल्पना दिली नाही. उलट गैरअर्जदार क्र. १ व २ हे अर्जदाराला फसविण्याचा प्रयत्न करीत होते हे सिद्ध होत आहे. गैरअर्जदार क्र. ३ यांनी त्यांच्या उत्तरात कथन केले की अर्जदारांनी TPPL योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जदाराने दस्ताऐवज दाखल न केल्यामुळे अर्जदाराची यात्रा रद्द झाली. परंतु अर्जदारांनी कोणते दस्ताऐवज दाखल केलेला नाही याबद्दल कोणताही पुरावा गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी दाखल केलेले नाही. त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे. हि बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. ३ :
६. मुद्दा क्रं. १ व २ च्या वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १११/२०१५ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदारास Buy & Fiy DubaiTrip योजनेच्या कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदारास
सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर केल्याने मानसिक व
नैतीक छळापोटी एकत्रित नुकसान भरपाई रक्कम रु.१,००,०००/- ३० दिवसाच्या
आत द्यावे.
४. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी गाडी विक्रीबाबत वैध असणा-या योजनेची माहिती
ग्राहकास अटी व शर्तींची पुर्तता करणे कामी योग्य ती उपाययोजना विहीत
कालावधीमध्ये करण्याबाबतचे निर्देश ग्राहक संरक्षण अधिनीयम कलम १४ (फ)
अन्वये गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांना देण्यात येतात.
५. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)