संयुक्त निकालपत्र :- (दि.14/09/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतचे ग्राहक तक्रार क्र.370/09 व 371/09 या दोन्ही तक्रारीतील सामनेवाला व वाद विषयात साम्य असलेने दोन्ही प्रकरणात एकत्रितपणे निकाल पारीत करण्यात येत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केला व अंतिम युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला गैरहजर होते व तक्रारदार व त्यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतच्या तक्रारी सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे पासबुकावरील चेक रक्क्मांच्या नोंदी कमी करुन सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (3) ग्राहक तक्रार क्र.370/2009 मधील तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदारांची पुजा एंटरप्राईजेस या नावाने अॅटोमोबाईल्स व स्पेअर पार्ट व होलसेल व रिटेलचा व्यवसाय आहे व संपूर्ण व्यवसाय व्यवहार प्रोप्रायटर म्हणून सौ.सुनिता मनीष पंजवाणी पाहतात. सामनेवाला क्र.1 ही सामनेवाला क्र.2 ची शाखा असून सामनेवाला क्र.2 चे सामनेवाला क्र.1 वर नियंत्रण आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांना आवश्यक पक्षकार करणेत आलेले आहे. तक्रारदाराचे ब-याच वर्षापासून सामनेवाला क्र.1 कडे सी.ए.2146 चे खाते आहे व ते आजमितीस चालू स्थितीत आहे. तक्रारदार सामनेवाला बँकेचे ग्राहक असलेने बँकींग सेवा देणे हे सामनेवाला यांचे कार्य आहे. ब) तक्रारदारांना आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन यांनी तक्रारदार यांचेकडून स्पेअर पार्टस खरेदीपोटी सामनेवाला क्र.3 यांचे शाखेवरील दि.31/03/2009 रोजीचा चेक क्र. 091786 रक्कम रु.1,03,068/- चा दिला होता. व तक्रारदारने दि.08/04/2009 रोजी सदर चेक सामनेवाला क्र.1 यांचेकडे नमुद खातेवर जमा केला होता. प्रस्तुतचा चेक सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.3 कडे कलेक्शनसाठी पाठवला होता. प्रस्तुत चेक वटवणुकीकरिता जमा केलेल्या चेकची रक्कम बील कलेक्शनपोटी तक्रारदाराचे पासबुकास दि.20/04/2009 ने नोंद केलेली आहे. असे असतानाही दि.21/04/2009 रोजी प्रस्तुतची नोंद कमी केलेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले व सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे खातेवर जमा झालेली चेकची रक्कम परत घेतलेली आहे. याबाबत दि.05/05/2009 रोजी प्रस्तुत चेकची रक्कम तक्रारदारचे खाती जमा करणेत यावी अथवा सदर चेकचा अनादर झाला असलेस तो परत मिळावा म्हणून लेखी अर्ज सामनेवाला क्र.1 यांना दिला. त्याची कोणतीही दखल न घेतलेने तक्रारदाराने पुन्हा दि.15/05/2009 रोजी लेखी तक्रार अर्ज देऊन खुलासा मागितला असता त्यास दाद दिली नाही. सबब सामनेवाला यांनी सेवा देणेस वैयक्तिक व संयुक्तिकरित्या कसूर केलेला आहे. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास चेकची रक्कम रु.1,03,068/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा तसेच मानसिक त्रासाची व व्यावसायिक नुकसानीची रक्कम रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रु.12,000/- देणेबाबतचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला क्र.1 यांचेकडील बँक पासबुक, चेक जमा केलेबाबतची रिसीट, सामनेवालांकडे दिलेले लेखी अर्ज इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच रिजॉइन्डर दाखल केले आहे. (4) ग्राहक तक्रार क्र.371/2009 मधील तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदारांची सनी अॅटोमोबाईल्स या नावाने अॅटोमोबाईल व स्पेअर पार्ट व होलसेल व रिटेलचा व्यवसाय आहे व संपूर्ण व्यवसाय व्यवहार प्रोप्रायटर म्हणून सौ.सोनी विष्णु पंजवाणी पाहतात. सामनेवाला क्र.1 ही सामनेवाला क्र.2 ची शाखा असून सामनेवाला क्र.2 चे सामनेवाला क्र.1 वर नियंत्रण आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांना आवश्यक पक्षकार करणेत आलेले आहे. तक्रारदाराचे ब-याच वर्षापासून सामनेवाला क्र.1 कडे सी.ए.1104 चे खाते आहे व ते आजमितीस चालू स्थितीत आहे. तक्रारदार सामनेवाला बँकेचे ग्राहक असलेने बँकींग सेवा देणे हे सामनेवाला यांचे कार्य आहे. ब) तक्रारदारांना आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन यांनी तक्रारदार यांचेकडून स्पेअर पार्टस खरेदीपोटी सामनेवाला क्र.3 यांचे शाखेवरील दि.31/03/2009 रोजीचा चेक क्र. 091785 रक्कम रु.1,25,836/-चा दिला होता. व तक्रारदारने दि.08/04/2009 रोजी सदर चेक सामनेवाला क्र.1 यांचेकडे नमुद खातेवर जमा केला होता. प्रस्तुतचा चेक सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.3 कडे कलेक्शनसाठी पाठवला होता. प्रस्तुत चेक वटवणुकीकरिता जमा केलेल्या चेकची रक्कम बील कलेक्शनपोटी तक्रारदाराचे पासबुकास दि.20/04/2009 ने नोंद केलेली आहे. असे असतानाही दि.21/04/2009 रोजी प्रस्तुतची नोंद कमी केलेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले व सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे खातेवर जमा झालेली चेकची रक्कम परत घेतलेली आहे. याबाबत दि.05/05/2009 रोजी प्रस्तुत चेकची रक्कम तक्रारदारचे खाती जमा करणेत यावी अथवा सदर चेकचा अनादर झाला असलेस तो परत मिळावा म्हणून लेखी अर्ज सामनेवाला क्र.1 यांना दिला. त्याची कोणतीही दखल न घेतलेने तक्रारदाराने पुन्हा दि.15/05/2009 रोजी लेखी तक्रार अर्ज देऊन खुलासा मागितला असता त्यास दाद दिली नाही. सबब सामनेवाला यांनी सेवा देणेस वैयक्तिक व संयुक्तिकरित्या कसूर केलेला आहे. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास चेकची रककम रु.1,25,836/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा तसेच मानसिक त्रासाची व व्यावसायिक नुकसानीची रक्कम रु.1,00,000/-व अर्जाचा खर्च रु.12,000/- देणेबाबतचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला क्र.1 यांचेकडील बँक पासबुक, चेक जमा केलेबाबतची रिसीट, सामनेवालांकडे दिलेले लेखी अर्ज, इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच रिजॉइन्डर दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र. 3 यांनी दाखल केलेल्या आपल्या लेखी म्हणणेमध्ये:- अ) सामनेवाला क्र.3 यांना विनाकारण पक्षकार केले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.1 व 2 व तक्रारदारा यांना आवश्यक सेवा दिली असलेने सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सामनेवाला क्र.3 विरुध्द तक्रारीस कारण घडलेले नाही. तक्रार अर्जातील मजकूर कलम 1 ते 9 मधील घटनांशी सामनेवाला यांचा संबंध नाही. सामनेवाला क्र.3 विरुध्द कोणतीही दाद मागणेचा कोणताही हक्क व अधिकार नाही. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज खर्चासह रद्द होणेस पात्र आहे. ब)प्रस्तुत तक्रारीतील धनादेश क्र.91786व 91785अनुक्रमे दि.13/04/2009 व दि.31/03/2009 रोजी इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक इचलकरंजी-रत्नागिरी या बँकेने क्लिअरींगकरिता दिलेले होते. सदरचे धनादेश सामनेवाला क्र.3 यांचेकडे आलेवर त्याच दिवशी आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि.यांचे खाते क्र.11149459215यांचे खातेवरुन कमी(डेबीट)करुन प्रस्तुतची रक्कम सामनेवाला क्र.3यांचे खाते क्र.11149261893 मध्ये जमा(क्रेडीट)करणेत आले होते.नमुद तारखांचे First Clearing Adjustment Sheet मधील अनुक्रमांक-9 येथे इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि. इचलकरंजी यांचे खातेवर एकूण रक्कम रु.2,28,904/- क्रेडीट केलेचे दिसून येते. क) सामनेवाला क्र.3 विरुध्द तक्रार करणेस कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही. सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सामनेवाला क्र.3 यांना तक्रारदार लेखी नोटीस अथवा पत्र पाठवून माहिती विचारणे सहज शक्य होते व सामनेवाला क्र.3 कडून त्यांना माहिती प्राप्त झाली असती. सामनेवाला क्र.3यांची कोणतीही सेवात्रुटी नसताना मे.मंचासमोर रत्नागिरी ते कोल्हापूर अशा खेपा मारणेस विनाकारण खर्चात टाकले आहे. सबब प्रस्तुत दोन्ही तक्रारीमध्ये प्रत्येकी तक्रारदाराकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.3,000/- मिळावेत अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला क्र.3 यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला क्र.3 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ शपथपत्र, ऑथॉरिटी लेटर, लिस्ट ऑफ चेक्स, खाते नं. 11149459215 व खाते नं. 11149261893 चे उतारे, First Clearing Adjustment Sheet इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (8) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार:- अ)तक्रारदाराचा अर्ज खरा नाही व चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास्त करुन व मटेरियल फॅक्टस दडवून ठेवून प्रस्तुतचा अर्ज दाखल केलेने तो रद्द होणेस भाग आहे. तक्रार अर्जातील कलम 1 व 2 मधील मजकूर बरोबर आहे.3 मधील मजकूर बरोबर आहे. कलम 4 मधील आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा.लि. यांचेकडून स्पेअर पार्ट खरेदीपोटी प्रस्तुतचा चेक तक्रारदारास दिलेची माहिती सामनेवालांना नाही. कलम 4 मधील तक्रारीतील नमुद चेक सामनेवाला क्र.1 शाखेकडे तक्रारदारांचे खातेवर वसुलीकरिता भरला होता व तो चेक सामेनवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.3 यांचेकडे पाठवण्यात आला हे तक्रारदाराचे म्हणणे खरे व बरोबर नाही. कलम 5 ते 8 मधील मजकूर मान्य व कबूल नाही. ब) यातील वस्तुस्थिती अशी की, तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेले चेक सामनेवाला क्र.1 बँकेमध्ये वसुलीसाठी भरला असता सामनेवाला क्र.1 यांनी ते कलेक्शनकरिता घेऊन इचलकरंजी को-ऑप बँक लि.शाखा-रत्नागिरी येथे वसुलीसाठी पाठवला. प्रस्तुत तक्रारदारांचे चेक्स लवकर वटावे व त्यांना कलेक्शन चार्जेस जादा लागू नये यासाठी प्रसतुत बँकेकडे चेक्स वसुलीसाठी पाठवले. यापूर्वीही तक्रारदाराचे चेक्स सदर बँकेमार्फत वसुलीसाठी पाठवून जमा झाले आहेत. प्रस्तुत बॅकेने प्रसतुतचे चेक्स वसुलीसाठी क्लिअरींग मार्फत स्टेट बँकेस पाठवला असता तो चेक पास झाला व त्याप्रमाणे सदर चेकची पास झालेली रक्कम त्यांचे कमिशन वजा जाता प्रस्तुत इचलकरंजी अर्बन बँकेने त्यांचे एच.डी.एफ.सी. बँकेच्या खातेवरील चेकने सामनेवाला क्र.1 यांचे खातेवर पाठवले. सदरचा चेक कोल्हापूरात एच.डी.एफ.सी. बँकेकडे वसुलीसाठी क्लिअरींगसाठी पाठवला असता तो चेक न वटता तो परत आला. दि इचलकरंजी को-ऑप बँक यांचे क्लिअरींग बंद झालेने व त्यांचेवर आर.बी.आय.चे निर्बंध आलेने व नमुद बँकेचे कोणत्याही खात्यातून उचल देणेस प्रतिबंध झालेने सदर चेकची रक्कम सामनेवाला क्र.1 बँकेस मिळाली नाही व त्यामुळे प्रसतुतची रक्कम तक्रारदाराचे खातेवर जमा करता आली नाही. तक्रारदाराचे सदर चेकची प्रोसीड म्हणजेच एच.डी.एफ.सी. बँकेवरील चेक आलेने तक्रारदाराचे खातेवर रक्कम जमेची नोंद केली. तथापि, सदरची प्रोसीडची रक्कम मिळू न शकलेने सदरची नोंद रद्द करणेकरिता नांवे लिहीली. वरील सर्व वस्तुस्थितीमुळे सामनेवाला यांनी कोणतीही निष्काळजीपणा व अथवा सेवात्रुटी केली नसलेचे स्प्ष्ट होते. सामनेवाला यांनी आवश्यक व कायदेशीर जरुर ती पूर्तता केली आहे. एवढेच नव्हे तर प्रस्तुत घटनेनंतरही सामनेवाला यांनी आर.बी.आय.कडे पत्रव्वयवहार करुन सदर प्रोसीडची रक्कम मिळणेबाबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे. रिझर्व बँकेचे आदेश मिळताच पुढील पूर्तता करणेस सामेनवाला सदैव तयार आहेत. रिझर्व बँकेच्या निर्देशाखेरीज काहीही व्यवहार करणे अयोग्य व बेकायदेशीर आहे.या सर्व वस्तुस्थितीमुळे प्रस्तुत अर्जास सामनेवाला यांचेविरुध्द कोणतेही कारण घडलेले नाही.तसेच तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कोणतीही मागणी करणेचा हक्क व अधिकार नाही. सामनेवाला हे वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या कोणतेही देणे लागत नाहीत. वरील सर्व वस्तुस्थिती तक्रारदारांना तोंडी व लेखी कळवूनही त्यांनी निष्कारण तक्रारदारांनी अर्ज केलेला आहे. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावेत अशी विनंती सदर मंचास सामनेवाला क्र.1 व 2 यांनी केली आहे. (9) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तसेच रिझर्व बँकेस पाठवलेले पत्र व रिझर्व बँकेकडून आलेल्या पत्र तसेच तक्रारदारांना पाठवलेली पत्रे इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेली आहेत. (10) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मु्द्दा क्र.1:- सामनेवाला क्र. 1 व2 यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये ग्राहक तक्रार क्र; 370 व 371/2009 मधील तक्रारदारांचे अनुक्रमे खाते क्र. सी.ए.2146 व सी.ए.1104 सामनेवाला क्र.1 यांचेकडे असलेचे मान्य केले आहे. तसेच तक्रारदारांनी त्यांचे खातेवर दि.08/04/2009 रोजी अनुक्रमे स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे दि.31/03/2009 चा चेक क्र.091786 व 091785 रक्कम रु.1,03,068/- व रु.1,25,836/- त्यांचे वर नमुद खातेवर जमा केलेचे दाखल पावत्यांवरुन निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुत खातेउता-यावर दि.20/04/2009 रोजी By BC या शे-यानिशी रक्कमा जमा केलेचे व 21/04/2009 रोजी To BC 24/29, व To BC 24/30 दि.20/03/2009 अशा शे-यानिशी नमुद रक्कमा नांवे टाकलेल्या आहेत ही बाबही सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीतील नमुद चेक त्यांचे खातेवर भरणा केले नंतर प्रस्तुतचे चेक कलेक्शनकरिता सामनेवाला क्र.1 यांनी दि इचलकरंजी अर्बन को-ऑप बॅक लि. शाखा रत्नागिरी येथे वसुलीसाठी पाठवली. प्रस्तुतचे चेक्स लवकर वटावेत व कलेक्शन चार्जेस जादा लागू नयेत यासाठीच नमुद बँकेकडे चेक्स वटवण्यासाठी पाठवले. यापूर्वीही सदर बँकेकडून वसुलीसाठी पाठवलेले चेक्स जमा झालेले आहेत. नमुद इचलकरंजी अर्बन बॅकेने प्रस्तुतचे चेक्स क्लिअरींगसाठी सामनेवाला क्र.3 कडे पाठवले. सदरचे चेक्स सामनेवाला क्र.3 बँकेने वटवून त्याच दिवशी धनादेशाची रक्कम आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांचे खाते क्र.111494592115 यांचे खातेवरुन डेबीट करुन चेक्सच्या त्यात्या तारखे दिवशीच सामनेवाला क्र.3 कडील खाते क्र.11149261893 च्या खातेस जमा केलेले आहेत हे सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेल्या खातेउतारा लिस्ट ऑफ चेक्स डिलीव्हर्ड व फर्स्ट क्लिअरींग अॅडजस्टमेंट शिटवरुन निर्विवाद आहे तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनीही आपल्या म्हणणेमध्ये प्रस्तुतच्या तक्रारीतील चेक्सच्या रक्कमा सामनेवाला क्र.3 यांनी वटूवून नमुद इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि. यांचेखातेवर जमा झालेचे मान्य केलेले आहे. सबब यामध्ये सामनेवाला क्र.3 यांची कोणतीही सेवात्रुटी नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.3 कडून नमुद तक्रारीतील चेक्स वटवून रक्क्मा इचलकरंजी अर्बन को-ऑप बँकेकडे जमा झाल्या. नमुद बँकेने सदर रक्कमा त्यांचे कमिशन वजा जाता त्यांचे एच.डी.एफ.सी.बँकेकडील खातेवरील चेकने सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवले. सदरचा चेक सामनेवाला क्र.1 यांनी कोल्हापूरात एच.डी.एफ.सी.बॅकेकडे क्लिअरींग मार्फत पाठवला असता तो चेक न वटता परत आला. दि इचलकरंजी अर्बन को-ऑप बँके यांचे क्लिअरींग बंद झालेने व त्यांचेवर रिझर्व बँकेचे निर्बंध आलेने नमुद इचलकरंजी बँकेच्या कोणत्याही खात्यातून उचल देणेस प्रतिबंध झालेने सदर चेक्सच्या रक्कमा सामनेवाला क्र.1 बँकेस मिळाल्या नाहीत. त्यामुळे सदरच्या रक्कमा तक्रारदाराचे खाती जरी जमेच्या नोंदी केल्या असल्या तरी सदरच्या नोंद कमी करुन त्या रक्कमा नांवे लिहील्या आहेत. ही वस्तुस्थिती सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. सामनेवाला कल्लाप्पाण्णा आवाडे बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे चिफ जनरल मॅनेजर यांना तक्रारदारांचे चेकबरोबरच अन्य चेक्स प्रस्तुत नमुद इचलकरंजी अर्बन को-ऑप बँकेमार्फत पाठवले आहे. तसेच तक्रारदाराचे अनुक्रमे BC 24/29, व BC 24/30 असून पे स्लिप एच.डी.एफ.सी.बँक डी.डी.क्र.25330 पाठवलेचे नमुद केले आहे व सदर रक्कमा त्यांचे ग्राहकांना वेळेत मिळणे गरजेचे आहे. मात्र रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे सदर रक्कमा सामनेवालांचे ग्राहकांना देणेसाठी निर्देश दयावेत अशी विनंती करणारे पत्र दि.15/05/2009 रोजी पाठवून दिलेचे दिसून येते. तसेच तक्रारदारासही दि.20/07/2009 रोजी तक्रारदाराने दिलेल्या दि.05 व 15 मे-2009 च्या लेखी तक्रारीस उत्तरादाखल कळवलेचे दिसून येते. तक्रारदाराचे धनादेश यापूर्वीही नमुद बॅकेकडून वटणावळीसाठी पाठवले होते. त्याप्रमाणे ते वटून जमाही झालेची बाब सामनेवाला यांनी नमुद केले आहे. मात्र रिझर्व बँकेचे निर्बंधामुळे सामनेवाला क्र.3 यांचेकडून वटून आलेल्या धनादेशाच्या रक्कमा या सामनेवाला क्र.1 यांचेकडे आलेच नसल्यामुळे तक्रारदारचे खातेवर जमा असलेली रक्कम नांवे टाकणेत आलेली आहे. सदर उदभवलेली परिस्थिती ही नाही सामनेवालांच्या हातात आहे नाही तक्रारदारांच्या हातात आहे. सामनेवालांनी रिझर्व बँकेशी पत्र व्यवहार केलेचे दिसून येते. सामनेवाला कल्लाप्पाण्णा आवाडे बॅकेने जाणीवपूर्वक प्रस्तुत धनादेशाच्या रक्कमा या तक्रारदारांचे खातेवर जमा व नंतर नांवे टाकलेल्या नाहीत. त्यास वरील परिस्थिती कारणीभूत आहे. यात सामनेवाला क्र. 1 व 2 यांची कोणतीही चुक दिसून येत नाही. सबब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदर परिस्थितीचा विचार करता सेवात्रुटी केली आहे असे म्हणता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- वरील मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदारांच्या तक्रारी नामंजूर करणेत येतात. 2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |