जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/43 प्रकरण दाखल तारीख - 06/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 20/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्रीमती.गंगाबाई भ्र.व्यंकटी मेकलवाड, वय सज्ञान , धंदा शेती व घरकाम, अर्जदार. रा. मोघाळी ता.भोकर जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखा अधिकारी, गैरअर्जदार. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड, शॉप नं.2, दिशा अलंकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद. 2. शाखा अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शरन्स कं.लि. 19,रिलायन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट,मुंबई. 3. तहसिलदार, तहसील कार्यालय, मुखेड, ता.मुखेड जि.नांदेड. 4. व्यवस्थापक,रिलायन्स लनरल इंशुरन्स कंपनी लि, उज्वल इंटरप्राईजेस, हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र. 1 - स्वतः गैरअर्जदार क्र. 3 - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 4 तर्फे वकील - अड.ए.जी.कदम. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ही मयत व्यंकटी मष्णा मेकलवाड यांची कायदेशिर पत्नी आहे. मयत व्यंकटी याचा मृत्यु दि.14/09/2009 रोजी सुमारे 14.30 ते 15.30 च्या दरम्यान मौजे सलगरा खुर्द शिवारात व्यंकटी यांच्या अंगावर विज पडुन मरण पावला. सदरच्या घटने बाबत अपघात मृत्यु म्हणुन पोलिस स्टेशन मुखेड येथे गुन्हा क्र. 31/07 अन्वये नोंद झाली आहे. सदर घटने संदर्भीय पोस्ट मार्टम रिपोर्ट, वैद्यकिय प्रमाणपत्रे दाखल केलेले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार शेतक-यास अपघाती विमा मिळतो या बाबत कुठलीच माहिती नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे रितसर क्लेम फॉर्मसह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्या करीता अर्ज केला त्यानुसार तहसिलदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे पाठविला. शेतकरी अपघात विमा योजना ही शासना मार्फत विमा कंपनी यांच्याकडुन मिळवून देण्याचा परिपत्रकानुसार मनोदय आहे. त्याप्रमाणे योजनेतील परिपत्रकानुसार अशा अपघातातील ग्रस्त लोकांना तसेच गरजु लोकांना रु.1,00,000/- देण्याचा क्रम प्रस्तुत परिपत्रकात आहे. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे योजनेचा लाभ मिळण्याची मागणी केली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे लेखी पत्र पाठवले ज्यामध्ये गैरअर्जदार क्र. 2 यांना त्यांनी माहिती दिली अर्जदाराचा सदरचा क्लेम हा विमा योजनेच्या क्षेत्रात बसत नाही तसेच परिपत्रकाच्या अटी व नियमाप्रमाणे Insured person is over age आहे, तो वेळ मर्यादेत येत नाही असा अभिप्राय पाठविला. परंतु डॉक्टरने त्यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मयताचे वय 60 वर्षे असे नमुद केलेले आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने जास्तीचे वय दाखवून वरील क्लेम रद्य ठरवीणे चुकीचे आहे. कारण टाळाटाळ करणे तसेच क्लेम मागणी देण्यास नाकरणे ही बाब चुकीच्या सेवेमध्ये तसेच निष्काळजीपणाची ठरते. अर्जदार यांनी वारंवार लेखी व तोंडी विनंती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना केल्या आहेत परंतु गैरअर्जदार यांनी क्लेम मंजुर करण्याऐवजी त्यास टाळाटाळ करुन क्लेम देण्यास नकार दिला आहे. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/-, 18 टक्के व्याजाने मिळावेत. अर्जदार यांना दिलेल्या चुकीच्या सेवेबद्यल व मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस देण्यात आली, त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यु .दि.14/09/2009 रोजी अपघाती मृत्यु झाल्यामुळे त्यांनी आमच्या कार्यालयाकडे दि.08/07/2008 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघाती विम्याचा मोबदला मिळण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे आमच्या कार्यालयात क्लेम फॉर्म व अर्जासोबत दाखल केले आहे. सदरील विमा पॉलिसी ही नॅशनल इंशुरन्स कंपनी मुंबई दिलेली आहे. सदरील क्लेम हा अपघात घडल्या पासुन 90 दिवसांच्या आंत पाठविल्यामुळे तो तहसिलदार यांचेकडे दि.02/08/2008 रोजी परत पाठविले आहे. गैरअर्जदारचे काम फक्त मध्यस्थी करणे व शेतक-यांच्या प्रस्तावाची छाननी करणे व योग्य त्या शिफारसीसह इन्शुरन्स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यामुळे त्याचे विरुध्दचा दावा खारीज करावा. गैरअर्जदार क्र. 3 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, मुद्या क्र. 1 ते 14 च्या खुलाशावरुन अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन मयत व्यंकटी मष्णा मेकलवाड हे दि.14/09/2007 रोजी विज पडुन मृत्यु सलगरा खु येथे त्यांचे शेतात चिंचेच्या झाडाखाली झाला त्याबद्यल आकस्मात मृत्यु नं.31/07 नोंदला गेला. मयताच्या नांवे गट क्र. 28 सलगरा येथे जमीन आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहे. म्हणुन प्रस्ताव कबाल इन्शुरन्स कं.प्रा.लि. औरंगाबाद यांचेकडे पाठविण्यात आला आहे. म्हणुन या कार्यालयात अर्जदार यांचा लाभ देण्या बाबतचा प्रस्ताव प्रलंबीत नाही. म्हणुन गैरअर्जदार क्र. 3 चा जबाब दावा स्विकारण्यात यावा व नियमाप्रमाणे अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 4 वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे एकत्रित रित्या दाखल केलेला आहे. त्यांचे म्हणणे असे की, प्रस्तुत तक्रार खोटया माहीतीच्या आधारावर दाखल केलेली आहे. अर्जदारांनी त्यांच्या लग्नांबद्यचे विवाह प्रमाणपत्र दाखल केलेले नाही तसेच मयत व्यंकटी यांचा मृत्यु अंगावर विज पडुन दि.14/09/2008 रोजी मृत्यु झाला, या बद्यलचा पुरावा नाही. त्यामुळे एफ. आय. आर, पंचनामा, साक्षीदाराचे जबाब या सर्व बाबी गैरअर्जदार अमान्य करतात. अर्जदार यांनी त्यांच्या पतीवर अवलंबुन होते व तेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते हे सिध्द केले पाहीजे. अर्जदार यांनी क्र. 3 यांच्या मार्फत मृत्यु दावा दाखल केले हे सिध्द केले पाहीजे. मयत यास गट क्र.28 मध्ये मौजे सलगरा ता.मुखेड जि.नांदेड येथे शेत जमीन आहे. गैरअर्जदराचे असे म्हणणे की, मयताचे इलेक्ट्रिक कार्डवरुन त्याचे वय दि.01/01/1994 रोजी 75 वर्ष शेतकरी अपघात विमा योजना 7/12, होल्डींगवर वय 12 ते 75 वर्षापर्यंत शेतकरी या योजनेस पात्र नाही. अर्जदार हे शेती करत होते व तो कर्ता होता, याचा पुरावा नाही किंवा वर उल्लेख केलेले कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाही. गैरअर्जदारांनी आजपर्यंत दावा दाखल केलेले नाही. त्यामुळे त्रुटीची सेवा देण्याचा प्रश्नच येत नाही. संबंधीत तक्रार ही अपरिपक्व आहे. सरकारी परीपत्रकाप्रमाण दि.19/08/2004 याप्रमाणे क्लेम हा तलाठी यांच्या मार्फत एक आठवडयाच्या आत अपघातानंतर आला पाहीजे. अपघात हा दि.14/09/2008 ला झाला व तहसिलदार यांनी प्रस्ताव पाठविला. अर्जदाराने तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, एफ.आय.आर.खबरी जबाब, मृत्यु प्रमाणपत्र इ. महत्वाचे कागदपत्र दाखल केले नाही. त्यामुळे दावा अपुर्ण आहे. सदरील तक्रार या मंचास कार्यक्षेत्र येत नसुन ते सिव्हील कोर्टाच्या कार्यक्षेत्रात येते. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात काही तक्रार निर्माण झाल्या तलाठयाने एक आठवडयाच्या आंत क्ले दाखल करावयास पाहीजे. अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेले नाही. सबब अर्जदाराचा दावा खर्चासह खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईन तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी सिध्द करतात काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 - गैरअर्जदार यांचा आक्षेप क्लेम प्रस्ताव त्यांना मिळालेला नाही शिवाय तो मुदतीत नाही. यानंतर अर्जदाराचे जे वारस आहेत इतर वारसाची संमती नाही. संबंधीत कागदपत्र, एफ.आय.आर. पंचनामा त्यांचेकडे नाही. पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्जदाराने वेळेच्या आत म्हणजे अपघातानंतर सात दिवसांच्या आंत प्रस्ताव पाठविलेले नाही. क्लेम प्रस्ताव हा अपरिपक्व आहे, अद्यापही गैरअर्जदारांनी यावर निर्णय घेतलेला नाही, काही वाद असेसल तर जिल्हा समीती पुढे ठेवले पाहीजे होते ते न ठेवता अर्जदार हे सरळ मंचात आलेले आहेत. इ.आक्षेप घेत त्यांनी दावा अद्यापही नाकारलेला नाही असे म्हटलेले आहे. येथे अर्जदाराने त्यांच्या पतीचे .दि.14/09/2008 रोजी मौजे सलगरा शिवरात अंगावर विज पडुन मृत्यु झाला व याबद्यल पोलिस स्टेशन मुखेड येथे अपघात म्हणुन गुन्हा क्र.31/2007 नोंदविलेला आहे. याबद्यल एफ.आयर.आर. पोलिस पंचनामा, पी.एम.रिपोर्ट दाखल केलेले आहे. तसेच तलाठया मार्फत अर्जदाराने प्रस्ताव फॉर्म भरुन तहसिलदार यांचेकडे पाठविलेले आहे. वारसाबद्यल प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. वारस हे मयताचे पती असुन बाकीचे त्यांचे मुले आहेत. इ.सर्व कागदपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचा आक्षेप आहे की, मयत व्यंकटी मेकलवाड यांचे मृत्यु समयी वय ईलेक्शन कार्ड प्रमाणे 75 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पॉलिसीच्या नियमाप्रमाणे 75 च्या वर वय जर जात असेल तर तो विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. आमच्या मते इलेक्शन कार्ड हे वयाचा पुरावा असु शकत नाही व मयत व्यंकटी यांचे वय काय असावे याबद्यलचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. म्हणुन मयत व्यंकटीचे वय नेमके काय असावे याचा आधार म्हणुन पी.एम. रिपोर्ट पाहीले असता, डॉक्टर हे मयताचे हाडावरुन त्यांचे वय काय असावे याचा गणीत लावू शकतो व पी.एम.रिपोर्ट मध्ये त्यांचे वय 60 वर्ष लिहीलेले आहे म्हणजे हे वय पॉलिसीच्या नियमात बसते. म्हणुन पी.एम.रिपोर्ट हे ग्राहय धरुन आम्ही मयताचे वय 60 वर्ष आहे असे ठरवितोव यावरुन गैरअर्जदारांनी घेतलेला आक्षेप आम्ही अमान्य करतो. त्यामुळे येथे गैरअर्जदाराचा वरील आक्षेप मान्य करण्या सारखा नाही . आता प्रश्न राहीला हे पॉलिसीतील नियमाप्रमाणे व परीपत्रकाप्रमाणे अपघातानंतर मृत्यु दावा हा तलाठयामार्फत पाठवीणे आवश्यक असतांना त्यांनी तो 9 ते 10 महिन्यांनी उशिरा दाखल केलेला आहे. यात अर्जदाराची मनस्थिती लक्षात घेतली असता हे स्पष्ट आहे की, पतीच्या मृत्युनंतर पत्नी ही अतीशय दुःखात असते घरातील व्यक्ती गेल्यानंतर सात दिवसांत इंशुरन्स कंपनीकडे पैसे मागायला जाणे हे शक्य होत नाही. किंवा समाजाच्या दृष्टीकोनातुन बरोबर दिसत नाही. यानंतर शासनाचे असे काही कल्याणकारी योजना आहे हे माहीती नसते किंवा अशा प्रकारचा क्लेम दाखल करण्यास विलंब होणे शक्य आहे. परीपत्रकात स्पष्ट म्हटलेले आहे की, अशा प्रकारचा क्लेम दाखल करण्यास उशिर जरी झाला तरी ता बंधनकारक नाही. त्यामुळे याला विलंब जरी झाला असले तर माफी देण्यात येते व हा वेळेच्या आंत क्लेम मानन्यात येतो, असे समजण्यात येते. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते, याबद्यल 7/12, नमुना 8, होल्डींग म्हणुन गट क्र.28 मध्ये मौजे सलगारा ता.मुखेड येथे शेती होते व शेतीच्या उत्पन्नातुन कुटूंबाचे पालनपोषन करत होती ही गोष्ट सिध्द होते. वर उल्लेख सर्व कागदपत्र या प्रकरणांत दाखल आहे. पी.एम.मध्ये मयत यांचा मृत्यु अंगावर विज पडुन झाला हे स्पष्ट असे म्हटले आहे म्हणजे तो अपघाती मृत्यु आह हे सिध्द होते. याबद्यल गैरअर्जदारांचा आक्षेप नाही. महाराष्ट्र शासनाचे परीपत्रक या प्रकरणांत दाखल केलेले. अपघाती मृत्यु हा विम्याचा कालावधीच्या आंत झालेले आहे. शासनाने नेमलेली समीती हा एक पर्याय आहे पण पर्यायाने शिवाय अडीशनल रेमीडी असुन अर्जदार मंचात आपली तक्रार घेऊन येऊ शकतो. गैरअर्जदार यांनी तक्रार ही अपरीपक्व स्वरुपात आहे असे म्हटले आहे. व तक्रार ही त्यांनी कबाल इंशुरन्स कंपनी यांच्या म्हणण्या प्रमाणे तहसिलदार यांच्या मार्फत पुराव्यासह हे सिध्द करतात की, तक्रार ही प्राप्त झालेली आहे. तक्रार झाल्यानंतर 30 दिवसात झाले असले ती तक्रार अपरीपक्व आहे, म्हणता येणार नाही व गैरअर्जदार म्हणतात सर्व कागदपत्र या प्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदार अजुनही प्रकरणांत दाखल असलेले क्लेम प्रस्ताव भाग 1 व वारस प्रमाणपत्र, 7/12, होल्हींग, एफ.आय.आर. पोलिस पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इलेक्शन कार्ड, एस.बी.एच. येथे खाते असल्याबद्यल पास बुक व फेरफार रजिस्टर इ.कागदपत्राचे सत्य प्रती घेऊन या प्रस्तावावर क्लेम देण्याचा नीर्णय घ्यावा. गैरअर्जदारांना अर्जदार यांनी या सर्व कागदपत्रसह क्लेम देण्यासाठी सहकार्य करावे, या सर्व कागदपत्रांच्या आधारे गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम देण्याचा नीर्णय घ्यावा. वरील सर्व कागदपत्रांच्या अवलोकन करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.25/06/2009 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे असे न केल्यास यानंतर दंडनिय व्याज म्हणुन 12 टक्के व्याज पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 3. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |