जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 352/2016.
तक्रार दाखल दिनांक : 26/12/2016.
तक्रार आदेश दिनांक : 16/08/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 07 महिने 21 दिवस
ज्ञानेश्वर पि. भिमराव जाधव, वय 28 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. ब्राम्हण गल्ली, अंबेजवळगे, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कं.लि.,
पहिला मजला, लातूर साडी सेंटरच्या वर, जुनी कापड लाईन,
लातूर, ता.जि. लातूर.
(2) मॅनेजर, मिनाक्षी टी.व्ही.एस. मोटार सायकल शोरुम,
जिल्हा कारागृहाच्या समोर, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कस्तुरे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : पी.व्ही. सराफ
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एच. मिनीयार
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, दि.6/4/2015 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून टी.व्ही.एस. कंपनीची अपाची आरटीआर 180 मोटार सायकल खरेदी केलेली असून तिचा नोंदणी क्रमांक एम.एच.25/ए.सी.4309 आहे. मोटार सायकल खरेदी करताना विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे मोटार सायकलचा दि.6/4/2015 ते 5/4/2016 कालावधीकरिता पॉलिसी क्रमांक 91817983 अन्वये विमा उतरविलेला होता. दि.1/2/2016 रोजी तक्रारकर्ता हे पुणे येथील सारस बागेमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेले होते आणि त्यावेळी सारसबागेसमोर मोटार सायकल पार्क केल्यानंतर चावी तशीस विसरुन राहिली. तक्रारकर्ता हे मोटार सायकलकडे परत आल्यानंतर मोटार सायकल तेथे मिळून आली नाही. शोध घेऊनही वाहन न आढळल्यामुळे दि.7/2/2016 रोजी तक्रारकर्ता यांनी पोलीस स्टेशन, स्वारगेट, पुणे शहर येथे मोटार सायकल चोरीची फिर्याद नोंदवली आणि त्याप्रमाणे गु.र.नं.31/2016 नुसार गुन्हा नोंद झाला. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दि.3/2/2016 रोजी दावा नोंद केला. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर केली. परंतु दि.6/7/2016 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केल्याचे सांगितले. विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवूनही नुकसान भरपाई देण्याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी नवीन मोटार सायकल देण्याचा किंवा रक्कम देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा आणि मानसिक व शारीरिक त्रासाकरिता; तसेच आर्थिक खर्चाकरिता रु.25,000/- नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी चोरीच्या वेळेस त्यांची मोटार सायकल ही लॉक न करता विनादेखरेखीखाली ठेवली आणि विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. वाहनाचे नुकसान होण्यापासून विमेदाराने आवश्यक पावले उचललेली नाहीत आणि वाहन सुरक्षीत ठेवले नाही. त्या कारणास्तव तक्रारकर्ता यांचा विमा दावा दि.9/3/2016 रोजी नामंजूर केला आहे. तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी आहे. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे विमा कालावधीमध्ये मोटार सायकल चोरीस गेल्यास विमा रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 जबाबदार आहेत. ते केवळ वाहनाचे विक्रेते आहेत आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई मागण्याचा तक्रारकर्ता यांना अधिकार नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता यांच्या वादकथित मोटार सायकलचा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा उतरवल्याचे व विमा कालावधीमध्ये मोटार सायकल चोरीस गेल्याचे विवादीत नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा दावा दाखल केल्याबाबत व तो विमा दावा नामंजूर केल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही.
6. मुख्य वादविषयाकडे गेल्यानंतर चोरीच्या वेळेस त्यांची मोटार सायकल ही लॉक न करता विनादेखरेखीखाली ठेवली आणि विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे; तसेच वाहनाचे नुकसान होण्यापासून विमेदाराने योग्य सुरक्षा न ठेवल्यामुळे तक्रारकर्ता यांचा विमा दावा दि.9/3/2016 रोजी नामंजूर केल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन आहे. तक्रारकर्ता यांनी वादकथित मोटार सायकलचे Two Wheeler Policy Certificate of Insurance cum Schedule अभिलेखावर दाखल केले आहे. असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.1 हे ज्या पॉलिसी अटी व शर्तीचा आधार घेत आहेत, त्यासंबंधी योग्य व आवश्यक कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत.
7. काहीही असले तरी तक्रारकर्ता यांची मोटार सायकल चोरीस गेलेली आहे. तक्रारकर्ता यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेल्या वादकथनाप्रमाणे व पोलीस कागदपत्रांप्रमाणे तक्रारकर्ता हे चोरी घडण्याच्या वेळेस मोटार सायकलला चावी तशीच विसरुन गेले होते. तक्रारकर्ता यांनी विमा संरक्षीत मोटार सायकल सुरक्षीत ठेवण्याबाबत आवश्यक काळजी घेतलेली नव्हती, असे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांचा निष्काळजीपणा विचारात घेऊन व तथाकथित पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा नामंजूर केला असल्यास ते कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरणार नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-