निकाल
दिनांक- 01.01.2014
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार मेसर्स उत्तम ट्रेडींग कंपनी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी पॉलीसीत नमुद केलेली रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे भुसार माल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी व्यवसायाकरीता सामनेवाला क्र.2 यांच्याकडून रक्कम रु.10,00,000/-(रु.दहा लाख) दि.29.05.2009 रोजी कर्जाऊ म्हणून घेतलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे मर्चंट पॉलीसी नुसार तक्रारदार यांचा भुसार मालाचा विमा काढलेला आहे, त्या पॉलीसीचा क्रमांक 4017/0020361/01/020 असा आहे. पॉलीसीचा कालावधी दि.06.5.2010 ते 31.08.2010 असा आहे.
तक्रारदार यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालू असताना दि.25.05.2010 रोजी पहाटे 03.00 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचे भुसार आडत दुकानातील असलेल्या विद्युत मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन दुकानास आग लागली, सदरील आग लागल्याची माहिती मिळताच तक्रारदार हे दुकानावर गेले आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. सदरील दुकानास लागलेल्या आगीमुळे तक्रारदार यांच्या दुकानातील तुर, कापूस, मोहरी, मुग, गहू, मका, बाजरी, चिंच, ज्वारी, करडी, सुर्यफूल, मटकी व दुकानात असलेला रिकामा बारदाना जळून खाक झाले. सदरील घटनेची माहिती तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन शिरुरयेथे दिली. पोलीसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला व तक्रारदार यांचा जबाब नोंदविला. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे दुकानातील माल जळाल्याबाबत माहिती दिली. तक्रारदार यांच्या दुकानात जळालेल्या मालाचा विमा काढला असल्यामुळे तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्र सामनेवाला यांच्याकडे देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला क्र.1 ने चुकीचे निकष लावून विमा रकमेपैकी फक्त रक्कम रु.6,42,815/- तक्रारदार यांच्या खाती जमा केले. तक्रारदार यांचे दुकानातील सुमारे रक्कम रु.16,00,000/- चा माल जळून खाक झाला. सामनेवाला यांनी विमा पॉलीसीत नमुद केलेली रक्कम रु.10,00,000/- देणे आवश्यक असतानाही कमी रक्कम देऊन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांच्या दुकानात सुमारे रु.21,00,000/- चा माल होता. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वेळोवेळी उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून मागणी केली. सामनेवाला क्र.1यांनी फेर चौकशी करुन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले, परंतू सदरील रक्कम दिली नाही. सामनेवाला क्र.2यांनी तक्रारदारास दि.03.03.2012 रोजी कर्ज भरण्याबाबत नोटीस दिली. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 मार्फत कर्जाऊ घेतलेल्या रकमेतून विमा उतरविलेला आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाईची रक्कम रु.9,92,000/- व त्यावर द.सा.द.शे.12 टक्के व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 इन्शुरन्स कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी कैफियत निशाणी 11 अन्वये दाखल केली. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांनी विमा पॉलीसी घेतली आहे ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक आहे ही बाब मान्य केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या दुकानास आग लागली होती ही बाब मान्य केलेली आहे, परंतू सदरील आगीत तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेले नुकसान मान्य केलेले नाही. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वेअर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे. तक्रारदार यांचे नुकसानीचे नियमाप्रमाणे मुल्यांकन करुन तक्रारदार यांच्या उपस्थितीत अहवाल सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सादर केलेला आहे तो अहवाल तक्रारदार यांना मान्य व कबूल होता. सर्वेअर यांनी नुकसानीचे मुल्यमापन केले, त्या अन्वये रक्कम रु.6,42,815/- ठरविण्यात आली. तक्रारदार यांनी सदरील रक्कम मान्य व कबूल केली. तक्रारदार यास सामनेवाला क्र.1यांनी धनादेश क्र.135458 दि.28.10.2010 रोजी पाठविला.सामनेवाला क्र.2 यांनी दि.10.11.2010 रोजी तो धनादेश कर्ज रकमेपोटी जमा केला. तक्रारदार यांनी सदरील रक्कम मान्य व कबूल आहे व संपूर्ण रक्कम स्विकारली आहे असे लेखी पावती सामनेवाला यांना करुन दिलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला विरुध्द भविष्यात कोणताही दावा करणार नाही असे लेखी पावतीद्वारे कबूल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संपुष्टात आलेली आहे. तक्रारदार विरुध्द सामनेवाला क्र.2 यांनी कर्ज वसूलीसाठी कारवाई सुरु केल्यामुळेव कर्ज देऊ लागू नये म्हणून सदरील खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना दिलेला धनादेश अनादरीत झाला आहे, त्याबाबत सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे विरुध्द फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही, नियमाप्रमाणे होणारी नुकसान भरपाई तक्रारदार यांना दिलेली आहे, सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपली लेखी कैफियत निशाणी 8 अन्वये दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून रु.10,00,000/- कर्ज दि.29.05.2009 रोजी घेतले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या व्यवसायाचा विमा सामनेवाला क्र.1 यांच्याकडे काढलेला आहे व विमा पॉलीसीची रक्कम भरलेली आहे. तक्रारदार यांचे दुकानातील भुसार माल जळाला आहे ही बाब मान्य आहे. परंतू किती रकमेचा माल जळाला आहे व आग लागण्यास कोणते कारण कारणीभूत आहे या बाबत अनभिज्ञता दर्शविली आहे. सामनेवाला क्र.1यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे कर्ज खात्यावर रक्कम रु.6,42,815/- जमा केली आहे ही बाब मान्य आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांचेकडून एकूण रक्कम रु.4,19,003/- कर्जापोटी येणे आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना तारण गहाणपत्र करुन जमीनी तारण दिलेल्या आहेत. तक्रारदाराने तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केलेली आहे व सामनेवाला क्र.2 यांची फसवणूक केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या विरुध्द धनादेश अनादरीत झाल्यामुळे फौजदारी केस दाखल केली आहे. तसेच रक्कम वसूलीसाठी उपनिबंधक सहकारी संस्थी बीड यांच्याकडे कारवाई केलेली आहे. सदरील कारवाईमुळे चिडून जाऊन तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे, सामनेवाला क्र.2 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 3 अन्वये दस्तऐवज हजर केलेले आहेत. त्यामध्ये घटनास्थळ पंचनामा, पोलीस निरीक्षक शिरुर यांच्याकडे दिलेला रिपोर्ट, तक्रारदार यांनी मार्केट कमिटीस भरलेल्या रकमेची पावती, बँकेचे पासबूक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमाणपत्र, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, तसेच स्वतःचे शपथपत्र निशाणी 10 अन्वये दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी निशाणी 7 अन्वये तक्रारदार यांनी घेतलेल्या कर्जाचे कागदपत्र, बँकेचे कर्जाबाबत खातेउतारा, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, तक्रारदार यांचे नावे रक्कम दिलेला धनादेश व सामनेवाला क्र.2 यांच्या बँकेत तक्रारदार यांचे नावे रक्कम जमा केल्याबाबत पावती, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना करुन दिलेली लेखी पावती इत्यादी कागदपत्र हजर केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी पुराव्याकामी शपथपत्र निशाणी 11 अन्वये दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पुराव्याकामी देविदास सावंत यांचे शपथपत्र निशाणी 9 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद निशाणी 15 आणि 16 अन्वये दाखल केले आहे.
वर नमुद केलेल्या सर्व दस्तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तक्रारदार व सामनेवाला यांनी सादर केलेला पुरावा याचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे वसामनेवाला यांचे वकील श्री.डी.बी.कुलकर्णी व एम.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पॉलीसीची संपूर्ण रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय? नाही. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र वकागदपत्राचे अवलोकन केले असता, खाली नमुद केलेल्या बाबी विषयी वाद नाही. तक्रारदार हे उत्तम ट्रेडींग कंपनी भुसार मालाचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडून व्यवसायाकरता रक्कम रु.10,00,000/- कर्ज काढले होते. दि.25.05.2010 रोजी तक्रारदार यांचे आडत दुकानास आग लागली व त्यामुळे दुकानात असलेला माल जळाला. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमा रकमेपोटी रु.6,42,815/- रक्कम अदा केली व ती रक्कम तकारदार यांनी सामनेवाला क्र.2 बँकेत कर्जापोटी जमा केली. तक्रारदार यांनी त्याचे दुकानातील मालाचा विमा काढला होता व नुकसान भरपाईची मर्यादा रु.10,00,000/-पर्यंत होती. तक्रारदार यांना त्यांचे दुकान जळाल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.6,42,815/-मिळालेली आहे.
तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संगनमत करुन तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात तक्रारदार यांचे दुकानातील माल जळून खाक झाला त्याचे नुकसान हे रु.16,00,000/- होते. तक्रारदार यास सामनेवाला यांनी विम्याची संपूर्ण रक्कम देणे क्रमप्राप्त होते. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना समजून न देता सदरील रक्कम धनादेशाने सामनेवाला क्र.2 बँकेत जमा केलेली आहे, तक्रारदार यांनीरु.20,00,000/- चा माल खरेदी केलेला आहे व त्याबाबत तक्रारदार यांनी पावत्याही हजर केलेल्या आहेत. तक्रारदार यांचे वकीलानी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांनी सर्वेअरचा रिपोर्ट मंचासमोर हजर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे किती नुकसान झाले व ही बाब तक्रारदार यांचे जमा केलेल्या रकमेएवढे नुकसान झाले हे सामनेवाला सिध्द करु शकले नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संगनमत करुन तक्रारदार यांच्या व्हाऊचरवर सहया घेतलेल्या आहेत. सबब सामनेवाला यांनी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांच्या वकीलानी या मंचाचे लक्ष पोलीसांनी तयार केलेला पंचनामा व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावर वेधले व तक्रारीत मागणी केलेली रक्कम ही योग्य व वाजवी असून ती देण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे असा युक्तीवाद केला.
सामनेवाला क्र.1 यांच्या वकीलानी असा युक्तीवाद केला की, सर्वेअरने नुकसान भरपाईचा आढावा घेतला, तक्रारदार यांचे समक्ष रिपोर्ट तयार केला व त्या रिपोर्ट अन्वये तक्रारदार यांचे रु.6,42,815/- चा माल जळाला ही बाब तक्रारदार यांनी मान्य केलेली आहे, तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून सदरील रक्कम अदा करण्यात आलेली आहे व तक्रारदार यांनी ती रक्कम मान्य असल्याबाबत लिहून दिलेले आहे व तशी पावती करुन दिलेली आहे. सामनेवाला यांच्या वकीलानी या मंचाचे लक्ष सामनेवाला यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावर वेधले व असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी बँकेचे कर्ज थकवलेले आहे, सामनेवाला क्र.2 यांनीतक्रारदार यांचे विरुध्द न्यायालयीन कारवाई सुरु केलेली आहे त्याला शह देण्यासाठी तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी त्यांचा क्लेम फुल अण्ड फायनल सेटलमेंट करुन रक्कम स्विकारलेली आहे, सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सामनेवाला क्र.2 यांचे वकीलानी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांच्याकडे कर्ज थकलेले आहे, याबाबत त्यांनी कोर्ट कारवाई सुरु केलेली आहे. तक्रारदार यांनी तारण दिलेली शेतजमीन परस्पर विक्री केलेली आहे, तक्रारदार यांचेकडून कर्जापोटी रक्कम घेणे आहे. सामनेवाला क्र.2 यांनी विम्याची रक्कम न देऊन कोणतीही सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांची विम्याची रक्कम विमा पॉलीसीचा हप्ता सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरलेला आहे.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेता व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी विम्याची संपूर्ण रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? याबाबत विवेचन करणे गरजेचे आहे. तक्रारदार यांच्या मते रक्कम रु.16,00,000/- चा माल जळाला आहे, त्याबाबत त्यांनी पावत्याही दाखल केलेल्या आहेत. प्रत्यक्ष दुकानात किती स्टॉक होता, तक्रारदार यांनी किती मालाची विक्री केली होती व ज्या दिवशी दुकानास आग लागली त्या दिवशीदुकानात किती माल शिल्लक होता या बाबत रजिस्टर हजर केलेले नाही, केवळ तक्रारदार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पावत्या, रकमेचा माल खरेदी केला ही बाब पुरेशी नाही. प्रत्यक्षात किती स्टॉक शिल्लक होता हे सिध्द करणे आवश्यक आहे तसेच तक्रारदार यांनी सांगितल्याप्रमाणे नुकसानीचा आकडा पंचनाम्यात नमुद केलेला आहे. पंचनाम्यामध्ये पोलीसांनी प्रत्यक्ष कोणता माल किती पोत्यात भरलेला होता व किती माल जळाला याचे प्रत्यक्ष वर्णन केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी नमुद केलेला माल जळाला आहे हे म्हणणे उचित होणार नाही. सामनेवाला क्र.2 यांनी सर्वेअर पाठवून नुकसान भरपाईचा अंदाज घेतलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सर्वे रिपोर्ट या मंचासमोर हजर केला नाही. परंतू तक्रारदार यांनी रक्कम रु.6,42,815/- स्विकारली आहे ही बाब शाबीत केलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना सदरील रक्कम मिळाली आहे असे लिहून दिलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेला दस्तऐवज बघता दि.28.10.2010 रोजी तक्रारदार यांचे नावे रु.6,42,815/- चा धनादेश दिलेला आहे, तो धनादेश सामनेवाला क्र.2 यांच्याकडे तक्रारदार यांचे खाती भरण्यासाठी दिला आहे. तक्रारदार यांनी तो धनादेश सामनेवाला क्र.2 हया बँकेत स्वतःची सही करुन भरलेला दिसून येतो. तक्रारदार यांनीदि.10.11.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांना CLAIM DISCHARGE CUM SATISFACTION VOUCHER लिहून दिलेले आहे. सदर दस्ताचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे झालेले नुकसान याचा आढावा घेतलेला आहे व त्याबाबत तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. तक्रारदार हे पूर्णपणे समाधानी झालेले असून संपूर्ण क्लेम त्या रकमेपोटी संपूर्ण क्लेम रक्कम रु.6,42,815/- घेण्यास तयार झाले व ती रक्कम फुल अण्ड फायनल सेटलमेंट म्हणून स्विकारत आहे हे स्पष्ट नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांना ऋणातून मुक्त केलेले आहे व पूढे क्लेम संबंधी कुणाकडे काहीही मागणी करणार नाही, याबाबत स्पष्ट लिहून दिलेले आहे. सदरील दस्तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी फुल अण्ड फायनल सेटलमेंट म्हणून सामनेवाला यांच्याकडून रक्कम स्विकालेली आहे व तसे लिहून दिलेले आहे. तक्रारदार यांचा युक्तीवाद लक्षात घेतला असता त्यांचे म्हणणे की, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संगनमत करुन तक्रारदाराना फसवले आहे. प्रत्यक्षात धनादेश भरताना तो धनादेश तक्रारदार यांच्या सहीने भरलेला आहे व तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना ऋणमुक्त केलेले आहे, याची पावती करुन दिलेली आहे, त्या पावतीवर तक्रारदार यांची सही आहे. जर तक्रारदार यांना संपूर्ण नुकसान भरपाईची रक्कम मान्य नव्हती अगर दिलेली रक्कम योग्य व वाजवी नव्हती, तर तक्रारदार यांनी सदरील रक्कम अंडर प्रोटेस्ट घ्यावयास हवी होती व तशी नोंद करणे गरजेचे होते, तसेच सदरील रक्कम मान्य नसल्याबाबत सामनेवाला यांना ताबडतोब नोटीस देऊन कळवणे गरजेचे होते.सदरील रक्कम तक्रारदार यांना दि.10.11.2010 रोजी मिळाली व तक्रारदार यांनी सदरील तक्रारदि.07.04.2012 रोजी दाखल केली आहे. कोणताही सुज्ञ मनुष्य ज्याची फसवणूक झाली आहे, तो इतका वेळ शांत बसून राहणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना कोणतीही नोटीस दिलेली नाही, अगर दिलेली रक्कम योग्य व वाजवी नाही असे कळविलेले नाही. याउलट तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांनी दिलेली रक्कम स्विकारली आहे व क्लेमचे पुर्णपणे समाधान झाले आहे व सामनेवाला यांना ऋणमुक्त केले आहे असे लिहून दिलेले आहे. सबब तक्रारदार यांचे कथन की, सामनेवाला यांनी तक्रारदाराला फसवले आहे हे स्विकारता येणार नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे विरुध्द कर्ज थकीत झाल्यामुळे कोर्ट कारवाई केलेली दिसते. तदनंतरच तक्रारदार यांनी सदरील तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे. यावरुन असे लक्षात येते की, तक्रारदार यांचा हेतु शुध्द नाही. केवळ सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या विरुध्द कारवाई सुरु केलेली आहे म्हणून सदरील तक्रार दाखल केल्याचे निदर्शनास येते. सबब या मंचाच्या मते सामनेवाला क्र.2यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करु शकला नाही. म्हणून तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड