( आदेश पारित द्वारा मा. सदस्या, श्रीमती अल्का उमेश पटेल)
-- निकालपत्र --
( पारित दि. 30 मार्च, 2013)
तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. तक्रारकर्तीचे पती खेमराज गोविंद हरिणखेडे यांच्या मालकीची मौजा पांजरा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 159, 201, 222, 265, 202, 230 ही शेत जमीन असून तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते.
2. दिनांक 12/12/2005 ला तक्रारकर्तीचे पती मोटारसायकलने तिरोडा कडे येत असतांना समोरून भरधाव वेगाने येणा-या टॅक्सीच्या धडकेने जखमी होऊन मरण पावले.
3. पतीच्या अपघाती मृत्युमुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा मिळण्यासाठी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 01/02/2006 रोजी अर्ज केला तसेच आवश्यक कागदपत्रे दिली.
4. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा सदर दावा मंजूर किंवा नामंजूर केला नाही. ही विरूध्द पक्ष 1 व 2 यांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तिने सदरची तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीमध्ये विमा रक्कम रू. 1,00,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
6. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 13 दस्त तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 10 ते 54 वर दाखल केले आहेत.
8. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केले.
9. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने तिचा विमा दावा दिनांक 01/02/2005 ला दाखल केल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. करिता विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी केली आहे.
10. विरूध्द पक्ष 1 व 2 चे म्हणणे आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 12/12/2005 रोजी झालेला असून आवश्यक संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही म्हणून विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला. याबाबत तक्रारकर्तीला दिनांक 14/09/2006 रोजीच्या पत्राद्वारे कळविलेले आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 च्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रस्तुत तक्रार खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी केलेली आहे.
11. विरूध्द पक्ष 3 म्हणतात की, तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत सदर प्रस्ताव पाठविला असून तो त्यांनी जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांच्याकडे पाठविलेला आहे. अर्जदाराकडून प्रस्ताव स्विकारणे व तो पुढील कार्यवाहीस्तव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे एवढेच कार्य विरूध्द पक्ष 3 चे असल्यामुळे त्यांनी त्यांचे कार्य योग्य प्रकारे पार पाडले आहे. करिता त्यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरूध्द पक्ष 3 यांनी केलेली आहे.
12. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी उत्तरासोबत पृष्ठ क्रमांक 77 ते 80 वर दस्त दाखल केले आहेत.
13. विरूध्द पक्ष 4 – तहसीलदार तिरोडा, जिल्हा गोंदीया यांच्या नोटीसची पोच रेकॉर्डवर आहे. ते हजर झाले नाहीत किंवा उत्तरही दाखल केले नाही. म्हणून दिनांक 26/03/2013 रोजी त्यांच्या विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
14. तक्रारकर्तीने लेखी युक्तिवाद दाखल केला. तर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तर व दस्त हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिलेली आहे.
15. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, दाखल केलेले दस्त तसेच विरुध्द पक्ष 1,2 व 3 यांचे लेखी उत्तर, दस्त आणि तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ?
कारणमिमांसा
16. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीचे मयत पती खेमराज हरिणखेडे हे शेतकरी असून त्यांच्या नावे मौजा पांजरा, तालुका तिरोडा जिल्हा गोंदीया येथे शेत जमीन आहे. शासनाच्या योजनेनुसार ज्या शेतक-याचे नाव 7/12 उता-यावर आहे तो शेतकरी सदर योजनेत लाभाधारक असल्यामुळे तक्रारकर्तीचा पती सुध्दा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभधारक ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
19. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविली आहे. ज्याद्वारे शासनाने विरूध्द पक्ष 1 व 2 विमा कंपनीला प्रिमियम दिलेला आहे. राज्यातील 7/12 उता-यावरील खातेधारक सदर योजनेतील लाभार्थी आहेत. तक्रारकर्तीचा पती हा खातेधारक असल्यामुळे तो लाभार्थी ठरतो. तसेच पतीच्या मृत्युनंतर तक्रारकर्ती ही लाभार्थी ठरत असल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्या विरोधात सदर तक्रार दाखल केलेली आहे.
20. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, पतीच्या अपघाती मृत्युनंतर दाव्यासाठी लागणारी संपूर्ण कागदपत्रे तिने विरूध्द पक्ष यांच्याकडे जमा केली आहेत. परंतु विरूध्द पक्ष 1 व 2 म्हणतात की, दाव्यासाठी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची तक्रारकर्तीने पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केला आहे. तथापि त्याबाबतचे कोणतेही दस्त रेकॉर्डवर दाखल केले नाही. म्हणून विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या या म्हणण्यात तथ्य नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान माननीय राज्य आयोग व राष्ट्रीय आयोग यांची खालील निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1. 2011 (4) CPR 502 (NC) - Reliance General Insurance Co. v/s Sri AVVN Ganesh
2. I (2009) CPJ 147 - National Insurance Co. v/s Asha Jamdar Prasad
3. II (2008) CPJ 403 - ICICI Lombard General Insurance Co. Ltd. v/s Sindhubhai Khanderao Khairnar
4. I (2010) CPR 219 – Kamlabai Prakash Chavan v/s The Authorised Signatory ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
5. III (2007) CPJ 308 – Ramayanvati v/s Oriental Insurance Co. Ltd.
6. I (2009) CPJ 264 – Golden Trust Financial Services & Anr. v/s Malwa Devi
7. 2011 (4) CPR 396 (NC) – 15 T.P.D. Gram Sewa Sahakari Samiti Ltd. Through its Manager & Ors v/s Smt. Charanjit Kaur & Ors..
8. III (2011) CPJ 282 – United India Insurance Co. Ltd. v/s Vyasa Bank Ltd. & Anr.
9. III (2011) CPJ 285 – Sadhana Ramdas @ Jambuwant Salunke v/s State of Maharashtra & Ors.
सदरच्या निकालपत्रातील तथ्ये व वस्तुस्थिती सदर प्रकरणाच्या तथ्याशी सुसंगत असल्यामुळे सदर निवाडे या तक्रारीस तंतोतंत लागू पडतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम अद्याप दिली नाही ही विरूध्द पक्ष 1 व 2 यांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
21. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी (1) CPJ 2009 (3) page no. 75 Supreme Court. (2) CPJ 2001 (3) page no. 73 महाराष्ट्र राज्य आयोग हे न्यायनिवाडे रेकॉर्डवर दाखल केले आहेत. परंतु त्यातील मुद्दे सदर तक्रारीस लागू होत नाही.
22. प्रस्तुत तक्रारीमध्ये विरूध्द पक्ष 3 व 4 यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.
करिता आदेश
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- द. सा. द. शे. 12% व्याजासह द्यावी. व्याजाची आकारणी दिनांक 01/02/2006 ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत करावी.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 3 व 4 यांच्या विरोधात प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.