( निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
::निकालपत्र::
(पारीत दिनांक –07 मे, 2012 )
1. अर्जदार/तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली प्रस्तूत तक्रार विरुध्दपक्ष/गैरअर्जदार विरुध्द न्याय मंचा समक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदार/तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याचे मालकीचे चारचाकी वाहन असून, त्याचा नोंदणी क्रं MH-31, DC-30-3035 असा आहे. त.क.ने सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून काढला होता व त्यात वाहन चोरी झाल्यास त्या संबधाने विमा अंर्तभूत होता. सदर विम्याचा कालावधी हा दिनांक 03.03.2011 पर्यंत होता. अशाप्रकारे त.क. वि.प.विमा कंपनीचा ग्राहक आहे.
3. त.क.ने पुढे असे नमुद केले की, त.क.चा भाऊ दि.18.10.2010 रोजी सदर विमाकृत वाहनाने पुण्याला जात असताना, जालना येथे रात्री 10.00 वाजता थांबला असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी जेवणात गुंगीचे औषध टाकून त.क.चे भाऊला बेशुध्द केले व खिश्यातून चाबी काढून वाहन चोरुन नेले. या संबधात त.क.ने जालना येथील पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला परंतु वाहन मिळून आले नसल्याचा समरी रिपोर्ट पोलीसांनी न्यायालयात दाखल केला.
4. त.क.ने वाहन चोरीस गेल्या नंतर विमा दावा आवश्यक त्या सर्व दस्तऐवजासह वि.प.विमा कंपनीकडे सादर केला. वि.प.विमा कंपनीने दिनांक 18.04.2011 रोजीचे पत्रान्वये निष्काळजीपणामुळे वाहन चोरीस गेले या कारणावरुन विमा दावा फेटाळून लावला. त्यावर त.क.ने वि.प.विमा कंपनीला
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
दिनांक 17.05.2011 व 27.06.2011 रोजीचे पत्र पाठविले परंतु सदर पत्रास उत्तरही वि.प.विमा कंपनीने दिले नाही व दाव्यासंबधाने विचार केला नाही. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली.
5. त.क.चे असेही म्हणणे आहे की, त्याचा भाऊ बेशुध्दा अवस्थेत असताना विमाकृत वाहन चोरीस जाणे हे कृत्य निष्काळजीपणा मध्ये मोडत नाही. त.क.ने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ या संबधाने मा.वरिष्ठ न्यायालयांचे निकालाचे न्यायनिवाडे आपले तक्रारीत उदधृत केलेत. त.क.चे असेही म्हणणे आहे की, विमा काढताना त्यातील अटी व शर्तीची प्रत वि.प.विमा कंपनीने दिली नाही किंवा अटी व शर्तीवर त.क.ची सही घेतली नाही व अटी व शर्ती समजावून सांगितलेल्या नाहीत. तसेच उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे विमाकृत वाहनाची चोरी झाल्यास वि.प.विमा कंपनी नुकसान भरपाईसाठी जबाबदार राहणार नाही असे कुठेही पॉलिसीचे प्रती मध्ये नमुद नाही किंवा अशा प्रकारची घटना निष्काळजीपणामध्ये मोडत नाही. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
6. म्हणून त.क.ने गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द प्रस्तुत तक्रार न्यायमंचा समक्ष दाखल करुन तीद्वारे त.क.ला वाहनाचे विमा दाव्यापोटी रुपये- 7,06,325/- एवढी रक्कम वि.प.कडून मिळावी. तसेच त.क.ला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारीद्वारे केली.
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
7. वि.प.विमा कंपनीने पान क्रं 38 ते 44 वर आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर सादर केला. वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी व चुकीची असल्याचे नमुद केले. त.क. याचे स्कॉप्रीओ वाहन क्रं MH-31, DC-30-3035 ची पॉलिसी वि.प.विमा कंपनीने काढली होती आणि पॉलिसीचा कालावधी हा दि.04.03.2010 ते 03.03.2011 असा होता ही बाब मान्य केली. पॉलिसीमध्ये आय.डी.व्ही. रुपये-7,06,325/- एवढा होता. पॉलिसीची प्रत व शर्तीचा दस्तऐवज त.क.ला पॉलिसी काढल्या नंतर देण्यात आला होता. त.क.ला पॉलिसीचे अटी व शर्तीचा दस्तऐवज दिला नव्हता ही बाब नाकबुल केली. त्यांनी त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
8. वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात असेही नमुद केले की, त.क.ने तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त.क.चे भाऊ विमाकृत वाहन घेऊन जात असताना दिनांक 18.10.2010 रोजी रात्री 10.00 वाजता दोन अनोळखी व्यक्तींनी त.क.चे भाऊला गुंगीचे औषध देऊन विमाकृत वाहन चोरीस नेले आणि त्या संबधाने जालना पोलीस स्टेशनला दिनांक 20.10.2010 रोजी एफ.आय.आर. नोंदविण्यात आला या सर्व बाबी नाकबुल केल्यात. सदर पोलीस एफ.आय.आर हा दस्तऐवजाचा भाग असल्याचे नमुद केले. वाहन चोरीला गेल्या नंतर त.क.ने वि.प.विमा कंपनीला दिलेल्या पत्रातील मजकूर नाकबुल केला. त.क.चा भाऊ बेशुध्दावस्थेत असताना वाहन चोरीस गेल्यामुळे सदरची घटना ही निष्काळजीपणा या सदरात मोडत असल्याचे नमुद केले. कोणताही समजूतदार मनुष्य हा अनोळखी व्यक्तीस रस्त्यावर लिफट देणार नाही आणि त्यांचे सोबत हॉटेल मध्ये राहणार नाही व
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
जेवणार सुध्दा नाही. त.क.चे भाऊने विमाकृत वाहना संबधाने योग्य काळजी घेतल्याचे त.क.चे तक्रारीतील विधान अमान्य केले. पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे
विमाधारकाने वाहनाची योग्य काळजी घ्यावयास पाहिजे. वि.प.विमा कंपनीने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त.क.ची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयात मोडत नसल्याने वि.न्यायमंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याचे नमुद केले. तसेच सदर वाहनाचे फायनान्सरला प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नाही, त्यामु्ळेही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
9. त.क.ची तक्रार पूर्णतः चुकीची असल्याने, त्यामधील मागण्या या अमान्य करण्यात येत आहेत. सबब तक्रार खारीज व्हावी, असा उजर वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात घेतला.
10. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 6 निशाणी क्रमांक-3 वरील यादी नुसार एकूण 09 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये एफ.आय.आर., पोलीस तर्फे दाखल अ फायनल प्रत, पॉलिसी प्रत, विमा कंपनीने विमा दावा फेटाळल्या बाबत दिलेले पत्र, त.क.यांनी वि.प.विमा कंपनीला दिलेली पत्रे अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. त.क.ने पान क्रं 61 ते 65 वर प्रतिउत्तरा दाखल आपले शपथपत्र दाखल केले तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
11. गैरअर्जदार विमा कंपनीने आपला लेखी जबाब पान क्रमांक 38 ते 42 वर, निशाणी क्रमांक 8 प्रमाणे प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत पान क्रं 43 वरील
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
यादी नुसार विमा दावा नाकारल्याचे पत्र, नागपूर नागरी सहकारी बँकेचे पत्र, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट,क्लेम फॉर्म अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
12. उभय पक्षांचे लेखी निवेदन, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
13. प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती आणि दाखल दस्तऐवज पाहता, निर्विवादपणे तक्रारदाराने, गैरअर्जदार/वि.प. विमा कंपनी कडून, त्यांचे मालकीचे स्कॉर्पीओ या चार चाकी वाहनाचा विमा, वार्षिक प्रिमियम रुपये-21,424/- एवढी रक्कम अदा करुन काढला होता. सदर वाहनाचे पॉलिसीचा कव्हर नोट क्रमांक-58881387 असा असून, पॉलिसीचा कालावधी दि.-04.03.2010 ते दि.-03.03.2011 असा होता.
14. पॉलिसीचे वैध कालावधीमध्ये दि.18.10.2010 रोजी तक्रारदाराचा भाऊ सदर विमाकृत वाहनाने, पुणे येथे जात असताना, रात्री जालना येथे थांबला असता, तेथे दोन अनोळखी व्यक्ती त्यास भेटले, त्यांचे सोबत तो गेस्ट हाऊसला गेला. त्यातील एका अनोळखी व्यक्तीने जेवण आले असता, तक्रारदाराचे भाऊचे जेवणात बेशुध्दीचे औषध टाकले. सदरचे जेवण घेतल्या नंतर तक्रारदाराचा भाऊ बेशुध्द झाला त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तींनी त्याचे खिश्यातून वाहनाची चावी काढून सदर विमाकृत वाहन चोरुन नेले.
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
15. दाखल दस्तऐवजा वरुन हे ही दिसून येते की, तक्रारदाराने पॉलिसी अंतर्गत विमा दावा वि.प. विमा कंपनीकडे दाखल केला असता, वि.प. विमा कंपनीने त्यांचे दिनांक-18.04.2011 रोजीचे पत्रान्वये, तक्रारदाराने पॉलिसीतील नमुद अटी व शर्ती प्रमाणे, सदर विमाकृत वाहनाची योग्य ती काळजी घेतली नाही व तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे वाहन चोरीस गेले व त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झाला, या कारणास्तव तक्रारदाराचा विमा दावा नाकारला.
16. परंतु उपरोक्त नमुद घटनाक्रम बघता, तक्रारदाराचे भाऊची दिशाभूल करुन/धोका देऊन व त्यास बेशुध्द करुन, अनोळखी व्यक्तीनीं विमाकृत वाहन चोरुन नेले, यात तक्रारदाराचे भाऊचा निष्काळजीपणा होता, असे घटनाक्रम पाहता म्हणता येणार नाही.
17. पान क्रं 7 वरील, दस्तऐवज क्रं 1 वरुन हे ही निदर्शनास येते की, सदर विमाकृत वाहनाचे चोरी बाबत तक्रारदाराने जालना पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. दाखल केला होता. तसेच पान क्रं 15 वरील दस्तऐवज क्रं-2 वरुन संबधित पोलीस स्टेशनने तक्रारदारास दिलेल्या सुचना फॉर्म मध्ये देखील सदरची फीर्याद खरी असल्याचे व गुन्हयातील आरोपी व मुद्येमाल मिळाला नसल्याचे नमुद केलेले आहे. तसेच पान क्रं 16 वरील दस्तऐवजा वरुन असे निदर्शनास येते की, संबधित पोलीस स्टेशनने मुख्य न्यायदंडाधिकारी, जालना यांचे न्यायालयात सदर वाहन सापडून आले नाही, अशी "अ-फायनल समरी" दाखल केल्याचे निदर्शनास येते. एवढेच नव्हे तर
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने सादर केलेल्या ........ अहवालात देखील सदरच्या बाबी नमुद केल्याचे दिसून येते (अहवालाची कारण मिमांसा) पर्यायाने तक्रारदाराचे विमाकृत वाहनाची चोरी झाल्याची फीर्याद खरी असून सदरचे वाहन सापडून आले नाही, ही बाब पूर्णतः सिध्द होते.
18. वरील परिस्थिती पाहता, गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने, तक्रारदाराचा विमा दावा हा अयोग्य कारणास्तव नाकारुन, तक्रारदारास सेवेतील कमतरता दिली, असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
19. दाखल दस्तऐवजां वरुन तसेच उभय पक्षांचे यु्क्तीवादा वरुन असेही निदर्शनास येते की, तक्रारदाराचे सदरचे विमाकृत वाहन हे नागपूर नागरी सहकारी बँकेकडे गहाण असल्याचे पान क्रं 45 वरील दाखल नागपूर नागरी सहकारी बँकेने, वि.प.विमा कंपनीस दि.10.11.2010 रोजी लिहिलेल्या पत्राचे प्रतीवरुन निदर्शनास येते.
20. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, वि.जिल्हा न्यायमंच प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1)तक्रारकर्त्याची तक्रार गैरअर्जदार/वि.प. विमा कंपनी विरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
2) गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने, तक्रारदारास स्कॉर्पिओ विमाकृत वाहन
क्रं- MH-31, DC-30-3035 चे पॉलिसी कव्हरनोट नं.-58881387 अनुसार
घसारा वजा जाता येणारी देय विमा रक्कम विमा क्लेम नाकारल्याचा
दिनांक-18.04.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो
द.सा.द.शे.9% दराने व्याजासह तक्रारदाराचे नागपूर नागरी सहकारी बँक,
शाखा मानेवाडा रोड, नागपूर येथील त.क.चे कर्ज खात्यात जमा करावी.
अशी रक्कम जमा झाल्यानंतर नागपूर नागरी सहकारी बँकने सदर
जमा रकमेचे त.क.चे कर्ज खात्यात योग्य ते समायोजन करुन
योग्य ती कार्यवाही पार पाडावी.
3) गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने, तक्रारकर्त्यास प्रस्तुत तक्रारीचे खर्चा दाखल
रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) द्यावेत.
4) गैरअर्जदार/वि.प.विमा कंपनीने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रत प्राप्त
झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे. अन्यथा गैरअर्जदार विमा
कंपनी देय विमा रक्कम द.सा.द.शे.9% दरा ऐवजी द.सा.द.शे.12% दंडनीय
दराने त.क.यास देण्यास जबाबदार राहील.
ग्राहक तक्रार क्रमांक :367/2011
5) तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येतात.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्या द्याव्यात.