::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
1. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. अर्जदार क्रमांक एक व दोन हे दोघेही पती-पत्नी असून दोन्ही वनविभागात स्थायी कर्मचारी आहेत. गैरअर्जदार कमांक एक हे ICICI बँक चंद्रपूर शाखेत ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तसेच गैरअर्जदार कमांक दोन आयसीआयसी होम फायनान्स बँकेचे रजिस्टर ऑफिस असून सदर ऑफिस मधून आयसीआयसीआय होम फायनान्स बँक चे संपूर्ण कर्ज वितरणाची प्रक्रिया केली जाते. तक्रारदार क्र. 1 व 2 ने प्लॉट विकत घेऊन त्यावर बांधकामाचा निर्णय घेतला. अर्जदारांनी प्लॉट विकत घेऊन त्यावर बांधकाम करण्याकरीता अपुर्ण राशी असल्यामुळे कर्ज घेण्याकरता गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे आवेदन केले. सदर आवेदना सोबत अर्जदारांनी प्रशासकीय व इतर खर्च म्हणून रक्कम रु. 20000/- गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या निर्देशाप्रमाणे शाखेचा अधिकारीकडे जमा केले. त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 व 2 हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. अर्जदाराने राहण्याकरता मोजा चांदा रय्यतवारी येथील भुमापन क्रमांक 228/1 मधील परावर्तित प्लॉट क्रमांक 72 चे एकूण 4800 चौ. फूट जागेपैकी 1207.80 चौरस मीटर जागा विकत घेण्यासाठी अर्जदारांनी सुरुवातीला DHFL बँके येथे लॅंड लोन करिता आवेदन केले. सदर बँकेने जागेसंबंधी व नोकरीबाबत दस्तांची पडताळणी करून अर्जदाराला सदर प्लॉट विकत घेण्यासाठी 9,21,161/- रु. land loan मंजूर केले. सदर लोन मंजूर झाल्यानंतर अर्जदाराने अधिपत्र करून सातबारा आपले नावे नोंदवली व त्यानंतर बांधकामाकरिता अर्जदारांनी महानगर पालिका चंद्रपूर येथे बांधकामाची मंजुरी घेतली. परंतु सदर बांधकामाकरिता अपुरे राशी असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1च्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी अर्जदाराला त्वरित लोन त्यांच्या शाखेत LAND लोन TAKEOVER करून होम लोन मंजूर होणार असे सांगितले. त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे अर्ज केला असता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराला जागेबाबत व नोकरीचे संपूर्ण दस्तावेज मागितले व DHFL बॅंकेकडून land loan takeover करण्याकरता सर्व दस्तावेजाची मागणी केली. सदर दस्तावेजाची पडताळणी झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दिनांक 8.6.15 रोजी अर्जदाराला लॅंड लोन क्रमांक 7720628107 मार्फत 9,21,161/- रुपये व बांधकामाचे home loan क्रमांक 7790728108 मार्फत 10,00,000/- रुपये मंजूर करून अर्जदाराला कर्ज मंजुरीचे पत्र दिले. त्याकरिता प्रशासकीय खर्च व इतर खर्च मिळून 20,000/- त्या शाखेतील अधिकाऱ्याकडे अर्जदार यांनी केले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराला LAND लोन म्हणून रक्कम रु. ९,२१,९६१/- DHFL बँकेच्या नावाने धनादेश दिला. उर्वरित 10,00,000/- हाउसिंग कर्जाची रक्कम सदर जागेवर DHFL बँकेकडून सदर जागेची विक्री पत्र व नाहरकत प्रमाणपत्र व बांधकामाचे इतर दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर त्वरित देण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे दिनांक 25.07.15 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराच्या निर्देशनानुसार विक्रीपत्र व नाहरकत प्रमाणपत्र व इतर बांधकामाचे संबंधित सर्व दस्तावेज गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे जमा केले, तेव्हा गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराला सदर जागेवर स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकाम करण्याचे निर्देश दिले व उर्वरित रक्कम सदर बांधकाम झाल्यानंतर देण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 च्या निर्देशाप्रमाणे सदर जागेवर बांधकाम केले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराला उर्वरित होम लोन रक्कम करिता शाखेत जाऊन वेळोवेळी रकमेची मागणी केली, परंतु वेगवेगळ्या दस्तऐवजाची मागणी करून अर्जदाराने टाळाटाळ केली. अर्जदार क्रमांक 1 ने टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने दिनांक 10.9.15 रोजी अर्जदाराने त्यांच्या वकिलामार्फत नोटीस पाठवून हाउसिंग कर्जाची मागणी केली. परंतु सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतरही गैरअर्जदाराने आज पर्यंत लोन दिलेले नाही, ही गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती सेवेत त्रुटी राहिली. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 8.6.15 रोजी मंजूर झालेले हाऊसिंग लोन त्वरीत देण्याचे देण्याचा आदेश पारित करावा. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून घेतलेले बांधकामासंबंधीचे संपूर्ण दस्तावेज व प्रशासकीय खर्च व इतर खर्च म्हणून 20 हजार रुपये व रु. 150 प्रतिदिवस प्रमाणे अर्जदाराला भुगतान होईपर्यंतच्या तारखेपर्यंत देण्यात यावे. तसेच हाऊसिंग कर्ज आज पर्यंत न दिल्यामुळे त्या शारीरिक-मानसिक त्रासापोटी एक लाख व आर्थिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देण्याचे आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्वीकृत होऊन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर तक्रारीत दाखल केले. अर्जदारांनी मौजा चांदा रैयतवारी येथील भुमापन क्रमांक 228/1 मिळकत मधील परावर्तित प्लॉट कमांक 72 चे एकूण 4800 चौरस फूट जागेपैकी 1207.80 चौरस मीटर जागा विकत घेण्यासाठी सुरुवातीला डीएचएफएल बँक इथे लॅंड लोन करता आवेदन केले. त्याप्रमाणे सदर बॅंकेने याला प्लॉट विकत घेण्यासाठी रक्कम रु. 9,21,161/- लॅन्ड लोन मंजुर केले. परंतु सदर प्लॉटवर घर बांधण्याकरीता पैसे नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पुन्हा नविन कर्ज मिळेल का म्हणून विचारणा केली. गैरअर्जदार क्रमांक 1 होम फायनान्स कंपनीने अर्जदारास संयुक्त भूखंडावर घरबांधणी कर्ज देता येत नाही. त्या करिता अर्जदाराच्या मालकीचा भूखंड वेगळा करावा लागेल याची सूचना दिली, अर्जदार यांनी राजस्व अधिकाऱ्याकडून भूखंडाचा भाग वेगळा करुन देतो तो पर्यंत आमचे कर्ज परतफेड करण्याचे पत्रक तात्काळ मंजूर करा व सातबारा वेगळा झाल्यानंतर घरबांधणी कर्जाची उचल करु द्यावी अशी विनंती केली. अर्जदाराच्या विनंतीचा विचार करून गैरअर्जदार क्र. १ कंपनीने अर्जदारास कर्ज देण्याची तयारी दर्शवली व तसे पत्र दिनांक 07.07.2015 रोजी अर्जदाराला दिले. त्यानुसार पत्राचे अट क्रमांक 6 ची पूर्तता अर्जदाराला करावयाची होती. त्यानुसार अर्जदारांनी डीएचएफएल कडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरीता 9,21,161/- रुपयांची उचल केली व त्यासंदर्भात अर्जदाराने आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या लाभात करारनामा करून दिलेला आहे. या कर्जाची उचल केल्यानंतर आज पर्यंत अर्जदाराने त्यांची प्रफुल्ल पुरुषोत्तम पोटदुखे, सिंधुताई पुरुषोत्तम पोटदुखे यांचे नावे सयुक्त असलेली मालमत्ता वेगळी करून न दिल्यामुळे तसेच चंद्रपुर महानगरपालिका, चंद्रपूरचे बांधकामाचे प्रमाणपत्र फक्त अर्जदार याच्या नांवे न करून दिल्यामुळे घर बांधणी कर्ज रुपये 10,00,000/- ची उचल आज पर्यंत गैरअर्जदाराकडून देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत कागदपत्राची पुर्तता अर्जदाराने केली नसल्यामुळे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीने अर्जदाराला मंजूर कर्जाची उचल दिलेली नाही. आजही आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी जर अर्जदार त्याची मालकी हक्काचे कागदपत्रे स्वतःचे नावे वेगळी आणल्यास व चंद्रपुर शहर महानगरपालिकेकडून फक्त त्यांच्या नावे घर बनण्याची परवानगी व नकाशा दाखल केल्यास आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी अर्जदारास मंजूर झालेल्या कर्जाची उचल देण्यास तयार आहे. गैरअर्जदाराने पुढे नमूद केले की नियमानुसार व कराराच्या अटी नुसार त्यांची अडचण आल्यास हा करार रद्द करण्याचे अधिकार आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीला आहेत. सबब तक्रार खर्चासह अमान्य करावी, अशी विनती गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी केली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
1. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास गृह कर्ज कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही
2. गैरअर्जदार तक्रारदारास नुकसानभरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? नाही
3. आदेश? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :-
5. अर्जदाराने व गैरअर्जदारने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे कि, अर्जदाराच्या विनंतीचा विचार करून गैरअर्जदार क्र. १ कंपनीने अर्जदारास कर्ज देण्याची तयारी दर्शवली व तसे पत्र दिनांक 07.07.2015 रोजी अर्जदाराला दिले. त्यानुसार पत्राचे अट क्रमांक 6 ची पूर्तता अर्जदाराला करावयाची होती. त्यानुसार अर्जदारांनी डीएचएफएल कडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरीता 9,21,161/- रुपयांची उचल केली व त्यासंदर्भात अर्जदाराने आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या लाभात करारनामा करून दिलेला आहे. परंतु या कर्जाची उचल केल्यानंतर आज पर्यंत अर्जदार व त्यांची पत्नी व प्रफुल्ल पुरुषोत्तम पोटदुखे, सिंधुताई पुरुषोत्तम पोटदुखे यांचे नावे संयुक्त असलेली मालमत्ता वेगळी करून दिली नाही तसेच चंद्रपुर महानगरपालिका, चंद्रपूरचे बांधकामाचे प्रमाणपत्र फक्त अर्जदार याच्या नांवे न करून दिल्यामुळे घर बांधणी कर्ज रुपये 10,00,000/- ची उचल आज पर्यंत गैरअर्जदाराकडून देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत कागदपत्राची पुर्तता अर्जदाराने केली नसल्यामुळे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीने अर्जदाराला मंजूर कर्जाची उचल दिलेली नाही. तक्रारीत गैरअर्जदारने त्यांचे उत्तरात नमुद केले आहे कि, आजही आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी जर अर्जदार यांनी मालकी हक्काचे कागदपत्रे स्वतःचे नावे वेगळी आणल्यास व चंद्रपुर शहर महानगरपालिकेकडून फक्त त्यांच्या नावे घर बनण्याची परवानगी व नकाशा दाखल केल्यास आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी अर्जदारास मंजूर झालेल्या कर्जाची उचल देण्यास तयार आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे कर्जाची रक्कम मंजूर केलेली असली तरी ती अटी व शर्तीनुसार अर्जदाराला मिळणार होती. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या कर्ज अटी व शर्ती मध्ये अट क्रमांक 6 मध्ये असे स्पष्ट नमूद आहे की subject to positive legal and Technical clearance of proposed loan property याचा अर्थ असा की सदर लोन मंजुर झाले असले तरी अटी व शर्ती चे नियमानुसारच गैरअर्जदार दस्ताऐवज दिल्यानंतरच कर्जाची रक्कम अर्जदाराला देईल. सदर तक्रारीत दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता कर्ज मंजुरी करतांना अर्जदाराच्या नांवे वेगळी करुन न दिल्यामुळे गैरअर्जदारनी अर्जदारास मंजुर केलेले कर्ज उचल करण्याची परवानगी दिली नाही. सदर गैरअर्जदाराची कृती ही नियमानुसार असल्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदाराप्रती सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही असे मंचाचे मत आहे. मा. राष्ट्रीय आयोगाचा II ( 2012 ) CPJ 128 ( NC ) या संदर्भित मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयाचा आधार घेवुन सदर अर्जदार यांनी आवश्यक दस्ताऐवजाची पुर्तता न केल्यामुळे गैरअर्जदार यांनी कर्जाची उचल अर्जदाराला न करुन देवुन सेवेत कोणतीही त्रृटी केलेली नाही. सबब मंद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत :-
6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रार क्र. 219/2015 अमान्य करण्यात येते.
(2) खर्चाबाबत आदेश नाही.
(3) आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे (कुटे) किर्ती गाडगिळ (वैदय) श्री. उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा.अध्यक्ष