(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची हकिकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने त्याचे वाहन ट्रक नोंदणी क्र.एम.एच.20-एटी-7372 चा गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय. जनरल लोम्बार्ड इन्शुरन्स (2) त.क्र.583/10 या विमा कंपनीकडे दि.05.11.2008 ते 04.11.2009 या कालावधीसाठी विमा उतरविला होता. विमा कालावधीमध्येच दि.10.09.2009 रोजी त्याच्या वाहनाचा बीड-औरंगाबाद रोडवर वडीगोद्रीजवळ एस.टी.महामंडळाच्या बसशी धडक होऊन अपघात झाला. अपघातामधे पाच लोकांचे निधन झाले. अपघाताबाबत पोलीस स्टेशन गोंदी, ता.अंबड जि.जालना येथे दि.10.09.2009 रोजी फिर्याद दिली. त्यावरुन पोलीसांनी चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. अपघातामधे वाहनाचे नुकसान झाल्यामुळे त्याने त्वरीत गैरअर्जदार विमा कंपनीला माहिती दिली. त्यावरुन विमा कंपनीने सर्वेअर मार्फत पाहणी केली. त्यानंतर विमा कंपनीने तक्रारदारास वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन दुरुस्तीच्या खर्चाची बिले दाखल करावयास सांगितली. त्यानुसार त्याने आवश्यक कागदपत्रांसह नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनीने त्यास विमा रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदाराने वाहनाची किंमत रु.8,46,184/-, विमा हप्त्याची रक्कम रु.19,426/-, आर.टी.ओ. कार्यालयाचा खर्च रु.15,500/-, वाहनाचे देखभालीचा खर्च 9,000/-, वाहन पोलीस स्टेशनमधून सोडविण्यासाठी वकिलाची फीस व कोर्टाचा खर्च रु.10,000/- क्रेनने वाहन औरंगाबादला आणण्याचा खर्च 7,000/-, पोलीस स्टेशनचा स्टेशनरी खर्च रु.2,000/- आणि मानसिक त्रास व इतर संपूर्ण खर्च रु.2,00,000/- असे एकूण रु.11,09,110/- गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन हे मान्य केले आहे की, तक्रारदाराचे वाहनाचा त्यांच्याकडे विमा उतरविलेला होता. त्याने वाहनाच्या नुकसानीबददल भरपाई मिळावी म्हणून विमा दावा सादर केला होता. परंतू त्याने आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाही म्हणून त्यास दि.12.10.2009 आणि दि.25.01.2010 रोजी पत्र पाठवून विमा दावा सेटल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. परंतू तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर कागदपत्रे दाखल केली. कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने कागदपत्रांची पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, तक्रारदाराचे वाहन अपघाताच्या वेळी जो चालक चालवित होता, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तक्रारदाराचे वाहन ट्रक हे मध्यम मालवाहू वाहन या प्रकारात मोडते आणि अपघाताचे वेळी वाहन चालकाकडे सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, त्याच्याकडे हलक मालवाहू वाहन (LMV) चालविण्याचा परवाना होता. वाहन चालविण्याचा वैध परवाना नसलेल्या वाहन चालकाने वाहन चालविल्यामुळे तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात झाला व चालकाचे विरुध्द कलम 304 अ, 279, 337, 338, 427 इंडियन पीनल कोड नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. (3) त.क्र.583/10 अशा प्रकारे तक्रारदाराने पॉलीसीतील अटीचे उल्लंघन केले आणि म्हणून तक्रारदाराचा विमा दावा दि.10.01.2011 रोजी फेटाळण्यात आला. विमा दावा फेटाळण्यासाठी दिलेले कारण योग्य असून तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षातर्फे दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराने स्वतः युक्तिवाद केला. गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.भास्कर यांनी बाजू मांडली. तक्रारदाराचे वाहन क्र.एम.एच.20-एटी-7372 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा उतरविला होता या विषयी वाद नाही. तक्रारदाराच्या वाहनाचा दि.10.09.2009 रोजी अपघात झाला. अपघातामधे त्याच्या वाहनाचे नुकसान झाले म्हणून त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला होता, परंतू तक्रारदाराचे वाहन अपघाताच्या वेळी वाहन चालविण्याचा वैध परवाना नसलेली व्यक्ती चालवित होती या कारणावरुन विमा कंपनीने त्याचा विमा दावा फेटाळला. तक्रारदाराचे वाहन मालवाहू प्रकारातील मध्यम मालवाहू वाहन या प्रकारात मोडत असल्याचे वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरुन दिसून येते. त्याच्या वाहनाचा अपघात दि.10.09.2009 रोजी झाला त्यावेळी त्याचे वाहन शेख फैजोद्यीन पिता शेख अलाउद्यीन हा चालवित होता. सदर शेख फैजोद्यीन यांच्याकडे “हलके मालवाहू वाहन” (LMV) चालविण्याचा परवाना होता ही बाब गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या शेख फैजोद्यीन याचे वाहन चालविण्याच्या परवान्यावरुन दिसून येते. तक्रारदाराचे वाहन मालवाहू प्रकारातील मध्यम मालवाहू वाहन म्हणजे एम.जी.व्ही. या प्रकारातील आहे. अशा प्रकारचे मध्यम मालवाहू वाहन माल वाहण्यासाठी वापरले जात असेल तर ते वाहन चालविण्यासाठी वेगळया परवान्याची आवश्यकता असते. प्रस्तुत प्रकरणात वाहन चालकाकडे हलके मालवाहू वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असल्यामुळे त्यास फक्त हलके मालवाहू वाहन चालविता येते. आणि त्याला जर मध्यम मालवाहू वाहन चालवायचे असेल तर त्याला वेगळा परवाना घेण्याची आवश्यकता आहे असे आमचे मत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या मा.सर्वोच्च न्यायालय आणि मा.राष्ट्रीय आयोगाच्या निवाडयांचा त्याला प्रस्तुत प्रकरणात फायदा मिळू शकत नाही असे आम्हास वाटते. तक्रारदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेला विमा दावा विमा कंपनीने अपघाताचे वेळेस वाहन चालक शेख फैजोद्यीन यांचेकडे हलके मालवाहू वाहन चालविण्याचा परवाना असून त्याला मध्यम मालवाहू वाहन चालविण्याचा वैध (4) त.क्र.583/10 परवाना नव्हता आणि अशा प्रकारे तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटीचे उल्लंघन केले, या कारणावरुन फेटाळून कोणतीही चुक केलेली नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळला असून गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जामधे वाहनाची किंमत, विमा हप्त्याची रक्कम, आर.टी.ओ.कार्यालयाचा खर्च, वाहन पोलीस स्टेशनमधून सोडविण्यासाठी वकिलाची फीस व कोर्टाचा खर्च, क्रेनने वाहन औरंगाबादला आणण्याचा खर्च, पोलीस स्टेशनचा स्टेशनरी खर्च आणि मानसिक त्रास व इतर खर्च असे एकूण रु.11,09,110/- गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे हप्त्याची भरलेली विमा रक्कम सोडली तर इतर कोणत्याही खर्चाबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही. आमच्या मतानुसार तक्रारदाराने मागणी केलेली सदर रक्कम त्याला गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळू शकत नाही. कारण तक्रारदाराने फक्त त्याच्या वाहनाचाच विमा उतरविलेला आहे आणि वाहन चालकाकडे अपघाताचे वेळेस मध्यम मालवाहू वाहन चालविण्याचा वैध परवाना असता तर तक्रारदार फक्त वाहनाची विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरला असता, परंतू तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीने योग्य कारणावरुन फेटाळल्यामुळे तक्रारदारास त्याने मागणी केलेली रक्कम देण्यास गैरअर्जदार विमा कंपनी जबाबदार ठरत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |