(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :16/04/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.18.02.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने आपली टोयाटा क्वालीस एम.एच.31/एजी-1315 चा विमा गैरअर्जदार कंपनीकडे दि.26.06.2010 ते 25.06.2011 या कालावधीकरीता काढलेला होता. श्री. उमेश बायटोले गाडी चालक होता, तक्रारकत्याचे परिचीत श्री. उमेश सिंग यांच्या मुलाचे लग्नाकरीता त्यांनी वाहन चालविण्याकरीता दिले असता वाहनाचा नागपूर ते अंबिकापूर जाते वेळी भाटीया पेट्रोल पंप, इसगडा, दुर्ग (छत्तीसगड) येथे अपघात झाला, त्यामधे 2 व्यक्ति मरण पावले व गाडीचे नुकसान झाले. याबाबतचे अपघाताची तक्रार पुलगाव, जिल्हा-दूर्ग पोलिस स्टेशनला नोंदविण्यांत आली व नुकसान भरपाईकरीता कंपनीकडे तक्रारकर्त्याने दावा नोंदविला व गैरअर्जदारांनी दि.14.12.2010 रोजी तक्रारकर्त्याला कळविले की, त्याचे वाहन हे भाडयाने देण्यांत आले होते व वाहन खाजगी असतांना असे केल्यामुळे पॉलिसीच्या शर्तींचा भंग झालेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर करण्यांत आला. तक्रारकर्त्याने दि.20.12.2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस दिली व रु.3,00,000/- चा दावा मंजूर करावा अशी मागणी केली. गैरअर्जदारांनी दि.14.12.2010 चे पत्राप्रमाणे नावा नामंजूर केल्याचे कळविले. तक्रारकर्त्याचे निवेदन आहे की, श्री. उमेश सिंग हे त्यांचे जवळचे व्यक्ति होते व त्यांनी वाहन वापरण्याकरता दिले होते.
3. तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.3,00,000/- मिळावी, दोषपूर्ण सेवेकरता रु.20,000/-, शारीरिक- मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे सर्व विपरीत विधाने अमान्य केली व पॉलिसीची बाब मान्य करुन सदर वाहन हे व्यक्तिगत वापराकरीता असतांना ते भाडे तत्वावर दिले ही बाब त्यांचे इन्व्हेस्टीगेटरने केलेल्या तपासनीत सिध्द झालेली आहे. त्यामुळे पॉलिसींच्या शर्तींचा भंग केल्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा नाकारलेला आहे व तसे त्यास कळविण्यांत आले असुन यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारे त्रुटी ठेवलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची असल्यामुळे ती खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.17.03.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर, त्यांचा युक्तिवाद ऐकला, तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. सदर प्रकरणात अपघात व विमा पॉलिसी यासंबंधाने विवाद नाही, गैरअर्जदारांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याचे वाहन हे खाजगी असतांनाही ते भाडे तत्वावर वापरल्या गेले, त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला असुन तक्रारकर्ता विम्याची रक्कम मागण्यांस पात्र नाही. या उलट तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने सदर वाहन वापरण्याकरता दिले होते श्री. उमेश सिंग व तक्रारकर्त्याचे कौटूंबीक संबंध होते व त्यांना वाहन हे भाडयाने न देता आपसी प्रेमापोटी देण्यांत आले होते. गैरअर्जदारांनी योग्य चौकशी न करता चुकीचा निष्कर्ष काढला आणि निष्कारण विमा दावा नामंजूर केला.
8. गैरअर्जदारांनी सर्वे करणा-या व्यक्तिचा प्रतिज्ञा लेख दाखल केलेला आहे व त्याने चौकशी केल्याप्रमाणे दस्तावेज व अहवालाच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. याबाबत तक्रारकर्त्याने आपली भिस्त हरीयाणा राज्य ग्राहक आयोग यांनी दिलेला निकाल व 2010(1) सीपीआर-238, या ठिकाणी प्राकाशीत झालेल्या निकालपत्रावर ठेवलेली आहे. यामधे मा. राज्य आयोगाने विमा कंपनीने या प्रकरणात जो पुरावा दिला होता तो योग्य नसुन, विचारात घेण्याचे योग्यतेचा नाही असा निष्कर्ष काढलेला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, तपासनी करणा-याचा प्रतिज्ञालेख हा ऐकीव माहितीचे स्वरुपाचा आहे व तो पुरावा म्हणून ग्राह्य नाही. त्यामुळे शर्तींचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. गैरअर्जदारांनी तपासनीसाचा प्रतिज्ञालेख अनुषंगाने तज्ञलेख केवळ दाखल केलेला आहे त्यातील प्रथम माहीती असुच शकत नाही. दुसरे म्हणजे गैरअर्जदारांनी प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे तो सुध्दा त्यांचे दावा व्यवस्थापक, मुंबई यांचा आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी सदरचे वाहन अपघाताचे वेळी भाडे तत्वावर चालविण्यांत येत होते ही बाब सिध्द केलेली नाही.
9. सदर प्रकरणातील वस्तुस्थीतीस गृहीत धरले की सदरचे वाहन अपघाताचे वेळी भाडयाने दिले होते तरीही या संबंधाने मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, बी.व्ही. नागराजु –विरुध्द- ओरिएंटन एन्शोरन्स कंपनी लि.’, जो 1996 सीपीजे-28 या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. या निकालात मा. सर्वोच्च न्यायालयाने, जोपर्यंत असे सिध्द होत नाही की, वाहनात बसलेला व्यक्तिमुळे अपघात घडलेला आहे व तो अपघातास कारणीभुत आहे. तोपर्यंत अश्या स्वरुपाच्या प्रकरणात जरी, आंशिक दोष असेल तरी विम्याचा करार भंग व्हावा अशा स्वरुपाचा हा दोष ठरत नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे पॉलिसीचा मुळ हेतू आणि फंडामेंटल ब्रीच या तत्वाचा विचार केला असता मा. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या प्रकरणात शर्तींचा भंग होत नाही हे स्पष्ट केलेले आहे. म्हणून गैरअर्जदारांचा बचाव चुकीचा असुन गैरकायदेशिर आहे.
10. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसच्या दाव्यापोटी रु.3,00,000/- एवढया रकमेच्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे, ती उघडपणे चुकीची आहे कारण तक्रारकर्त्याचे असे म्हणणे नाही की, सदर वाहन एवढे क्षतिग्रस्त झाले आहे की ते टोटल लॉसच्या संज्ञेस पात्र होते. विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर पॉलिसी ही केवळ रु.3,00,000/- एवढया किमतीची आहे आणि तक्रारकर्त्याने आपले वाहनाचे क्षतिबद्दल रु.3,00,000/- ची मागणी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तक्रारकर्त्याने एकही दस्तावेज दाखल केला नाही की, ज्याव्दारे वाहनाचे दुरुस्तीकरीता किती खर्च आला हे सिध्द होईल.
11. प्रस्तुत प्रकरणात दाखल असलेला प्रथम सुचना रिपोर्टवरुन सदर वाहनाचा चालक व इतर दोन प्रवासी जागीच ठार झाले व इतर प्रवासी जखमी झाल्याचे दिसते. याचाच अर्थ वाहनास गंभीर स्वरुपाची ठोस लागली असुन वाहनाचे नुकसान झाल्याचे व गंभीर स्वरुपाचा अपघात झाल्याचे स्पष्टपणे दिसुन येते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मागणीच्या निम्मी मागणी म्हणजेच रु.1,50,000/- एवढी नुकसानीची मागणी विचारात घेण्याजोगी आहे, असे आम्हास वाटते. त्यामुळे घसारा आणि भंगारा पोटी 15% एवढी रक्कम कपात करणे योग्य होईल असे आमचे मत आहे. यासाठी तक्रारकर्त्यास गैरअर्जदारांनी विमा दाव्याचे रु.1,27,500/- एवढी नुकसान भरपाई म्हणून व शारीरिक, मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच पोहचले. सबब खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास वाहनाचे विमा दाव्यापोटी रु.1,27,500/- दि.14.12.2010 रोजीपासुन रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह अदा करावी.
3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.9% ऐवजी द.सा.द.शे.12% व्याज देय राहील.