( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक :30 मार्च, 2012 )
यातील तक्रारकदार भुषण दिगंबर पुरी यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदाराचे वडील अतिशय आजारी असल्यामुळे मित्रांकडुन व नातेवाईकांकडुन तसेच दानकर्त्याकडुन व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडुन आथिंक मदत मिळावी म्हणुन गैरअर्जदार बँकेच्या शाखेत बचत खाते उघडले होते त्याचा खाते क्रमांक क्रं.01021930006666 असा आहे. या बचत खात्यात तक्रारदार त्यांचे वडींलाच्या आजारपणात औषधोपचार तसेच डाक्टरांची फि, औषधाचा खर्च भागावा म्हणुन तक्रारकर्त्याने आपल्या मित्रमंडळीकडुन रुपये 3,00,000/- आर्थिक मदत घेतली होती व ते पैसे गैरअर्जदाराच्या बँकेतील सदर बचत खात्यात जमा केले होते. कालांतराने तक्रारदारास पैशाची गरज पडती असता तक्रारदार पैसे काढण्याकरिता गैरअर्जदाराच्या बँकेत गेला असता, बँकेने तक्रारदाराचे बचत खाते गोठविले आहे असे कळले व त्यांचे खात्यातील रुपये 3,00,000/- अधिग्रहित करुन रोखुन ठेवल्याचे कळले व सदर खात्यातील सर्व व्यवहार बंद केले त्यामुळे तक्रारदार आपल्या वडीलांचा यथायोग्य उपचार करु शकला नाही. वेळेवर औषधी घेऊ शकला नाही व डॉक्टरांची फि देऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला.
गैरअर्जदाराने गोठवुन ठेवलेली रक्कम रुपये 3,00,000/- निर्गत करावी म्हणुन तक्रारदाराने गैरअर्जदारास वारंवार पत्रव्यवहार तसेच तक्रारी व निवेदने दिले परंतु गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या पत्रांची उत्तरे दिली नाही व त्या पत्रांवर दखल घेऊन त्यानुसार कोणतीही कारवाई सूध्दा गैरअर्जदाराने केली नाही. तसेच तक्रारदाराचे खात्यातील रोखुन ठेवलेली रक्कम आजपावेतो गैरअर्जदाराने निर्गत केली नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराचे तक्रारीची पोच तक्रारादारास दिली नाही तसेच रोखुन ठेवलेल्या रुपये 3,00,000/-बद्दल देखिल कोणतेही संतोषजनक उत्तर दिले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे कृत्य निश्चीतच सेवेतील कमतरता या सदरात मोडते म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदारास तक्रारदाराची रोखुन ठेवलेली रक्कम निर्गत करण्याचे आदेश द्यावे तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रुपये 1,00,000/- मिळावे व इतर खर्चाबदृल रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने तक्रारदाराने तक्रारीत केलेली बहुतांश विधाने माहिती अभावी नाकबुल केली. मात्र तक्रारदाराने वेळोवेळी रुपये 3,00,000/- ही रक्कम देण्याची विनंती केली ही गोष्ट मान्य आहे. तसेच बँकेने 01021930006666 मधील रुपये 3,00,000/- रोखुन ठेवली होती. ही बाब मान्य केली. गैरअर्जदाराने सर्व विवरण पत्रे तक्रारदारास पाठविली आहेत. गैरअर्जदाराच्या विशेष युक्तिवादात नमुद केले की कर्ज करार 13279952 दिनांक 2/6/2008 रोजी तक्रारदाराने रुपये 4,75,000/- चे कर्ज घेतलेले होती व त्यांची जुलै 2008 ते जुन 2011 पर्यत दर महिन्याच्या सहा तारखेला रुपये 16,937/- च्या 36 समान हप्त्यामध्ये परत करावयाची होती. पुढे तक्रारदाराने रुपये 3,00,000/- चा धनादेश जमा करुन दिनांक 20/2/2010 रोजी गैरअर्जदाराच्या बँकेत 01021930006666 बचत खाते उघडले. परंतु 7/9/2008 पासुन तक्रारदाराने एकही हप्ता भरलेला नाही. व 34 हप्ते भरलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराचा बचत खाते क्रं.0102193000666 हया त्याच्या खात्यात असणारी रक्कम कर्ज खाते क्रमांक 13279952 हया खात्यात समायोजीत केली आहे अद्यापही तक्रारदाराकडुन रुपये 4,03,720/- एवढी रक्कम वसुल करावयाची आहे. कर्जाची रक्कम परत करण्याची वस्तुस्थीती तक्रारदाराने उघड न केल्यामुळे तक्रारदाराचा हेतु लक्षात येतो म्हणुन तक्रार खर्चासह खारीज करावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 6 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला व दस्तऐवज दाखल केले.
#####- का र ण मि मां सा -#####
यातील गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराची विधाने स्पष्ट उत्तर देऊन नाकारलेली नाहीत. बहुतेक विधाने ही माहितीच्या अभावी नाकारलेली आहे. हयाचाच अर्थ ती मान्य केली असा होतो. त्यामुळे तक्रारदाराने विशिष्ट उद्देशाकरिता खाते उघडले होते ही बाब गैरअर्जदार बॅकेने स्पष्टपणे अमान्य केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे त्या विधानात तथ्य दिसुन येते.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे गैरअर्जदार बॅकेने कोड ऑफ बँक कमिटमेंट चा मजकुर परिच्छेद क्रं.2 मध्ये नमुद केला आहे त्यास कोणतेही उत्तर दिले नाही तो भाग नाकारला नाही. यासंबंधी त्यांचे विधान हे “ तथ्यहीन आहे व त्या विधानाशी संबंध नाही ” असे निरर्थक स्वरुपाचे आहे. तक्रारदाराने जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचा सुध्दा सरळ सरळ संबंधीत मजकूराशी संबंध आहे हे स्पष्ट आहे.
वरील वस्तुस्थितीचे संदर्भात, गैरअर्जदार बँकेने हे मान्य केले आहे की, तक्रारदाराचे खाते त्यांचेकडे 3 लाख एवढया रक्कमेचे होते व त्या खात्यातील रक्कम गैरअर्जदार बँकेनी वळविली ती रक्कम तक्रारदाराला दिली नाही. तक्रारदाराने अनेक वेळा मागणीपत्र पाठविले मात्र गैरअर्जदाराने त्याला प्रतिसाद दिला नाही. हे स्पष्ट आहे.
गैरअर्जदाराने असे मान्य केले आहे की, तक्रारदाराच्या तक्रारी त्यांना मिळाल्या, असेही दिसून येते की त्यांनी कोणतेही उत्तर त्यांना दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही. कोणतीही सूचना न देता त्यांच्या खात्यातील रक्कम वगळली आहे असेही दिसून येते. तक्रारदारास वा रक्कम वगळयापुर्वी तक्रारदारास दिलेल्या सुचनेबद्दल कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही ज्यावरुन सदर उत्तर तक्रारदाराला पाठविले होते असे दिसुन येईल. गैरअर्जदार बँकेने दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यासंबंधी त्यांची विधाने मान्य होण्याजोगी नाही. त्यातुन एक स्पष्ट निष्कर्ष निघतो की गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराची रक्कम एका खात्यातुन दुस-या खात्यात वळविली. तसेच कर्ज खात्यात ती रक्कम जमा करुन घेण्यापुर्वी तक्रारदारास कोणतीही सुचना दिली नाही. तसेच तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचे कोणतेही उत्तर दिले नाही.
गैरअर्जदार बँकेने असा उजर घेतला आहे की, त्यांना अशी सुचना न देता रक्कम वगळण्याचे अधिकार आहेत. यासंबंधी त्यांनी दस्तऐवज क्रमांक 1 हे 2 पानी दस्तऐवज अटी व शर्ती चे दाखल केलेले आहे. मात्र हे दस्तऐवज तक्रारदाराने सही केलेले दस्तऐवज नाहीत व त्यामुळे तक्रारदार व गैरअर्जदार यांचेमधील कराराचे स्वरुप या दस्तऐवजास प्राप्त होत नाही. त्यामुळे तो विचारात घेण्याजोगा नाही. गैरअर्जदार बॅकेने कर्ज खात्याचा करार या प्रकरणात दाखल केलेला आहे व त्यातील नोंद क्रमांक 11.6 वर त्यांनी आपली भिस्त ठेवलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये असे कुठेही नमुद नाही की, तक्रारदाराची रक्कम कोणतीही सुचना न देता अन्य खात्यात वळती करण्यात येईल. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदार यांनी आपले सेवेत कमतरता व त्रुटी ठेवली हे उघड आहे. अशा स्वरुपाच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी दिलेला निकाल II(2005) CPJ 246 या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. त्यांचे अवलोकन केले असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने जमा रक्कम कर्जाऊ रक्कमेत समायोजीत करुन घेता येते असे सांगीतले आहे. ही बाब लक्षात घेतली तरी तक्रारदाराला त्याची जमा रक्कम कर्ज खात्यात जमा करुन घेतलेली आहे ती परत देण्याबाबतची मागणी मंजूर करता येणार नाही. मात्र तक्रारदारास गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीपुर्ण सेवेसंबंधी नुकसानी देणे गरजेचे आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार बँकेने तक्रारदारास मानसिक, शारिरिक नुकसानी व गैरसोयी दाखल रुपये 10,000/- द्यावे.
3. गैरअर्जदाराने , तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.