ग्राहक तक्रार क्र. 249/2012
अर्ज दाखल तारीख : 05/01/2013
अर्ज निकाल तारीख: 28/11/2014
कालावधी: 01 वर्षे 10 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) रेवती भ्र. रविशंकर अवधुत,
वय- 24 वर्षे, धंदा- घरकाम,
रा.येडशी, ता.जि. उस्मानाबाद.
2) ज्ञानेश्वरी पि. रविशंकर अवधुत,
वय - 1 महिना धंदा - काहीनाही,
अ.पा.क. रेवती भ्र. रविशंकर अवधुत,
रा. येडशी, ता.जि. उस्मानाबाद.
3) बाबुराव पि. रामहरी अवधुत,
वय:- 67 वर्षे, धंदा- सायकल दुकान,
रा.येडशी, ता.जि.उस्मानाबाद.
4) निर्मला भ्र. बाबुराव अवधुत,
वय-57 वर्षे, धंदा- घरकाम,
रा. येडशी, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) ब्रँच मॅनेजर, श्री. सतिश दौलत अवचार,
एच डी.एफ.सी. इरगा जनरल इन्शुरंन्स कंपनी लि.
6 जी फ्लोअर लीला बीजनेस पार्क,
अंधेरी-कुरलारोड अंधेरी पुर्व, मुंबई -40059. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
२) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.एस.कुलकर्णी.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.पी.व्ही.सराफ.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार क्र.1 ही मयत रविशंकर बाबुराव अवधुत यांची पत्नी. अर्जदार क्र.2 मुलगी, अर्जदार क्र.3 मयताचे वडील असुन अर्जदार क्र.4 ही मयताची आई आहे व सर्व अर्जदार क्र.1 हे 4 हे येडशी ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. मयत रविशंकर बाबुराव अवधुत यांनी मोटारसायकल खेरेदी करणे कामी एच.डी.एफ.सी. बँक शाखा, सोलापुर यांचेकडून रु.30,500/- कर्ज घेतले होते. तसेच विप यांनी मयत रविशंकर अवधुत यांनी काढलेल्या “SARVA SURKSHA STAR” या विमा योजनेकरीता दि.17/01/2012 रोजी रक्कम रु.667/- भरुन घेतले व पॉलिसी क्र.2950200188864400000 दिली आहे. सदर पॉलीसीची मुदत दि.16/01/2012 ते 15/09/2013 अशी आहे. सदर 20 महीन्याच्या कालावधीमध्ये पॉलिसीकडून मिळणारे सर्व लाभ विप यांनी दिलेल्या सर्व सुरक्षा पॉलिसीवर देय आहेत. सदर पॉलीसी धारक दि.08/02/2012 रोजी पोलिस स्टेशन उस्मानाबाद ग्रामीण यांना मौजे. आळणी ता. जि. उस्मानाबाद शिवारात खुन झाल्या कारणाने मयत आढळून आला. सदर प्रकरणात उस्मानाबाद ग्रामीण पोलिस स्टेशन यांनी गुन्हा क्र.16/2012 नोंदविला आहे. अर्जदार क्र.1 ते 4 हे सदर पॉलिसीधारक रविशंकर बाबुराव अवधुत यांचे कायदेशीर वारस आहेत. म्हणून विप यांना सदरबाबत कळवले व विम्याची रक्कम रु.2,00,000/- देण्याची मागणी केली तसेच मोटार सायकल कर्जाबाबतही सुचना दिली परंतु विप यांनी हेतु:पुरस्कर विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. दि.06/03/2012 रोजी तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी त्यांच्या विधिज्ञा मार्फत विप यांना कायदेशीर नोटीस पाठवली परंतु नोटीस मिळूनही विप यांनी सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जासोबत विप यांनी पाठवलेल्या नोटीसची पावती व पोच पावती अर्जासोबत जोडलेली आहे. त्यानंतर दि.24/08/2012 रोजी अर्जदारांनी विप यांना विम्याच्या रक्कमेबाबत व कर्जाच्या रक्कमेबाबत विचारणा केली असता देण्यास नकार दिला म्हणून सदर अर्ज दाखल केला आहे. म्हणून विप यांनी तक्रारदार यांना विम्यापोटी रु.2,00,000/-, कर्ज रु.30,500/- सहव्याज संबंधीत बँकेत देण्याचा हुकुम व्हावा तसेच अर्जाच्या खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याज घटना घडलेल्या तारखेपासून देण्याचा तक्रारदारास देण्याचा हुकुम व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत पॉलिसी शेडयूल नोट, F.I.R.ची प्रत, वारस प्रमाणपत्र, H.D.F.C. Bank ची repayment Schedule, विप क्र.1 यांना पाठवलेल्या नोटीसची पावती, विप यांना मिळालेल्या दि.28/07/2012 नोटीसची पाहोच, नोटिसची ऑफिस कॉपी इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केलेल्या आहेत.
2) सदर तक्रारीबाबत मंचाने विपस नोटीस काढली असता विपने आपले म्हणणे दि.05/08/2013 रोजी दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
सदर पॉलिसी अटी नियमाप्रमाणे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची कल्पना 14 दिवसांचे आत देणे बंधनकारक असतांना तक्रारदार यांनी याची कुठलीही माहीती कंपनीस कळविली नाही अथवा तक्रारदार यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यु संदर्भात अजतागायत कुठलीही माहीती अथवा कागदपत्रे कंपनीस सादर केली नाहीत. तसेच मृत्यु नंतर 28 दिवसांच्या आतमध्ये सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन तो क्लेम कंपनीकडे पाठविणे बंधनकारक असतांना देखील 28 दिवसांच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेम अर्जदाराने केलेला नाही. तक्रारदार क्र.1 च्या पतीचा मृत्यु हा घातपाताने झाला असल्याने व सदर घातपात हा क्रेडिट शिल्ड इन्शुरन्स या सदराखाली मोडत नसल्याकारणाने अर्जदाराने परिच्छेद क्र.6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विप क्र.1 हे तक्रारदार यांना कुठल्याही प्रकारची रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. तक्रारदार क्र.1 हिचे पतीने एच.डी.एफ.सी ई. आर.जी.ओ. जनरल इंन्शुरन्स कंपनीतर्फे पॉलीसी काढल्यामुळे तसेच विप क्र.1 व 2 यांचे कार्यालय मा.न्यायमंचाच्या स्थळसिमेत नसल्याकारणाने मा.न्यायालयास प्रस्तुतची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे देखील सदरील तक्रार खर्चासह खारीज होणे योग्य व न्याय आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी विप यांच्याविरुध्द विनाकारण तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारदार यांनी रु.10,000/- भरण्याचे आदेश व्हावे असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील प्राथमीक मुददे उपस्थित करीत आहोत. त्यांचा निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) ही तक्रार या मंचात चालविण्यास पात्र आहे काय ? नाही.
2) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
4) मुददा क्र.1 चे उत्तर:
विपने आपल्या सेमध्ये म्हंटलेले आहे की विपचे कार्यालय या मंचाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे ही तक्रार या मंचात चालणार नाही. तक्रारीमध्ये विपचा पत्ता अंधेरी-कुरला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई., असा दिलेला आहे. हे खरे आहे की मयत रविशंकर रा.येडशी, ता.जि. उस्मानाबादचा रहीवाशी होता. त्याने रोख रु.667/- देवून विपची सर्व सुरक्षा स्टार पॉलिसी घेतली. परंतु ही पॉलिसी उस्मानाबाद जिल्हयातील विपच्या एजंट मार्फत घेतली असा एकही शब्द तक्रारीत नमूद नाही. उलट पॉलीसी विपकडून घेतली असे तक्रारीमध्ये नमूद आहे. विप या मंचाच्या कार्यक्षेत्रात राहत नसल्यामुळे ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार येत नाही. त्यामुळे मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) ही तक्रार चलविण्याचा अधिकार या मंचास येत नाही.
2) तक्रारदारास सदरची तक्रार योग्य त्या मंचात दाखल करण्यास या तक्रारीची बाधा
येणार नाही.
3) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.