Maharashtra

Bhandara

CC/19/117

DR. NITIN DEVENDRA TURASKAR - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER HDFC BANK LTD. BHANDARA - Opp.Party(s)

MR. S.M.CHAWRE

19 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/117
( Date of Filing : 30 Nov 2019 )
 
1. DR. NITIN DEVENDRA TURASKAR
R/O TURASKAR NURSING HOME. RAJGOPALCHARI WARD BHANDARA. TAH.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER H.D.F.C BANK LTD. BHANDARA
NEAR MISKIN TAG. TAH. BHANDARA.
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Jul 2021
Final Order / Judgement

                                                                                  :: निकालपत्र ::

          (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                   (पारीत दिनांक– 19 जुलै, 2021)

   

01.  तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द त्‍यांना बॅंकेनी पुरविलेल्‍या क्रेडीट कार्ड वर न कळविता काही चार्जेस/शुल्‍क लावले आणि पुढे त्‍यांनी विरुध्‍दपक्ष बॅंकेचे क्रेडीट कार्ड बंद केले असताना देखील बॅंकेव्‍दारे वारंवार फोन करुन तसेच विरुध्‍दपक्ष बॅंकेचे कर्मचारी व्‍यक्‍तीशः त्‍यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये येऊन तेथे उपस्थित रुग्‍ण/नातेवाईक यांचे समोर क्रेडीट कार्ड बिल संबधात विचारणा करीत असल्‍यामुळे त्‍यांचे व्‍यवसायावर परिणाम झाला त्‍यामुळे त्‍यांचे झालेले व्‍यवसायिक नुकसान, झालेला शारिरीक व मानसिक त्रास, तक्रारीचा खर्च आणि सुधारीत प्रार्थने मध्‍ये विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍यांचे कडे दर्शविलेली खोटी थकबाकीची रक्‍कम रद्द करण्‍या बाबत विनंती केली असून ही तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर  दाखल केली. जिल्‍हा आयोगाचे कार्यालयीन आदेश दिनांक-15 जून, 2021 अनुसार दोन्‍ही मा.सदस्‍य भंडारा जिल्‍हा आयोगाचे कार्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित असून मा.अध्‍यक्ष यांना जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा येथील अतिरिक्‍त कार्यभार आणि गोंदीया जिल्‍हा आयोगाचा नियमित कार्यभार असल्‍याने त्‍यांनी गोंदीया आयोगातून व्‍हीडीओ कॉन्‍फरसिंगव्‍दारे दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच दोन्‍ही पक्षांना ऑडीओ आणि व्‍हीडीओ क्लियर आहे या बद्दल विचारणा केली असता त्‍यांनी आपली संमती नोंदविली.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

     तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी हे व्‍यवसायाने भंडारा जिल्‍हयातील नामांकित डॉक्‍टर असून  त्‍यांचे भंडारा येथे तुरसकर नर्सींग होम आहे. तर विरुध्‍दपक्ष एच.डी.एफ.सी.बॅंकेचे भंडारा येथील शाखा कार्यालय आहे. तक्रारकर्ता यांनी  सन-2012 मध्‍ये विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या भंडारा शाखे मध्‍ये खाते उघडले होते आणि त्‍यामुळे ते विरुध्‍दपक्ष बॅंकेचे ग्राहक आहेत.  विरुध्‍दपक्ष बॅंकेचे कर्मचारी श्री संदीप पैगवार यांनी क्रेडीट कॉर्ड घेण्‍या बाबत वारंवार आग्रह केल्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष बॅंकेचे क्रेडीट कार्ड सन-2016 मध्‍ये घेतले. सदर क्रेडीट कार्डचा नंबर-457262XXXXXX8403 असा असून त्‍याची लिमिट रुपये-26000/- पर्यंत होती.

   तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, ते  सन-2018 मध्‍ये दिल्‍ली येथे गेले असता त्‍यांचे फुलपॅन्‍ट मधील विरुध्‍दपक्ष बॅंकेचे क्रेडीट कार्ड असलेले पॉकीट चोरीस गेले, त्‍यांनी  सदर घटने बाबत विरुध्‍दपक्ष बॅंकेला दुरध्‍वनी वरुन सुचीत केल्‍या नंतर ते कार्ड ब्‍लॉक करण्‍यात आले होते, त्‍यानंतर दुसरा क्रेडीट कार्ड ऑटो जनरेट झाला परंतु विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍यांना त्‍या बाबत बरेच महिने  कळविले नसल्‍याने त्‍यांना बरेच महिने क्रेडीट कार्ड उपभोगा पासून वंचीत राहावे लागले परंतु क्रेडीट कार्डचे बिल जनरेट होणे सुरुच होते अशाप्रकारे त्‍यांना  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिली.

     त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष बॅंकेनी जानेवारी-2019 मध्‍ये नविन क्रेडीट कार्ड नं.-4572620401973503 पाठविला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दिनांक-02 मार्च 2019 रोजी रुपये-1007/- चे बिल पाठविले.  तक्रारकर्ता यांनी  रुपये-1007/- व रुपये-1007/- या प्रमाणे  एकूण रक्‍कम रुपये-2014/- नेट बॅंकींगव्‍दारे ट्रॉन्‍सफर केली. वारंवार होत असलेला मानसिक त्रास आणि जास्‍तीचे लावलेले शुल्‍क यामुळे त्‍यांनी सदरचे क्रेडीट कार्ड व सभासदत्‍व बंद करण्‍यासाठी क्रेडीट कार्ड मेंबरशिप क्‍लोजर फॉर्म दिनांक-07.05.2019 रोजी भरुन आणि क्रेडीट कार्ड नं.-4572620401973503  आडवा कापून  विरुध्‍दपक्ष बॅंकेचे चेन्‍नई येथे असलेल्‍या मुख्‍य कार्यालयास पोस्‍टाव्‍दारे पाठविला व त्‍या संबधात पोच प्राप्‍त केली. अशी स्थिती असताना व क्रेडीट कार्ड बंद करण्‍या बाबत विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या मुख्‍य कार्यालयास पोस्‍टाने सुचना केलेली असताना देखील त्‍यांना विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दुरध्‍वनी वरुन रक्‍कम भरण्‍यास कळविले त्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या भंडारा शाखे मध्‍ये दिनांक-31.07.2019 रोजी पत्र देऊन त्‍याव्‍दारे त्‍यांचे  क्रेडीट कार्ड व्‍यवहारा बाबतची माहिती दिली.  तक्रारकर्ता यांचे कडे  क्रेडीट कार्ड संबधात कोणतीही रक्‍कम प्रलंबित नसताना सुध्‍दा त्‍यांचे नर्सींग होम मध्‍ये उपस्थित असलेल्‍या रुग्‍णां समोर  व  नातेवाईकां समोर विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या कर्मचा-यां व्‍दारे वारंवार रकमेची मागणी करण्‍यात आली, त्‍यामुळे त्‍यांना शारिरीक व मानसिक त्रास होऊन त्‍याचा परिणाम व्‍यवसायावर झाला. तक्रारकर्ता हे Indian Medical Association भंडारा येथील अध्‍यक्ष असून वरील प्रकारामुळे त्‍यांची समाजा मध्‍ये बदनामी होऊन व्‍यवसायिक मित्रमंडळी मध्‍ये त्‍यांना अपमानीत व्‍हावे लागले.

    तक्रारकर्ता यांचे असे म्‍हणणे आहे की, वस्‍तुतः  त्‍यांना आणि विरुध्‍दपक्ष बॅंकेतील कर्मचारी श्री संदीप पैगवार यांना बॅंकींग युनिट सेंटरव्‍दारे माहे जून-2019 मध्‍ये तक्रारकर्ता यांचे सभासदत्‍व व क्रेडीट कार्ड बंद केल्‍याचे कळविण्‍यात आले होते परंतु क्रेडीट कार्ड बंद करुन सुध्‍दा विरुध्‍दपक्ष बॅंकेनी वकीलांचे मार्फतीने दिनांक-15.10.2019 रोजी बनावट व खोटी नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे  त्‍यांचे नावे Outstanding Amount Rs.-7101/- दर्शवून सदर रक्‍कम त्‍वरीत भरण्‍यास सुचीत केले. अशा प्रकारची खोटी व बनावट नोटीस पाठविण्‍याचा उद्देश्‍य हा त्‍यांचा अपमान व मानहानी करण्‍याचा होता. त्‍यानंतर  सुध्‍दा विरुध्‍दपक्ष बॅंकेनी  दिनांक-10.11.2019 रोजी वकीलांचे मार्फतीने नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे रुपये-8068.84 एवढया रकमेची मागणी केली,  सदर नोटीस पाहून त्‍यांना मानसिक व शारिरीक धक्‍का बसला आणि त्‍याचा  व्‍यवसायावर परिणाम झाल्‍याने त्‍यांचे व्‍यवसायाचे  सरासरी रुपये-5,00,000- रकमचे नुकसान झाले आणि त्‍यामुळे सदर नुकसान भरपाई विरुध्‍दपक्ष बॅंके कडून मिळण्‍यास ते पात्र आहेत.  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून त्‍यांना वारंवार फोन येत असलयाने  झालेल्‍या मानसिक व शारीरीक त्रासा बद्दल रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्ष बॅंके कडून मिळण्‍यास ते पात्र आहेत. या शिवाय विरुध्‍दपक्ष बॅंकेनी  क्रेडीट कार्ड बंद करुनही कोणतेही कारण नसताना दोन वेळा नोटीस पाठविल्‍यामुळे त्‍यांना सदर नोटीसचे उत्‍तर पाठवावे लागले आणि त्‍यासाठी त्‍यांना रुपये-10,000/- खर्च आला. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी  जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

 

  1.  विरुध्‍दपक्षाचे कृत्‍यामुळे तक्रारकर्ता यांना  झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. विरुध्‍दपक्षाच्‍या गैरकृत्‍यामुळे तक्रारकर्ता यांची त्‍यांचे नातेवाईकां मध्‍ये, रुग्‍णांमध्‍ये व समाजा मध्‍ये बदनामी झाल्‍यामुळे नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. तक्रारकर्ता यांना आलेला नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे. अशाप्रकारे एकूण रुपये-7,50,000/- नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. वरील प्रकरणा मुळे तक्रारकर्ता यांचा सीबिल खराब झाला असल्‍यास त्‍या संबधात क्रेडीट कार्डच्‍या नोंद त्‍यातून खारीज करण्‍यात याव्‍यात.
  1. विरुध्‍दपक्ष बॅंकेनी वकीलांचे मार्फतीने दिनांक-15.10.2019  आणि दिनांक-10.11.2019 रोजी पत्राव्‍दारे तक्रारकर्त्‍याचें  नावे  दाखविलेली क्रेडीट कार्डची खोटी थकबाकीची रक्‍कम अनुक्रमे रुपये-7101/- आणि रुपये-8068.85  रद्द करण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03    विरुध्‍दपक्ष बॅंकेला जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळाल्‍या नंतर त्‍यांनी  लेखी उत्‍तर आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी उत्‍तरा मध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता यांनी व्‍यवसायीक हानी संबधाने नुकसान भरपाईसाठी तक्रार दाखल केली असल्‍याने तक्रार ग्राहक आयोगा समक्ष चालू शकत नाही. संबधित ग्राहकास नैसर्गिक न्‍यायतत्‍वाचे आधारे त्‍वरीत न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जिल्‍हा आयोगाची स्‍थापना झालेली आहे. सदर प्रकरण निकाली काढण्‍यासाठी विस्‍तृत प्रमाणात साक्षी पुरावे आवश्‍यक असून जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मर्यादित अधिकार क्षेत्रात सदर तक्रार निकाली निघू शकत नाही, ती दिवाणी न्‍यायालयात चालविणे योग्‍य आहे. तक्रारकर्ता यांनी कोर्ट फी वाचविण्‍यासाठी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा आयोगा समोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी अंतर्गत चालू शकत नाही त्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी.

     पुढे विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्ता हे सन-2013 पासून विरुध्‍दपक्ष बॅंकेचे ग्राहक असल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्ता यांना विरुध्‍दपक्ष बॅंकेचे कर्मचारी श्री संदीप पैगवार यांनी कधीही क्रेडीट कार्ड घेण्‍यास आग्रह केला नाही. तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्ड मिळण्‍यासाठी दिनांक-21.05.2014 रोजी अर्ज केला होता, तक्रारी मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे क्रेडीट कार्ड सन 2016 मध्‍ये दिले ते खोटे आहे.  तक्रारकर्ता यांचे क्रेडीट कार्ड दिल्‍ली येथे चोरीस गेले होते या बद्दल वि.प.बॅंकेस माहिती नाही. तक्रारकर्ता यांना क्रेडीट कार्ड क्रेडीट बॅंकेचे चेन्‍नई येथील डिव्‍हीजन मधून पोस्‍टाव्‍दारे पाठविण्‍यात आले होते त्‍यामुळे तक्रारकर्ता यांना नविन क्रेडीट कार्ड बद्दल कळविण्‍यात आले नव्‍हते हे विधान नामंजूर करण्‍यात येते. क्रेडीट कार्ड हरविल्‍यास नविन क्रेडीट कार्ड हे ग्राहकाने विनंती केल्‍या नंतरच देण्‍यात येते आणि संबधित ग्राहकास नविन क्रेडीट कार्ड पोस्‍टाव्‍दारे पुरविल्‍या बाबत एस.एम.एस.व्‍दारे तसेच दुरध्‍वनीव्‍दारे सुचित केल्‍या जाते. तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्डचा वापर न करता सुध्‍दा त्‍यांना बॅंकेव्‍दारे बिले पाठविण्‍यात आली ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता यांना नविन क्रेडीट कार्ड क्रं-4572620401973503 पुरविले होते. नविन क्रेडीट कार्ड पुरविल्‍या नंतर त्‍याचा वापर केल्‍या नंतर जे काही शुल्‍क तक्रारकर्ता यांनी भरले ते त्‍यांना मान्‍य आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष बॅंकेस दिनांक-31.07.2019 रोजी पत्र दिल्‍याची बाब मान्‍य करण्‍यात येते. तक्रारकर्ता आणि त्‍यांची पत्‍नी नामवंत डॉक्‍टर आहेत ही बाब मान्‍य आहे. तक्रारकर्ता यांचे कडे क्रेडीट कार्ड वर प्रलंबित रक्‍कम असल्‍याने त्‍याची मागणी विरुध्‍दपक्ष बॅंकेनी केली होती त्‍यामुळे कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्‍दपक्ष बॅंकेचे कर्मचारी यांनी तक्रारकर्ता हे नर्सींग होम मध्‍ये व्‍यस्‍त असताना त्‍यांचे रुग्‍ण आणि नातेवाईकां समोर बिलाची मागणी करीत असल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता यांनी बनावट कथा रचून सदर तक्रार दाखल केलेली आहे. थकीत क्रेडीट कार्ड बिलाची रक्‍कम मागितल्‍याने तक्रारकर्ता यांचे व्‍यवसायची, ख्‍यातीची हानी झाली ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता यांचेकडे वारंवार मागणी करुनही क्रेडीट कार्डची थकबाकी न भरल्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंकेस रुपये-7101/- ची डिमांड नोटीस पाठवावी लागली. विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या क्रेडीट कार्ड डिव्‍हीजनव्‍दारे दिनांक-10.11.2019 रोजीची नोटीस तक्रारकर्ता यांना पाठवून त्‍याव्‍दारे थकीत रक्‍कम रुपये-8068.84 ची मागणी करण्‍यात आली. सदर नोटीस पाठविल्‍यामुळे तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रास होऊन त्‍यांचे व्‍यवसायाची हानी झाली आणि त्‍यामुळे ते विरुध्‍दपक्ष बॅंके कडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत या बाबी नामंजूर केल्‍यात. विरुध्‍दपक्ष बॅंकेनी खोटी व बनावट नोटीस पाठविल्‍याची बाब अमान्‍य केली. विरुध्‍दपक्ष बॅंके व्‍दारे तक्रारकर्त्‍यां कडे थकीत असलेली कायदेशीर वैध रकमेची मागणी करणारी नोटीस पाठविल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यासाठी कारण घडले असे होत नाही. तक्रारकर्ता यांची संपूर्ण तक्रार खोटी व बनावट असलयाने  रुपये-25000/- खर्च तक्रारकर्ता यांचेवर लावून तक्रार खारीज करण्‍यात यावी.

   आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष बॅंक असून बॅंकींग व्‍यवसाय करते. तक्रारकर्ता यांना सन-2016 मध्‍ये क्रेडीट कार्ड देण्‍यात आले होते. तक्रारकर्ता यांनी HDFC ERGO विमा पॉलिसी काढली होती आणि त्‍याचे मासिक हप्‍ते क्रेडीट कार्ड व्‍दारे भरण्‍यास तक्रारकर्ता यांनी सहमती दिल्‍याने तक्रारकर्ता यांचे क्रेडीट कार्ड मधून विम्‍याचे हप्‍ते भरण्‍यात येत होते. जून-2019 मध्‍ये तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्ड बंद करण्‍याचे ठरविले होते, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी (क्रेडीट कार्ड डिव्‍हीजन) विमा पॉलिसीची प्रलंबित रक्‍कम आणि चालू महिन्‍याचे व्‍याज त्‍याच बरोबर फोरक्‍लोजर चॉर्जेस रुपये-110/- असे मिळून एकूण रुपये-3793/- चे जून-2019 मध्‍ये क्रेडीट कार्डचे बिल आकारले. परंतु तक्रारकर्ता यांनी सदर प्रलंबित रक्‍कम भरली नाही आणि त्‍यामुळे उशिरा भरल्‍या बद्दलचा दंड, जी.एस.टी. इत्‍यादीची रक्‍कम बिलामध्‍ये वाढत गेली. तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्डची थकीत रक्‍कम भरण्‍या कडे र्दुलक्ष्‍य केले त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेचे शाखा व्‍यवस्‍थापक यांनी स्‍वतः तक्रारकर्ता यांची भेट घेऊन क्रेडीट कार्डची थकीत रक्‍कम भरण्‍याची विनंती केली परंतु तक्रारकर्ता यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्‍यामुळे रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या मार्गदर्शक तत्‍वा नुसार  तक्रारकर्ता यांना थकीत रक्‍कम जमा करण्‍या बाबत नोटीस पाठविण्‍यात आली. तक्रारकर्ता हे दिनांक-22.11.2019 रोजी विरुध्‍दपक्षा कडे आलेत त्‍यावेळी विरुध्‍दपक्षा तर्फे One Time Settlement चा प्रस्‍ताव देण्‍यात आला होता. विरुध्‍दपक्ष बॅंक  One Time Settlement व्‍दारे तक्रारकर्ता यांनी अंतिम रुपये-4400/- नोव्‍हेंबर-2019 पर्यंत भरल्‍यास उर्वरित शिल्‍लक प्रलंबित रक्‍कम माफ करुन ना-देय-प्रमाणपत्र बॅंकेव्‍दारे देण्‍यात येणार होते, सदर प्रस्‍तावास तक्रारकर्ता यांनी मान्‍यता दिली होती परंतु समझोत्‍याची रक्‍कम न भरता तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार मा.जिल्‍हा आयोगा समोर दाखल केली. त्‍यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण न घडल्‍यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष बॅंके व्‍दारे करण्‍यात आली.

 

04. तक्रारकर्ता यांनी पुराव्‍याचे शपथपत्र पान क्रं 73 वर दाखल केले असून तक्रारी मध्‍ये नमुद केलेले सर्व कथन शपथपत्रावर नमुद केले परंतु सदर शपथपत्रामध्‍ये  पृष्‍ट क्रं-75 वरील परिच्‍छेद क्रं 6 मध्‍ये जे  काही नमुद केलेले आहे ते त्‍यांचे तक्रारी मध्‍ये नमुद केलेले नाही. परंतु विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांचे लेखी जबाबामध्‍ये  मुद्दा क्रं 13 चे उत्‍तरानुसार जे नमुद केलेले  आहे ते  त्‍यांनी मान्‍य केले आहे. तक्रारकर्ता यांनी हे कबुल केले की, त्‍यांनी  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून अॅक्‍सीडेंट प्‍लॅन वन विमा पॉलिसी क्रं-52185289/00001 काढली होती, सदर पॉलिसी effective date-30/10/2016 होती व expiry date-29/10/2018  होती.  दुसरी पॉलिसी  क्रं-2952201788047300000/1 हेल्‍थ सुरक्षा पॉलिसी  असून तिचा प्रिमियमरुपये-7781/-  होता आणि सदर Policy Inception Date-24/05/2017 & Policy Expire Date-23/05/2018 अशी होती. सदर दोन्‍ही नमुद पॉलिसी अनुक्रमे मे व  जून-2018 मध्‍ये Expire झाल्‍यात त्‍यामुळे सन  2019 मध्‍ये क्रेडीट कार्ड बंद केल्‍यावर पॉलिसीचे प्रिमियम मागणे हे ग्राहकाची दिशाभूल व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब समजावे, आपले कथनाचे पुष्‍टयर्थ पुरावा म्‍हणून पॉलिसीच्‍या झेरॉक्‍स प्रती पुराव्‍या सोबत तक्रारकर्ता यांनी दाखल केल्‍यात. पुढे तक्रारकर्ता यांनी आपले शपथपत्रातील परिच्‍छेद क्रं 7 मध्‍ये  असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने दिनांक-16.01.2020 रोजी आयोगा समोर दाखल केलेल्‍या उत्‍तरात परिच्‍छेद क्रं-15 चे उत्‍तरा नुसार तक्रारकर्ता वैतागून गेला होता, त्‍यांच्‍या बॅंकेच्‍या वारंवार येणा-या कॉलमुळे व स्‍थानीक प्रतिनिधी श्री राहूल तायडे यांच्‍या म्‍हणण्‍या नुसार रुपये-4400/- भरण्‍यास ते तयार पण झाले होते पण हे त्‍यांच्‍या दबाव नितीमुळे व वैतागल्‍यामुळे ते काही क्षणा करीता तयार झाले होते. पुढे शपथपत्रात नमुद केले की, विरुध्‍दपक्ष बॅंकींग युनिट सेंटर व्‍दारे माहे जून-2019 मध्‍ये तक्रारकर्ता यांचे क्रेडीट कार्ड सभासदत्‍व व क्रेडीट कार्ड बंद करुन संपुष्‍टात आल्‍या बाबत तोंडी व रजिस्‍टर पोस्‍टाने कळविण्‍यात आले होते, त्‍याची पोच पावती पण जोडलेली आहे तरी सुध्‍दा तक्रारकर्ता यांचेकडे विरुध्‍दपक्षाने वकीलांचे मार्फतीने दिनांक-15.10.2019 रोजी नोटीस पाठवून रुपये-7101/- ची मागणी करण्‍यात आली आणि त्‍यानंतर दिनांक-10.11.2019 रोजी नोटीस पाठवून पुन्‍हा रुपये-8068.84 ची मागणी करण्‍यात आली. वरील विरुध्‍दपक्षाच्‍या कृतीमुळे तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रास होऊन कर्तव्‍य बजावणे कठीण झाल्‍यामुळे व्‍यवसायाचे रुपये-5,00,000/- नुकसान झाले. सदर नुकसान विरुध्‍दपक्षाचे अनुचित व्‍यापारी पध्‍दतीच्‍या अवलंबामुळे झालेले असल्‍याने त्‍याची भरपाई विरुध्‍दपक्षा कडून मिळणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्षाचे कर्मचा-यांनी वारंवार फोन करुन मानसिक व शारिरीक त्रास दिल्‍यामुळे रुपये-2,00,000/- नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद केले.

05.   विरुध्‍दपक्ष यांनी देखील आपला शपथे वरील पुरावा पान क्रं 82 वर दाखल करुन त्‍या सोबत दिनांक-29 जून, 2020 तसेच दिनांक-23 मे 2019 पर्यंत विमा पॉलिसी अस्तित्‍वात असल्‍याचे पुरावे पृष्‍ट क्रं-87 वरील यादी प्रमाणे दाखल केलेले आहे. तसेच त्‍यांनी परत नमुद केले की, विरुध्‍दपक्ष बॅंक असून बॅंकींग व्‍यवसाय करीत असल्‍या कारणाने तक्रारकर्ता यांनी घेतलेल्‍या विमा पॉलिसीचे हप्‍त्‍याची रक्‍कम सदर क्रेडीट कार्डचा वापर करुन तक्रारकर्ता भरीत होते म्‍हणून ज्‍या दिवशी तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्ड बंद करण्‍याचा अर्ज दाखल केला तेंव्‍हा त्‍यांनी अगोदरचे विमा हप्‍ते जमा करणे बंधनकारक असून त्‍यांनी वेळोवेळी तक्रारकर्ता यांना विमा हप्‍त्‍याची रक्‍कम जमा करण्‍यास सांगितले आणि तो त्‍यांचा व्‍यवसाय असून तक्रारकर्ता यांना त्रास देण्‍याचे हेतूने कधीही नोटीस पाठविला नाही परंतु कायदेशीर रकमेची मागणी करणे हा मानसिक त्रास होऊ शकत नाही म्‍हणून त्‍यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार रद्द करुन त्‍यांचे विम्‍याचे हप्‍त्‍याची ररक्‍कम तक्रारकर्ता यांनी जर भरली असेल तर त्‍याचा पुरावा सादर करावा आणि शेवटी तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.

06. तक्रारकर्ता  यांनी पृष्‍ट क्रमांक-93 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला असून विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांचा लेखी युक्‍तीवाद पृष्‍ट क्रमांक-107 वर दाखल केलेला आहे.

07.    तक्रारदाराचे मौखीक युक्‍तीवादाचे वेळी त्‍यांनी तक्रारी मधील प्रार्थनेच्‍या मागणी मध्‍ये दुरुस्‍ती करावयाची असून त्‍या करीता दुरुस्‍ती परवानगी अर्ज दिनांक-16 मार्च, 2019 रोजी सादर केला असता आयोगाने सदरचा अर्ज मंजूर केला त्‍यानुसार तक्रारकर्ता यांनी तक्रारी मध्‍ये दुरुस्‍ती करुन सुधारीत तक्रार पान क्रं 117 वर दाखल केली.

08.  तक्रारकर्ता यांची तक्रार, तक्रारी सोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विरुध्‍दपक्ष यांचे लेखी उत्‍तर व दाखल दसतऐवज त्‍याच बरोबर उभय पक्षांचा शपथे वरील पुरावा व त्‍या सोबत जोडलेले दस्‍तऐवज ईत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले तसेच दोन्‍ही पक्षांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारकर्ता यांची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे का?

नाही

2

विरुध्‍दपक्षानी तक्रारकर्ता यांना सेवा देण्‍यात त्रृटी केली आहे का?

नाही

3

तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारण मिमांसे प्रमाणे

 

                                                                            ::कारणे व मिमांसा::

मुद्दा क्रं 1 ते क्रं-3 बाबत -

09   अभिलेखावरील दाखल दस्‍तऐवजा वरुन हे सिध्‍द होते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष यांचे कडून घेतलेल्‍या क्रेडीट कार्डचा वापर त्‍यांचे विम्‍याच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍या करीता केला होता तसेच तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे तक्रारी मध्‍ये विमा पॉलिसी संबधित बाबी लपविलेल्‍या असून  ज्‍या दिवशी विरुध्‍दपक्ष बॅंकेनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये विमा पॉलिसीचे हप्‍त्‍याचा मुद्दा उचलला तेंव्‍हा त्‍यांनी आपल्‍या शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये फक्‍त दोन वर्षाची विमा पॉलिसीची प्रत दाखल केली तसेच पान क्रं 18 वर दाखल केलेल्‍या स्‍टेटमेंटचा आधार घेऊन त्‍यांनी सदरची तक्रार दाखल केली परंतु पूर्वीचे स्‍टेटमेंट व नंतरचे स्‍टेटमेंट जाणूनबुजून दाखल न करुन त्‍यांनी आयोगाची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे असे दिसून येते. जर तक्रारकर्ता यांनी विमा पॉलिसी घेतलेली आहे तर त्‍यांना विम्‍याचे हप्‍त्‍याची रक्‍कम भरणे बंधनकारक आहे आणि जर त्‍यांना आपला क्रेडीट कार्ड बंद करावयाचा आहे तर त्‍यांनी उर्वरीत किंवा शिल्‍लक विमा हप्‍त्‍याची रक्‍कम जमा करणे कायदेशीर असून विरुध्‍दपक्ष बॅंकेनी
त्‍यांना पाठविलेली नोटीस ही सेवेमधील त्रृटी किंवा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्‍हणणे चुकीचे आहे . तक्रारकर्ता यांनी  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून जे क्रेडीट कार्ड घेतले होते, त्‍याव्‍दारे ते विम्‍याचे हप्‍ते भरीत होते आणि क्रेडीट कॉर्ड सुविधा बंद करते वेळी विम्‍याचे प्रलंबित हप्‍त्‍याची रक्‍कम त्‍यांनी  भरणे क्रमप्राप्‍त आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेने त्‍या प्रलंबित रकमेची मागणी त्‍यांचेकडे केली यामध्‍ये गैर काहीही नाही.  तक्रारकर्ता यांनी गैरसमजुती मधून सदरची तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेली आहे, त्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्‍यावरुन  मुद्दा क्रं 3 अनुसार आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये  खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                         ::  अंतिम आदेश    ::

 

  1.    तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज  करण्‍यात येते.

 

  1.   नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 मध्‍ये तरतुद नसल्‍या कारणाने  खर्चा बाबत काही आदेश नाही.

 

  1.  निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1.   तक्रारकर्ता व विरुध्‍दपक्ष यांचे तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांनी    जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.            

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.