द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 24 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांना SAP PP Module कोर्स करावयाचा असल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून सदरहू कोर्सची माहिती घेतली. जाबदेणार यांचे प्रतिनिधी कु. गझल यांनी रविवारी शिकवणीसाठी शिक्षकांची व्यवस्था करण्यात येईल व आधी कल्पना दिली तर इतरही दिवशी शिक्षक असतील असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी आय सी आय सी आय बँकेच्या क्रेडिट कार्ड अन्वये दिनांक 30/10/2009 मध्ये रुपये 22000/- जाबदेणारांकडे भरले. दिनांक 25/10/2009, 1/11/2009, 10/11/2009 व 25/11/2009 रोजी क्लास झाला. नंतर क्लास झाला नाही. शिक्षक श्री. मुकूंद सर अनुपस्थित असत. त्यानंतर मुकूंदसरांनी राजीनामा दिला. नंतर जाबदेणार यांनी कुठल्याच फॅकल्टीची नेमणूक केली नाही. तक्रारदारांना काही शिकवले गेले नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार संपर्क साधून क्लास संदर्भात चौकशी केली. परंतु शिक्षक नसल्यामुळे क्लास पूर्ण झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 23/3/2010 रोजी फी परत मिळण्यासाठी अर्ज केला. नंतर तक्रारदारांनी वारंवार दुरध्वनीवरुन संपर्क साधून, प्रत्यक्ष भेटून रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून भरलेली फी रुपये 22,000/- 18टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व कोर्ट खर्च, रिक्षा, झेरॉक्स इ. साठी रुपये 5000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या Roadmap for SAP R/3 – Production Planning ची मंचाने पाहणी केली असता सदरहू कोर्स 10 सेशन्सचा होता ही बाब स्पष्ट होते. त्यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे रुपये 22000/- आय सी आय सी आय क्रेडिट कार्डद्वारे भरल्याचे दाखल स्टेटमेंटवरुन दिसून येते. जाबदेणार यांनी कोर्सची संपुर्ण फी तक्रारदारांकडून स्विकारुनही कोर्स पूर्ण केला नाही, व्यवस्थित शिकवणी दिली नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मंच जाबदेणार यांना असा आदेश देतो की तक्रारदारांची फी ची रक्कम रुपये 22000/- दिनांक 30/10/2009 पासून 9 टक्के व्याजासह परत करावी. तसेच तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
तक्रारदारांना रक्कम रुपये 22000/- दिनांक 30/10/2009 पासून 9 टक्के व्याजासह आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.