आदेश निशाणी क्र.1 वर
(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 29 जुलै 2013)
सदर प्रकरणात या मंचास तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा आहे काय असा मुद्दा मंचासमोर उपस्थित झाल्याने यावर अर्जदाराचे वकीलांचा युक्तीवाद एैकून पुढील प्रमाणे मुद्दा निकाली काढण्यांत आला.
अर्जदाराचे वकील श्री तलमले यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांचे म्हणणे असे की, सदर तक्रारीतील अर्जदार हा देसाईगंज, जिल्हा - गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्यांनी गैरअर्जदार क्र.2 कडून हूंडाई कंपनीची कार नोदंणी क्र.एम.एच.33/ए-5252 खरेदी केली असून त्याचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून उतरविला आहे. सदर कारला वडसा ते लाखांदूर येथील रस्त्यावर दि.23.11.2012 रोजी अपघात झाला असून, सदर अपघातग्रस्त कार दुरुस्तीकरीता अर्जदाराने रुपये 2,84,222/- खर्च आला. सदर खर्चाची भरपाई गैरअर्जदार क्र.1 ने मागणी करुनही केली नाही, म्हणून विमा पॉलिसी अंतर्गत सदर नुकसानभरपाई मिळावी म्हणून यांनी मंचाकडे तक्रार अर्ज केला आहे.
त्याचे म्हणणे असे की, या प्रकरणातील गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे जरी नागपूर येथे राहत असले तरी अर्जदार हा वडसा, जिल्हा – गडचिरेाली येथे राहात असल्यामुळे सदर तक्रार अर्ज चालविण्याचा गडचिरोली जिल्हा तक्रार निवारण मंचास अधिकार आहे.
या ग्राहक तक्रार निवारण मंचाची कलम 11 चे तरतुदीनुसार ग्राहक मंचास तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा सांगितलेली आहे. त्याप्रमाणे, विरुध्द पक्ष ज्या ग्राहक मंचाच्या अधिकार कक्षेत राहतो किंवा अनेक विरुध्दपक्षांपैकी एक विरुध्दपक्ष ज्या ग्राहक मंचाचे अधिकार कक्षेत राहात असेल, त्या जिल्ह्राच्या ग्राहक मंचास तक्रार अर्ज चालविण्याची कार्यकक्षा आहे. तसेच, तक्रारीस कारण ज्या जिल्हा ग्राहक मंचाचे अधिकार कक्षेत घडले असेल अशाही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार आहे.
सदरचे प्रकरणातील गैरअर्जदार क्र.1 व 2 हे विरुध्दपक्ष नागपूर येथ राहात असून त्यांचेकडे नागपूर येथे अर्जदाराने विमा उतरविला आहे. म्हणून सदर तक्रार अर्ज चालविण्याची कार्यकक्षा नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार मंचास असून, ती गडचिरोली तक्रार निवारण मंचास नाही. कलम 11 च्या तरतुदी प्रमाणे या मंचास सदरची तक्रार दाखल करुन घेण्याचा व चालविण्याचा अधिकार नसल्याने सदरची तक्रार योग्य ठिकाणी दाखल करण्यासाठी अर्जदारास परत करणे आवश्यक आहे.
अंतिम आदेश
सदरची तक्रार योग्य ग्राहक तक्रार निवारण
मंचाकडे दाखल करण्यास अर्जदारास परत
करण्यात येते.
गडचिरोली.
दिनांक :- 29/7/2013