(घोषित दि. 16.10.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार या घनसावंगी जि.जालना येथील रहिवाशी आहेत. त्यांचे पती नामदेव थावरा राठोड यांचा मृत्यू दिनांक 03.08.2013 रोजी विहीरीतील पाण्यात पडून अपघाताने झाला. प्रस्तुत घटनेची माहिती घनसावंगी पोलीस स्टेशनला दिल्यामुळे फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 174 अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक 29/2013 नोंदविण्यात आली. मयतावर मरणोत्तर पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले.
तक्रारदारांचे पती नामदेव थावरा राठोड हे शेतकरी होते व त्यांचे नावे गट क्रमांक 615 तालुका घनसावंगी जि.जालना येथे शेत जमीन होती.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी राबविलेली आहे. या अंतर्गत सन 2012 – 2013 साठीचा महसूल गैरअर्जदार क्रमांक 1 फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी यांचेकडे जमा केलेला आहे. तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 08.10.2013 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे दाखल केला. असे असतांना देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवलेला आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गट क्रमांक 615 चा 7/12 चा उतारा, 8 अ चा उतारा, फेरफार नक्कल, मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 हे मंचा समोर हजर झाले. त्यांना वारंवार संधी देवूनही आपला लेखी जबाब दिला नाही. म्हणून मंचाने त्यांचे विरुध्द No Say आदेश पारीत केले. तो आदेश रद्द व्हावा म्हणून नि.15 वर गैरअर्जदारांनी अर्ज दाखल केला तो मंचाने नामंजूर केला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नि.7 वर त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार त्यांना दिनांक 08.10.2013 रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यावर तो विमा कंपनीकडे पाठविला. विमा कंपनीकडून त्यांना दिनांक 02.01.2014 रोजी पत्र प्राप्त झाले. त्यात कंपनीने गाव नमुना, 6 क च्या दाखल्याची मूळ प्रत मागविली होती. वरील त्रुटी बाबत त्यांना दिनांक 10.01.2014 रोजी तक्रारदारांनी कळविले आहे.
तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती नामदेव थावरा राठोड यांचे नावे कृष्ण नगर तालुका घनसावंगी जि.जालना येथे शेत जमीन होती. वरील जमीन त्यांची नावे 1995 पासून होती. ही गोष्ट तक्रारदारांनी दाखल केलेल्या गाव नमुना, 7/12 व 8 अ च्या उता-या वरुन तसेच फेरफार पत्रकावरुन स्पष्ट होते.
- तक्रारदारांनी अपघाता नंतर विहीत मुदतीत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता. ही गोष्ट देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबातून स्पष्ट होते.
- तक्रारदारांच्या पतीचा दिनांक 06.08.2013 रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही गोष्ट पंचनामा, गुन्हयाची प्रथम खबर, शवविच्छेदन अहवाल व आकस्मात मृत्यू क्रमांक 29/2013 मधील कागदपत्र या वरुन स्पष्ट होते.
- दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी यांनी दिनांक 02.01.2014 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून 6 क चा उतारा (ओरिजिनल) ची मागणी केलेली दिसते व तक्रारदारांनी त्यांची पूर्तता केलेली नाही. मंचा समोरील कागदपत्रात देखील 6 क चा उतारा अथवा तक्रारदार या मयत नामदेव राठोड यांच्या वारस असल्याबाबतची इतर कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
अशा परिस्थितीत तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या पत्रानुसार त्यांना 6 क चा उतारा पाठवावा व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 60 दिवसात प्रस्ताव निकाली करावा असा आदेश देणे न्याय्य ठरेल असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
- तक्रारदारांनी आदेश दिनांका पासून तीस दिवसांच्या आत 6 क चा उतारा (मूळ प्रत) गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवावा.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उतारा प्राप्त झाल्या पासून साठ दिवसांच्या आत विमा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करावा.
- खर्चा बाबत आदेश नाही.