- नि का ल प त्र -
(दि.03-07-2018)
द्वारा : मा. श्री. व्ही.ए. जाधव, अध्यक्ष.
1) तक्रारदार यांचे सामनेवाला यांच्या बॅंकेत असलेल्या खात्यातून सामनेवाला यांनी रक्कम रु. 52,762.50 बेकायदेशीरपणे जनरल चार्जेस रिकव्हरी या कारणापोटी दि.31-03-2016 रोजी खर्ची टाकून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी दिलेली असून सदर रक्कम रु. 52,762.50 ही दि. 31-03-2016 रोजी पासून द.सा.द.शे. 12 % प्रमाणे व्याजाने परत मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारीचा सारांश थोडक्यात असा-
तक्रारदार यांचे सामनेवाला बॅंकेमध्ये नं. 321001010036022 चे चालू खाते आहे. सामनेवाला बॅंकेने दि. 14-01-2016 तारीख नमूद असणारे पत्र पाठवून चालू खाते फॅसिलिटीमध्ये बदल केल्याचे तक्रारदार यांना कळविले. ते पत्र तक्रारदार यांना दि.15-02-2016 रोजी दिले. पत्र मिळताच तक्रारदार यांनी दि. 17-02-2016 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून अशाप्रकारे खात्याच्या सुविधेमध्ये बदल केल्यामुळे तक्रारदार यांना खाते वापरणे शक्य होणार नाही असे कळविले. बॅंक अधिका-यांनी त्यावर तुम्हाला कळवितो असे सांगितले. परंतु दि.31-03-2016 रोजी सामनेवाला बॅंकेने तक्रारदार यांचे खात्यामध्ये रक्कम रु. 52,762.50 खर्ची टाकले. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला बॅंकेला दि.6-04-2016 रोजी पत्र पाठवून सदर रक्कम रु. 52,762.50 परत मिळावे अशी विनंती केली. तेंव्हा बॅंक अधिकारी श्री. बने यांनी सदर रक्कम चुकून खर्ची टाकली आहे लवकरच ती रक्कम तुमच्या खात्यात रिफंड करतो अशी ग्वाही दिली परंतु तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवाला बॅंकेने सदर रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात वर्ग केली नाही. दोन महिन्यानंतरही सदर रक्कम तक्रारदार यांचे खात्यात वर्ग केली नाही म्हणून तक्रारदार यांनी दि. 21-06-2016 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून सदर रक्कम परत न केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल असे कळविले. परंतु सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही अशा रितीने सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे खात्यातून रक्कम रु.52,762.50 जनरल रिकव्हरी चार्जेस या कारणासाठी खर्ची टाकून सेवेत गंभीर त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांजकडून रक्कम रु. 52,762.50 बेकायदेशीरपणे कापलेली रक्कम तसेच रक्कम रु. 15,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी तसेच रक्कम रु. 5,000/-, तक्रारीचा खर्च असे एकूण रक्कम रु. 72,762.50 देवविण्यात यावे. सामनेवाला यांनी तक्रारदार खात्यातून कापलेल्या रक्कम रु. 52,762.50 वर दि. 31-03-2016 रोजी पासून द.सा.द.शे. 12 % व्याजाने दयावेत यासाठी तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
3) नि. 7 प्रमाणे सामनेवाला यांना दि. 7-03-2017 रोजी नोटीस बजावणी होऊनही मंचात हजर झाले नाहीत त्यामुळे सामनेवाला यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश नि. 1 वर दि.10-04-2017 रोजी मंचाने पारीत करुन प्रकरण चौकशीसाठी नेमण्यात आले.
4) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.5 वर तक्रारदार यांचा सामनेवाला बॅंकेतील खातेउतारा, सामनेवाला यांनी तक्रारदार यास दि.14-01-2016 दिलेले पत्र, तक्रारदार यांने सामनेवाला बॅंकेस दि. 17-02-2016 रोजी दिलेले पत्र, तक्रारदार याने सामनेवाला बॅंकेस दि. 6-04-2016 रोजी दिलेले पत्र. तक्रारदार याने सामनेवाला बॅंकेस दि. 21-06-2016 रोजी दिलेले पत्र,नि. 8 वर पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. नि. 9 वर तोंडी पुरावा बंदची पुरसीस दाखल केली. नि.10 वर तक्रारदाराचे तक्रार अर्ज व त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावे अशी पुरशीस दिली. नि.11 वर सरतपासाचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरशीस दिली.
5) तक्रारीचा आशय, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदार यांचे वकील श्री. भिसे यांचा तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे का ? | होय. |
2. | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून जनरल रिकव्हरी चार्जेस म्हणून खर्ची टाकलेली रक्कम व नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3. | आदेश काय ? | अंतिम आदेशनुसार. |
- का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1 व 2-
6) मुद्दा क्र. 1 व 2 हे एकमेकांशी निगडीत असलेने त्याचे विवेचन एकत्रितरित्या करणेत येत आहे. तक्रारदार यांनी नि. 5 वर सामनेवाला बॅंकेतील त्यांचे चालू खाते क्र. 321001010036022 चा खातेउतारा प्रत दाखल केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि. 14-01-2016 रोजीचे तक्रारदार यांचे चालू बॅंक खाते क्र. 321001010036022 चे अनुषंगाने पत्र पाठविले आहे. यावरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असून सामनेवाला हे सेवापुरवठादार आहेत असे दिसून येते.
7) तक्रारदार यांचे नॅशनल मेडीकल या दुकानाचे नावे सामनेवाला बॅंकेत चालू खाते क्र. 321001010036022 आहे. त्याबाबत तक्रारदार यांनी नि. 5 वर सदर चालू खात्याचा खातेउतारा दाखल केलेला आहे. सदर चालू खाते संबंधी सामनेवाला यांनी दि. 14-01-2016 रोजीचे पत्र तक्रारदार यांना पाठवून दोन नवीन डिपॉझिट स्कीम सुरु करणार असलेबाबत तसेच सदर दोन नवीन डिपॉझिट स्कीमबाबत विस्तृत माहिती दिलेचे दिसून येते. सदर पत्र हे तक्रारदार यांनी दि. 15-02-2016 रोजी स्वीकारल्याचे त्या पत्रावरील तक्रारदार यांचे सहीवरुन दिसून येते. सदर पत्रातील नमूद दोन नवीन डिपॉझिट स्कीमबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि. 29-02-2016 रोजी किंवा तत्पुर्वी कळविण्याचे त्या पत्रामध्ये नमूद आहे. त्यासंबंधी तक्रारदार यांनी दि. 17-02-2016 रोजी सामनेवाला बॅंकेला पत्र पाठवून सदर खाते चालवू शकत नसल्याचे कळविलेचे नि. 5 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे खात्यातून दि. 31-03-2016 रोजी रक्कम रु. 52,762.50 जनरल चार्जेस रिकव्हरी नावे खर्ची टाकल्याचे नि.5 वरील तक्रारदार यांचे सामनेवाला बॅंकेतील खातेउता-यावरुन दिसून येते. सदर खर्ची टाकलेल्या रक्कमेबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि. 06-04-2016 रोजी पत्र पाठवून खर्ची टाकलेल्या रक्कमेबाबत खुलासा मागविला परंतु सामनेवाला यांनी कोणताही खुलासा केला नसल्याचे दिसून येते. तदनंतर तक्रारदार यांनी दि. 21-06-2016 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून परत खुलासा मागितला तसेच कायदेशीर कारवाई करणार असल्या सबंधी सुचित केले परंतु सामनेवाला यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येते. सदरील खर्ची टाकलेल्या रकमेबाबत तक्रारदार यांनी या मंचात तक्रार दाखल केल्यानंतर मंचाने सामनेवाला यांना दि. 3-03-2017 रोजी नोटीस काढले सदर नोटीस सामनेवाला यांना दि. 7-03-2017 रोजी मिळाल्याचे नि. 7 वरुन दिसून येते.
8) सामनेवाला यांना नोटीस दि. 7-03-2017 रोजी मिळूनही त्यांची बाजू मांडण्याची संधी असूनही मंचात उपस्थित राहण्याची तसदी घेतलेली नाही तसेच दि. 14-01-2016 रोजी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्रातही जनरल चार्जेस रिकव्हरीव्दारे तक्रारदार यांचे चालू खात्यामधून रक्कम कपात केली जाईल असे तक्रारदार यांना सूचित केलेचे दिसून येत नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे खात्यातून खर्ची टाकलेली रक्कम रु. 52,762.50 ही कोणत्या बाबतीत खर्ची टाकले हे स्पष्ट करण्याची संधी सामनेवाला यांना असतानाही सामनेवाला हे आपली बाजू मांडण्यासाठी मंचात उपस्थित राहिले नाहीत. तक्रार अर्जातील तसेच प्रतिज्ञापत्रातील मजकूर तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा सामनेवाला यांनी नाकारलेला नाही. अशा रितीने एक सेवा पुरवठादार या नात्याने कोणतीही पूर्वसुचना न देता कोणतीही रक्कम आपल्या ग्राहकाच्या खात्यातून कपात करणे तसेच ग्राहकाने वारंवार त्यासंबंधी खुलासा मागवुनही कोणताही खुलासा न देणे ही गंभीर सेवाविषयक त्रुटी असल्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे चालू खाते क्र. 321001010036022 खात्यातून दि. 31-03-2016 रोजी जनरल चार्जेस रिकव्हरी नावाने खर्ची टाकलेले रक्कम रु. 52,762.50 आणि त्यावर दि. 31-03-2016 रोजी पासून द.सा.द.शे. 9 % व्यजाने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत अदा करावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- अदा करणे न्यायाचे दृष्टीने योग्य होईल या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 -
सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा पुरविण्यात त्रुटी दिली आहे हे पुराव्यावरुन सिध्द झालेले आहे. एकंदरीत पुराव्यावरुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
1) तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 52,762.50 (रुपये बावन्न हजार सातशे बासष्ट पन्नास पैसे फक्त) आणि त्यावर दि. 31-03-2016 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याज दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत अदा करावेत.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/-(रुपये दहा हजार फक्त) तसेच तक्रार खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता 30 दिवसांत करावी तसे न केल्यास तक्रारदार सामनेवाले यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 25 व 27 खाली कार्यवाही करु शकतील.
5) या आदेशाची प्रत तक्रारदार व सामनेवाला यांना विनामुल्य दयावी.