नि.48 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 18/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.10/03/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.05/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या जनता सहकारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, लांजा जि.रत्नागिरी करीता सेक्रेटरी, श्री.उमेश गोविंद मांडवकर व्दारा जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्यादीत, लांजा, मु.पो.लांजा, जि.रत्नागिरी 416 701. ... तक्रारदार विरुध्द 1. शाखाधिकारी न्यू इंडिया ऍश्युरन्स कं. रत्नागिरी जावकर प्लाझा, जयस्तंभ, ता.जि.रत्नागिरी 415 612. 2. श्रीमती लिलावती महादेव कोपरे रा.मु.पो.लांजा, कोर्लेतिठयाजवळ, जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.एस.कदम सामनेवाले क्र.1 तर्फे : विधिज्ञ श्री.एम.बी.भाटवडेकर सामनेवाले क्र.2 तर्फे : विधिज्ञ श्री.ए.एस.कदम -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार सामनेवाला क्र.2 यांचे विमा दाव्याबाबत दाखल केली आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणे - तक्रारदार ही कर्जपुरवठा करणारी सहकारी पतसंस्था आहे. सदर पतसंस्थेच्या कर्जदार सभासदांचा सामनेवाला क्र.1 विमा कंपनीतर्फे “जनता पर्सनल ऍक्सीडेंट ग्रुप ” विमा उतरविला जातो. सन 2006 मध्ये तक्रारदार संस्थेमार्फत 188 कर्जदारांना कर्ज वाटप करण्यात आले व त्या सर्व सभासदांचा दि.23/11/2006 ते दि.22/11/2011 या कालावधीसाठी सामनेवाला क्र.1 मार्फत विमा उतरविण्यात आला. सदर 188 सभासदांपैकी सामनेवाला क्र.2 यांचे पती महादेव शंकर कोपरे यांनीसुध्दा तक्रारदार संस्थेकडून कर्ज घेतले होते व त्यांचासुध्दा सामनेवाला क्र.1 कंपीनीमार्फत रक्कम रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आला होता. सदर कर्जदार महादेव शंकर कोपरे यांचा दि.26/07/2007 रोजी अपघात झाला व उपचारादरम्यान त्यांचा दि.29/07/2007 रोजी मृत्यु झाला. सदरच्या अपघाताची माहिती सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार संस्थेस दिल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा रक्कम मिळण्यासाठी सामनेवाला क्र.2 यांच्या सहीनिशी क्लेम फॉर्म सामनेवाला क्र.1 कंपनीकडे पाठविण्यात आला. त्यानंतरही सामनेवाला यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी दि.27/06/2008 रोजीच्या पत्राने सामनेवाला क्र.2 यांचा विमा दावा नाकारला. त्यामध्ये सामनेवाला क्र.1 यांनी सदरची विमा पॉलिसी ही 10 ते 70 वयोगटातील लोकांसाठी आहे, पॉलिसी घेतेवेळी मयत महादेव कोपरे यांचे वय 62 असल्याचे दाखवणेत आले आहे. तथापी शाळेच्या दाखल्यावरुन पॉलिसी घेतेवेळी मयत महादेव कोपरे यांचे वय 77 असल्याचे दिसून येते. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यामुळे सदरचा विमा दावा नाकारण्यात येत आहे असे कळविले. वास्तविक पॉलिसी काढतेवेळी वय ही महत्त्वाची अट आहे असे केव्हाही सामनेवाला क्र.1 तर्फे सांगण्यात आले नव्हते व वयाच्या दाखल्याबाबतची मागणीही सामनेवाला क्र.1 तर्फे करण्यात आली नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी चुकीच्या कारणास्तव विमा क्लेम नाकारला आहे. तक्रारदार संस्थेस विमा करारानुसार नॉमिनी म्हणून नेमले असल्याने तक्रारदार यांनी सदरची तक्रार विमा दावा मिळण्यासाठी व शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांच्याकरीता दाखल केली आहे. तक्रारदार यांनी नि.2 ला शपथपत्र व नि.5 चे यादीने एकूण 32 कागद दाखल केले आहेत. 3. सामनेवाला क्र.1 यांनी याकामी हजर होवून नि.9 ला आपले म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर तसेच महादेव कोपरे यांना झालेल्या अपघाताबाबतचा मजकूर मान्य असल्याचे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यात सदरची पॉलिसी 10 ते 70 वयोगटातील व्यक्तिकरीता आहे ही बाब तक्रारदार संस्थेस सांगितली नव्हती ही गोष्ट अमान्य केली आहे. सदर पॉलिसी 10 ते 70 वयोगटातील व्यक्तिकरिता आहे याबाबतची पूर्ण कल्पना तक्रारदार संस्थेस दिली होती. तक्रारदार संस्थेने विमा पॉलिसी घेताना जो प्रपोजल फॉर्म भरुन दिला आहे त्यामध्ये प्रस्तुत विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती वाचल्या असून त्या मान्य असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती माहिती नव्हत्या या तक्रारदारांचे विधानामध्ये कोणतेही तथ्य नाही असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. पॉलिसी काढतेवेळी विमा धारकाचे वय 62 असल्याचे खोटे दाखविण्यात आले त्यामुळे पॉलिसी देण्यात आली. तक्रारदार यांनी खोटी माहिती दिल्यामुळे तक्रारदारचा क्लेम नाकारण्यास पात्र आहे असे सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी नि.10 ला प्रतिज्ञापत्र, नि.14 च्या यादीने एकूण 4 कागद दाखल केले आहेत. तसेच नि.17 वर साक्षीदार चंद्रशेखर करंदीकर यांचे शपथपत्र दाखल केले आहे व नि.18 च्या यादीने एक कागद दाखल केला आहे. 4. सामनेवाला क्र.2 यांनी नि.26 वर तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मान्य व कबूल असल्याची पूरशिस दाखल केली आहे. तक्रारदार यांनी नि.31 ला सामनेवाला यांचे म्हणणे मान्य नसल्याचे नमूद केले आहे. तसेच त्याच्या पृष्ठयर्थ नि.33 ला शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी नि.36 ला व तक्रारदार यांनी नि.37 ला जादा तोंडी पुरावा देणेचा नाही अशी पूरशिस दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 तर्फे नि.39 ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. तक्रारदारतर्फे नि.42 ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. तक्रारदारतर्फे नि.43 चे यादीने व सामनेवालातर्फे नि.44 चे यादीने निवाडे दाखल करण्यात आले आहेत. 5. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | सामनेवाला क्र.2 यांचा विमा दावा नाकारुन सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 3. | तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतबाहय झाला आहे काय ? | नाही. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 6. मुद्दा क्र.1 - तक्रारदार यांनी त्यांचे कर्जदार सभासद मयत महादेव कोपरे यांचा “जनता पर्सनल ऍक्सीडेंट ग्रुप ” विमा उतरविला होता व सदर महादेव कोपरे यांचा विमा पॉलिसीचे कालावधीमध्ये अपघाताने मृत्यु झाला ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेदरम्यान वादाचा मुद्दा जो उपस्थित झाला आहे तो सदरची पॉलिसी ही 10 ते 70 वयोगटातील व्यक्तिसाठीच होती व तक्रारदार यांनी पॉलिसी काढतेवेळी कै.महादेव कोपरे यांचे वय 62 असल्याचे दर्शविले त्यामुळे त्यांना पॉलिसी देण्यात आली. त्यांचे मृत्युनंतर चौकशीदरम्यान कै.महादेव कोपरे यांचे पॉलिसी काढतेवेळीचे वय 77 असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी पॉलिसी काढतेवेळी चुकीची माहिती दिली त्यामुळे त्या आधारे विमा धारकास विमा संरक्षण देण्यात आले. तक्रारदार यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे विमा करारातील अटीप्रमाणे विमा धारकाचा विमा दावा नाकारण्यात आला. तक्रारदारतर्फे विधिज्ञांनी आपले युक्तिवादामध्ये पॉलिसी काढतेवेळी वय ही महत्त्वाची अट आहे असे केव्हाही सांगितले नाही त्यामुळे विमा धारक महादेव कोपरे यांचे अंदाजे वय 62 लावण्यात आले. सदर पॉलिसीमध्ये वय ही महत्त्वाची अट होती का ? व त्याची माहिती पॉलिसी काढतेवेळेस तक्रारदार संस्थेस होती का ? या दोन गोष्टी पाहणे जरुरीचे आहे. सामनेवाला यांनी सदरची विमा पॉलिसी ही 10 ते 70 वयोगटातील व्यक्तिसाठीच होती व तसे तक्रारदार संस्थेस सांगण्यात आले होते हे दर्शविण्यासाठी साक्षीदार श्री.चंद्रशेखर करंदीकर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सदर साक्षीदार यांनी आपले साक्षीमध्ये तक्रारदार संस्थेचे सेक्रेटरी मांडवकर यांना वय ही महत्त्वाची अट होती असे सांगितले होते असे नमूद केले आहे. सदर करंदीकर हे सामनेवाला विमा कंपनीचे ऍडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर आहेत. तक्रारदार यांनीही आपल्या तक्रार अर्जात वय ही महत्त्वाची अट होती असे सामनेवाला अगर त्यांच्या अधिका-यांनी केव्हाही सांगितले नव्हते असे शपथपत्रावर नमूद केले आहे. दोन वेगवेगळी शपथपत्रे मंचासमोर आल्यानंतर त्या अनुषंगाने दोन्ही बाजूंनी दाखल असलेला कागदोपत्री पुरावा पाहणे गरजेचे आहे. सामनेवाला यांनी सदरची पॉलिसी ही 10 ते 70 वयोगटातील व्यक्तिसाठीच आहे हे दर्शविण्यासाठी नि.14/1 वर सदर पॉलिसीसाठीच्या प्रपोजल फॉर्मचा नमुना हजर केला आहे. सदरच्या नमुन्याचे अवलोकन केले असता सदरचा फॉर्म हा कोरा आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये परिच्छेद 5 मध्ये “तक्रारदार संस्थेने प्रस्तुतची विमा पॉलिसी घेताना जो प्रपोजल फॉर्म भरुन दिला आहे त्यामध्ये प्रस्तुत विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती वाचल्या असून त्या मान्य असल्याचे लिहून दिले आहे. ” तसेच “तक्रारदार संस्थेने या विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती माहिती करुन घेऊनच प्रपोजल फॉर्म भरुन त्यावर सही करुन दिली आहे ”असे नमूद केले आहे. तक्रारदार संस्थेने जर प्रपोजल फॉर्म भरुन त्यावर सही करुन सामनेवाला यांच्याकडे दिला आहे व सदर प्रपोजल फॉर्ममध्ये सदरची अट नमूद असेल तर सदरचा तक्रारदार संस्थेने भरुन दिलेला मूळ प्रपोजल फॉर्म याकामी का दाखल करण्यात आला नाही ? याचा समर्पक खुलासा होत नाही. सामनेवालाकडे असलेला प्रपोजल फॉर्मसारखा महत्त्वपूर्ण पुरावा दाखल न करता सामनेवाला यांनी प्रपोजल फॉर्म भरण्याचा कोरा नमूना दाखल केला आहे. त्यामुळे फॉर्म भरतेवेळी तक्रारदार संस्थेस वय ही महत्त्वाची अट होती ही बाब माहित होती असे निष्पन्न होत नाही. तक्रारदार संस्थेने 188 कर्जदारांची विमा पॉलिसी घेतली आहे. तक्रारदार संस्थेस वय लपवून विमा पॉलिसी घेण्याचे कोणतेच कारण दिसून येत नाही. वय ही अत्यंत महत्त्वाची अट असेल तर वयाबाबतचा कागदोपत्री पुरावा तपासण्यात येवून त्याची खात्री करुन पॉलिसी का देण्यात आली नाही ? हाही प्रश्न अनुत्तरीत रहातो. सामनेवाला यांनी तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक मयत महादेव कोपरे यांचे वय लपवून पॉलिसी घेतली व सामनेवाला संस्थेस चुकीची माहिती दिली ही बाब सामनेवाला यांनी सिध्द केली नाही त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे असे मंचाचे मत आहे. 7. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांनी पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- देण्यात यावी तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार हे सदर पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून नेमण्यात आले आहेत. सदर पॉलिसीनुसार सामनेवाला क्र.2 हे लाभार्थी आहेत. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्येच सदरची तक्रार ही सामनेवाला क्र.2 यांचे कुटुंबाच्या भल्यासाठीच केली आहे व सरतेशेवटी रक्कम सामनेवाला क्र.2 यांनाच अदा करण्याची आहे असे नमूद केले आहे. तसेच सदरची तक्रार तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांचेवतीनेसुध्दा दाखल केली आहे परंतु सामनेवाला क्र.2 सहीसाठी उपलब्ध होवू न शकल्याने त्यांना सामनेवाला क्र.2 म्हणून फॉर्मल पार्टी करण्यात आले आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी याबाबत कोणतीही हरकत घेतलेली नाही. सामनेवाला क्र.2 ही मयत महादेव कोपरे यांची पत्नी आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदर पॉलिसीनुसार रु.1,00,000/- इतक्या रकमेचे विमा संरक्षण होते ही बाब नाकारलेली नाही. त्यामुळे सदरची रक्कम रु.1,00,000/- मिळणेस सामनेवाला क्र.2 पात्र आहेत अशा निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. सदरचा विमा दावा नाकारल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना जो शारिरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला त्यापोटीही रक्कम रु.3,000/- मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. 8. मुद्दा क्र.3 - सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तक्रारदार यांची तक्रार मुदतबाहय झाली आहे असा आक्षेप घेतला आहे व त्याकारणे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले आहे. पॉलिसी करारातील तरतूदीनुसार दावा नाकारलेच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीत जर विमा कंपनीविरुध्द त्याबाबतीत न्यायालयात प्रकरण दाखल केले नाही तर असा विमा दावा विमा धारकाने सोडून दिला अशी अट आहे. तक्रारदार यांचा विमा दावा सामनेवाला यांनी दि.27/06/2008 रोजीच्या पत्राने फेटाळला. त्यानंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल करणे गरजेचे होते परंतु तक्रारदार यांनी सदरची तक्रार दि.10/03/2010 रोजी दाखल केली आहे ती मुदतबाहय झाली आहे. सामनेवालाने आपल्या युक्तिवादाच्या पृष्ठयर्थ सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखल केला आहे. सदर H.P.State Forest Company Ltd. V/s. United India Insurance Co.,Ltd., या निवाडयाच्या कामी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने “A clause in an insurance policy fixing a period of limitation extinguishing the right to file a suit or complaint within a certain stipulated period which could be less than that prescribed by the limitation act was not violating of Section 28 of the Indian Contract Act. ” असा निष्कर्ष नोंदविला आहे. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय झाली आहे का ? हे ठरविण्यासाठी मंचासमोर दाखल झालेल्या कागदपत्रांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. सामनेवाला यांनी मूळ प्रपोजल फॉर्म याकामी हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी त्यांना देण्यात आलेल्या पॉलिसीची झेरॉक्सप्रत याकामी हजर केली आहे. सदर मूदतीच्या मुद्दयाबाबत अशी अट पॉलिसीमध्ये नमूद आहे का ? हे तपासण्यासाठी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या झेरॉक्स प्रतीची मूळ प्रत मंचात हजर करणे आवश्यक वाटल्याने तक्रारदार यांनी मूळ पॉलिसी प्रत दाखल करावी असा आदेश नि.1 वर केला. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी नि.47 च्या यादीने पॉलिसीची मूळ प्रत दाखल केली. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता क्लेम नाकारल्यानंतर बारा महिन्यांच्या आत न्यायालयात दाद मागितली नाही तर विमा दावा सोडून दिला असे समजण्यात येईल अशी कोणतीही अट नमूद नाही. पॉलिसीमध्ये जर अशी अट नमूद नसेल तर सदरची अट या तक्रारदारावर बंधनकारक रहाणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदार यांची तक्रार मुदतबाहय झाली आहे हे सामनेवाला यांनी शाबित केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख मात्र) सामनेवाला क्र.2 यांना अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 3. सामनेवाला क्र.1 यांनी वर नमूद आदेशाची पूर्तता दि.05/09/2010 पर्यंत करण्याची आहे अन्यथा त्यांना वर नमूद रकमेवर आदेशाच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे.9% दराने व्याज सामनेवाला क्र.2 यांना अदा करावे लागेल. 4. सामनेवाला क्र.1 यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- (रु.तीन हजार मात्र) सामनेवाला क्र.2 यांना दि.05/09/2010 पर्यंत अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 5. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी विहित मुदतीत न केल्यास तक्रारदार अथवा सामनेवाला क्र.2 त्यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 05/08/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |