निकालपत्र:- (14/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदारतर्फे लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकील गैरहजर होते व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार चालू ठेव खातेवरील रक्कम अदा न केलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे 85 वर्षाचे वयोवृध्द ग्रहस्थ असून वृध्दापकाळात त्यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करणेसाठी मुलगा रविंद्र यास कुलमुखत्यापत्र दिलेले आहे. त्यानुसार सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. सामनेवाला ही बँकींग व्यवसाय करणारी संस्था असून तक्रारदार हे तिचे खातेदार आहेत. ब) तक्रारदाराचे सामनेवालांकडे चालू खाते क्र.33 फोलीओ क्र.90/12 असे असून दि.18/07/1983 पासून पासबुक दिलेले आहे. सदर पासबुकावर दि.20/02/1984 रोजी रक्कम रु.41,661.78 अंतिम शिल्लक म्हणून होती दि.01/07/1988 रोजी सदर खाते मुख्य शाखेकडे वर्ग करणेत आलेची इन्डॉरस्मेंट करणेत आली. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असलेने व कोणताही व्यवसाय करीत नसलेने प्रस्तुत रक्कमेची मागणी सामनेवालांकडे केली असता तुमच्या खातेची पडताळणी चालू आहे असे सांगून रक्कम अदा करणेस विलंब केला. यामुळे दि.23/08/2007 रोजी रक्कम मागणीचा लेखी अर्ज केला. तदनंतर दि.22/01/2008 रोजी खातेउता-याची लेखी मागणी केली त्यावेळी सदर खातेवर रक्कम रु.41,661.78 ऐवजी रक्क्म रु.266.60 पै. शिल्लक असलेचे सामनेवालांनी तक्रारदारास कळवलेले आहे. याचा तक्रारदाराला मानसिक धक्का बसला व तशी लेखी तक्रार सामनेवालांचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक यांचेकडे केली त्याची कोणतीही दखल त्यांनी घेतलेली नाही. सबब सामनेवालांनी बँकींग सेवा देणेस कसुर केलेने दि.16/04/2008 रोजी वकील श्री पी.आर.बाणवलीकर यांचे मार्फत नोटीस दिली. सामनेवालांशी केलेल्या प्रत्येक पत्रव्यवहार व नोटीसीची प्रत सामनेवालांचे मेंगलोरस्थित सहाय्यक व्यवस्थापक गा्हक सेवा विभाग यांना पाठवलेल्या आहेत व त्यांना त्या मिळालेल्या आहेत. सामनेवालांचे वकील श्री सी.आर.जोशी यांनी उत्तरी नोटीस पाठवून मागणी केलेली रक्कम देणेचे नाकारलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदार हे 85 वर्षाचे वयोवृध्द इसम असून त्यांचे तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करणेत यावा व तक्रारदारास रक्क्म रु.41,661.78 सदर रक्कमेवर दि.20/02/1984 पासून 12 टक्के व्याजासह देणेचा सामनेवालांना आदेश व्हावा तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मंजूर करणेत यावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ वटमुखत्यार, सामनेवालांचे पासबुक खाते क्र.33, अस्सल प्रत व सत्यप्रत, सामनेवाला बँकेस दिलेली पत्रे, त्याच्या पोच पावत्या सामनेवाला बँकेस दिलेली वकील नोटीस व त्याची आलेली उत्तरी नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांचे लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज धांदात खोटा, लबाडीचा असून सामनेवालांना तो बिलकूल मान्य व कबूल नाही.तक्रार अर्जातील सर्व कथनाचा स्पष्ट शब्दात इन्कार करतात. प्रस्तुतचा अर्ज पैसे उकळण्याच्या दु्ष्ट हेतूने दाखल केलेला आहे. वस्तुत: तक्रारदार व त्याचा भाऊ विष्णू आकाराम पाटील या दोघांनी मिळून सामनेवाला बॅंकेत चालू खाते क्र.33 संयुक्तिक खाते सुरू केले होते.सदर खाते सुरु करणेसाठी दोघांनीही आपल्या सहयानिशी अर्ज केला होता व त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करुन दिलेली होती. सदर खातेवर दोघांपैकी कुणीही एकाने व्यवहार करणेची अट आहे. ब) मे.विश्राम आकाराम पाटील या भागीदाराचे व्यवहार करणेसाठी तक्रारदाराला सामनेवाला बँकेने 814026 ते 814050 असे एकूण 25 चेक्सचे चेकबुक दिलेले होते व सदरच्या खातेवर कोणत्याही एका भागीदाराने व्यवहार करणेची मुभा दिलेली होती. दि.20/02/1984 रोजी सदर खातेवर रक्कम रु.266.60 इतकीच रक्कम शिल्लक होती. सदर खातेवर 10 वर्षापेक्षा अधिक काळासाठी व्यवहार केलेले नव्हते व नाही. तसेच पासबुक वेळेवर भरुन घेतलेले नाही. त्याबाबत तक्रारदाराने निष्काळजीपणा केला. बँकींग कायदयातील नियमानुसार बंद स्वरुपात असलेल्या 10 वर्षाहून अधिक काळाची कागदपत्रे नाश केली जातात. त्यानुसार तक्रारदाराचे खातेसंदर्भातील अस्सल कागदपत्रे सामनेवालांकडे उपलब्ध नाही. फक्त खाते सुरु करणेबाबतचा अर्ज उपलब्ध आहे. तसेच सदरच्या संयुक्तिक खातेवरील नोंदीनुसार चेक क्र.814041/47/50, पर्यंतचे चेक कोठे आहेत याची माहिती तक्रारदाराने सामनेवालांना आजतागायत दिलेली नाही. उपलब्ध कागदपत्रावरु न तक्रारदाराचे खातेवर रक्कम रु.266.60 इतकी नाममात्र शिल्लक आहे याचा खुलासा दि.12/05/2008 रोजीच्या लेखी पत्राने तक्रारदाराचे वकीलांना दिलेला आहे. सबब तक्रारदाराने कलम 9 मध्ये मागणी केलेली रक्कम सामनेवाला देणे लागत नाहीत. प्रस्तुतची तक्रार पैसे उकळण्याचे दृष्टीने दाखल केली असलेने ती खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून कॉम्पेंसेंटरी कॉस्ट रक्कम रु.5,000/- सामनेवालांना देणेचा आदेश व्हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदारांनी बँकेत खाते उघडण्यासाठी दिलेला अर्ज, फर्मचा खाते उतारा, फिक्स्ड् डिपॉझिट लेजर उतारा, सामनेवाला यांनी वकिल नोटीसीस पाठविलेले उत्तर, त्याची पोच पावती, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले पत्र व त्याची पोच पावती इत्यादीच्या सत्यप्रती, तसेच बागवान यांचे नांवे करुन दिलेले वटमुखत्यार, खाते सुरु करणेसाठी दिलेला अस्सल अर्ज, तसेच परिपत्रकाची सत्यप्रत दाखल केलेली आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. तक्रारदार त्यांचे चालू खातेवरील रक्कम मिळणेस पात्र आहेत काय?---होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराचे सामनेवालांकडे चालू खाते क्र.33 असलेचे सामनेवालांनी मान्य केलेले आहे. तसेच सामनेवालांचा लेखी म्हणणेनुसार सदर खातेवर रक्कम रु.266.60 इतकीच रक्कम शिल्लक असलेचे व सदर खाते मुख्य कार्यालयाकडे वर्ग केलेचे मान्य केले आहे. त्यासाठी सामनेवालानी दाखल केलेले तक्रारदाराने खाते उघडण्यासाठी दिलेल्या अर्जाचे अवलोकन केले असता प्रस्तुतचे खाते मे.विश्राम आकाराम पाटील धंदा भागीदारी असून विष्णू आकाराम पाटील व विश्राम आकाराम पाटील पैकी कोणीही एकजण सदर खातेवर व्यवहार करु शकत असलेची नोंद आहे. सामनेवालांनी दाखल केलेल्या नमुद चालू खाते क्र.33 चे फिक्स डिपॉझीट लेजरवर चेक क्र.814026 ते 814050 अशा चेकची नोंद दिसून येते. तसेच दि.01 जुलै-1988 रोजी ट्रान्सफर टू एच.ओ. अशी नोंद असून बॅलन्स निरंक(Nil) आहे. मात्र तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारदारचे चालू खाते क्र.33 फोलीओ क्र.90/12 चालू खातेचे अस्सल पासबुकाचे अवलोकन केले असता प्रस्तुत पासबुकावर दि.20/02/1984 अखेर शिल्लक रक्कम रु.41,166.78 दिसून येते. तसेच त्याखाली अकौन्ट ट्रान्सफर टू एच.ओ. दि.01/07/1988 तारखेची नोंद आहे व सदरची इन्डॉरस्मेंट सामनेवाला बॅंकेच्या अधिका-यांनी केलेचे युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांच्या वकीलांनी मान्य केले आहे. मात्र सदर इन्डॉर्समेंट करणेपूर्वी तक्रारदाराने रक्कमा काढलेच्या नोंदी नोंद करणेचे राहून गेलेचा फायदा तक्रारदार घेत असलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच 10 वर्षाच्या कालावधीतील कागदपत्रांचा नाश केलेने मूळ अन्य कागदपत्रे दाखल करणे शक्य नसलेचे प्रतिपादन केले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता वरील सामनेवाला बँक ही बँकींग व्यवसाय करणारी बॅक आहे. बॅंकींग व्यवसाय अर्थिक संरक्षणाच्या दृष्टीने पासबुकाशिवाय खातेवरील रक्कमा अदा केल्या जात नाहीत. एखादया वेळेस अधिकाराचा वापर करुन ग्राहकाच्या सोईसाठी अशी रक्कम देणे गरजेचे असल्यास पैसे काढणेच्या स्लिपवर मागील बाजूस पासबुकाशिवाय रक्कम अदा अशी खातेदाराकडून लिहून घेऊन रक्कम अदा केली जाते व संबंधीत अधिका-याची तसेच खातेदाराचीही सही असते. तशी वस्तुस्थिती सदर प्रकरणी दिसून येत नाही. तक्रारदाराने दि.20/02/1984 नंतर रक्कमा कशा काढल्या याबाबतचे स्प्ष्टीकरण अथवा कागदोपत्री पुरावा सामनेवालांनी दिलेला नाही. तसेच सदर अस्सल चालुखातेच्या पासबुकावरुन सदर खातेवर अकौन्ट ट्रान्सफर टू एच.ओ. ही इन्ड्रॉर्समेंट दि.01/07/1988 रोजी केलेली आहे. सदर वेळी नमुद कार्यरत असणा-या अधिका-यानी सदर इन्ड्रॉर्समेंट करणेपूर्वी योग्य नोंदी पासबुकावर करुन त्यानंतर इन्ड्रॉर्समेंट करावयास हवी होती. कारण दि.20/02/1984 ते 01/07/1988 मध्ये अंदाजे 4 वर्षाचा कालावधी दिसून येतो व सदर 4 वर्षाचे कालावधीतील सदर खातेवरील व्यवहाराची व्हौचर्स व कागदपत्रे उपलब्ध होती. तक्रारदाराने सदर खातेवरुन रक्कम काढली असेल तर संबंधीत अधिका-यांनी नमुद रक्कम वर्ग करणेबाबत इन्ड्रार्समेंट करणेपूर्वी प्रस्तुत पासबुकावर योग्य त्या नोंदी करुनच इन्ड्रार्समेंट करावयास हवी होती. सदर इन्ड्रार्समेंट करतेवेळी त्यांचेकडे योग्य ती व्हौचर व कागदपत्रे उपलब्ध होती तरीही सदर व्यवहाराच्या नोंदी करणेबाबत योग्य ती दक्षता सामनेवाला यांनी घेतलेली नाही. त्याचा दोष तक्रारदारास देता येणार नाही. तसेच प्रस्तुत खाते 10 वर्ष् तक्रारदाराने व्यवहार केले नसलेचे प्रतिपादन केले आहे. मात्र सदर कालावधीत खातेदारास नोटीस वजा पत्र पाठवलेचे कोठेही दिसून आलेले नाही. सबब तक्रारदाराचे खातेवर रक्कम रु.41,166.78 ऐवजी रक्कम रु.266.60 कशी आली याबाबत संयुक्तिक स्पष्टीकरण सामनेवाला देऊ शकलेले नाहीत. सबब चालू खातेवरील पासबुकावर असणारी रक्कम रु.41,166.78 तक्रारदाराने मागणी करुनही त्यास ती रक्कम अदा केलेचे दिसून आलेले नाही. तसेच सामनेवाला बँकेच्या कोणत्या नियमाच्या आधारे तक्रारदाराचे खातेवरील रक्कम सामनेवालांच्या मुख्य कार्यालयाकडे वर्ग करणेत आली याचेही संयुक्तिक कारण दिलेले नाही. याचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदाराचे चालूखातेवर असणारी शिल्लक रक्कम रु.41,166.78 इतकी रक्कम वर्ग न करता रक्कम रु.266.60 इतकीच रक्कम वर्ग केलेली आहे. सबब तक्रारदाराने पासबुकावर शिल्लक असलेल्या रक्कम रु.41,166.78 इतक्या रक्कमेची मागणी करुनही सामनेवालाने सदर रक्कम अदा न करुन बँकींग सेवा देणेबाबत कसुर केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेते :- (1) 2003 NCJ 123 (NC) - Central Bank of India Vs. Byu Hazarika Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) – Deficiency in services – Banking _ Less amount in account than ought to be – Is deficiency in service. तसेच सामनेवालांनी तक्रारदारचे भावास आवश्यक पक्षकार केलेले नाही हा मुद्दा हे मंच फेटाळत आहे. कारण सदर खातेवर दोघांपैकी एकास व्यवहार करणेची मुभा असलेने त्याप्रमाणे तकारदाराने व्यवहार केलेले आहेत. सबब सदर कारणास्तव प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही हा मुद्दा हे मंच फेटाळणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार त्यांचे चालू खाते वरील शिल्लक रक्कम रु.41,166.78 मिळणेस पात्र आहेत. मात्र सदरचे चालू खाते असलेने त्यावर व्याज मागणेचा अधिकार तक्रारदारास नाही. तक्रारदार हे 85 वर्षाचे वयोवृध्द इसम असलेने प्रस्तुत रक्कम मागणी करुनही त्यांना ती मिळालेली नाही याचा विचार करता तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास त्यांचे चालू खातेवरील शिल्लक रक्कम रु.41,166.78 पै. (रु.एकेचाळीस हजार एकशे सासष्ट पै.अष्टयाहत्तर फक्त) अदा करावेत. 3) सामनेवालांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबाबत रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |