::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- २३/०४/२०१८)
१. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
२. तक्रारकर्ती हि सेवानिवृत्त मुख्यध्यापिका आहे. विरुद्ध पक्ष क्र २ हे विरुद्ध पक्ष क्र. १ विमा कंपनीचे अभिकर्ता आहे. विरुद्ध पक्ष क्र १चे अधिकारी व वि. प. क्र. २ यांनी तक्रारकर्तीला जिवन सरल या पॉलीसीची माहिती दिल्यानंतर तक्रारकर्तीने ९७४८१००७२ क्रमांकाची जीवन सरल पॉलीसी काढली सदर पॉलीसीची दि. १५.०३.२००५ पासुन सुरुवात झाली असून सदर पॉलीसीचा सुरक्षित परतावा रक्कम रु. ५३,३७२/-असून मृत्यू नुकसान भरपाईची रक्कम हि रु. १,००,०००/- अशी विमा पॉलिसीत नमूद आहे. सदर पॉलिसीची परिपक्वता दिनांक १५/०३/२०१६ ही होती. तक्रारकर्तीने दिनांक १५/०३/२००५ पासून दिनांक १५/०९/२०१५ पर्यंत सर्व प्रिमियमची रक्कम रु. ४८,५२०/-विमा कंपनीकडे जमा केली होती. विरूध्द पक्ष क्र.१ यांनी दिनांक १८/०९/२०१५रोजी पत्रान्वये सुचीत केले की तांत्रिक चुकीमुळे सदर विमा पॉलिसीतील देय रक्कम रु.५३,३७२/- नमूद केली आहे परंतु विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्याला देय रक्कम रू.१५,७९६/- द्यावयाचे आहेत. विरूध्द पक्ष क्र.१ व २ हयांनी तक्रारकर्तीला खोटी माहिती सांगून मुदत पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक चुक झाली असे सांगून तिचे आर्थीक नुकसान करीत आहेत. तक्रारकर्तीने पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्र.१ यांचेकडे बॅंकेच्या खात्याचे क्रमांकासह क्लेम सादर केला होता. परंतु वि.प.क्र.१ यांनी विमादावा रक्कम रू. १८,३९८/-तक्रारकर्तीच्या बचत खात्यात जमा केले. तक्रारकर्तीने विरूध्द पक्षांचे कार्यालयात यासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारकर्तीने दिनांक १/०४/२०१६ रोजी वि.प.क्र.१ व २ यांना पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविला. वि.प.क्र.१ ने सदर नोटीसची पुर्तताही केली नाही व उत्तरही दिले नाही. वि.प.क्र.२ ने सदर नोटीसला उत्तर दिले परंतु त्यांची जबाबदारी नाकारली. विरूध्द पक्ष क्र.१ व २ यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्तीने मंचासमक्ष वि.प.विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, वि.प.ने तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीला पॉलिसीची रक्कम रू. ५३,३७२/-व इतर लाभ व संपूर्ण रकमेवर पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के व्याज विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला द्यावे तसेच शारिरिक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू. १०,०००/- व तक्रारीचा खर्च रू.५,०००/-विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीला द्यावा असे आदेश पारीत करण्यात यावेत अशी विनंती केली.
३. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुद्धपक्षांविरूद्ध नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.१ ने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात नमूद केले की विरूध्द पक्ष क्र.२ हा त्यांचा अभिकर्ता असून तक्रारकर्त्याने सदर अभिकर्त्यामार्फत त्यांचेकडून विवादीत पॉलिसी घेतल्याचे मान्य केले. सदर पॉलिसीमध्ये पुर्णावधीनंतरची देय रक्कम रू. ५३,३७२/-नमूद करण्यांत आल्याचेही त्यांनी मान्य केले आहे, परंतु सदर उल्लेख हा केवळ चुकीने व अनावधानाने टायपींगमधील चुकीमूळे आलेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारीतील उर्वरीत कथन त्यांनी नाकबूल केले असून आपल्या विशेषकथनात नमूद केले की, तक्रारकर्तीने जीवनसरल (नफयासह) पॉलिसी प्लान क्र.१६५-११ दिनांक१५/०३/२००५ पासून सुरू होणारी घेतली होती. प्रिमियम हे सहामाही भरावयाचे होते, परंतु तक्रारकर्तीने शेवटचे प्रिमियम भरलेले नव्हते. जिवनसरल पॉलिसी ही इतर पॉलिसीजपेक्षा वेगळी असून त्यात मुदतीपुर्तीनंतर मिळणारी रक्कम वयानुसार बदलत जाते व कमी वयाचे व्यक्तीस जास्त व जास्त वयाचे व्यक्तीस कमी रक्कम मिळते. तक्रारकर्तीच्या पॉलीसिमध्ये मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम अनावधानाने झालेल्या टायपिंगच्या चुकीमुळे रु. ५३,३७२/-दर्शविले आहे त्याएवजी रु.१५,७९६/-असावयास हवे होते परंतु तक्रारकर्ती सदर अनावधानाने झालेल्या चुकीचा गैरफायदा घेउन मुद्तपूर्तीनंतर रु.५३,३७२/-व्याजासह मागणी करत आहे. प्रस्तुत प्रकरणात नैसर्गीक किंवा अपघाती मृत्यू नाही त्यामुळे मृत्यूदाव्याची व अधिकची रक्कम देय नाही . तक्रारकर्तीस पॉलीसिनुसार रु.१५,७९६/- मॅच्युरीटी रक्कम व लॉयल्टी रक्कम रु.५१३४/- असे एकूण रु.२०,९३०/-देय होते परंतु अर्जदाराने ९/२०१५ चा प्रिमियम दिला नव्हता त्यामुळे प्रिमियमची रक्कम रु. २४२६/-आणि त्यावरील व्याज ११५/-रु. वजा करून १८,३८९रु. अगोदरच तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केलेले आहे. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
४. विरूध्द पक्ष क्र.२ हे प्रकरणात हजर होऊनही त्यांनी लेखी कथन दाखल न केल्याने त्यांचेविरूध्द दिनांक ९/०८/२०१७रोजी लेखी कथनाशिवाय तक्रार पुढे चालविण्यात येते असा आदेश पारीत करण्यांत आला.
५. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र,लेखी युक्तिवाद तसेच विरुद्ध पक्ष क्र. १ चे लेखी म्हणणे, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ती व वि .प.क्र१ यांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरुद्ध पक्ष क्र.१ चे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) तक्रारकर्ती विरूध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? : होय
२) विरूध्द पक्ष क्र १ नी तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा : होय
अवलंब केला आहे काय ?
३) विरूध्द पक्ष क्र १ ने तक्रारकर्तीप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
४) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
६. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्र. १ विमा कंपनीचे अभिकर्ता असलेल्या विरुद्ध पक्ष क्र २ मार्फत ९७४८१००७२ क्रमांकाची जीवन सरल पॉलीसी काढली. व प्रिमियमची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली. सदर बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ती हि विरूध्द पक्षांची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ व ३ बाबत ः-
७. तक्रारकर्तीने विरूध्द पक्षांकडून घेतलेली विवादीत जीवनसरल (नफयासह) पॉलिसी प्लान क्र.१६५-११ ही दिनांक१५/०३/२००५ पासून सुरू झाली होती व सदर पॉलिसीची परिपक्वता दिनांक १५/०३/२०१६ असून पुर्णावधीनंतरची देय रक्कम रू.५३,३७२/- पॉलिसीमध्ये दर्शविली आहे ही बाब विरूध्द पक्ष क्र.१ ने आपल्या लेखी म्हणण्यात मान्य केली आहे. तक्रारकर्तीला विरूध्द पक्षांकडे सदर पॉलिसीचे अर्धवार्षीक प्रिमियम रू.२,४२६/- दिनांक १५/०३/२००५पासून दिनांक १५/०९/२०१५ पर्यंत भरावयाचे होते, परंतु तक्रारकर्तीने दिनांक १५/०९/२०१५ चे शेवटचे प्रिमियम भरलेले नव्हते. तक्रारकर्तीच्या पॉलीसिमध्ये मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम अनावधानाने झालेल्या टायपिंगच्या चुकीमुळे रु. ५३,३७२/-दर्शविले आहे त्याएवजी रु.१५,७९६/-असावयास हवे होते परंतु सदर उल्लेख हा केवळ चुकीने व टायपींगमधील चुकीमूळे आलेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु विरूध्द पक्ष क्र. १ यांनी उपरोक्त पॉलिसीचा कालावधी पूर्ण होत असतांना दिनांक १८/०९/२०१५ रोजी पत्रान्वये तक्रारकर्त्यास सुचीत केले की सदर विमा पॉलिसीतील देय रक्कम रु.५३,३७२/- ही तांत्रिक चुकीमुळे दर्शविण्यांत आलेली असून विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारकर्तीला केवळ रू.१५,७९६/- सम अॅश्युअर्ड देय आहे. परंतु सदर तांत्रिक चूक विरूध्द पक्ष क्र.१ यांना, पॉलिसी निर्गमीत केल्यापासून म्हणजेच दिनांक १५/०३/२००५ पासून तब्बल १० वर्षांनी आणी तेही पॉलिसी देय होण्याच्या केवळ ६ महिने आधी निदर्शनांस आली व तसे त्यांनी तक्रारकर्तीस उपरोक्त पत्रान्वये कळवून तक्रारकर्तीस पॉलीसितील नमूद देय रक्कम न देता केवळ रु.१५,७९६/- मॅच्युरीटी रक्कम व लॉयल्टी रक्कम रु.५१३४/- असे एकूण रु.२०,९३०/-देय केली व सदर रक्कम देतांना तक्रारकर्तीने न दिलेला ९/२०१५ चा प्रिमियम रक्कम रु. २४२६/-आणि त्यावरील व्याज रु.११५/-असे एकूण २५४१ वजा करून रु. १८,३९८/- तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केले. विमा पॉलिसीचा करार हा उभय पक्षातील करार असून त्यातील अटी व शर्ती हया उभय पक्षांवर बंधनकारक असतात. उपरोक्त पॉलिसीमध्ये सम अॅश्युअर्ड रक्कम रू.५३,३७२/- नमूद आहे व सदर पॉलिसी ही २००५ मध्ये निर्गमीत झाली असल्यामुळे सदर करारातील अटींमध्ये विरूध्द पक्ष क्र.१ विमा कंपनी एकतर्फी बदल करू शकत नाही. सदर विमापॉलिसीतील सदर अट ही निसंदीग्ध असून पॉलिसी घेण्याबाबत ग्राहकाच्या निर्णयावर आमुलाग्र परिणाम करणारी असल्यामुळे सदर चूक अनावधानाने झाली असल्यांस विमा कायद्याचे कलम ४५ अन्वये सदर चुक पॉलिसी निर्गमीत केल्यापासून ३ वर्षांचे कालावधीत विरूध्द पक्ष क्र.१ यांनी दुरूस्त करणे आवश्यक होते. परंतु वि.प.क्र.१ यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे त्यांना तब्बल १० वर्षानंतर पॉलिसीतील सम अॅश्युअर्डबाबत महत्वाचे अटीत बदल करून स्वतःचे चुकीचा लाभ उचलता येणार नाही असे मंचाचे मत आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक न्यायनिवाडयांमध्ये हेच न्यायतत्व अधोरेखीत केले आहे. त्यामुळे पॉलिसीत नमूद अटींनुसार विरूध्द पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्त्यांस पुर्णावधीची देय रक्कम रू.५३,३७२/- न देवून तक्रारकर्तीप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी दिली हे सिद्ध होते. वि.प.क्र.१ यांनी तक्रारकर्तीस सदर रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्तीस शारिरीक व मानसीक त्रास झाला असून तक्रारकर्ती पॉलिसीतील फरकाची रक्कम तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी उचीत नुकसान-भरपाई मिळण्यांस देखील तक्रारकर्ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
वि.प.क्र.२ यांनी केवळ अभिकर्ता म्हणून विमा पॉलिसी काढली असल्याने विरूध्द पक्ष क्र.२ हे तक्रारकर्तीस कोणतीही रक्कम देण्यांस जबाबदार नाहीत.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
८. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रारकर्तीची तक्रार क्र.११२/२०१६ अंशतः मंजूर करण्यात येते.
(२) विरूध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्तीला जीवन सरल पॉलीसी क्रमांक ९७४८१००७२ ची सुरक्षित परतावा रक्कम रु. ५३,३७२/- देय करून त्यातून पुर्वी तक्रारकर्तीला दिलेली रक्कम रू.२०,९३०/- वजा करून उर्वरीत रक्कम तक्रारकर्तीस द्यावी व सदर रकमेवर पॉलिसीची परिपक्वता दिनांक १५/०३/२०१६पासून तक्रारकर्तीस रक्कम प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे.१०% टक्के दराने व्याज तक्रारर्तीस द्यावे.
(३) विरूध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्तीला शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान
भरपाई व तक्रार खर्च अशी एकत्रीत रक्कम रू.१५०००/- तक्रारकर्तीस द्यावे.
(४) उपरोक्त आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांचे आंत
करण्यांत यावी.
(५) विरूध्द पक्ष क्र.२ विरूध्द कोणताही आदेश नाही.
(६) ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १४ (फ)अंतर्गत विरूध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीला निर्देश देण्यांत येतात की त्यांनी भविष्यात अशी अनुचीत व्यापार पध्दती अवलंबीली जाणार नाही व त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.
(७) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – २३/०४/२०१८
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष