-- आदेश --
(पारित दि. 10-08-2007)
द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा -
श्रीमती श्यामकला मोहन उके यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1. त.क.यांचे पती मृतक मोहन सिताराम उके हे विजय ट्रान्सपोर्ट गैरेज, तिरोडा येथे हमालीचे काम करीत होते व त्यांच्याकडे वि.प.क्रं. 2 हे पॉलिसी विकण्याकरिता गेले असता त.क.यांचे पती मोहन उके यांनी त्यांच्याकडून एक पॉलिसी घेतली. पॉलिसीचा क्रं. 974569408 असा होता तर विमा रक्कम ही रुपये 40,000/- अशी होती. या पॉलिसीचा कालावधी दि. 15.02.04 ते 24.02.29 असा असून विमा हप्ता हा रुपये 657/- असा होता.
2. पॉलिसी धारक हे वि.प.क्रं. 2 श्री. दुर्योधन पाटील (अभिकर्ता) यांच्याकडे विमा हप्त्याची रक्कम देत होते व वि.प.क्रं. 2 हे वि.प.क्रं. 1 यांच्याकडे ती रक्कम जमा करीत होते. विमा हप्त्याची रक्कम ही देय तारखेच्या 10-15 दिवस अगोदर वि.प.क्रं. 2 यांच्याकडे दिली जात होती.
3. त.क.यांचे पती मोहन उके दि.13.01.06 रोजी रात्री 3.00 वाजता ट्रक क्रमांक एम.एच.35/1051 वर सामान लोडींग करुन, दोर कसत असतांना दोर अचानक तुटल्यामुळे ट्रक वरुन, दुसरा हमाल डोक्यावर पडल्याने त्यांना जखम झाली व मेडिकल कॉलेज मध्ये भरती केल्यावर दि. 14.01.06 ला त्यांचा दवाखान्यात मृत्यु झाला. सदर प्रकरणी नागपूर येथील लकडगंज पोलिसांनी मर्ग क्रं. 3/06 प्रमाणे नोंद करुन चौकशी केली.
4. त.क.यांचे पती यांनी पॉलिसीचा विमा हप्ता दिनांक 15.11.05 च्या देय तारखेच्या 15-20 दिवसा पूर्वीच वि.प.क्रं. 2 यांच्याकडे जमा केला. वि.प.2 यांना दि. 14.01.06 ला त.क.यांचे पती अपघातामुळे मरण पावले याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर रक्कम दि. 16.01.06 ला वि.प.क्रं. 1 यांच्याकडे जमा केली.
5. पॉलिसी धारक मृत्यु पावल्यामुळे वि.प.क्रं. 2 यांनी विमाकृत रक्कम मिळण्याबाबत त.क.यांच्याकडून क्लेम फॉर्म भरुन पॉलिसी व इतर कागदपत्र वि.प.क्रं. 1 यांच्या कार्यालयात जमा केले. तक्रारकर्त्या या 7-8 वेळा वि.प.यांच्याकडे गेल्या परंतु वि.प.यांनी त.क.यांना विमाकृत रक्कम दिली नाही. वि.प.क्रं. 1 यांनी त.क.यांना दि. 27-02-07 रोजी त.क.यांनी मागणी केल्यानंतर पॉलिसी स्टेटस रिपोर्ट दिला व त्यात विमा हप्ता रक्कमेचा भरणा पॉलिसी धारकाच्या मृत्युनंतर केला असल्यामुळे विमाकृत रक्कम देण्यात येणार नाही असे पॉलिसी स्टेटस रिपोर्ट मध्ये लिहून दिले.
6. वि.प.यांनी पॉलिसीची रक्कम न देणे ही त्यांच्या सेवेतील न्यूनता आहे असे त.क. म्हणतात. त.क.यांनी मागणी केली आहे की, विमा दावा रक्कम रुपये 80,000/- व त्यावर नियमानुसार बोनस रु.5000/- दि. 14.01.06 ते सदर रक्कम प्राप्त होत पर्यंत 12%व्याजासह त.क.यांना मिळण्याचा आदेश व्हावा, त.क.यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 12,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च वि.प.यांच्याकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
7. वि.प.क्रं. 1 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 9 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, विमा पॉलिसी ही तुमसर, जि. भंडारा येथून घेण्यात आल्यामुळे विद्यमान न्याय मंचास ही ग्राहक तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. वि.प.यांनी विमा दावा नाकारल्या नंतर त.क.यांनी क्लेम Review Committee Zonal Office Mumbai येथे अर्ज द्यावयास पाहिजे होता. पॉलिसी अस्तित्वात येण्याची तारीख ही 15.02.04 अशी आहे. पॉलिसी धारक यांना वर्षातून चार वेळा विमा हप्ते भरावयाचे होते. मृतक मोहन उके यांनी ऑगस्ट -05 पर्यंत विमा हप्ता भरलेले आहेत. नोव्हेबंर -05 चा विमा हप्ता हा त्यांनी भरलेला नव्हता, जेव्हा की, दि.14.01.06 रोजी त्यांचा मृत्यु झाला, ग्रेस पिरियेड हा फक्त दि.14.12.05 पर्यंत होता. ग्रेस पिरियेड मध्ये विमा हप्ता न भरल्यामुळे पॉलिसी ही संपुष्टात आली. नोव्हेबंर – 5 चा विमा हप्ता हा विमा धारकाच्या मृत्युनंतर म्हणजेच दि. 16.01.06 रोजी भरण्यात आला, त्यावेळी पॉलिसी ही अस्तित्वात नसल्यामुळे त.क.यांचा विमा दावा नाकारण्यात आला. अभिकर्ता यांना ग्राहकाकडून विमा हप्ता जमा करण्याचा अधिकार नाही. अभिकर्ता यांच्या चुकिसाठी वि.प.क्रं. 1 यांना जबाबदार धरता येऊ शकत नाही. वि.प.क्रं. 1 यांनी योग्य त्या कारणासाठी विमा दावा नाकारला असल्यामुळे त.क.यांची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
8. वि.प.क्रं. 2 यांना दि. 24.05.07 रोजी विद्यमान न्याय मंचाचा नोटीस प्राप्त झाला . परंतु ते विद्यमान न्याय मंचासमोर हजर झाले नाही व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा दिले नाही, त्यामुळे दि. 16.07.07 रोजी त्यांच्या विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
कारणे व निष्कर्ष
9. त.क व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र , इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, त.क.यांचे पती श्री.मोहन उके यांना दि.13.01.2006 रोजी अपघात झाला होता व दि. 14.01.2006 रोजी त्यांचा दवाखान्यात मृत्यु झाला. मृतक मोहन उके यांनी ऑगस्ट-05 पर्यंतचे विमा हप्ते भरले होते व नोव्हेबंर -05 चा विमा हप्ता भरण्यासाठी एजंट वि.प.क्रं. 2 यांच्याजवळ विमा हप्त्याची रक्कम दिली होती. दि. 14.01.06 रोजी मोहन उके यांचे निधन झाल्यानंतर वि.प.क्रं. 2 यांनी दि.16.01.06 रोजी ती रक्कम वि.प.क्रं. 1 यांच्याकडे जमा केली.
10. वि.प.क्रं. 1 यांनी मृतक मोहन उके यांना प्रिन्टेड पत्र पाठविले होते. त्यावर पोस्टाची तारीख स्पष्ट आहे, त्यात शेवटचा हप्ता हा दि.15.11.05 रोजीचा भरल्याचे दाखविले आहे तर दि.15.02.2006 चा हप्ता भरावयाचा आहे असे यात नमूद केले आहे. जेव्हा की, श्री.मोहन उके यांचा दि.16.01.2006 रोजी मृत्यु झाला होता. तसेच या पत्रात ग्रेस पिरियेड दि.15.09.2006 पर्यंत असलयाचे दर्शविले आहे.
11. दि.27.02.07 रोजी वि.प.क्रं. 1 यांच्या तर्फे त.क. यांना देण्यात आलेल्या स्टेटस रिपोर्ट मध्ये पॉलिसी ही कालातीत झाल्याचा कुठेही उल्लेख नाही.
12. मृतक श्री. मोहन उके यांनी नोव्हेबंर 05 चा शेवटचा हप्ता भरलेला नव्हता तरी सुध्दा त्यांचा मृत्यु हा ग्रेस पिरियेडमध्ये झाल्याचे दिसून येते व दि. 27.02.07 चा स्टेटस रिपोर्ट दर्शवितो की, पॉलिसी ही कालातीत नाही.
13. पॉलिसीच्या कलम – 10(2)(ब) या मध्ये असे नमूद केले आहे की, जर कां पॉलिसी धारकाला अपघात झाला असेल व त्या एकमेव कारणासाठी त्याचा अपघाताच्या तारखेपासून 180 दिवसाच्या आत मृत्यु झाला असेल तर पॉलिसी रक्कमेच्या एवढीच अधिक रक्कम वि.प. यांना द्यावी लागते. सदर प्रकरणात श्री. मोहन उके यांना दि.13.01.06 रोजी अपघात झाला व त्या अपघातात झालेल्या जखमेमुळे त्यांचा दि. 14.01.06 ला मृत्यु झाला, त्यामुळे त.क. या विमा रक्कमे एवढीच अधिक रक्कम (रुपये 40000/- + 40000 = 80000) मिळण्यास पात्र आहेत.
14. त.क.यांनी II (2003) सी.पी.जे. 41 हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे. तर वि.प.यांनी ए.आय.आर.2000 सुप्रिम कोर्ट 43 व I (1994) सी.पी.जे. 95, एन.सी. हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहेत. वि.प.यांनी दाखल केलेले केस लॉ यातील तथ्य व परिस्थिती भिन्न असल्यामुळे सदर तक्रारीस लागू होत नाही.
15. श्री. मोहन उके यांचा ग्रेस पिरियेड मध्ये मृत्यु झालेला असून सुध्दा त.क.यांना पॉलिसीची लाभासह रक्कम न देऊन वि.प.क्रं. 1 यांनी त.क.यांना न्यूनता पूर्ण सेवा दिली आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येते की,..........
आदेश
1. वि.प.क्रं. 1 यांनी त.क.यांना रुपये 80,000/- ही रक्कम दि. 27.02.07 पासून म्हणजेच विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून ती रक्कम त.क. यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह द्यावी. तसेच नियमानुसार पॉलिसीचे इतर लाभ द्यावे.
2. वि. प.क्रं.1 यांनी त.क.यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
3. आदेशाचे पालन वि.प.क्रं. 1 यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे. अन्यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम-27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.