ग्राहक तक्रार क्र. : 181/2014
दाखल तारीख : 16/09/2014
अर्ज निकाल तारीख : 19/09/2015
कालावधी : 01 वर्षे 0 महिने 03 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. नंदकुमार दत्तात्रय मैंदरकर,
वय-65 वर्षे, धंदा – निवृत्ती वेतनधारक,
रा.यशवंत नगर, तांबरी विभाग, उस्मानाबाद,
ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह
क्रेडिट सोसायटी लि., शाखा, उस्मानाबाद.
2. सर व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी कल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह,
क्रेडिट सोसायटी लि., मुख्य कार्यालय,
पुनम चेंबर्स, बँक स्ट्रीट, नवीपेठ, जळगाव ...विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र. अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.देविदास वडगावकर.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस. कोचेटा.
न्यायनिर्णय
मा. प्र. अध्यक्ष सौ.विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार उस्मानाबाद यंथील रहिवाशी असून ते सेवानिवृत्त आहेत. तक्रारदाराने विप कडे ठेवी ठेवल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. | पावती क्र. | देय रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक |
1. | 0437945 | रु.16,950/- | 04/06/2014 | 04/06/2015 |
2. | 0437483 | रु.67,800/- | 26/02/2014 | 26/02/2015 |
3. | 0525117 | रु.11,000/- | 02/01/2014 | 02/01/2015 |
4. | 0525467 | रु.15,000/- | 25/03/2014 | 25/03/2015 |
त्याचप्रमाणे दि.30/06/2014 रोजी रक्कम रु.21,511/- एवढी शिल्लक आहे. अर्जदाराने आपल्या घराची दुरुस्ती व नवीन बांधकाम करण्यासाठी दि.28/08/2014 रोजी वरील रक्कम काढण्यास विनंती केली असता विप ने रक्कम देण्यास टोलवाटोलवी केली. म्हणून तक्रारदाराने विप स नोटीस पाठविली असता विप ने घेण्यास नकार दिला. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत वर नमूद केलेल्या रक्कमेच्या ठेवीच्या पावत्या क्र.0437945, 0437483, 0525117, व पासबूक खाते क्र.NDM1 खाते उतारा दाखल केला आहे व घरबांधकामासाठी ठेकेदाराबरोबर केलेला करार देखील दाखल केला आहे. त्याचप्रमाणे दि.16/09/2014 रोजीच्या अंतरीम अर्जात विप यांच्याकडून रु.1,00,000/- ची घरबांधकामासाठी अत्यंत आवश्यकता असल्याने अंतरीम आदेशा अंतर्गत मिळण्याची मागणी केली आहे. त्यावर मा. मंचाने अर्जदाराचा अंतरिम अर्ज पारीत केला मात्र विप यांनी सदर रक्कम अदयाप अदा केली नसल्याचे म्हणणे आहे महणून सदची रक्कम व्याजासह मिळावी अशी विनंती केली आहे.
सदर तक्रारीबाबत विप क्र.1 यांना नोटीस पाठविली असता त्यांनी वकील पत्र दाखल केले मात्र आपले म्हणणे दाखल न केल्याने अखेर दि.01/01/2015 रोजी त्यांच्या विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला.
सदर तक्रारीबाबत विप क्र.2 यांना जाहीर नोटीस वदारे कळविले असता त्यांनी आपले म्हणणे दाखल न केल्याने दि.13/08/2015 रोजी त्यांचे विरुध्द एक्सपाटी आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 ते 3
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज ठेव गरज असल्याने मागणी करुनही मुदत संपुनही मिळालेली नाही म्हणून दाखल केली आहे. सदर तक्रारीबाबत तक्रारदार यांनी दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे नाव असलेले खालील पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे आढळून येतो.
अ.क्र. | पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक | मुदती नंतरची रक्कम |
1. | 0437945 | रु.15,000/- | 04/06/2014 | 04/06/2015 | रु.16,950/- |
2. | 0437483 | रु.60,000/- | 26/02/2014 | 26/02/2015 | रु.67,800/- |
3. | 0525117 | रु.11,000/- | 02/01/2014 | 02/01/2015 | रु.12,430/- |
4. | 0525467 | रु.15,000/- | 25/03/2014 | 25/03/2015 | रु.16,950/- |
एकूण रक्कम रु.1,01,000/- रु.1,15,130/- |
सदर ठेवींना व्याजदर 13 टक्के दर्शविलेला आहे. तक यांनी गुंतवलेली एकूण रक्कम रु.1,01,000/- असून देय रक्कम रु.1,15,130/- आहे. सदर पावत्यांवर विप पतसंस्थेचे नाव व क्लार्क, कॅशियर व मॅनेजर यांच्या सहया आहेत. तसेच तक यांनी दाखल केलेल्या पासबुकावर तक यांचा फोटो असून विप बँकेचा शिक्का आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊन त्यांनी आपले म्हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्हणून विप क्र.1 विरुध्द दि.01/01/2015 रोजी नो से आदेश व विप क्र.2 विरुध्द जाहीर नोटीस देऊनही हजर न झाल्याने व म्हणणे न दिल्याने दि.13/08/2015 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तसेच अंतरिम अर्जाची अंमलबजावणीही केली नाही किंवा त्याबाबत आपले म्हणणे ही दिले नाही. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित न राहण्याचे व आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच विप कडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराची एकूण मुदत ठेव पावती नुसार 13 टक्के व्याजासह
मुदतपुर्ती नंतर होणारी तक क्र.1 यांची रु.1,15,130/- (रुपये एक लक्ष पंधरा हजार तीस
फक्त) देय दिनांका पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेच्या 30 दिवसात
द्यावेत.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
(तक्रारीच्या) खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.