ग्राहक तक्रार क्र. 236/2014
दाखल तारीख : 07/11/2014
निकाल तारीख : 01/07/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. राहूल नरेंद्र गांधी,
वय - वर्ष, धंदा – शेती,
रा.गुजर गल्ली, जैन मंदीर जवळ, उस्मानाबाद.
ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट,
को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.
शाखा उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्यूलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.मुदकन्ना.
विरुध्द पक्षकार तर्फे विधिज्ञ : श्री.एस.बी.कोचेटा.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) विरुध्द पक्षकार (विप) क्रेडीट सोसायटीकडे मुदत ठेव ठेवली तिची रक्कम मुदत संपल्यानंतर परत न देऊन विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक हा उस्मानाबादचा रहिवाशी असून शेती व्यवसायीक आहे. विप हे जळगांव येथील क्रेडीट को. ऑप सोसायटी असून तिची शाखा उस्मानाबाद येथे आहे. तक चे विप कडे बचत खाते आहे. तक ने दि.19/04/2014 रोजी विप कडे सुवर्ण लक्ष्मी मासीक प्राप्ती योजने अंतर्गत रु.51,500/- मुदत ठेव म्हणून ठेवली. ठेवीची मुदत दि.19/01/2015 पर्यंत होती. मुदतीमध्ये व्याजाची रक्कम रु.2,800/- झाली. तक ने विप कडे मासिक व्याजाच्या रकमेची मागणी केली. मात्र विप ने रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे दि.28/10/2014 रोजी तक ने विप कडे ठेवीची संपूर्ण रक्कम देय व्याजासह मागितली मात्र विप ने त्यास नकार दिला. तक ला ठेवीची रक्कम व्याजासह मिळाली नाही म्हणून झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.30,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळणे जरुर आहे ते मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दि.07/11/2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने दि.19/04/2014 रोजी त्यात ठेवपावतींची प्रत हजर केली आहे. विप कडील सेव्हींग बँकेचे पासबुक यामध्ये मासिक व्याजाच्या रकमा जमा होऊन शिल्लक रु.2,800/- झाले त्याची प्रत हजर केली आहे.
ब) याकामी विप तर्फे अॅड. कोचेटा यांनी वकीलपत्र दिले. मात्र विप ने लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
क) तक ची तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहे.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. विप ने दिलेल्या मुदत ठेव पावतीप्रमाणे तक ने दि.19/04/2014 रोजी रु.51,500/- नऊ महिन्यासाठी मुदत ठेव म्हणून विप कडे ठेवले व्याजाचा दर 11.65 टक्के असा होता. सेव्हींग पासबूकाप्रमाणे दि.30/04/2014 रोजी व्याजाची रक्कम रु.200/- जमा झाल्याचे दिसते. त्यानंतर दरमहा व्याजाची रक्कम रु.500/- सप्टेंबर 2014 पर्यंत जमा झाल्याचे दिसते. तक चे म्हणणे आहे की त्याने व्याजाची रक्कम विप कडे मागितली असता विप ने ती रक्कम दिली नाही. वास्तवीक सेव्हिंग अकांऊटमधील रक्कम मागितल्यावर त्वरीत देणे हे विप चे कर्तव्य होते. तक चे त्यामुळे म्हणणे आहे की त्याची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर त्याने दि.28/10/2014 रोजी व्याजासह ठेवीची संपूर्ण रक्कम विप कडे मागितली. जरी त्या वेळी मुदत संपली नव्हती तरी आता ठेवीची मुदत संपलेली आहे. अद्यापही विप ने तक ची रक्कम परत केलेली नाही. तसेच कराराप्रमाणे व्याजाची रक्कम देय असतांना विप ने टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी केली त्यामुळे तक अनुतोषास पात्र आहे. म्हणून मी मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विप ने तक ला मुदत ठेव रक्कम रु.51,500/- (रुपये एक्कावन्न हजार पाचशे फक्त) व्याजासह द्यावे.
2) विप ने तक ला वरील रक्कम मुदतपुर्ती तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे.
3) विप ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..