ग्राहक तक्रार क्र. 33/2015
दाखल तारीख : 08/01/2015
निकाल तारीख : 01/08/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भारत मुरलीधर मसलेकर,
वय – 66 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा.श्रीराम मंदिराजवळ, समर्थनगर,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखाधिकारी / व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह,
क्रेडिट सोसायटी लि., जळगाव शाखा, उस्मानाबाद,
मारवाडी गल्ली, महाराष्ट्र बँकेजवळ, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.ए.पाथरुडकर.
विरुध्द पक्षकारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) अर्जदार क्र.1 व 3 हे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे. विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे खाली दिलेल्या तक्याप्रमाणे मुदत ठेवली आहे. सदर मुदत ठेव रक्कम गरज पडल्यामुळे मुदतीनंतर मिळणेची विनंती केली असता विप ने देण्यास टाळाटाळ केल्याने विप ने ती रक्कम परत न देऊन सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
तक यांच्या म्हणण्या प्रमाणे विप यांच्याकडे खालीलप्रमाणे मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत.
अ.क्र. | पावती क्र. | रक्कम | व्याज दर | मुदत पुर्तीची रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक |
01 | 0948412 | रु.16,000/- | 13% | रु.18,080/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
02 | 0948413 | रु.17,000/- | 13% | रु.19,210/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
03 | 0948414 | रु.17,000/- | 13% | रु.19,210/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
तक यांना आपआपल्या वेगवेगळया वैयक्तिक कारणा करीता पैशाची गरज असल्याने विप कडे मुदतीनंतर सदर रक्कम विप पतसंस्थेस ठेव परत मिळण्याबाबत अनेकदा विनंती केली असता त्यांना सदर रक्कम परत देण्यास सदर पतसंस्था विप ने टाळाटाळ केली व म्हणून तक ने दि.17/12/2014 रोजी विधीज्ञामार्फत नोटीस देऊन सदर रकमेची मागणी केली मात्र विप ने सदर नोटीस स्विकारुनही उत्तर दिले नाही तसेच रक्कमही परत दिली नाही. म्हणून तक स झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी व नोटीस खर्चापोटी रु.10,000/-, तसेच ठेव रक्कम मुदतीनंतरची रु.56,500/- दि.27/08/2014 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- अशी एकूण सर्व रक्कम विप कडून मिळावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत मुदत ठेवीची पावती क्र.0948412, 0948413, 098414 विप स पाठविलेली नोटीस, नोटीस मिळाल्याच्या पावत्या, ई. कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
सदर तक्रारीबाबत विप यांना नोटीस पाठविली असता त्यांनी हजर होऊन म्हणणे दाखल न केल्याने दि.21/04/2015 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 ते 3
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज ठेव गरज असल्याने मागणी करुनही मुदत संपुनही मिळालेली नाही म्हणून दाखल केली आहे. सदर तक्रारीबाबत तक्रारदार यांनी दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे नाव असलेले खालील पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे आढळून येतो.
अ.क्र. | पावती क्र. | रक्कम | व्याज दर | मुदत पुर्तीची रक्कम | ठेव ठेवल्याची दिनांक | ठेवीची मुदत संपणारी दिनांक |
01 | 0948412 | रु.16,000/- | 13% | रु.18,080/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
02 | 0948413 | रु.17,000/- | 13% | रु.19,210/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
03 | 0948414 | रु.17,000/- | 13% | रु.19,210/- | 27/08/2013 | 27/08/2014 |
सदर ठेवींना व्याजदर 13 टक्के दर्शविलेला आहे. गुंतवलेली एकूण रक्कम रु.50,000/- असून देय रक्कम रु.56,500/- आहे. सदर पावत्यांवर विप पतसंस्थेचे नाव व क्लार्क, कॅशियर व मॅनेजर यांच्या सहया आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊन त्यांनी आपले म्हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्हणून दि.21/04/2015 रोजी विप विरुध्द एक्सपार्टी आदेश पारीत करण्यात आला. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित न राहण्याचे व आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच त्यांच्याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराची एकूण मुदत ठेव पावती नुसार 13 टक्के व्याजासह
मुदतपुर्ती नंतर होणारी एकूण रक्कम रु.56,500/- (रुपये छप्पन्न हजार पाचशे फक्त)
दि.08/01/2015 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात
द्यावेत.
विप यांनी वरील रक्कम 30 दिवसात परत न केल्यास होणा-या एकूण रकमेवर त्या
नंतरच्या कालाधीकरीता द.सा.द.शे.12 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत
द्यावी.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व
कागदपत्राच्या (तक्रारीच्या) खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.