(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 31/01/2014)
- तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे...
तक्रारकर्तीचा एकमेव मुलगा नामे तानाजी शेषराव रेवतकर याने विरुध्द पक्ष बँक ऑफ महाराष्ट्र, नरेंद्रनगर शाखा, नागपूर येथे रु.40,000/- दि.02.05.2000 रोजी एफ.डी.आर. क्र.85530 प्रमाणे मुदत ठेवीत ठेवले होते. सदर ठेव द.सा.द.शे.10% प्रमाणे व्याजाने दि.02.08.2003 ला मुदतपूर्तीनंतर देय होती.
2. तक्रारकर्तीचा मुलगा 2002 साली यवतमाळ येथे कामास जातो म्हणून घराबाहेर पडला आणि आठवडयाभर काम केल्यावर नागपूर येथे येण्यासाठी बसमध्ये बसला, परंतु तो नागपूर येथे कधीही पोहचला नाही. तक्रारकर्ती व तिच्या पतीने मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिस स्टेशन, वर्तमान पत्रात व रेडिओवर तक्रार वजा जाहिरात दिली पण आजपावेतो तानाजीचा ठावठिकाणा लागला नाही.
3. तक्रारकर्तीने तानाजीच्या नावे विरुध्द पक्षाकडे असलेली रु.40,000/- ची ठेवीची रक्कम मागितली असता त्यांनी न्यायालयाचा आदेश आणल्याशिवाय रक्कम मिळणार नसल्याचे कळविले. तक्रारकर्ती व तिच्या पतीने नागपूर येथील दिवाणी न्यायालयात दावा क्र.488/2011 घोषणेसाठी दाखल केला. त्यात तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी याचा 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी शोध घेऊनही पत्ता लागला नाही म्हणून त्यास मृत झाला असे जाहीर करण्यांत आले. सदर आदेशाच्या आधारे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे तानाजीचे नावे असलेल्या मुदत ठेवीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला असता त्यांनी तक्रारकर्तीस ठेवीची मुदतपर्ती रक्कम रु.55,140/- व मुदतपूर्तीनंतर तक्रारकर्तीस रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीचे द.सा.द.शे.4% प्रमाणे व्याजाची रक्कम रु.18,767/- चे भुगतान केले.
4. तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, मुदतपूर्तीनंतरही तानाजीची वरील रक्कम बँकेकडेच राहील्यामुळे सदर रकमेवर मुळ ठेवीच्या व्याज दराप्रमाणे द.सा.द.शे.10% व्याज मिळणे आवश्यक आहे. परंतु विरुध्द पक्षाने तसे व्याज दिले नसल्यामुळे मुदतपूर्तीची रक्कम रु.55,140/- वर द.सा.द.शे.10% प्रमाणे चक्रवाढ व्याज पूर्नगुंतवणूकीच्या नियमानुसार देण्याचे विरुध्द पक्ष बँकेला निर्देश द्यावे तसेच मानसिक त्रासाबाबत रु.5,000/- आणि तक्रारीच्या खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केलेली आहे.
5. मंचातर्फे विरुध्द पक्षाला नोटीस पाठविल्यानंतर विरुध्द पक्षाने आपले लेखीउत्तर दाखल करुन तक्रारीतील मुद्दे नाकबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी याने त्यांचेकडे दि.02.05.2000 रोजी रु.40,000/- मुदत ठेवीत ठेवली होती व त्यावर द.सा.द.शे.10% प्रमाणे परिपक्वता तारीख 02.08.2003 पर्यंत रु.55,140/- व्याजासह दिलेले आहे. परिपक्वता दिनांकानंतर बँकेकडे जी रक्कम देय होती त्यावर आर.बी.आय.च्या नियमानुसार द.सा.द.शे.4% सरळ व्याजाने तक्रारकर्ती रु.18,767/- व्याजाची रक्कम मिळून एकूण रु.73,970/- अदा केलेले आहे. तक्रारकर्तीची मागणी अवास्तव व चुकीची असल्याने ती खारिज करण्यांत यावी अशी विनंती केलेली आहे.
6. प्रकरणाच्या निर्मीतीसाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले, त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
- विरुध्द पक्षाने मुदत ठेवीदार असलेल्या तक्रारकर्त्याप्रती
- सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
7. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी याने विरुध्द पक्ष बँकेकडे दि.21.05.2000 रोजी रू.40,000/- ची मुदत ठेव द.सा.द.शे.10% व्याजा प्रमाणे ठेवली होती व त्या ठेवीची परिपक्वता दि.02.08.2003 रोजी मुल्य रु.55,140/- होते याबाबत उभय पक्षांत वाद नाही. तक्रारकर्त्याने ठेवीच्या पावतीची झेरॉक्स प्रत दस्त क्र. 4 वर दाखल केले आहे.
8. तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी शेषराव रेवतकर हा 2000 साली घरुन निघून गेला आणि 7 वर्षांचा कालावणी होऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला असे घोषणापत्र होण्यासाठी तक्रारकर्ती व तिचे पती शेषराव यांनी बारावे सत्र दिवाणी न्यायाधिश कनिष्ठस्तर, नागपूर यांचे न्यायालयात दाखल क्र.488/2011 दाखल केला होता. त्याचा निकाल दि.01.11.2011 रोजी होऊन तानाजीचा मृत्यू झाला असे घोषणापत्र करण्यांत आले. सदर निर्णयाची प्रत तक्रारकर्त्याने दस्तावेज यादी दि.07.04.2012 सोबत दस्त क्र.2 वर दाखल केलेली आहे. दिवाणी न्यायालयाचे वरील निर्णयानंतर तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे दि.31.01.2012 रोजी मयत तानाजीची वारस म्हणून त्याचे नावाने असलेले एफ.डी.आर. नं.85530 चे दि.02.05.2000 ची देय रक्कम मिळावी म्हणून अर्ज सादर केला, सदर अर्जाची प्रत तक्रारकर्तीने दस्त क्र. 1 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने वरील मुदत ठेवीची परिपक्वता रक्कम रु.55,140/- आणि परिपक्वता दिनांकापासून दि.06.02.2012 पर्यंत द.सा.द.शे.4% प्रमाणे परिपक्वता रकमेवर व्याज रु.18,767/- असे एकूण रु.73,907/- तक्रारकर्तीचे खात्यात दि.06.02.2012 रोजी जमा केले. सदर रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारकर्तीने जमा झालेल्या रकमेबाबतचा हिशोब पुरविण्यासाठी दि.01.03.2012 रोजी विरुध्द पक्षास दस्त क्र.5 प्रमाणे नोटीस पाठविला. सदर नोटीसला विरुध्द पक्षाने दि.07.03.2012 रोजी उत्तर पाठविले ते दस्त क्र.6 वर आहे. सदर पत्र मिळाल्यानंतर तिला देण्यांत आलेले व्याज ठेवीच्या व्याज दराप्रमाणे देण्यांत आले नसुन बचत खात्याच्या व्याज दराप्रमाणे देण्यांत आले आहे. याची माहिती झाली आणि सदर व्याज कमी दराने देण्यांत आले आहे ते मुळ ठेवीच्या व्याज दराप्रमाणे द.सा.द.शे.10% प्रमाणे मिळावे म्हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार दाखल केली आहे.
9. तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. मेश्राम यांनी आपल्या युक्तिवादात असे प्रतिपादन केले आहे की, तानाजी याने ठेवलेले रु.40,000/- ची मुदत ठेव 3 वर्षांसाठी ठेवली होती. सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर त्या ठेवीचे परिपक्वतामुल्य ठेवीदाराने परत नेले नाही म्हणून ती ठेव विरुध्द पक्षाने मुळ ठेवीच्या अटी व शर्तींप्रमाणे नुतणीकृत करावयास पाहिजे होते. म्हणजेच रु.55,140/- पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी द.सा.द.शे.10% प्रमाणे दराने मुदत ठेवीत ठेवावयास पाहिजे होते. आणि त्याप्रमाणे पुढील कालावधीसाठी परिपक्वता रकमेची पूर्नगुंतवणूक करावयास पाहिजे होती. परंतु विरुध्द पक्षाने मुदत पुर्तीची रक्कम रु.55,140/- वर दि.02.08.2003 नंतर द.सा.द.शे.4% प्रमाणे सरळ व्याज आकारणी करुन रक्कम अदा केलेली आहे. ही विरुध्द पक्षाने ठेवीदाराप्रती अवलंबिलेली सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दत आहे. आपल्या युक्तिवादाचे पृष्ठयर्थ तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी “Automatic Renewal of Term Deposit”, संबंधात मार्गदर्शक नियमावली दाखल केलेली आहे. त्यात खालिल प्रमाणे आपोआप पूर्नगुंतवणूकीबाबत तरतूदी आहेत...
Premature termination of Term Deposits and payment of interest/ other issues relaying to Term Deposits Accounts.
- Payment of interest in case of term deposit accounts of deceased depositor(s)
In case of a term deposit standing in the name/s of –
- a deceased individual depositor, or
- two or more joint depositors, where one of the depositors has died, interest shall be paid in the manner indicated below.
- on the maturity of the deposit:
at the contracted rate
- In case of deposit being claimed after the date of maturity.
In the event of death of the depositor before the date of maturity of the deposit and the amount of the deposit is claimed after the date of maturity, the bank shall pay interest at the contacted rate till the date of maturity. From the date of maturity to the date of payment, the bank shall pay simple interest at the applicable rate operative on the date of maturity, for the period for which the deposit remained with the bank beyond the date of maturity.
However, in the case of death of the depositor after the date of maturity of the deposit the bank shall pay interest at savings deposit rate operative on the date of maturity from the date of maturity till the date of payment.
10. याउलट विरुध्द पक्षांच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात असे प्रतिपादन केले आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी याच्या नावाने असलेली मुदत ठेव दि.02.08.2003 रोजी परिपक्व झाली आणि सदर ठेवीची परिपक्वता मुल्य रु.55,140/- ठेव पावतीमध्ये नमुद होते. सदर ठेवीदार तानाजी हा परिपक्वता तिथीला ठेवीची रक्कम परत घेण्यासाठी किंवा ती रक्कम पूर्नगुंतवणूक करण्यासाठी आला नाही, त्यामुळे बँकेच्या नियमाप्रमाणे सदर रकमेवर तक्रारकर्तीने तानाजीच्या मृत्यूचे घोषणापत्र मिळवून अर्ज केल्याचे दिनांकापर्यंत द.सा.द.शे.4% या बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणे अदा केले आहे. ही कारवाई आर.बी.आय. च्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच असल्यामुळे विरुध्द पक्षाने सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला नाही.
11. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या आर.बी.आय. इंटर ऑफीस मेमोरंडम दाखल पार्ट-4 (बी)(2)(II) ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे त्याला मुदत ठेवींची परिपक्वता रकमेवर द.सा.द.शे.10% प्रमाणे व्याज मिळू शकत नाही.
12. विरुध्द पक्षाच्या अधिवक्त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या फायनान्सिअल मॅनेजमेंट ऍन्ड अकौन्टंस डिपार्टमेंटचे दि.17 मार्च 2009 चे परिपत्रक दि.30.11.2012 च्या यादीसोबत दाखल केले आहे. त्यात ठंवीच्या मुदतीपूर्तीनंतरच्या कालावधीसाठी (Overdue Period) बचत खात्याच्या व्याज दराप्रमाणे व्याज घ्यावे असे नमुद केले आहे.
13. वरील प्रमाणे तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांनी केलेले कथन दाखल दस्तावेज व युक्तिवाद लक्षात घेता खालिल बाबी स्पष्ट होतात.
तक्रारकर्तीचा मुलगा तानाजी याने विरुध्द पक्षाकडे दि.02.05.2000 ते 02.08.2003 या कालावधीसाठी (39 महिने) रु.40,000/- मुदत ठेव पावती क्र.085530 ठेवली होती (तक्रारकर्तीने दाखल दस्त क्र.4). मुदतपूर्तीनंतर तक्रारकर्तीने सदर ठेव परत मागण्यासाठी अर्ज केला असता तिला न्यायालयाकडून आदेश आणल्या शिवाय सदर ठेवीचे भुगतान दि.16.09.2009 पूर्वी करण्यांत येऊ नये असा आदेश आर.एम.ऑफीस पत्र क्र.AX7/NR/legal/03 dt. 10.09.2003 रोजी करण्यांत आला. त्या आदेशाची नोंद मुदती ठेवीच्या पावतीवर करण्यांत आली आहे. दि. 02.08.2003 रोजी देय झालेली मुळ ठेवीची परिपक्वता रक्कम रु.55,140/- त्यानंतर म्हणजे दि.06.02.2012 पर्यंत बँकेकडेच होती व बँकेने सदर रकमेचा वापर केलेला आहे.
14. सदरच्या प्रकरणात मयत तानाजी याच्या ठेवीवरील व्याजाची गणना करण्यासाठी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या बँक ऑफ इंडियाच्या Inter Office Memorandum दि.23.12.2006 मधील Model operational procedure for settlement of claims in respect of deceased depositor मधील Part-IV मधील तरतुदींचा वापर करणे योग्य होईल. सदर तरतुदींचा उल्लेख तक्रारकर्तीच्या वतीने सादर केलेल्या युक्तिवादात केलेला आहे. त्यामधील तरतुद क्र.IV(6)(1)(iii) प्रमाणे जर ठेवीदाराच्या मृत्यूमुळे देय होणारी ठेवीची रक्कम मुदतपूर्तीनंतर मागणी केली असेल तर (1) मुदतपूर्तीच्या तारखेपर्यंतचे व्याज ठेवीवरील ठरलेल्या दराप्रमाणे आणि (2) मुदतपूर्तीनंतर प्रत्यक्ष रक्कम ज्या दिवशी देण्यांत आली त्या कालावधीचे व्याज सदर कालावधीसाठी व्याजाचा जो दर मुदतपूर्तीचे दिवशी अस्तित्वात असेल त्या दराने व सरळ व्याजाने देय होईल असे नमुद केले आहे.
15. तक्रारकर्तीने वरील रकमेची मागणी मुदतपूर्तीनंतर केली असल्याने वरील तरतूदींप्रमाणे ठेवीवर व्याज मिळण्यांस पात्र आहे. विरुध्द पक्ष बँकेने वरील क्लॉज (1) प्रमाणे ठेवीच्या मुदतपूर्तीपर्यंतच्या कालावधीसाठी ठरलेल्या व्याजदराने म्हणजे द.सा.द.शे.10% दराने व्याजाची आकारणी करुन मुदतपूर्तीची रक्कम रु.55,140/- दिलेली आहे. मात्र वरील क्लॉज (2) प्रमाणे Overdue 8 वर्ष 6 महिने 3 दिवस या कालावधीसाठी रु.55,140/- वर द.सा.द.शे. सरळ व्याजाने रु.18,767/- व्याज दिले आहे.
16. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे मुदतपूर्तीची रक्कम रु.55,140/- वर Overdue कालावधीसाठी व्याजाची गणना द.सा.द.शे.10% प्रमाणे चक्रवाढ पध्दतीने करावयास पाहिजे होती व अशी व्याजाची गणना तक्रारकर्तीने दस्तावेज यादीसोबत दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे दि.02.08.2003 ते 05.02.2012 या कालावधीसाठी रु.68,962/- येते.
17. वर उल्लेख केलेल्या Model operational procedure for settlement of claims in respect of deceased depositor मधील क्लॉज (2) प्रमाणे जर ठेवीदार मुदतीपूर्वी मरण पावला आणि ठेवीची रक्कम मुदतपूर्तीनंतर मागणी केली असेल तर अशा बाबतीत ज्या काळासाठी ठेव रक्कम बँकेकडे Overdue राहीली त्या कालावधीसाठी ठेव देय झाली त्या तारखेस व्याजाचा जो दर असेल त्या दराने व सरळ व्याजाने बँकेने व्याज द्यावे असे नमुद आहे. सदरच्या प्रकरणात दि.02.08.2003 रोजी ठेवीची मुदत संपल्याने परिपक्वता मुल्य रु.55,140/- देय झाली व ती बँकेकडे 8 वर्ष 6 महिने 3 दिवस Overdue राहीली. त्यामुळे 8 वर्ष 6 महिने 3 दिवस या कालावधीसाठी मुदती ठेवीचा जो व्याजदर असेल त्या दराने व सरळ व्याजाने बँकेने रु.55,140/- वर 8 वर्ष 6 महिने 3 दिवसांसाठी व्याजाची गणना करुन ती रक्कम तक्रारकर्तीस द्यावयास पाहिजे होती. वरील मुदतीसाठी व्याजाचा दर काय होता हे तक्रारकर्ती अगर विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर सांगितलेले नाही. मात्र बँकेच्या व्याज दराबाबत न्यायीक दखल घेवून 8 वर्ष 6 महिने या कालावधीसाठी व्याजदर द.सा.द.शे.8% गृहीत धरुन सदर प्रकरणात आदेश देणे योग्य होईल असे मंचास वाटते.
18. विरुध्द पक्ष बँकेने मात्र वरील नियमाप्रमाणे व्याजाची गणना न करता द.सा.द.शे.4% दराने तक्रारकर्तीस व्याजाची रक्कम देऊन ग्राहकाप्रती सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे. वरील विवेचनाप्रमाणे तक्रारकर्ती मुळ ठेवीचे परिपक्वता मुल्य रु.55,140/- वर परिपक्वता तिथी दि.02.08.2003 पासून दि.05.02.2012 पर्यंत 8 वर्ष 6 महिने 3 दिवसाच्या कालावधीकरीता द.सा.द.शे.8% प्रमाणे सरळ व्याज रु.37,536/- मिळण्यांस पात्र असतांना विरुध्द पक्षाने सदर व्याजापोटी रु.18,767/- दिले असल्याने उर्वरित व्याजाच्या फरकाची रक्कम रु.18,767/- आणि सदर रकमेवरील दि.05.02.2012 पासून ती तक्रारकर्तीस अदा करेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज मिळण्यांस पात्र आहे. वरील रकमेशिवाय मानसिक त्रासाबाबत रु.5,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्यांस तक्रारकर्ती पात्र आहे.
वरील कारणांमुळे मुद्दा क्र.1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले असून मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // आदेश //-
तक्रारकर्तीचा ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालिल अर्ज
खालिल प्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येतो.
1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस द.सा.द.शे. 8% प्रमाणे सरळ व्याजाने दि.02.08.2003 पासून दि.05.02.2012 पर्यंतच्या Overdue कालावधीसाठी देय व्याजापैकी न दिलेली फरकाची रक्कम रु.18,767/- दि.05.02.2012 पासून तक्रारकर्तीस रक्कम प्रत्यक्षात अदा करेपर्यंत द.सा.द.श. 9% व्याजासह द्यावी.
2) वरील रकमेशिवाय मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारखर्च रु.3,000/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस द्यावा.
3) वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाचे दिनांकापासुन 1 महिन्यांचे आंत करावी.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5) तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.