(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक-08 ऑक्टोंबर, 2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष बॅंके विरुध्द दोषपूर्ण सेवे संबधी जिल्हाग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे नमुद करणे आवश्यक वाटते की, सदर प्रकरणा मध्ये तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचे अधिवक्ता यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष मौखीक युक्तीवाद करण्यासाठी वेळोवेळी तारखा देण्याची विनंती केली, त्यानंतरही दिनांक-23 ऑगस्ट, 2021 पर्यंत उभय पक्षकार व त्यांचे व अधिवक्ता यांना मौखीक युक्तीवादासाठी संधी देऊनही त्यांनी मौखीक युक्तीवाद केला नसल्या कारणाने आणि तक्रार ही खूप जुनी सन-2016 मधील असल्या कारणाने दिनांक-20.09.2021 रोजी उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यापैकी कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित न झाल्यामुळे जुनी तक्रार म्हणून प्राधान्य देऊन ही तक्रार जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे निकाली काढण्यात येत आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता मे. शिवा एजन्सी , भंडारा ही सन-1986 पासून एक मोठया प्रमाणावर ठोक स्वरुपात औषधी खरेदी-विक्री करणारी ख्यातीप्राप्त फर्म आहे आणि सदर फर्मने भंडारा जिल्हया मध्ये मोठया प्रमाणावर नाव लौकीक मिळविलेला आहे. सदर फर्मचा व्यवहार 40 ख्याती प्राप्त औषधी कंपन्यांशी असून सदर फर्म जिल्हयातील किरकोळ औषधी दुकानदार/एजन्सींना औषधींचा पुरवठा करते. तक्रारकर्ता फर्मचे बरेच दिवसां पासून विरुध्दपक्ष बॅंके मध्ये कॅश क्रेडीट खाते असून सदर खात्याचा क्रमांक-20134601818 असा असून सन-1997 पासून सदर खात्यावर रुपये-15,00,000/- एवढी कॅश क्रेडीट लिमिट सुविधा आहे. तक्रारकर्ता फर्म ही सतत विरुध्दपक्ष बॅंके मधून फर्मचे व्यवहार करते.
तक्रारकर्ता फर्मचे तक्रारी प्रमाणे त्यांनी मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Limited, Mumbai) या औषधीनिर्माता कंपनीला जो विरुध्दपक्ष बॅंकेचा धनादेश दिला होता तो धनादेश खात्यामध्ये पुरेशी रक्कम असताना देखील विरुध्दपक्ष बॅंकेच्या शाखेतून वटविल्या गेला नाही त्या बाबतचा तपशिल खालील प्रमाणे आहे-
अक्रं | त.क. फर्मने ज्या कंपनीचे नावे विरुध्दपक्ष बॅंकेचा धनादेश दिला त्या कंपनीचे नाव | धनादेश क्रमांक | धनादेश दिनांक | धनादेशाची रक्कम रुपयां मध्ये |
1 | Merck Ltd. Mumbai | 002541 | 15/11/2014 | 93,118/- |
तक्रारकर्ता फर्म तर्फे नमुद करण्यात आले की, त्यांनी ज्या दिनांकास विरुध्दपक्ष बॅंकेचा धनादेश मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीला दिला त्या दिवशी त्यांच्या विरुध्दपक्ष बॅंके मध्ये असलेल्या खात्यात पुरेशी रक्कम रुपये-1,65,000/- पेक्षा जास्त होती. सदर मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीने तक्रारकर्ता फर्मव्दारे देऊ केलेला धनादेश वटविण्यासाठी बॅंकेत जमा केला परंतु विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मचे खात्या मध्ये जमा असलेल्या रकमेची कोणतीही शहानिशा न करता बेकायदेशीरपणे सदर धनादेश तक्रारकर्ता फर्मचे खात्यामध्ये अपर्याप्त रक्कम असे चुकीचे कारण दर्शवून वटविला नाही. मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीने सदर धनादेश बॅंकेत वटविल्या गेला नसल्याचे तक्रारकर्ता फर्मला दुरध्वनी वरुन आणि नंतर लेखी स्वरुपात पत्र देऊन कळविले. तक्रारकर्ता फर्मचे असेही म्हणणे आहे की, ते मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनी मध्ये त्यांना पाहिजे असलेल्या औषधांची सर्वप्रथम ऑर्डर देतात आणि ऑर्डर दिल्या नंतर त्वरीत मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) कंपनी औषधीचा पुरवठा करते आणि त्यानंतर तक्रारकर्ता फर्म सदर औषधी निर्माता कंपनीला धनादेश देते. विरुध्दपक्ष बॅंकेतून धनादेश वटविल्या न गेल्याने सदर मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) कंपनीने तक्रारकर्ता फर्मला असे सांगितले की, त्यांनी प्रथम रक्कम धनाकर्षाव्दारे दयावी आणि सदर धनाकर्ष वटविल्या नंतर ते तक्रारकर्ता फर्मला पाहिजे असलेल्या औषधींचा पुरवठा करतील परंतु या व्यवहारात जवळपास 15 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यामुळे सदरचा व्यवहार तक्रारकर्ता फर्मला गैरसोयीचा आहे. सदर धनाकर्षाचे व्यवहारा मध्ये वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे तक्रारकर्ता फर्म किरकोळ दुकानदारांना नियमित वेळेत औषधांचा पुरवठा करु शकत नाही आणि त्यामुळे तक्रारकर्ता फर्मचे व्यवसायाची फार मोठया प्रमाणावर आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. विरुध्दपक्ष बॅंकेच्या चुकीच्या कृती मुळे तक्रारकर्ता फर्मची बाजारातील पत खराब झाली. विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मने दिलेला धनादेश वटविणे आवश्यक होते परंतु त्यांनी गैरकायदेशीररित्या सदर धनादेश वटविला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मला ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे तरतुदी प्रमाणे दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्ता फर्मची जी व्यवसायीक हानी झाली त्यासाठी विरुध्दपक्ष बॅंक जबाबदार आहे.
तक्रारकर्ता फर्म व्दारे पुढे असे नमुद करण्यात आले की, या शिवाय तक्रारकर्ता फर्मव्दारे 1) Ipca Laboratories Ltd. Nagpur 2) USV Limited Nagpur and 3) Alembic Pharmaceuticals Ltd. या औषधी निर्माता कंपनीला देऊ केलेले धनादेश विरुध्दपक्ष बॅंकेच्या निःष्काळजीपणा मुळे त्यांचे खात्यात पुरेशी रककम असताना देखील वटविल्या गेले नाहीत त्यामुळे सदर औषधी निर्माता कंपन्यांनी तक्रारकर्ता फर्म यांना त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप बंद करण्याची धमकी दिली आणि त्यांनी तक्रारकर्ता फर्मला काळया यादीत टाकले. त्यामुळे तक्रारकर्ता फर्म तर्फे विरुध्दपक्ष बॅंकेला दिनांक-09.02.2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून दोषपूर्ण सेवा, शारीरीक व मानसिक त्रास आणि व्यवसायीक हानी संबधाने एकूण रुपये-2,00,000/- नुकसान भरपाई रकमेची मागणी केली. सदर कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष बॅंकेला मिळून देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही व नोटीसला उत्तर दिले नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्ता फर्म तर्फे तिचे प्रोप्रायटर यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष बॅंके विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्ता फर्मव्दारे मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीला दिनांक-15.11.2014 रोजीचा दिलेला धनादेश क्रं-002541, धनादेश रक्कम रुपये-93,118/- विरुध्दपक्ष बॅंकेतून वटविल्या न गेल्याने विरुध्दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे.
- विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे नुकसान भरपाई रुपये-50,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/-, व्यवसायीक हानी संबधाने भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- आणि नोटीस खर्च रुपये-5000/- व तक्रारखर्च अशा रकमा विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मला दयाव्यात असे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा व्यवस्थापकांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्ता फर्म औषध खरेदी विक्रीचा व्यवसाय भंडारा येथे करीत असल्याची बाब मान्य केली. तसेच हे सुध्दा मान्य केले की, तक्रारकर्ता फर्मचे विरुध्दपक्ष बॅंके मध्ये खाते क्रं-20134601818 असून त्या खात्याची कॅश क्रेडीट लिमिट रुपये-15,00,000/- आहे. तक्रारकर्ता फर्मने ज्या दिवशी म्हणजे दिनांक-15.11.2014 रोजीचे मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीचे नावे धनादेश क्रं-002541 रक्कम रुपये-93,118/- जारी केला त्या दिवशी तक्रारकर्ता फर्मचे खात्या मध्ये रुपये-1,65,000/- पेक्षा जास्त रक्कम जमा होती ही बाब नामंजूर केली. वस्तुतः दिनांक-22.11.2014 रोजी तक्रारकर्ता फर्मचे खात्यामध्ये (Outstanding Balance) थकबाकी शिल्लक रुपये-14,20,660.69 होती (Including unclear balance of clearing cheques for Rs.35,447/-) आणि या रक्कमा वजा जाता तक्रारकर्ता फर्मचे खात्यात फक्त रुपये-43,892.31 पैसे एवढीच क्लियर शिल्लक होती, त्यामुळे तक्रारकर्ता फर्म व्दारे देऊ केलेला दिनांक-15.11.2014 रोजीचा धनादेश क्रं 002541 धनादेश रक्कम रुपये-93,118/- विरुध्दपक्ष बॅंकेव्दारे न वटविता मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) कंपनीला दिनांक-22.11.2014 रोजी परत करण्यात आला. त्यामुळे तक्रारकर्ता फर्मचे नावे विरुध्दपक्ष बॅंकेत असलेल्या खात्यात पुरेशी रक्कम जमा होती हे विधान नामंजूर करण्यात येते. तसेच विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मचे खात्यात जमा असलेल्या रकमेची खात्री न करता मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या औषधी निर्माता कंपनीने जमा केलेला धनादेश न वटविता तक्रारकर्ता फर्मचे खात्यामध्ये पुरेसा निधी नाही असे चुकीचे कारण दर्शवून गैरकायदेशीररित्या परत केला ही बाब नामंजूर केली. ते तक्रारकर्ता फर्मचे विरुध्दपक्ष बॅंके मध्ये असलेल्या खात्याचे विवरण पुराव्या दाखल सादर करीत आहेत. तक्रारकर्ता फर्मची जबाबदारी आहे की, त्यांनी त्यांचे खात्या मध्ये शिल्लक असलेल्या रकमेची खात्री करणे त्यामुळे तक्रारकर्ता फर्मव्दारे जो काही व्यवहार करण्यात आला त्या संबधात तक्रारकर्ता फर्मची जबाबदारी येते. तक्रारकर्ता फर्मव्दारे जारी केलेला धनादेश वटविल्या न गेल्यामुळे फर्मची फार मोठया प्रमाणावर व्यवसायीक हानी झाली असल्याची बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्म यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे शारिरीक व मानसिक त्रास देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्ता फर्म व्दारे दिलेला तथाकथीत धनादेश हा फर्मचे खात्या मध्ये पुरेशी रक्कम जमा नसल्यामुळे विरुध्दपक्ष बॅंके व्दारे परत करण्यात आल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता फर्म व्दारे विरुध्दपक्ष बॅंकेला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याची बाब मान्य आहे परंतु सदर नोटीस मधील मजकूर हा अमान्य आहे. आपले उत्तराचे विशेष कथनात विरुध्दपक्ष बॅंकेनी नमुद केले की, बॅंकेच्या क्लिअरींग सिस्टीम प्रमाणे जे धनादेश खात्यामध्ये जमा केले जातात ते धनादेश दुस-या बॅंका मध्ये पाठविल्या जातात आणि दुसरे दिवशी अकाऊंट मध्ये पोस्ट केल्या जातात आणि क्लिअरींग हाऊस कडून धनादेश वटल्याची माहिती मिळाल्यावर ते धनादेश क्लियर होतात. धनादेश खात्यात जमा केल्या नंतरही जो पर्यंत तो धनादेश वटविल्याची क्लियरींग हाऊस कडून माहिती मिळत नाही तो पर्यंत सदर धनादेशाची रक्कम अनक्लियर्ड दर्शविल्या जाते. जर दुस-या बॅंकेचा धनादेश वटविल्या गेला नाही तर तेवढी रक्कम संबधित खातेदाराच्या खात्या मधून डेबीट (वजा) केल्या जाते आणि जर दुस-या बॅंकेनी देऊ केलेला धनादेश वटविल्या गेला तर संबधित खातेदाराच्या खात्यामधील अनक्लियर्ड बॅलन्स हे क्लियर्ड बॅलन्स म्हणून दर्शविल्या जाते. जे अनक्लियर्ड बॅलन्स असते त्याचा उपयोग हा पेमेंट करण्यासाठी किंवा धनादेश वटविण्यासाठी करता येत नाही. जेंव्हा धनादेश वटविल्या केल्या नंतर खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम जमा होते त्याच वेळी अनक्लियर्ड बॅलन्स हे क्लियर्ड बॅलन्स म्हणून हिशोबात धरण्यात येते.
विरुध्दपक्ष बॅंके तर्फे आपले विशेष कथनात पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्ता फर्मचे विरुध्दपक्ष बॅंके कडील असलेले खाते क्रं-20134601818 मध्ये मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या कंपनीने दिनांक-20.11.2014 रोजी रुपये-93,118/- चा धनादेश वटविण्यासाठी जमा केला असता तो खात्यामध्ये अपर्याप्त निधीचे कारणा वरुन दिनांक-22.11.2014 रोजी परत करण्यात आला कारण त्या दिवशी तक्रारकर्ता फर्मचे खात्या मध्ये फक्त रुपये-43,892.31 एवढी रक्कम शिल्लक होती आणि त्यावेळी तक्रारकर्ता फर्मचे खात्या मध्ये अनक्लियर्ड बॅलन्सची रक्कम रुपये-35,447/-(Cheques of other banks deposited on 22/11/2014) आणि डेबीट बॅलन्स रुपये-14,20,660.69 एवढे होते म्हणजेच कॅश क्रेडीट लिमिट रुपये-15,00,000/- मधून डेबीट बॅलन्स रुपये-14,20,660.69 आणि अनक्लियर्ड बॅलन्सची रक्कम रुपये-35,447/- वजा जाता क्लियर बॅलन्स म्हणून रुपये-43,892.31 एवढीच रक्कम शिल्लक असल्यामुळे सदर रुपये-93,118/- चा धनादेश न वटविता परत गेला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी कोणतीही चुकीची कृती केली नाही तसेच तक्रारकर्ता फर्मला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता त्यांचे विरुध्द दाखल केलेली चुकीची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे विरुध्दपक्ष बॅंके तर्फे नमुद करण्यात आले.
04. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजाच्या प्रती, साक्ष पुरावे आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद या वरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिर्णयार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता फर्मचे म्हणण्या प्रमाणे त्यांचे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असताना विरुध्दपक्ष बॅंकेनीत.क. फर्मने देऊ केलेला धनादेश न वटवून परत केल्याने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते काय? | -नाही- |
02 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 व 2
05. सर्वसाधारण बॅंकेचा व्यवहार हा आजचे काळात धनादेशाव्दारे करण्यात येतो कारण धनादेशाच्या नोंदी या खाते उता-या मध्ये येत असल्यामुळे तो एक सक्षम पुरावा मानल्या जातो. विरुध्दपक्ष बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे अनक्लियर्ड बॅलन्स म्हणजे जेंव्हा खातेदार हा त्याचे खात्यामध्ये दुस-या बॅकेचा त्याला देऊ केलेला वटविण्यासाठी जमा करतो त्यावेळेस त्याचे खाते असलेली बॅंक प्रथमतः त्याचे खात्या मध्ये धनादेश जमा केल्याच्या नोंदी ज्यामध्ये धनादेश क्रमांक, दिनांक व धनादेशाची रककम इत्यादी करते, धनादेश खात्या मध्ये जमा केल्यावर सदर धनादेशाची रक्कम ही अनक्लियर्ड बॅलन्स म्हणून दर्शविल्या जाते आणि जर सदर धनादेश दुस-या बॅंके मधून वटविल्या गेला नाही तर तेवढी रक्कम संबधित खातेदाराच्या खात्या मधून डेबीट (वजा) केल्या जाते आणि जर धनादेश हा दुस-या बॅंके मधून वटविल्या गेला तर त्या धनादेशाची रक्कम संबधित खातेदाराच्या खात्या मध्ये जमा होते.विरुध्दपक्ष बॅंकेच्या या म्हणण्या मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येते.
06. विरुध्दपक्ष बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्ता फर्मचे खात्या मध्ये दिनांक-22.11.2014 रोजी डेबीट बॅलन्स रुपये-14,20,660.69 होते आणि अनक्लियर्ड बॅलन्स रुपये-35,447/- (Cheques of other banks deposited on 22/11/2014) होते, याचाच अर्थ असा निघतो की, रुपये-35,447/- एवढया रकमेचे दुस-या पार्टी कडून तक्रारकर्ता फर्मला दिलेले धनादेश असले तरी जो पर्यंत दुस-या बॅंके मधून सदरचे धनादेशाची रक्कम वटविल्या जात नाही तो पर्यंत सदर अनक्लियर्ड बॅलन्स रुपये-35,447/- एवढी रक्कम तक्रारकर्ता फर्मचे खात्यात प्रत्यक्षात जमा होत नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, ज्या वेळी मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) कंपनीने तक्रारकर्ता फर्मने देऊ केलेला धनादेश वटविण्यासाठी बॅंकेत जमा केला त्यावेळी तक्रारकर्ता फर्मचे खात्याची कॅश क्रेडीट लिमिट रुपये-15,00,000/- होती हे जरी खरे असले तरी त्यामधून डेबीट बॅलन्सची रक्कम रुपये-14,20,660.69 आणि अनक्लियर्ड बॅलन्सची रक्कम रुपये-35,447/- असे मिळून एकूण रुपये- 14,56,107.69 वजा जाता प्रत्यक्षात रुपये-43,892.31 एवढीच क्लियर रक्कम तक्रारकर्ता फर्मचे खात्यात जमा होती आणि त्यामुळे तक्रारकर्ता फर्मने मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या कंपनीला देऊ केलेला रुपये-93,118/- रकमेचा धनादेश अपर्याप्त निधी असल्याचे कारणा वरुन परत करण्यात आला. बॅंकिंग व्यवहारा मध्ये अनक्लियर्ड बॅलन्स रकमे मधून सदर तक्रारकर्ता फर्मने देऊ केलेल्या धनादेशाच्या रकमेचे प्रदान होऊ शकत नाही. बॅकिंग क्लिअरींग हाऊस कडून धनादेश वटल्याची सुचना मिळाल्या नंतर अनक्लियर्ड बॅलन्स हे क्लियर्ड बॅलन्स म्हणून दर्शविण्यात येते. तक्रारकर्ता फर्मचे म्हणण्या प्रमाणे ज्या दिवशी तक्रारकर्ता फर्मने देऊ केलेला धनादेश मर्क लिमिटेड, मुंबई (Merck Ltd. Mumbai) या कंपनीने वटविण्यासाठी जमा केला त्या दिवशी त्यांचे खात्या मध्ये रुपये-1,65,000/- पेक्षा जास्त रक्कम होती परंतु रुपये-35,447/- एवढी रक्कम ही अनक्लियर्ड बॅलन्सची होती, जो पर्यंत अनक्लियर्ड बॅलन्स संबधाने बॅकिंग क्लियरींग हाऊस कडून सुचना मिळत नाही तो पर्यंत अनक्लियर्ड बॅलन्स हे क्लियर्ड बॅलन्स म्हणून हिशोबात धरल्या जात नाही आणि अनक्लियर्ड बॅलन्सच्या रकमे मधून धनादेशाच्या रकमेचे शोधन केल्या जात नाही.
07. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्म मे. शिवा एजन्सीचा जो खाते उतारा अभिलेखावर दाखल केला त्यामधील नोंदी तपासून पाहिल्या असता दिनांक 22 नोव्हेंबर 2014 रोजी सदर खात्या मध्ये बरेच व्यवहार झाल्याचे दिसून येते आणि दिनांक-22 नोव्हेंबर, 2014 रोजी ज्यावेळी धनादेश वटविण्यासाठी विरुध्दपक्ष बॅंकेत टाकण्यात आला त्यावेळेस फर्मचे खात्यामध्ये बॅलन्स म्हणून (-) रुपये-14,20,660.69 एवढी रक्कम दर्शविलेली आहे याचाच अर्थ सदरची रक्कम ही डेबीट बॅलन्सची आहे असे स्पष्ट होते कारण सदरची रक्कम ही मायनस म्हणून दर्शविलेली आहे.
डेबीट बॅलन्स याचा अर्थ खालील प्रमाणे आहे-
Debit Balance in a Bank Account
A debit balance is a negative cash balance in a Checking account with a bank. Such an account is said to be overdrawn, and so is not actually allowed to have a negative balance - the bank simply refuses to honor any checks presented against the account that would cause it to have a debit balance. Alternatively, the bank will increase the account balance to zero via an overdraft arrangement.
जिल्हा ग्राहक आयोगाचे मते विरुध्दपक्ष बॅंकेचा खाते उतारा हा संगणकाव्दारे मेन्टेन केल्या जातो आणि सदर उतारा हा खुद्द विरुध्दपक्ष बॅंकेनी सदर तक्रारी मध्ये पुरावा म्हणून सादर केलेला आहे तसेच विरुध्दपक्ष बॅंकेनी आपला शपथे वरील पुरावा सुध्दा सदर प्रकरणात सादर केलेला आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, विरुदपक्ष बॅंक ही एक राष्ट्रीयकृत बॅंक आहे आणि त्यांचा शपथे वरील पुरावा आणि पुराव्या दाखल खाते उतारा यावरुन सदर तक्रार निकाली काढण्यास जिल्हा ग्राहक आयोगास कोणतीही अडचण नाही आणि त्यावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन जिल्हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.
08. या सर्व व्यवहारा वरुन विरुध्दपक्ष बॅंकेनी गैरकायदेशीररित्या चुकीने तक्रारकर्ता फर्मने दिलेला धनादेश वटविला नाही असे दिसून येत नाही त्यामुळे विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ता फर्मला दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येत नाही म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्तर नकारार्थी आल्याने मुद्दा क्रं 2 अनुसार जिल्हा ग्राहक आयोग सदरची तक्रार खारीज करीत आहे.
09. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता मे. शिवा एजन्सीज, भंडारा तर्फे तिचे प्रोप्रायटर श्री हरीश किसनलाल तलदार यांची विरुध्दपक्ष महाराष्ट्र बॅंक भंडारा तर्फे तिचे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(04) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.