::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/11/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात नुकसान भरपाई मिळण्याकरिता, विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारकर्त्यांनी दाखल केलेली तक्रार व दाखल दस्त, तक्रारकर्त्यांचा तोंडी युक्तिवाद, यांचा सखोल अभ्यास करुन या प्रकरणात निर्णय पारित केला तो येणेप्रमाणे.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द विना लेखी जबाब, प्रकरण पुढे चालवण्याचा आदेश दिनांक 14/09/2017 ला वि. मंचाने पारित केला.
3) तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते यांचे विरुध्द पक्ष क्र. 1 बॅंकेत खाते क्र. 60067778770 व 60067778544 असून ते विरुध्द पक्ष क्र. 1 चे ग्राहक आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 बॅंकेत फिक्स डिपॉझीट मध्ये रक्कम जमा केली. सदरहू रक्कमेवर विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी टी.डी.एस ची आकारणी करुन ती तक्रारकर्त्यांच्या खात्यातून परस्पर कपात केली, सदर रक्कम आयकर खात्यात विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी जमा करणे भाग होते, परंतु ती त्यांनी जमा केली नाही. त्या रक्कमेचा तपशील पुढीलप्रमाणे . .
अ.क्र. तारीख अर्जदार क्र. 1 अर्जदार क्र. 2
1) 31/03/2011 रुपये 53/- -
2) 31/03/2011 रुपये 6,613/- रुपये 5,751/-
3) 15/06/2012 रुपये 1,438/- रुपये 1,250/-
4) 31/03/2013 रुपये 5,797/- रुपये 5,041/-
म्हणून त्याबाबत तक्रारकर्त्यांनी दिनांक 19/05/2016 व 02/07/2016 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांना पत्र दिले व कपात केलेल्या टी.डी.एस रक्कमेची माहिती मागीतली तसेच वकिलामार्फत दिनांक 08/08/2016 रोजी नोटीस दिली. तरीसुध्दा विरुध्द पक्षाने सदरहू रक्कम तक्रारकर्त्यांच्या खात्यात वळती केली नाही व अशाप्रकारे रुपये 25,989/- रक्कमेचा अपहार करुन गैरफायदा घेतला. म्हणून सदर रक्कम व त्यावरील व्याज विरुध्द पक्षाकडून मिळावे तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी तक्रारकर्त्यांची विनंती आहे.
4) तक्रारकर्ते यांच्या कथनाला विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून कोणतेही नकारार्थी कथन उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त मंचाने तपासल्यानंतर असे दिसते की, तक्रारकर्ते यांचे विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या बँकेत खाते आहे शिवाय तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांचे नावे विरुध्द पक्ष क्र. 1 च्या बँकेत फिक्स डिपॉझीट मध्ये रक्कम जमा आहे, असे दाखल दस्तांवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 व 2 हे विरुध्द पक्ष क्र. 1 चे ग्राहक आहे या निष्कर्षावर मंच आले आहे.
तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दाखल केलेले अर्ज / पत्र दिनांक 08/02/2016, दि. 19/05/2016 व 02/07/2016 रोजीचे यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे अर्ज देवून अशी विचारणा केली होती की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ते क्र. 1 व 2 च्या त्यांच्याकडील जमा फिक्स डिपॉझीट रक्कमेवरील टी.डी.एस. रक्कम, जी कपात केली ती तक्रारदारांच्या आयकर खात्यात जमा झाली नसल्यामुळे, सदर रक्कम विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारदारांच्या बचत खात्यात जमा करावी व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 29/03/2011 ते 04/12/2015 या कालावधीत कापण्यात आलेल्या टी.डी.एस. ची माहिती द्यावी. सदर पत्रावर विरुध्द पक्ष क्र. 1 चे कोणतेही स्पष्टीकरण रेकॉर्डवर दाखल नाही. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला खाते ऊतारा व त्यातील कपात रक्कम ही तक्रारकर्त्यांच्या मते, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी कपात केलेली टी.डी.एस. रक्कम आहे. यावरही विरुध्द पक्षाचे कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने, तक्रारदार यांचा युक्तीवाद मंचाने ग्राहय धरला आहे. दाखल फिक्स डिपॉझीट पावत्यांवर विरुध्द पक्ष क्र. 1 हे नियमानुसार टी.डी.एस. रक्कम कपात करतील, अशी नोंद आहे. त्यामुळे त्याबद्दल विचारणा करणारे तक्रारदार यांचे पत्र, व कायदेशीर नोटीस लक्षात घेता, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांच्या जमा रकमेवर टी.डी.एस. म्हणून रक्कम 25,989/- कपात केली आहे. परंतु त्याबद्दलचे प्रमाणपत्र जारी करुन तशी नोंद आयकर विभागाकडे केली नाही, या निष्कर्षावर मंच आले आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी कपात केलेली वरील रक्कम ईतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह तक्रारदार यांना वापस करणे उचीत राहील, असे मंचाचे मत आहे.
त्यामुळे, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारदार यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदार यांना ( तक्रारकर्ते क्र. 1 व 2 ) कपात केलेली टी.डी.एस. रक्कम रुपये 25,989/- ( अक्षरी रुपये पंचवीस हजार नऊशे एकोन्नवद फक्त ) परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळून रक्कम रुपये 10,000/- ( अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) द्यावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri