जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 9/2016 तक्रार नोंदणी दि. :-17/2/2016
तक्रार निकाली दि. :-28/07/2016
निकाल कालावधी :-5 म. 11 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- (1) श्री.अभिराम भिमचंद अधिकारी,
वय – 53 वर्षे, व्यवसाय – शेती,
राहणार – देशबंधूग्राम, पो.मुलचेरा,
पिन नं.442707.
(2) श्री.प्रभात अभिराम अधिकारी,
वय – 28 वर्षे, व्यवसाय – शेती,
राहणार – देशबंधूग्राम, पो.मुलचेरा,
जि.गडचिरोली. पिन नं.442707.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- शाखाधिकारी साहेब,
बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा मुलचेरा, जि, गडचिरोली,
पिन नं.442707.
अर्जदार तर्फे :- स्वतः
गैरअर्जदार तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं.प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 जूलै 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार क्र.1 हे मृतक प्रेमिला अभिराम अधिकारी यांचे पती असून त्यांनी संयुक्तपणे गैरअर्जदाराचे बँकेमध्ये खाते क्र.60094364132 काढले असून, अर्जदार क्र.2 हे नॉमिनी आहेत. गैरअर्जदार हे जनधन योजनेच्या खात्याचे बँकेचे शाखाधिकारी असून विम्याची रक्कम देणे ही त्यांची जबाबदारी आहे. गैरअर्जदार यांनी जनधन खाते काढतेवेळी ए.टी.एम. काढण्यास कोणतीही सुचना दिलेली नाही किंवा जनधन योजनेच्या विम्याकरीता एम.टी.एम.आवश्यक आहे याची माहिती दिली नाही. गैरअर्जदार यांनी, ए.टी.एम.नसल्यामुळे, आपणांस विम्याची रक्कम देता येणार नाही, असे सांगितले. प्रधानमंत्री जनधन योजनेची मुदत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यंत होती. अर्जदाराचे जुने संयुक्त खाते जनधन योजनेमध्ये परावर्तित केलेले आहे. गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम न दिल्यामुळे, अर्जदाराने विद्यमान मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराकडून विमा राशी रुपये 2,00,000/- द.सा.द.शे. 15 टक्के दराने मिळण्यात यावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.4 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.4 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की,
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातेधारकांना ए.टी.एम.रुपी डेबिट कार्ड देण्यात यावे व खातेधारकांनी त्याचा वापर 45 दिवसांमध्ये करणे बंधनकारक करण्यात यावे, असे योजनेमध्ये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. तशा प्रकारची सुचना देखील बँकेमध्ये समोरील भागात लावण्यात आलेली आहे. त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे की, “the customer who has opened or converted ac in to PMJDY Scheme and as well as we have individually instructed to all customers that, he/she to compulsorily taken ATM Rupay debit card and should be activated through atm machine”. मुलचेरा हा लहानसा ग्रामीण भाग असून, तिथे शिक्षित लोकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे, तेथील लोक ए.टी.एम. रुपे डेबिट कार्ड वापरता येत नसल्यामुळे, घेण्यास नकार देतात. अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेमध्ये संयुक्त बचत खाते होते व त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सदर खाते परावर्तित करुन घेतले. त्यावेळी त्यांनी ए.टी.एम. रुपे डेबिट कार्ड घेण्यास नकार दिला. त्यामुळे, त्यांना या योजनेअंतर्गत कोणतेही लाभ मिळणार नाहीत, अशा सुचना देण्यात आल्या होत्या.
4. अर्जदाराने तक्रारी कथना पृष्ठयर्थ नि.क्र.7 नुसार पुरावा शपथपञ व नि.क्र.8 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तर व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : होय
केला आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
अर्जदार क्र.1 हे मृतक प्रेमिला अभिराम अधिकारी यांचे पती असून त्यांनी संयुक्तपणे गैरअर्जदाराचे बँकेमध्ये खाते क्र.60094364132 काढले असून, अर्जदार क्र.2 हे नॉमिनी आहेत, ही बाब गैरअर्जदारास मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत, हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
मृतक यांनी गैरअर्जदार बँकेत जनधन योजनेअंतर्गत खाते काढले होते ही बाब गैरअर्जदारांस मान्य आहे. गैरअर्जदाराने त्यांचे जबाबात नि.क्र. 4 वर पोष्टाव्दारे दाखल केलेल्या जबाबात असे कथन केले आहे की, जनधन योजनेचे खाते काढतांना ग्राहकांना ए.टी.एम कार्ड घेणे आवश्यक आहे व त्याचा वापर 45 दिवसांचे आंत केला असले पाहिजे. मृतक यांनी ए.टी.एम. कार्ड घेण्यास नकार दिला म्हणून जनधन योजनेचे अटी व शर्तीनुसार त्याचे लाभ अर्जदाराला देता आला नाही. सदर तक्रार गैरअर्जदाराने त्याचे लेखी कथनाला सिध्द करण्याकरीता कोणतेही शपथपत्र, साक्षीपुरावा किंवा साक्ष दस्तऐवज दाखल केलेले नाही. जरी, खातेदाराने ए.टी.एम. कार्ड घेण्यास नकार दिला असला तरी ते कार्ड खातेदाराला पोष्टाव्दारे का पाठविण्यात आले नाही, हा प्रश्न मंचासमक्ष विचारण्यात आला आहे. याउलट, अर्जदाराने तक्रारीत केलेले कथन सिध्द करण्याकरीता सदर प्रकरणात साक्षी शपथपत्र दाखल केलेले आहे, त्यावरुन, असे सिध्द होते की, गैरअर्जदार बँकेने जनधन योजनेचा विमाकरीता ए.टी.एम. कार्ड आवश्यक आहे अशी माहिती दिलीच नाही. म्हणून असे सिध्द होते की, गैरअर्जदार बँकेने स्वतःची चुक झाल्यावर अर्जदाराला प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत झालेला विमा दावा नामंजूर केलेला आहे. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नामंजूर करुन अर्जदाराचे प्रती सेवेत न्युनता निर्माण केलेली आहे,असे सिध्द होते, म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतिम आदेश –
अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
गैरअर्जदाराने प्रधानमंत्री जन धन योजनाअंतर्गत काढलेला खातेदाराची विमा रक्कम रुपये 2,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आंत अर्जदार क्र.2 नामनिर्देशित वारसदार यांना दयावी.
गैरअर्जदाराने, अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रुपये 5000/- व प्रत्येकी रुपये 2500/- तक्रारीचा खर्च म्हणून आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आंत दयावी.
आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य द्यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/7/2016.
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.