द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास सामनेवाला बँकेने दिलेल्या सदोष सेवेबाबत अथवा सेवेतील त्रुटीबाबत दाखल दाखल केलेली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणेः- तक्रारदार हे एकत्र हिंदू कुटूंबमधील कर्ते आहेत. तक्रारदाराचे नांवे तीन ठेव पावत्या क्र.140045110001822, 140045110001823 व 140045110001824 या नंबरच्या बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखेत होत्या. सदर ठेव पावत्या दि.20/09/11 रोजी मुदतपूर्ण होणार होत्या. दि.16/09/11 रोजी तक्रारदाराने सविस्तर पत्र लिहून ठेव पावत्यांच्या मागील बाजूस सही करुन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत स्वत: नेऊन दिल्या व तीन पावत्यांसह पत्र पोहोचवल्याची सही घेतली. त्यावेळी तक्रारदाराने दि.20/09/11 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शाखेचा रक्कम रु.2,20,000/- चा चेक वसुलीला आलेस तो स्विकारावा अशी तोंडी विनंती केली. सदरचा चेक तक्रारदाराने बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शाखेत 8 ठेव मुदत पावत्यांसाठी दिलेला होता. दि.20/09/11 रोजी सदर पावत्या घेणेसाठी तक्रारदार हे बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शाखेत गेले असता संबंधीत कर्मचा-याने तक्रादारास सांगितले की, त्यांनी दिलेला चेक त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने न वटता परत आलेला आहे. म्हणून मुदत ठेव पावत्या त्यांचे अर्जाप्रमाणे तयार होऊ शकल्या नाहीत. तसेच तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक सताना असला चेक जमा करण्यासाठी का देता? असे सुनावले. तक्रारदाराचे म्हणणेनुसार सदरचा ताशेरा एकूण त्यांचे मनावर मोठा आघात झाला. म्णून तक्रारदार हे बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखेत गेले. तेथील अधिका-यांनी तक्रारदाराचे पासबुक पाहून दि.20/9/11 रोजी कनेक्टीव्हीटी (Connectivity) नव्हती. त्यामुळे चेक परत पाठवला गेला असे असंबंध व फालतू उत्तर दिले. तक्रारदाराचे म्हणणेनुसार त्यांच्याच शाखेतील मुदत ठेवीच्या पावत्यांची मॅच्युरिटीची रक्कम त्यांच्याकडे असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कनेक्टीव्हीटी (Connectivity)ची जरुरी नव्हती.
- तक्रारदाराचे पुढे असे म्हणणे की, बॅंक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखेत तक्रारदाराचे बचत खाते क्र.140010110002315 वर Cheque Returned Charges म्हणून रक्कम रु.150/- वसुल केले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शाखेने तक्रारदाराच्या बचत खाते क्र.60032167885 मध्ये cheque returned unpaid charges म्हणून रक्कम रु.83/- वसुल केले. तक्रारदाराचे म्हणणेनुसार त्यांची कोणतीही चुक नसताना बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखेच्या अनागोंदी व बेजबाबदार कारभारामुळे तक्रारदाराचे दोन्ही बाजूंनी नुकसान झाले. तसेच तक्रारदार यांनी 62 वर्षे कष्ट करुन समाजात मिळवलेली प्रतिष्ठा व पत ही एका क्षणात नाहीसी झाली. त्यामुळे त्यांना आयुष्याच्या अखेरच्या टप्यातील वयामध्ये तीव्र मानसिक आघात सोसावा लागला. म्हणून तक्रारदारास मानसिक व शारिरीक यातना सहन कराव्या लागल्या त्या केवळ सामनेवाला यांच्या हलगर्जीपणामुळे. त्यानंतर दि.26/09/11 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी मुदत ठेव पावत्या तयार करुन दिल्या. त्यामुळे तक्रारदारास 6 दिवसाचे व्याजाचे नुकसान झाले.तसेच सामनेवाला क्र.1 बँकेने मुदत ठेव पावत्या क्र.140045110001822, 140045110001823 या दोन ठेव पावत्यांचे व्याज बचत खात्यात जमा केले. परंतु मुदत ठेव पावती क्र.140045110001824 चे व्याज मात्र जमा केले नाही किंवा दि.16/9/11 च्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्दयाबाबत काहीच कळवले नाही. म्हणून तक्रारदाराने दि.04/11/11 रोजी वरिष्ठ विभागीय कार्यालयास पत्र पाठवले. त्यानंतर तक्रारदाराने दीड महिना वाट पाहून दि.17/12/11 रोजी स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर सामनेवाला बँकेने दि.26/12/11 रोजी उत्तर पाठविले व रत्नागिरी शाखेत झालेली चूक मान्य केली. तसेच दि.04/11/11 रोजी पत्रात नमुद केलेप्रमाणे आर्थिक नुकसान बचत खात्यात जमा केले आहे. त्यामुळे झालेली चूक माफ करावी व घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तक्रारदाराचे म्हणणेनुसार तक्रारदाराची चुक नसताना सामनेवाला बँकेने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच समाजातील त्यांची प्रतिष्ठा व पत गमवावी लागली. त्याबाबत चुकीचे प्रायश्चित म्हणून रु.51,000/- तक्रारदाराचे सांपत्तीक स्थितीनुसार सामनेवाला बँकेकडून नुकसान भरपाई मिळावी तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवालाकडून वसुली होऊन मिळावा म्हणून सदरचा तक्रार अर्ज या मंचामध्ये दाखल केलेला आहे.
4) तक्रारदाराने तक्रारीसोबत त्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. तसेच नि.4 कडे एकूण 17 कागदपत्र दाखल केलेली आहेत.
5) सामनेवाला क्र.1 ते 3 हे या कामी वकीलामार्फत हजर होऊन नि.12 कडे म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रार अर्जातील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय उत्तर देऊन नाकारलेला आहे. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 या बॅंकेच्या शाखेत मुदतठेव पावत्या काढल्या होत्या. सदरच्या मुदतठेव पावत्यांची मुदत ही दि.20/09/11 रोजी पूर्ण होणार होती. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे रु.2,20,000/- या रक्कमेचा चेक दि.20/09/11 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रत्नागिरी यांचेकडून वसुलीसाठी आल्यास तो स्विकारावा याबाबत कोणतीही पुसटशी कल्पनादेखील तक्रारदार यांनी दिलेली नव्हती. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या पावत्यांची होणारी रक्कम त्यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे दि.20/09/11 म्हणजेच ज्या दिवशी पावत्यांची मुदत संपली त्याच दिवशी तक्रारदार यचांच्या खात्यात जमा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये सामनेवाला बँकेने तक्रारदार यांना Deficiency in Service दिलेली नाही. खरे पाहता दि.20/09/11 रोजी ज्यावेळी बॅंक ऑफ महाराष्ट्र चा चेक खात्यात नावे पडला त्यावेळी म्हणजेच दि.20/09/11 रोजी दुपारी 12.55.46 हयावेळी तक्रारदार यांचे खात्यात चेक एवढी रक्कम शिल्लक नव्हती. सामनेवाला बँकेने तक्रारदार यांची मुदत पूर्ण झालेली ठेवीची रक्कम मुदतपूर्ण झालेल्या दिवशी बॅंकेच्या कामकाजाच्या वेळेमध्ये म्हणजेच सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 हया वेळेत केव्हाही जमा करावयाची आहे. तसेच ती सामनेवाला बँकेने दि.20/09/11 रोजी दुपारी 13.49.00 यावेळी केलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारे Deficiency in Service केलेली नाही. बॅकेच्या ग्राहकाने त्याच्या खात्याच्या नांवे चेक जाहीर करण्याआधी त्या खात्यामध्ये चेक एवढी रक्कम जमा झाली पाहिजे असा प्रचलित नियम आहे. परंतु तक्रारदार यांची रक्कम खात्यामध्ये त्यावेळी जमा नव्हती. तक्रारदाराचे म्हणणेनुसार त्यादिवशी दुपारी तक्रारदाराच्या पावत्यांची रक्कम त्यांचे खात्यात जमा केलेली आहे. तथापि, बँकींग कामकाजाच्या रोजच्या परिचलनात वेळेचा फरक पडलेने तक्रारदाराचा चेक Clearing मधून परत गेल्यानंतर खात्यामध्ये रक्कमेची जमा नोंद झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र यांचा चेकपोटी घेतलेले चार्जेस तक्रारदाराच्या खात्यामध्ये प्रामाणिकपणे जमा केलेले आहेत. तसेच तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून त्यांच्या वयाचा विचार करुन त्यांना समजावलेले आहे. तक्रारदारांना कोणतेही कारण नसताना खोडसाळपणे तसेच सामनेवाला यांना त्रास देणेसाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची बदनामी होईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही. तक्रारदार रक्कम उकळण्यासाठी प्रस्तुतचा अर्ज दाखल केलेला आहे. सबब सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. तसेच सामनेवाला यांना विनाकारण खर्चात टाकल्यामुळे रक्कम रु.3,000/- तक्रारदाराकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
6) सामनेवाला यांनी त्यांचे बचावाप्रित्यर्थ सामनेवाला बँकेचे अधिकारी श्री राजीव रंजन यांचे प्रतिज्ञापत्र नि.21कडे दाखल केलेले आहे. त्यासोबत दि.20/09/11 चे अकौन्ट लेजर इन्क्वायरी एक्सट्रॅक्ट व दि.19/07/13 चे इनर्फोमेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट यांचेकडील ई-मेलची प्रत असे दोन कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यानंतर तक्रारदार यांचा लेखी युक्तीवाद नि.24 कडे व सामनेवाला यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद नि.25कडे दाखल केलेला आहे.
7) एकंदरीत तक्रारीचा आशय, पुरावा, युक्तीवाद ऐकला असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार अर्ज अंशत: मंजूर. |
08) मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत काय ?
स्पष्टीकरण :- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्र यांचे अवलोकन करता तक्रारदार हे हिंदू एकत्र कुटूंबातील कर्ता असून त्यांचे नांवे सामनेवाला बँकेमध्ये बचत खाते क्र.140010110002315 होते ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदार यांचे नांवे तीन ठेव पावत्या सामनेवाला बँकेमध्ये होत्या. त्यांची दि.20/09/11 रोजी मुदतपूर्ण होणार होती ही बाब सामनेवाला बँकेने मान्य व कबुल केली आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे खातेदार होते.सामनेवालाकडून बँकींग सेवा घेत होते ही बाब या मंचासमोर असलेल्या पुराव्यावरुन सिध्द होते. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होते या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
09) मुद्दा क्र.2 व 3 ः- सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? व काय आदेश ?
स्पष्टीकरण ः- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे ठेवलेली मुदत ठेवीची मुदत दि.20/09/11 रोजी संपत होती. दि.16/09/11 रोजी म्हणजेच 4 दिवस आधी तक्रारदाराने सामनेवाला यांना सदरच्या पावत्या सही करुन तसेच पत्र पाठवून आगाऊ कळविलेले होते. सदर पत्र पोहोचलेबाबत सामनेवाला बँकेने पोचदेखील दिलेली आहे. यावरुन एक गोष्ट शाबीत होते की, तक्रारदाराने सदरच्या पावत्या मुदतपूर्व बँकेकडे जमा केलेल्या होत्या. सबब दि.20/9/11 रोजी सकाळी ज्यावेळी बॅंकेकडे कामकाज सुरु झाले त्यावेळी सदर पावत्यांची रक्कम तक्रारदाराचे खात्यावर जमा करणे जरुरीचे होते. तथापि, सदरची रक्कम बॅंकेने तक्रारदाराचे खात्यामध्ये उशिरा जमा केलेचे दिसून येते. मुदत पूर्ण झालेल्या ठेवीची रक्कम मुदतपूर्ण झालेल्या दिवशी बँकेचे कामकाज असलेने जमा करणे बंधनकारक आहे. बँकेने परिचलनाचे फरकामुळे ही गोष्ट झाली व त्यांची चुक झाली याबाबत तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा केलेनंतर कळविले आहे. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार दि.20/09/11 रोजी ज्यावेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रचा चेक खात्यात नांवे पडला त्यावेळी दुपारी 12.55 वाजता तक्रारदाराचे खात्यात तेवढी रक्कम शिल्लक नव्हती. तसेच बँकेचे कामकाज वेळेत 10.30 ते 3.30 केव्हाही सदर रक्कम जमा करावयाची. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी दि.20/09/11 रोजी दुपारी 13.59 वाजता सदरची रक्कम जमा केली होती. म्हणून सामनेवाला यांचे म्हणणेनुसार सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारे सेवेमध्ये त्रुटी दिलेली नाही.
9) तक्रारादाराने दाखल केलेली कागदपत्रे पाहता चेक रिटर्न मेमो हा नि.4/4 कडे दाखल केलेला आहे. सदरचा रिटर्न मेमो Funds insufficient म्हणून परत आलेला आहे. तक्रारदाराने दिलेले एकूण 8 मुदत ठेव पावत्या चेक Funds insufficient म्हणून परत आलेने बँक ऑफ महाराष्ट्र ने तक्रारदारांना त्याचदिवशी मुदत ठेव पावत्या दिल्या नाहीत. तक्रारदाराने बँकेच्या विभागीय कार्यालयाशी दि.04/11/11 रोजी केलेला पत्रव्यवहार नि.4/9कडे हजर केलेला आहे. तसेच दि.17/12/11 रोजीचे पत्र नि.4/10कडे हजर केले आहे. दि.19/1/12 चे पत्र नि.4/12कडे हजर केले आहे. दि.23/04/12 चे पत्र नि.4/14कडे हजर केले आहे. तसेच तक्रारदाराचे पत्राला सामनेवाला यांचे झोनल ऑफिसकडून आलेले दि.26/12/11 चे उत्तर नि.4/11 कडे हजर केलेले आहे. दि.25/04/12 चे सामनेवाला यांनी दिलेले पत्र नि.4/15कडे हजर केलेले आहे. या पत्रांच्या मजकुरावरुन असे दिसून येते की, दि.20/09/11 रोजी क्लिअरींगचा चेक परत गेलेनंतर पावत्यांची रक्कम तक्रारदाराचे बचत खात्यामध्ये जमा केली. बँकेच्या रोजच्या कामकाजाच्या वेळेत परिचलनामध्ये फरक झालेने सदरचा चेक न वटता परत गेला. सदरचे पत्र बँकेने दिलगिरी व्यक्त करुन चुक माफ करणेची विनंतीदेखील केली आहे. तक्रारदाराचे तक्रार दाखल करतानाचे वय पाहता तक्रारदार हा हिंदू एकत्र कुटूंबाचा कर्ता तसेच ज्येष्ठ नागरीकदेखील आहे. सबब तक्रारदाराने 4 दिवस अगोदार कळवूनदेखील सामनेवाला यांनी त्यांची ठेव पावत्यांची रक्कम त्याचदिवशी बँकेचे कामकाज सुरु झालेबरोबर जमा करणेची आवश्यकता होती. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कडून आलेला चेक हा क्लिअरींगसाठी तक्रारदाराचे खात्यावर रक्कम जमा केलेनंतर पाठवणे आवश्यक होते. किंवा सदरच्या चेकची रक्कम खात्यावर जमा करेपर्यंत चेक न वटवता परत पाठविला गेला नसता तर बँकेने ग्राहकास योग्य ती सेवा पुरविलली असे म्हणता आले असते. तथापि, याबाबत सामनेवाला बँकेने विनाकारण घाई केलेचे दिसून येते. सबब तक्रारदाराचा चेक हा खात्यात पुरेशी रक्कम नसलेने न वटता परत गेला या गोष्टीचा परिणाम नक्कीच तक्रारदारावर होणे क्रमप्राप्त आहे. सदर चेक न वटता परत पाठवणेचे बँकेने दिलेले कारण हे योग्य व पटण्यासारखे नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराच्या खात्यावर तेवढयाच चेकची रक्कम जमा असूनही insufficient Funds म्हणून चक परत गेला त्यामुळे साहजिकच तक्रारदारांना जबरदस्त मानसिक धक्का सहन करावा लागला. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रमधील मुदत ठेव ठेवण्याची इच्छादेखील त्यादिवशी सफल झाली नाही. सबब एकंदरीत पुराव्यावरुन हे मंच या निर्णयाप्रत येत आहे की, सामनेवाला बँकेने तक्रारदारांना सदोष सेवा दिलेली आहे. तसेच सेवेमध्ये त्रुटी दिलेली आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत.
10) तक्रारदाराने या कामी First Appeal No.A/10/835 मध्ये दि.19/10/2010 रोजी मा. राज्य आयोग, मुंबई यांनी केलेला न्यायनिवाडा हजर केला आहे. सदर न्यायनिवाडयाचे अवलोकन केले असता सदरची घटना या तक्रारीतील घटनांशी साधर्म्य दाखवतात. सबब सामनेवाला यांनी सेवेत दिलेल्या त्रुटीमुळे तक्रारदार ज्येष्ठ नागरीक असलेमुळे त्यांना मानसिक धक्का बसला तसेच समाजातील त्यांचे पत-प्रतिष्ठेवर देखील परिणाम झाला. तक्रारदार हे टॅक्स पेअर असून त्यांनी टॅक्स भरलेबाबत अॅसेसमेंट उतारा याकामी दाखल केलेला आहे. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांची समाजातील अप्रतिष्ठा पैशाने भरणे शक्य नाही. तथापि, एकंदरीत घटनांचा तसेच पुराव्याचा विचार करता सामनेवाला बॅंकेने त्यांचे कर्तव्यात कसूर केल्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक नुकसान सोसावे लागले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे ही गोष्ट पुराव्यानिशी तक्रारदाराने शाबीत केलेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार सामनेवालांनी केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी रक्कम रु.10,000/- तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.27/08/12 पासून द.सा.द.शे.9 % रक्कम फिटेपर्यंत मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहेतक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो आणि पुढील आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास सेवेतील त्रुटीबाबत नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) अदा करावे तसेच सदर रक्कमेवर दि.27/08/2012 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज देणेचे आदेश पारीत करणेत येतात.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.5000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) सदरचे आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी 45 दिवसांत करावी. तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकेल.
5) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात / पाठविण्यात याव्यात.