रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.121/2008. तक्रार दाखल दि.10-11-2008. तक्रार निकाली दि.31-12-2008.
1. श्री.गोपाळ माधव पेंडसे, मु.पो.ता.खालापूर, जि.रायगड. ... तक्रारदार.
विरुध्द बँक ऑफ इंडियातर्फे शाखाधिकारी- खालापूर शाखा, खालापूर, जि.रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदार– स्वतः सामनेवालें– एकतर्फा आदेश. -निकालपत्र -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदाराने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत दाखल केली असून तिचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे. त्याचा मसाला तयार करण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्याला बँकेत खाते उघडणे आवश्यक होते म्हणून त्याने सामनेवालेच्या बँकेत खाते उघडले. खाते उघडतेवेळी त्याला त्यांनी तोंडी रु.5,000/- भरण्यासाठी सांगितले, त्याप्रमाणे त्यानी दि.28-3-06 रोजी रक्कम भरुन खाते उघडले. खाते उघडतेवेळी जो फॉर्म दिला होता, त्यात फक्त असे नमूद आहे की, जे नियम असतील ते आम्हांस मान्य आहेत. ते नियम कोणते त्याची माहिती त्याला देण्यात आली नव्हती किंवा ते नियम नोटीसबोर्डावर किंवा पासबुकात छापलेले नव्हते. त्याला दि.13-7-06 रोजी चेकबुक देण्यात आले व त्यापोटी रु.75/- पूर्वसूचना न देता कापले. नंतर आणखी रु.5,000/- भरण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे त्याने दि.23-12-06 रोजी आणखी रक्कम भरुन कमीत कमी शिल्लक रु.10,000/- केली. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 5 ऑगस्ट 06 पासून 4 मार्च 07 अखेर प्रत्येक महिन्यास रु.60/- प्रमाणे रक्कम कापली गेली. ते सतत रक्कम कापत असल्यामुळे त्याबाबत पत्र घेऊन बँकेत गेले असता त्यांचे पत्र घेण्यास नकार देऊन अर्ज देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी दि.3-1-07 रोजी अर्ज दिला. त्यास उत्तर न आल्याने दि.20-2-07 रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले. त्यालाही उत्तर न आल्याने दि.7-9-07 रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले. त्याबाबतही उत्तर न आल्याने समक्ष चौकशी केली असता तुमची पत्रे वरील कार्यालयाकडे पाठवली होती पण ती हरवली आहेत, तरी तुम्ही पुन्हा मूळ अर्जाच्या प्रती दया असे सांगून त्यांच्याकडून पुन्हा प्रती घेतल्या.
2. या पत्रास दि.1-10-07 रोजी सामनेवालेनी अचानक उत्तर दिले की, नियमाप्रमाणे पैसे कापले आहेत व तशी सूचना नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. वेबसाईटवरही सूचना उपलब्ध आहे. त्याची अशी तक्रार आहे की, नोटीस फलकावर सूचना लावली असती तर त्याने त्याच्या पहिल्या अर्जालाच उत्तर देऊन तसे कळवले असते. तसे त्यांनी कळवले नाही, यावरुन त्यांचा खोटपणा दिसतो. तसेच वेबसाईट पहाणे हे मला शक्य होणार नाही. प्रत्येक साधारण माणूस वेबसाईट पहातोच असे म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांचे हे उत्तर चुकीचे आहे. मुळातच ग्राहकाचे नुकसान होईल अशी नियमावली त्यानी प्रसिध्द केलेली नाहीच.
3. त्यांनी त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे त्यामुळे त्यांचे रु.480/- चे नुकसान झाले आहे. तो ज्येष्ठ नागरिक आहे त्यामुळे त्यास मानसिक त्रास सोसावा लागला. तरी त्याने तक्रार अशी दाखल केली आहे की, त्याला मानसिक त्रासापोटी रु.3,000/-दयावेत व त्याचे खात्यातून जी रक्कम रु.480/- कमी केली आहे ती त्याला परत करण्याचा आदेश व्हावा. 4. अर्जासोबत त्याने नि.2 अन्वये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.3 सोबत एकूण 5 कागद दाखल केले असून त्यात त्याने बँकेला दिलेली तीन पत्रे, तसेच बँकेकडून आलेले दि.1-10-07 चे उत्तर, पासबुकाच्या प्रती इ.दाखल केले आहे. 5. तक्रार दाखल झाल्यानंतर नि.4 अन्वये सामनेवाले बॅकेला नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीस सामनेवालेना मिळाली आहे, त्याची पोच नि.5 अन्वये आहे. नोटीस मिळूनही सामनेवाले गैरहजर राहिले आहेत. मंचाने त्यांना त्यांचे म्हणणे दाखल करण्यासाठी योग्य संधी दिली. योग्य वेळेत ते हजर झाले नाहीत, म्हणून त्याचेविरुध्द दि.22-12-08 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारित केला. त्यानंतर दि.30-12-08 ही एकतर्फा चौकशीसाठी नेमण्यात आली. 6. दि.30-12-08 रोजी तक्रारदार व सामनेवाले गैरहजर होते. तक्रारदार गैरहजर असला तरी तक्रारीचा निकाल कागदपत्रावरुन देण्याचा अधिकार मंचाला असल्याने तक्रारदार गैरहजर असल्याने काढून न टाकता तिचा निर्णय कागदपत्रावरुन दयावा या निष्कर्षाप्रत मंच आल्यामुळे या तक्रारीचा निर्णय देत आहे. त्यासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात-
मुद्दा क्र.1- तक्रारदाराना सामनेवालेकडून दोषपूर्ण सेवा मिळाली आहे काय? उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 – तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करणे योग्य होईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 – 7. या कामी सामनेवाले नोटीस मिळूनही गैरहजर आहेत. सामनेवाले ही राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यांचेकडून योग्य तो प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. पण तो मिळालेला नाही. या कामी तक्रारदारांचा अर्ज वाचला, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. तक्रारदार हा ज्येष्ठ नागरिक आहे. त्याने संबंधित शाखाधिका-यांना वेळचेवेळी पत्रे देऊन रक्कम परत मिळण्यासाठी कळवले आहे. त्यास त्यांनी एकूण तीन स्मरणपत्रे दिली आहेत. त्याचे उत्तर न देणे ही सुध्दा सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. दि.1-10-07 रोजी जे उत्तर दिले आहे त्याद्वारे त्यांनी असे कळविले आहे की, बँकेच्या नियमाप्रमाणे आम्ही रक्कम कापली आहे व यासंदर्भातील नियम बँकेच्या नोटीसबोर्डावर लावले आहेत, तसेच वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. याठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की, तक्रारदार म्हणतो त्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती वेबसाईट पहाते काय? त्याचे उत्तर नाही म्हणावे लागेल. तसेच बँकेने नोटीसबोर्डावर नियमावली लावल्याचे नमूद केले आहे. तक्रारदाराची मुळात तक्रारच अशी आहे की नोटीसबोर्डावर नियम लावलेले नव्हते व ते छापलेलेही नाहीत. वास्तविकतः सामनेवालेंनी त्यांचे म्हणणे योग्य प्रकारे मांडण्याची त्यांची जबाबदारी आहे. ते या कामी हजर नाहीत. तक्रारदाराने दाखल केलेल्या पत्राप्रमाणे बँकेच्या नोटीसबोर्डावर जर नोटीस लावली होती असे मानले तर ती नोटीस तक्रारदाराने तक्रार केली त्यावेळी अस्तित्वात होती हे निर्विवादपणे दाखवण्याची त्यांची जबाबदारी आहे. याकामी असे झालेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार अमान्य करण्याचे काही कारण नसल्याचे मंचाचे मत आहे. तसेच त्यास खोटी तक्रारही दाखल करण्याचे काही कारण नाही. तक्रारदाराने त्यांची तक्रार निर्विवादपणे कागदपत्राचे आधारे योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. सामनेवालेकडून त्यास आवश्यक ती सेवा मिळाली नसल्याचे मंचाचे मत आहे. वास्तविक दोषरहित सेवा देण्याची जबाबदारी ही सामनेवालेची आहे. तक्रारदाराच्या संमतीशिवाय व कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्याचे खात्यावरुन मिनिमम बॅलन्सपोटी व चेकबुक दिल्यापोटीच्या रकमा त्याचे खात्यातून कमी करणे व त्यासंदर्भात कोणतीही सूचना नोटीस बोर्डावर न लावणे ही कृती दोषपूर्ण सेवा असल्याचे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 - 8. तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली गेल्याचे दिसून आले तर त्यांचा अर्ज मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचास वाटते. याकामी सामनेवालेकडून तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली गेली असल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारदार हा ज्येष्ठ नागरिक असून त्याने मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व त्याची कमी केलेली रक्कम रु.480/- ही परत मागितली आहे. त्यास मानसिक त्रास झाला आहे त्याप्रमाणे त्याचे मागणीप्रमाणे त्याला रु.3,000/- दयावेत तसेच त्याचे जे अकारण रु.480/-बँकेने कापलेले आहेत ते त्यांस सव्याज परत करावेत असा आदेश करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी मागितलेली रक्कम योग्य आहे त्यामुळे ती कमी करु नये असे मंचास वाटते. वास्तविकतः तक्रारदारास योग्य ती सेवा देण्याची जबाबदारी संबंधित शाखाधिका-यांची आहे. तक्रारदाराने दिलेले अर्ज वेळोवेळी शाखाधिका-यांनी स्विकारुनही त्यास मार्गदर्शन केले नाही, त्यामुळे त्यास वारंवार स्मरणपत्रे दयावी लागली, तसेच खाते उघडताना सर्व नियम समजावण्याची जबाबदारीही शाखाधिका-यांचीच आहे. ती त्यानी या कामी पार पाडल्याचे दिसत नाही. तसेच ग्राहकाच्या खात्यात बँकेने स्वतःहून काही रक्कम जमा केली किंवा नावे टाकली तर त्याबाबत सूचना (Advice) देण्याची जबाबदारी ही संबंधित शाखाधिका-यांची आहे. त्यामुळे त्यांनी ती पार न पाडल्याने तक्रारदाराचे जे नुकसान झाले आहे ते देण्याची जबाबदारी त्याचेवर टाकावी असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज खर्चासह खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे- -ः आदेश ः- सामनेवालेनी खालील आदेशांचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे- 1. तक्रारदाराच्या बचत खाते क्र.सी-डी-102 मधून त्यांनी कमी केलेली रक्कम रु.480/- (रु.चारशे ऐंशी मात्र) त्याच्या खात्यात पुन्हा जमा करावी ही रक्कम त्यांनी ज्या ज्या तारखेला कमी केली तेव्हापासून ते पूर्ण रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करेपर्यंत त्यावर 5% प्रमाणे व्याज दयावे. 2. सामनेवाले बँकेने तक्रारदारास रक्कम रु.3,000/- (रु.तीन हजार मात्र)त्यांस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी तसेच न्यायिक खर्चापोटी दयावेत. 3. सामनेवालेना असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी वरील आदेशाचे पालन करावे, तसेच वर उल्लेख केलेली सर्व रक्कम रु.3,480/- ही दि.13-7-06 पासून दि.5-3-07 अखेर जे शाखाधिकारी सामनेवाले बँकेत कार्यरत होते त्यांचेकडून ती वसूल करावी व ती वसूल केल्याचे मंचास कळवावे. 4. सामनेवालेनी याप्रमाणे कलम 1 व 2 प्रमाणे रकमा न दिल्यास या सर्व रकमा द.सा.द.शे. 5% दराने वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. 5. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दिनांक- 31-12-2008. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |