CC 131-2011.doc
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर
तक्रार क्रमांक : 131/2011
दाखल दिनांक : 28/11/2011
वि.प.नोटीस तामील दि. : 23/01/2012
निकाल पारीत दिनांक : 19/06/2012
कालावधी : 04 महिने.
27 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता : ओमनाथ नथ्युजी डोणारकर,
वय-26 वर्ष, व्यवसाय शेती,
मु.पाली, उमरी, पोस्ट माऊली,
तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर
विरुध्द
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष : शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ इंडीया,
पानशिवनी शाखा, जिल्हा नागपूर
गणपुर्ती :– 1) श्री.विजयसिंह ना. राणे -- मा.अध्यक्ष
2) श्रीमती जयश्री येंडे -- मा.सदस्या
उपस्थिती :– तक्रारदारातर्फे वकील श्री डी.आर. भेदरे/
श्री सुरेंद्र एन.चिचबनकर/श्री प्रविण डेहनकर
गैरअर्जदार तर्फे श्री अवधुत पुरोहित / श्री विनोद महंत
CC 131-2011.doc
::निकालपत्र::
(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक –19 जून, 2012 )
1. अर्जदार/तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली प्रस्तूत तक्रार गैरअर्जदार विरुध्द वि.न्यायमंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदार/तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त.क.चे मालकीची उपरोक्त नमुद पत्त्यावर स्वमालकीची शेती आहे. त.क. हा अशिक्षीत आहे. त.क.ने ट्रॅक्टर व ट्राली खरेदी करीता गैरअर्जदार बँकेच्या शाखेतून सन 2008 मध्ये कर्ज घेतले होते. अशाप्रकारे त.क. हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे. कर्ज देताना को-या दस्तऐवजावर त.क.च्या स्वाक्ष-या घेण्यात आल्यात. सदर ट्रॅक्टरचा क्रमांक-MH-40-L-450 व ट्रॉलीचा क्रं-MH-40-L-577 असा आहे. त.क.ला प्रतीवर्ष रुपये-84,000/- अधिक व्याज या प्रमाणे कर्ज फेडावयाचे होते.
3. त.क.चे पुढे असे म्हणणे आहे की, कर्जाचे परतफेडीसाठी गैरअर्जदार बँकेने धमकावल्यामुळे आईला मानसिक धक्का बसून तिचे निधन झाले. आईचे आजारपण आणि शेतीची नापिकी यामुळे त.क. कर्जाचे परतफेडीचे हप्ते नियमित भरु शकला नाही, या बाबीची कल्पना गैरअर्जदार बँकेस दिली. अशी स्थिती असताना, गैरअर्जदार बँके तर्फे गुंड व्यक्तीनी त.क.चे अनुपस्थितीत दिनांक-18.03.2010 रोजी ट्रॅक्टर उचलून नेला. वस्तुतः ट्रॅक्टर जप्त करण्यापूर्वी लेखी नोटीस देणे आवश्यक होते. अशाप्रकारे गै.अ.बँकेनी त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त.क.ने गैरअर्जदार विरुध्द दि.17.10.2011 रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी, जि.नागपूर येथे रिपोर्ट केला परंतु कार्यवाही झाली नाही.
4. त.क.चे पुढे असेही म्हणणे आहे की, त्याने कर्ज खात्याचा हिशेब गैरअर्जदार बँकेकडे मागितला परंतु गैरअर्जदार बँकेने तो कधीही दिला नाही. ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे व्यवसायिक रुपये-1.00 लक्ष रुपयाची हानी झाली. त.क.ने गैरअर्जदारास दिनांक 14.10.2011 रोजी नोटीस पाठविली परंतु तिला गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही
4. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे गैरअर्जदाराने त.क.चा ट्रॅक्टर परत करण्याचे आदेशित व्हावे. त.क.यास गैरअर्जदार बँकेने कर्ज खात्याचा हिशोब द्यावा. त.क.यास प्रतीदिन रुपये-500/- या प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-1.00 लक्ष व तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- गैरअर्जदार कडून मिळावेत अशी मागणी केली.
5. प्रस्तुत प्रकरणात यातील गैरअर्जदारास रजिस्टर पोस्टाने न्यायमंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली. गैरअर्जदार बँके तर्फे संबधितांनी उपस्थित होऊन न्यायमंचा समक्ष पान क्रं 39 ते 43 वर लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर सादर केले. गैरअर्जदाराने प्राथमिक आक्षेप घेतला की, त.क. हे त्यांचे ग्राहक होत नसल्याने तसेच तक्रार मुदतबाहय असल्याने व तक्रारीत आवश्यक प्रतिपक्ष सामील न केल्यामुळे तक्रार खारीज व्हावी तसेच सदर प्रकरणात सखोल साक्षीपुरावा होणे आवश्यक असल्याने न्यायमंचाचे मर्यादित क्षेत्रात निकाल होऊ शकत नसल्याचे नमुद केले. त.क.ने केलेली अन्य विपरीत विधाने नाकबुल केलीत.
6. गैरअर्जदार बँके तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, त.क.ने त्यांचे कडून कर्ज घेतल्याची बाब मान्य केली. कर्जा संबधाने त.क.ने डिमांड प्रामिसरी नोट आणि हायपोथिकेशन कम लोन अग्रीमेंटवर सही केली असून ते या सोबत दाखल करीत असल्याचे नमुद केले. हायपोथिकेशन कम लोन एग्रीमेंट मधील पान क्रं 6, परिच्छेद क्र 10 मध्ये गैरअर्जदारास कर्ज परतफेडीमध्ये अनियमिता झाल्यास ट्रॅक्टर आपले ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे नमुद आहे, त्यानुसारच त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
7. गैरअर्जदार बँकेनी पुढे असेही नमुद केले की, त.क.चे कर्ज खात्याचा उतारा ते सोबत जोडत असून त्यावरुन लक्षात येईल की, त.क..चे लेजर बॅलन्स दिनांक-31.05.2011 रोजी रुपये-8,27,340/- एवढे आहे, यावरुन असे दिसून येईल की, त.क.ने बँकेच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. गैरअर्जदार बँकेनी ट्रॅक्टर जप्त करण्यापूर्वी त.क.यास दिनांक 27.11.2010 रोजीची नोटीस देऊन 07 दिवसाचे आत कर्जाची परतफेड करण्यास कळविले होते व असे न केल्यास ट्रॅक्टर ताब्यात घेऊन विक्री करण्यात येईल असे सुध्दा नमुद करण्यात आले होते. सदर नोटीसची प्रत अवलोकनार्थ सोबत जोडली असल्याचे गै.अ. यांनी नमुद केले. तसेच ट्रॅक्टर विक्रीची निवीदा दिनांक 17.07.2011 रोजीच्या लोकमत व सकाळ वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली होती. अशाप्रकारे गैरअर्जदार बँकेचा संपूर्ण व्यवहार कायदेशीर असून त.क.ची तक्रार ही तथ्यहिन असल्याचे गै.अ.नमुद करतात.
8. गैरअर्जदार बँके तर्फे नमुद करण्यात आले की, त.क.ने कराराचा भंग केला आहे आणि सार्वजनिक पैशाचे वसुलीसाठी त्यांनी त.क. विरुध्द कार्यवाही केलेली आहे. सबब तक्रार तथ्यहिन असल्याने खारीज व्हावी, असा उजर गैरअर्जदार बँके तर्फे घेण्यात आला.
9. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 7 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये 7/12 उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस रिपोर्ट, नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. त.क.ने पान क्रं 65 वरील यादी नुसार श्री रोशन गोपाळ डोणारकर यांचा प्रतिज्ञालेख दाखल केला तसेच प्रतिउत्तरा दाखल प्रतिज्ञालेख दाखल केला. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
10. गैरअर्जदार बँके तर्फे लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल करण्यात आले. सोबत पान क्रं 44 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये प्रामुख्याने त.क.चे कर्जा संबधाने डिमांड प्रामीसरी नोट, हायपोथिकेशन कम लोन एग्रीमेंट, कर्ज खात्याचा उतारा, ट्रॅक्टर जप्ती संबधातील नोटीस, टेंडर नोटीस अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. गैरअर्जदार बँकेनी पान क्रं 78 वरील यादी नुसार मा.वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयाच्या प्रती दाखल केल्यात.
7. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
8. तक्रारकर्त्याची लेखी तक्रार, गैरअर्जदार/विरुध्दपक्षाचा लेखी जबाब आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व उभय पक्षांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
9. यातील गैरअर्जदाराने दाखल केलेल्या खाते उता-या प्रमाणे आणि उपलब्ध दस्तऐवजा वरुन, गैरअर्जदार यांनी, तक्रारकर्ता यांचेकडे रुपये-8,27,340/-एवढी रक्कम प्रलंबित असल्याचे दर्शविले आहे. तक्रारकर्त्याने योग्य वेळी कर्जाची परतफेड केलेली नाही, ही बाब स्वतःच मान्य केलेली आहे आणि तक्रारकर्त्या कडील संबधित ट्रॅक्टर दिनांक-18.03.2010 रोजी गैरअर्जदारांनी ताब्यात घेतल्या नंतर प्रस्तुत तक्रार ही त्यानंतर जवळपास दिड वर्षा पेक्षा जास्त कालावधी नंतर दाखल केलेली आहे, त्यामुळे ती सदभावी दिसत नाही.
10. गैरअर्जदार/विरुध्दपक्षाने आपली भिस्त ( AIR 2010 (NOC) (Supp) 468 (NCC) ) या ठिकाणी प्रकाशित झालेल्या Surendra Kumar Agarwal-V/s-Telco Finance Ltd. & Anr. या निकालावर ठेवली. आम्ही, सदर निकालाचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याची प्रस्तुत तक्रार ही मंजूर होण्यास पात्र नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
11. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, न्यायमंच प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार गैरअर्जदार विरुध्द खारीज करण्यात येते.
2) प्रस्तुत प्रकरणाचा खर्च, ज्याचा त्यांनी सहन करावा.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.
(जयश्री येंडे) (विजयसिंह ना. राणे)
सदस्या अध्यक्ष
अतिरिक्त जिल्हा ग्राहक न्यायमंच, नागपूर