:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–11 जुन 2020)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 बॅंके विरुध्द दोषपूर्ण सेवे बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेमध्ये बचत खाते असून त्याचा खाते क्रमांक-920310100015558 असा आहे व त्याने ए.टी.एम.व्दारे पैसे काढण्याची सुविधा घेतलेली आहे. तो दिनांक-26.08.2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेतील ए.टी.एम.केंद्रावर रक्कम काढण्यासाठी गेला होता व त्याने ए.टी.एम.कॉर्डचा वापर करुन रुपये-15,000/- काढण्याचा प्रयत्न केला, व्यवहार पूर्ण होऊन मशीन मधून नोटा मोजण्याची प्रक्रिया सुरु झाली परंतु प्रत्यक्षात ए.टी.एम. मधून रक्कम निघाली नाही व ट्रान्झीक्शन पावती सुध्दा बाहेर आली नाही. त्याचे भ्रमणध्वनीवर मात्र रुपये-15,000/- त्याचे बॅंक खात्या मधून वजाती झाल्याचा संदेश आल्याने त्याने त्वरीत ए.टी.एम.केंद्रावरील सुरक्षा रक्षकाशी संपर्क साधला परंतु सदर सुरक्षा रक्षक त्याचे खोलीमधून बाहेर आला नाही व त्याने दुस-या बॅंकेच्या ए.टी.एम. मधून पैसे काढण्याचा सल्ला दिला. नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने त्याच दिवशी म्हणजे दिनांक-26.08.2017 रोजी स्टेशन रोड वरील भारतीय स्टेट बॅंकेच्या ए.टी.एम. मधून रुपये-10,000/- काढले. त्याने आपले बचतखात्या मधील व्यवहाराच्या नोंदी घेतल्या असता त्याचे असे निदर्शनास आले की, दिनांक-26.08.2017 रोजी रुपये-15,000/- आणि दिनांक-27.08.2017 रोजी रुपये-10,000/- काढल्याची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात त्याने रुपये-10,000/- दिनांक-26.08.2017 रोजीच काढले असताना त्याची नोंद दिनांक-27.08.2017 रोजी दर्शविल्या गेली. त्याने बॅंकेच्या नियमा प्रमाणे 07 दिवस वाट बघीतली परंतु त्याचे बचतखात्यात रुपये-15,000/- परत जमा झाल्याची नोंद आली नसल्याने तो दिनांक-01 सप्टेंबर, 2017 रोजी वि.प.क्रं 1 बॅंकेत गेला व त्याने तेथील कर्मचारी श्रीमती नेपाले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वाट बघण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही त्याने वेळोवेळी बॅंक कर्मचारी श्रीमती नेपाळे यांचेशी संपर्क साधला असता त्या वि.प.क्रं 2 बॅंकेशी सी.सी.टी.व्ही.फुटेज विषयी बोलल्यात. त्यानंतर त्याने वि.प.क्रं 2 बॅंकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला परंतु त्यांनी ज्या शाखेत बचत खाते आहे तिथेच संपर्क साधण्यास सांगितले. वि.प.क्रं 1 बॅंकेच्या कर्मचारी श्रीमती नेपाले यांनी लेखी तक्रार करण्यास सांगितले. त्याने दिनांक-01 सप्टेंबर, 2017 नंतर सातत्याने वि.प.क्रं 1 बॅंकेकडे मौखीक तक्रारी केल्या असता बॅंकेनी ए.टी.एम.सेल मुख्य कार्यालय बांद्रा ईस्ट मुंबई यांचेशी संपर्क साधला असता मुंबई येथील ए.टी.एम.सेलने वि.प.क्रं 1 बॅंकेला दिनांक-22 सप्टेंबर, 2017 रोजी पत्र लिहून नमुद केले की, तक्रारकर्त्याची तक्रार त्यांना दिनांक-19 सप्टेंबर, 2017 रोजी प्राप्त झाली असून पुढे असे नमुद केले की, “Transaction was successful as per electronic journal data available with us”
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने वि.प.क्रं 1 बॅंकेमध्ये दिनांक-01 सप्टेंबर, 2017 व त्यानंतर सातत्याने तक्रारी केल्या नंतर वि.प.क्रं 1 बॅंकेनी सदर ए.टी.एम.केंद्रा मधील व्यवहाराचे सी.सी.टी.व्ही.फुटेज मागावयास हवे होते कारण जर सी.सी.टी.व्ही.फुटेज मिळाले असते तर तक्रारीची शहानिशा करता आली असती परंतु वि.प.क्रं 1 बॅंकेनी असे काहीही केलेले नाही व संबधित सुरक्षा रक्षकाचे बयान सुध्दा नोंदविले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे त्याला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. त्याने दिनांक-14.10.2017 रोजी वि.प.क्रं 1 बॅंकेकडे लेखी पत्र दिले परंतु त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने ग्राहक पंचायत भंडारा यांचे मार्फतीने वि.प.क्रं 1 बॅंकेस पत्र दिले असता दिनांक-25.04.2018 रोजीचे उत्तरामध्ये सदर ए.टी.एम.व्यवहार यशस्वी झाल्याचे नमुद केले. त्याने दिनांक-17 मे, 2018 रोजी वि.प.क्रं 1 बॅंकेला पत्र दिले असता त्यांनी वकीलाचे मार्फतीने उत्तर दिले परंतु आज पर्यंत त्याला सदर ए.टी.एम.व्यवहाराची रक्कम मिळालेली नाही म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
तक्रारकर्त्यास ए.टी.एम. मशनी मधून कपात केली परंतु प्रत्यक्षात न मिळालेली रक्ककम रुपये-15,000/- त्याला वि.प.क्रं 1 बॅंके कडून देण्याचे आदेशित व्हावे. त्याचे बचत खात्यात ए.टी.एम.व्यवहार दिनांका पासून 07 दिवसाचे आत ए.टी.एम.व्यवहाराची रक्कम जमा न झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणा नुसार प्रतीदिन रुपये-100/- प्रमाणे 333 दिवसां करीता रुपये-33,300/- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून देण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी त्याला कोणतेही मार्गदर्शन न केल्यामुळे तसेच योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे रुपये-5000/- वि.प.क्रं 2 बॅंके कडून मिळावेत. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बॅंकांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000 आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- वि.प.क्रं 1 व क्रं 2 बॅंके कडून त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं 2) बॅंक ऑफ इंडीया तर्फे मुख्य प्रबंधक भंडारा शाखा यांनी एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं -31 ते 36 वर ग्राहक मंचात दाखल केले. त्यांनी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 2 राजीव गांधी चौक शाखेच्या ए.टी.एम. केंद्रावरुन दिनांक-26.08.2017 रोजी व्यवहार केल्याची बाब मान्य केली परंतु सदर ए.टी.एम.व्यवहाराची रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झाली नसल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं 2 बॅंकेच्या ए.टी.एम.केंद्रा मध्ये दिनांक-26.08.2017 रोजी सकाळी 08.31 वाजता गेला होता व त्याने रक्कम रुपये-15,000/- काढल्याची नोंद बॅंकेच्या संगणकात झालेली आहे. त्यानंतर तो दुसरे दिवशी दिनांक-27.08.2017 रोजी स्टेट बॅंकेच्या ए.टी.एम.केंद्रात सकाळी 09.38 वाजता गेला होता व तेथून रक्कम रुपये-10,000/- काढले होते व त्याची नोंद सुध्दा बॅंकेच्या संगणकामध्ये झालेली आहे. दिनांक-26.08.2017 व दिनांक-27.08.2017 या दोन दिवशी बॅंकेला सुट्टी असल्यामुळे सदर व्यवहाराच्या नोंदी बॅंकेच्या कामाच्या दिवशी म्हणजे दिनांक-28.08.2017 रोजी संगणकावर दिसत आहेत. सुटटीचे दिवसां मध्ये झालेल्या बॅंक व्यवहाराच्या नोंदी या सुट्टी नंतर येणा-या बॅंकेच्या कामकाजाच्या दिवशी येतात. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने दिनांक-26 ऑगस्ट, 2017 रोजी भारतीय स्टेट बॅंके मधून ए.टी.एम.व्दारे पैसे काढले होते हे म्हणणे संपूर्णपणे खोटे असून त्याला कोणताही पुराव्याचा आधार नाही. तक्रारकर्त्याची तक्रार आल्या नंतर त्यांनी बॅंकेच्या व्हेंडर जो ए.टी.एम.व्यवहार पाहतो त्यांना कळविले असता त्यांनी जर रक्कम निघाली नसेल तर ती रक्कम संबधित खातेधारकाच्या खात्यात 03 दिवसात जमा होते परंतु तक्रारकर्त्याचा सदरचा ए.टी.एम.व्यवहार यशस्वी झाल्या बाबतचा रिपोर्ट बॅंकेच्या व्हेंडर यांनी दिलेला आहे व ONUS isg रेकॉर्ड प्रमाणे तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते. तक्रारकर्त्याची तक्रार त्यांना दिनांक-19 सप्टेंबर, 2017 रोजी प्राप्त झाल्या नंतर त्यांनी पाहणी केली असता व्यवहार यशस्वी झाल्याचे आढळून आले. तक्रारकर्त्याने वारंवार वि.प.बॅंकेकडे पाठपुरावा केल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने दिनांक-14 ऑक्टोंरब, 2017 रोजी वि.प.क्रं 1 बॅंकेकडे पत्र दिल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने दिनांक-17.05.2018 रोजी वि.प.क्रं 1 बॅंकेला पत्र दिले होते,त्या पत्राचे उत्तर दिनांक-20 जुन, 2018 रोजी बॅंकेच्या वकीलांचे मार्फतीने देऊन सदर दिनांक 26.08.2017 रोजीचा ए.टी.एम.व्यवहार यशस्वी झाल्या बाबत त्याला कळविण्यात आले होते. ए.टी.एम.व्यवहाराचे सीसीटीव्ही फुटेज हे व्यवहाराचे दिनांका पासून 03 महिन्या पर्यंत ठेवण्यात येतात मात्र तक्रारकर्त्याने 03 महिन्या नंतर मागणी केल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाहीत. सबब तक्रारकर्त्याची तक्रार ही खोटी व योग्य त्या पुराव्या अभावी असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेव्दारे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 10 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने दिनांक-28.08.2017 पर्यंतच्या नोंदी असलेल्या बॅंकेच्या खाते बुकाची प्रत, त्याने वि.प.बॅंकेला दिनांक-14.10.2017 रोजी दिलेल्या पत्राची प्रत, ज्यावर वि.प.बॅंकेची पोच नाही तसेच वि.प.बॅंकेला दिनांक-17.05.2018 रोजी दिलेले पत्र ज्यावर ते मिळाल्याची बॅंकेची पोच आहे. ग्राहक पंचायत भंडारा तर्फे वि.प.बॅंकेला दिनांक 31 मे, 2018 रोजी दिलेले पत्र, वि.प.बॅंकेनी त्यांचे वकीलांचे मार्फतीने दिनांक-20.06.2018 रोजी दिलेले उत्तर, वि.प. बॅंकेनी ए.टी.एम.सेलला दिनांक-04 ऑक्टोंबर, 2017 रोजी वादातील ए.टी.एम.व्यवहारा बाबत दिलेले पत्र, ए.टी.एम.सेलने दिनांक 25 एप्रिल, 2018 रोजी एटीएमसेलने वादातील एटीएम व्यवहार यशस्वी झाल्या बाबत दिलेले पत्र, एटीएम सेलने विरुध्दपक्ष बॅंकेला दिनांक-19 सप्टेंबर, 2017 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 22 सप्टेंबर, 2017 रोजी दिलेला अहवाल ज्याव्दारे ए.टी.एम.ट्रान्झीक्शन यशस्वी झाल्याचे दिलेले आहे, अयशस्वी एटीएम व्यवहारा बाबत रिझर्व्ह बॅंकेचे दिनांक 27 मे, 2011 रोजीचे परिपत्रक, दिनांक-26.08.2017 रोजी त.क.चे भ्रमणध्वनीवर वादातील व्यवहारा बाबत आलेल्या संदेशाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्त्याने पान क्रं 46 ते 53 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 57 ते 61 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं 2 बॅंके तर्फे एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं -31 ते 36 वर ग्राहक मंचात दाखल केले. तसेच पान क्रं 39 व 40 वर त.क.च्या एटीएम व्यवहारा बाबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. वि.प. तर्फे पान क्रं 54 वरील दाखल पुरसिस प्रमाणे त्यांचे लेखी उत्तरालाच पुरावा समजण्यात यावा असे नमुद करण्यात आले. पान क्रं 55 व 56 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 64 ते 67 वर 180 दिवसाचा कालावधी उलटून गेल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्या बाबत बॅंकेचा दस्तऐवज दाखल केला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज तसेच बॅंकेचे लेखी उत्तर, लेखी युक्तीवाद व दाखल दसतऐवज इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले त्याच बरोबर उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद एैकला असता ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा विरुध्दपक्ष बॅंकेचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | विरुध्दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्त्याने पुराव्यानिशी सिध्द केली काय? | -नाही- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
07. प्रस्तुत तक्रारीतील दाखल दस्तऐवज आणि उभय पक्षांचे कथन यावरुन तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया शाखा गजानन चौक, भंडारा येथील बॅंकेत खाते असून त्याने त्या सोबत ए.टी.एम.सुविधा घेतल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक ऑफ इंडीया शाखा राजीव गांधी चौक येथील ए.टी.एम.केंद्रावरुन दिनांक-26 ऑगस्ट, 2017 रोजी व्यवहार केल्याची बाब सुध्दा उभय पक्षांना मान्य असून दाखल दस्तऐवजावरुन सुध्दा ही बाब सिध्द होते. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने वि.प.बॅंके कडून सेवा घेतलेली असल्याने तो वि.प.बॅंकेचा ग्राहक होतो आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने उपस्थित केलेला संक्षीप्त वादाचा मुद्दा असा आहे की, त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या ए.टी.एम.केंद्रामधून दिनांक-26.08.2017 रोजी त्याचे ए.टी.एम.कॉर्डव्दारे रुपये-15,000/- काढण्यासाठी व्यवहार केला होता. परंतु त्याचे तक्रारी नुसार त्याने ए.टी.एम.कॉर्डचा वापर करुन रुपये-15,000/- काढण्याचा प्रयत्न केला, व्यवहार पूर्ण होऊन मशीन मधून नोटा मोजण्याची प्रक्रिया सुरु झाली परंतु प्रत्यक्षात ए.टी.एम. मधून रक्कम निघाली नाही व ट्रान्झीक्शन पावती सुध्दा बाहेर आली नाही. त्याचे भ्रमणध्वनीवर मात्र रुपय-15,000/- त्याचे बॅंक खात्या मधून वजाती झाल्याचा संदेश आला.
09. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेच्या युक्तीवादा प्रमाणे तक्रारकर्ता हा वि.प.क्रं 2 बॅंकेच्या ए.टी.एम.केंद्रा मध्ये दिनांक-26.08.2017 रोजी सकाळी 08.31 वाजता गेला होता व त्याने रक्कम रुपये-15,000/- काढल्याची नोंद बॅंकेच्या संगणकात झालेली आहे. त्यानंतर तो दुसरे दिवशी दिनांक-27.08.2017 रोजी स्टेट बॅंकेच्या ए.टी.एम.केंद्रात सकाळी 09.38 वाजता गेला होता व तेथून रक्कम रुपये-10,000/- काढले होते व त्याची नोंद सुध्दा बॅंकेच्या संगणकामध्ये झालेली आहे. दिनांक-26.08.2017 व दिनांक-27.08.2017 या दोन दिवशी बॅंकेला सुट्टी असल्यामुळे सदर व्यवहाराच्या नोंदी बॅंकेच्या कामाच्या दिवशी म्हणजे दिनांक-28.08.2017 रोजी संगणकावर दिसत आहेत. सुटटीचे दिवसां मध्ये झालेल्या बॅंक व्यवहाराच्या नोंदी या सुट्टी नंतर येणा-या बॅंकेच्या कामकाजाच्या दिवशी येतात. तक्रारकर्त्याचा सदरचा ए.टी.एम.व्यवहार यशस्वी झाल्या बाबतचा रिपोर्ट बॅंकेच्या व्हेंडर यांनी दिलेला आहे व ONUS isg रेकॉर्ड प्रमाणे तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते. तक्रारकर्त्याची तक्रार त्यांना दिनांक-19 सप्टेंबर, 2017 रोजी प्राप्त झाल्या नंतर त्यांनी पाहणी केली असता व्यवहार यशस्वी झाल्याचे आढळून आले. ए.टी.एम.व्यवहाराचे सीसीटीव्ही फुटेज हे व्यवहाराचे दिनांका पासून 03 महिन्या पर्यंत ठेवण्यात येतात मात्र तक्रारकर्त्याने 03 महिन्या नंतर मागणी केल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाहीत.
10. ग्राहक मंचा तर्फे प्रकरणात दाखल दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार वि.प.बॅंकेनी पान क्रं 39 व 40 वर अकाऊंट लेजर इन्क्वायरीचा दस्तऐवज दाखल केला, त्यामध्ये दिनांक-26.08.2017 रोजी सकाळी 08.31.42 वाजता त.क.चे खात्यातून रुपये-15,000/- उचल केल्याची नोंद आहे. त्याच प्रमाणे दिनांक-27.08.2017 रोजी सकळी 09.38.01 वाजता त.क.चे खात्यातून रुपये-10,000/- उचल केल्याची नोंद आहे. पान क्रं 23 वर वि.प.बॅंकेच्या ए.टी.एम. सेल बांद्रा इस्ट मुंबई यांनी दिनांक-22.09.2017 रोजी वि.प.बॅंकेला कळविले की, वि.प. बॅंकेची तक्रार त्यांना दिनांक-19.09.2017 रोजी प्राप्त झालेली असून त्याव्दारे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याचा वादातील रुपये-15,000/- चा ए.टी.एम.व्यवहार हा ईलेक्ट्रानीक जर्नल डाटा प्रमाणे यशस्वी झालेला आहे. तसेच विरुध्दपक्ष बॅंकेनी पान क्रं 64 ते 67 वर बॅंकेच्या इन्फरमेशन अॅन्ड टेक्नॉलाजी डिपार्टमेंट नागपूर यांनी 25 जुलै, 2019 रोजी वि.प.बॅंक भंडारा यांना पाठविलेल्या दस्तऐवजाची प्रत दाखल केली, त्यामध्ये वादातील व्यवहारानंतर 180 दिवस उलटून गेल्याने सी.सी.टी.व्ही. फुटेज उपलब्ध होऊ शकत नाही असे कळविले आहे.
11. तक्रारकर्त्याचा वादातील रक्कम रुपये-15,000/- चा एटीएम व्यवहार हा दिनांक-26 ऑगस्ट, 2017 रोजी झालेला आहे परंतु तक्रारकर्त्याने सीसीटीव्ही फुटेजची मागणी लेखी स्वरुपात विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडे दिनांक-17 मे, 2018 रोजी केल्याचे दिसून येते. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्त्याने वादातील एटीएम व्यवहारा नंतर जवळपास 09 महिने उशिराने सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली आहे, जेंव्हा की बॅंकेच्या नियमा नुसार सी.सी.टी.व्ही. फुटेज हे वादातील व्यवहाराचे दिनांका पासून 90 दिवसा पर्यंत राखून ठेवल्या जातात, त्यामुळे तक्रारकर्त्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करुन देण्याची मागणी सुध्दा मुदती नंतर उशिराने केल्याची बाब सिध्द होते.
12. उपरोक्त नमुद पुरावे पाहता तक्रारकर्त्याने त्याचे वादातील ए.टी.एम. व्यवहारा बाबत योग्य तो पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी त्याला दोषपूर्ण सेवा दिली असल्याची बाब सिध्द होत नाही म्हणून आम्ही मुद्दा क्रं 02 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 02 चे उत्तर नकारार्थी आल्याने, मुद्दा क्रं 03 अनुसार तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्यावरुन आम्ही प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ इंडीया, शाखा गजानन चौक, भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बॅंक ऑफ इंडीया शाखा राजीव गांधी चौक, भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
03) सर्व पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
04) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.